वाचन म्हणजे आपल्या कक्षा रुंदावणं. ज्ञानाचं भांडार, माहितीचा खजिना. म्हणूनच भरपूर वाचा. अनेक जण वाचायला वेळ लागतो म्हणून वाचत नाहीत. पण जो जास्त वाचतो, त्याचा वेग जास्त असतो आणि ज्याचा वेग जास्त तो जास्त वाचतो. निष्कर्ष सांगतात की, हुशार मुले जास्त वाचतात आणि जास्त वाचणारी हुशार होतात. म्हणूनच वाचनाकडे पाठ फिरवू नका.

मनसोक्त पुस्तके वाचा. इंग्रजी आणि मराठीही. यामुळे शब्दभांडार समृद्ध होईल, लेखन कसं असावं हे नकळत, कळत जाईल. जेव्हा तुम्ही पुस्तक आवडलं/आवडलं नाही अशा कॉमेंट्स करता तेव्हा नकळत तुम्ही पुस्तकाचं परीक्षण करत असता. जी सवय खूप उपयुक्त ठरते. फावल्या वेळात, प्रवासात, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरूर वाचा. एखादं मासिक, विशेषांक वा पुस्तक हातात आल्यावर ‘अमूक इतक्या तासांत/दिवसांत’ वाचून पूर्ण करण्याचा निश्चय करा. काही चरित्रांचं वाचन करा. पुढील शिक्षणासाठी तुम्ही जे विषय निवडणार त्यासंदर्भात वाचून ते क्षेत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अजून नोकरी शोधायला वेळ असला तरी ‘एम्लॉयमेंट न्यूज’ जरूर वाचा. त्याचे संपादकीय वाचा. यामुळे किती प्रकारचे अभ्यासक्रम, नोकऱ्या उपलब्ध आहेत याचा अंदाज येईल. विविध स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका यात असतात. त्या तोंडी सोडवा. यातून तुम्हाला तुमच्या वाचनाची, प्रयत्नांची दिशा आपोआप मिळेल. एखाद्या वहीत जे वाचलं त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव लिहून ठेवा. त्यातला आवडलेला विचार, वाक्यांची नोंद ठेवा. पुढे केव्हातरी संदर्भासाठी याचा नक्की उपयोग होतो. जे वाचलंत त्याबद्दल घरात किंवा मित्रांशी बोला. म्हणजे ते पुस्तक आपोआप तुमच्या स्मरणात राहील. पुस्तक आवडलं वा उपयुक्त वाटलं तर इतरांना ते वाचण्याचा जरूर सल्ला द्या. आपल्याला भावेल असं पुस्तक निवडणं हीसुद्धा कला आहे.
पुस्तकाचं पहिलं, शेवटचं पान, प्रस्तावना, लेखकाचं मनोगत नजरेखालून घाला. तुम्हाला पुस्तकाचा आशय, उद्देश समजायला मदत होईल.
वाचनाचा वेग वाढवणं हे एक स्वतंत्र तंत्र आहे. त्याचा सराव वेगवेगळ्या प्रकारे करावा लागतो. तज्ज्ञांच्या मदतीने किमान सहा महिने तंत्र हस्तगत करणं आणि वर्षभर त्याचा सराव केल्याने तुमचा वाचनवेग कित्येक पटीने वाढू शकतो.
वाचनतंत्र विकसित करायला शिकवणारी पुस्तकंही उपलब्ध आहेत. मात्र वाचनतंत्राचा सराव नित्यनेमाने करणं आवश्यक ठरतं. किमान काही सवयी लावून घेतलीत, पथ्ये पाळलीत तरी वाचनाचा वेग किमान दुप्पट होईल.

* झोपून वाचू नका. वाचताना फेऱ्या मारू नका.
* पुस्तक किमान १० ते १२ इंच अंतरावर धरा.
* उजेड पुरेसा असू दे. मात्र प्रकाश डोळ्यांवर वा पुस्तकांवर येणार नाही, असे पाहा.
* पुस्तक वाचताना मान, पाय हलवणं, केसांशी चाळा करणं अशा अनावश्यक हालचाली टाळा.
* पुस्तकावरून पेन व बोट फिरवणं टाळा. समजा, तुम्हाला
एखादी ओळ सुटेल-वाचली जाणार नाही अशी भीती वाटत असेल तर पुस्तकाच्या आकाराची २’’ते ३’ रुंदीची पांढऱ्या कागदाची पट्टी जी ओळ वाचता त्या खाली ठेवा. वाचता वाचता पट्टी खाली सरकवा.
* मोठय़ानं वाचणं टाळा. काहींना आपल्याशीच वाचतानाही मोठय़ानं वाचण्याची सवय असते. यामुळे वेगावर मर्यादा पडतात.
* सुट्टीतलं हे वाचन परीक्षेसाठी नाही तर तुमच्या व्यक्तिमत्त्व समृद्धीसाठी आहे. म्हणूनच जे वाचलं ते आठवायचा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. डोळे थकले तर पामिंग करा व डोळ्यावर पाण्याचे हबके मारा.
* एखादा उतारा, कविता पाठ केलीत तरी चालेल. न जाणो मुलाखतीत, गटचर्चेमध्ये याचा फायदा होईल.
* एक पान वाचून पूर्ण होण्यापूर्वीच वरच्या कोपऱ्यातून पुस्तकाचं पान उचलून धरा. बुकमार्कचा उपयोग करण्याऐवजी पान क्रमांक लक्षात ठेवा.
* पुस्तकं वाकवणं, पानं दुमडणं, नीट न हाताळणं, पुस्तकाला थुंकी लावणं, त्यावर खुणा करणं, लिहिणं, चित्रांना विकृत करणं अशा गोष्टी टाळा.
* वृत्तपत्र न चुकता वाचा. त्यातील अग्रलेख वा इतर सदरलेखन आवर्जून वाचा. मोठय़ा अक्षरांतील हेडलाइन्स वाचून बातमीचा अंदाज घ्या. एकच बातमी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिली गेलेली असते, ते समजून घ्या. वृत्तपत्रातील मजकूर उभ्या रकान्यात छापलेला असतो.
* श्रवण-ऐकणे हा एक महत्त्वाचा ज्ञानस्रोत आहे हे आपण विसरलो आहोत. त्याचं स्मरण ठेवा.

goreanuradha49@yahoo.in

Story img Loader