* फोनवरचं बोलणं तुमच्यापुरतं राहू द्या.. कदाचित आलेला फोन तुमच्या कामाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असेल तरी तो तुमच्या सहकाऱ्यांसाठी उपयुक्त असेल असे नाही. गॉसिपसारखाच सहकाऱ्यांना तुमच्या फोनवरच्या बोलण्याचाही त्रास होऊ शकतो. तुमचे कार्यालयात फोनवरील बोलणे हे मृदू भाषेतील, मोजके आणि इतरांना कामात व्यत्यय न आणणारे असे हवे. लँण्डलाइनवर आलेला फोन तर कधीही स्पीकर फोनवर टाकू नये.
* काम करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो, मात्र उद्धटपणाला थारा नको. कामाच्या बाबतीत तुमच्या चांगल्या कल्पना असतील तर त्या जरूर व्यक्त करा. मात्र, इतरांच्या कल्पनांचाही पुरेसा आदर करा.
* इतरांच्या कामाचा अनादर नको. बहुसंख्य कार्यालयांमधील प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटत असते की आपणच अधिक काम करतो आणि माझे इतर सहकारी मात्र त्या तुलनेत कमी काम करतात. सहकाऱ्यांच्या कामाची टिप्पणी करताना प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचे बलस्थान हे वेगळे असते हे ध्यानात घ्यायला हवे.
* तुम्हाला नोकरी बदलायची असल्यास नव्या कामाचा शोध हा आता तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात, तिथे घेऊ नये. नव्या नोकरीसाठी सद्य नोकरीतील स्रोत वापरू नयेत. तुमची वर्तणूक ही सद्य नोकरीबाबत आदर आणि विश्वासाला तडा जाणारी ठरेल. तसेच तुमच्या नोकरी बदलण्यासंदर्भातील तुमचा विचार तुम्ही कामाच्या ठिकाणी कुणासमोर मांडलात तर तो गॉसिपचा मुद्दा ठरेल तसेच तुमचा आताचा पदभारही धोक्यात येईल.
* तुमच्या कार्यालयातील वातावरण आणि तिथे वावरणाऱ्यांच्या मानसिकतेनुसार तुमचा पेहराव असावा. यासाठी उत्तम म्हणजे तुमच्या वरिष्ठांचा पेहराव कसा असतो ते ध्यानात घ्या. सदोदित फॉर्मल पेहराव करणे किंवा नेहमी कॅज्युअल पेहरावात वावरणे या दोन्हीही गोष्टी चुकीच्या आहेत.
* गॉसिप नको- गॉसिपचे स्रोत बनू नका किंवा त्यात सहभागीही होऊ नका. गॉसिपमुळे तुम्ही कामापासून दूर जाता आणि कार्यालयात अव्यावसायिक वातावरणाची निर्मिती करता.