परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच महाविद्यालयीन विद्यार्थी गांभीर्याने अभ्यासाला सुरुवात करतात. वर्षभर लेक्चर्स ऐकणे, वाचन, नोट्स काढणे सुरूच असते. परीक्षेची तारीख समोर आली की मगच अभ्यासाला गती येते. वेगवेगळे विषय, ढीगभर नोट्स.. मग प्रश्न पडतो, अभ्यासाला सुरुवात कुठून करावी व कशी? महाविद्यालयीन अथवा विद्यापीठाच्या परीक्षांकरता नुसतीच घोकंपट्टी फारशी उपयोगी पडत नाही, तर अधिकाधिक मार्क मिळवण्याकरता योजनाबद्ध अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. नुसतेच पाठांतर करण्याऐवजी स्मरणशक्तीच्या तंत्रांचा वापर करून ‘स्मार्ट’ अभ्यास करता येईल.
परीक्षेची पूर्वतयारी
* प्रत्येक विषयाचा नेमून दिलेला अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न व परीक्षेचा कालावधी यांची अचूक माहिती करून घ्या. याकरता मित्र-मत्रिणी किंवा इंटरनेटवर विसंबून न राहता विद्यापीठाच्या अधिकृत अभ्यासक्रमाचा आधार घ्या. हा अभ्यासक्रम महाविद्यालयांतील प्राध्यापकांकडे किंवा महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध असतो. परीक्षेच्या संरचनेच्या आधारे अभ्यासाचे नियोजन केल्यास तो अधिक परिणामकारक होईल.
* प्रश्नपत्रिकेत पर्याय दिले असल्यास विद्यार्थी अभ्यासक्रमातील काही भाग आपल्या अभ्यासातून वगळतात अर्थात ऑप्शनला टाकतात. जरी पर्याय उपलब्ध असले तरी कोणताही भाग पूर्णपणे वगळू नका. थोडक्यात उत्तर लिहिता येईल इतपत तयारी वगळलेल्या भागाचीही करा.
* मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवून त्यांचे नीट वाचन करा. प्रत्येक युनिटवर आधारित कोणते प्रश्न विचारले गेले आहेत त्यांची यादी करा. संपूर्ण पुस्तक/नोट्सचा अभ्यास करण्यापेक्षा अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तयार करण्यावर भर द्या.
* विषयाशी संबंधित सर्व पुस्तके व नोट्स एकत्र करा. प्रश्नांप्रमाणे त्यांचे वर्गीकरण करा. प्रत्येक युनिटमधील मुख्य संकल्पना (थीम) टिपून घ्या व त्याखाली उप-संकल्पना (सब-थीमस्) लिहून काढा. अभ्यास करताना एका वेळेस एक संकल्पना पूर्ण करूनच पुढच्या संकल्पनांकडे वळा.
* नोट्सचे प्रमाण व वेळेची कमतरता पाहून मनावर दडपण येऊ शकते. एका वेळेस संपूर्ण विषयाचा विचार न करता एका युनिटवर लक्ष केंद्रित करा. त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यावर आणखी एक युनिट अशा सोप्या, सहजसाध्य भागांमध्ये अभ्यास करा. यामुळे तणावमुक्त राहून बराच अभ्यास पूर्ण करता येईल.
* नोट्स वाचताना महत्त्वाचे शब्द/मुद्दे अधोरेखित करा. त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण वाचून, उदाहरणे समजून घ्या. मग नोट्स बंद करून सर्व प्रमुख मुद्दे आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा. लक्षात न राहिलेल्या मुद्दय़ांची उजळणी करा किंवा ते दोन-तीन वेळा लिहून काढा.
* थोडा वेळखाऊ असला तरी लिहून केलेला अभ्यास सर्वात उत्तम. म्हणूनच म्हटले जाते- kI hear and I forget, I read and I remember, I write and I understand.l
* माहितीचे संक्षिप्त रूप : एखाद्या संकल्पनेची अनेक वैशिष्टय़े, एखाद्या घटनेची अनेक कारणे किंवा परिणाम लक्षात ठेवण्यासाठी Acronym तयार करा. Acronym म्हणजे अनेक शब्दांची पहिली अक्षरे घेऊन तयार केलेला शब्द.
* कल्पनाचित्रांचा वापर : लांबलचक परिच्छेदातील माहिती पाठ करणे कठीण वाटते. अशा सविस्तर माहितीची आकृती किंवा कल्पनाचित्राच्या स्वरूपात मांडणी करा. बुलेट पॉइंटस्, तक्ते, ट्री डायग्रॅम, माइंड मॅप किंवा फ्लो चार्टच्या स्वरूपात माहिती लिहून काढल्यास ती लक्षात ठेवायला अधिक सोपी बनते. आशयाच्या प्रकाराप्रमाणे योग्य आकृतिबंधाचा वापर केल्यास फायदेशीर ठरतो. उदा. बाजारपेठेचे प्रकार व उपप्रकार ‘ट्री डायग्रॅम’च्या स्वरूपात लिहिता येतील तर एखाद्या रासायनिक प्रक्रियेचे संक्षिप्त वर्णन ‘फ्लो चार्ट’ वापरून उत्तमरीत्या करता येईल. अशी कल्पनाचित्रे तयार केल्यामुळे सविस्तर नोट्स संक्षिप्त होतात, तसेच परीक्षेपूर्वी उजळणी करतानाही वेळ वाचतो.
* अशा संक्षिप्त नोट्स तयार करायला अभ्यास गट उपयोगी ठरतो. प्रत्येकाने वेगवेगळ्या संकल्पनांची कल्पनाचित्रे तयार केली तर अल्पावधीत संपूर्ण अभ्यासक्रमाच्या संक्षिप्त नोट्स तयार होतील.
* व्याख्या, सूत्रे, नियम यांसारखे महत्त्वाचे मुद्दे मात्र शब्दश: आत्मसात करा. ते मोठय़ा अक्षरांत लिहून सतत नजरेस पडतील अशा ठिकाणी लावा. महत्त्वाच्या मुद्दय़ांची रोज उजळणी करा.
* रंगांचा वापर – रंगीत पेनांनी लिहिलेली / अधोरेखित केलेली माहिती लक्षात राहण्यास मदत होते. एकाच प्रकारच्या माहितीकरता एकच रंग वापरल्यास उत्तम. उदा. तुमच्या नोट्समधील प्रत्येक व्याख्या लाल शाईने अधोरेखित करा. तसेच प्रत्येक उदाहरण हिरव्या शाईच्या कंसात टाका. पेपर लिहिताना रंगाच्या साहाय्याने माहिती आठवणे सोपे ठरते.
अभ्यासाचे नियोजन
* वेळेचे व सरावाचे नियोजन करणे ही यशस्वी अभ्यासाची पहिली पायरी आहे. आपल्याला उपलब्ध असलेले दिवस व अभ्यास करायचे विषय यांची योग्य सांगड घालून वेळापत्रक तयार करा. सर्व विषयांना जवळपास सारखा वेळ देतानाच कठीण वाटणाऱ्या एखाद्या विषयाकरता अतिरिक्त वेळ राखून ठेवा.
* एका दिवशी एकाच विषयाचा अभ्यास करण्याऐवजी दर दोन-तीन तासांनी वेगळा विषय हातात घ्या. कठीण किंवा जड विषयाच्या अभ्यासानंतर सोपा वाटणारा विषय वाचला तर कंटाळा येणार नाही व तणावही जाणवणार नाही.
* परीक्षेच्या आधी शक्य तितके अधिक दिवस अभ्यासाकरता द्या. शेवटच्या चार-पाच दिवसांत संपूर्ण विषय समजून घेऊन लक्षात ठेवणे अशक्यच. अनेक विद्यार्थी परीक्षेपूर्वी तीन-चार रात्री जागून सर्व नोट्स पाठ करण्याचा प्रयत्न करतात. पेपर समोर आल्यावर मात्र त्यांना काहीच आठवेनासे होते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी परीक्षेच्या बरेच दिवस आधी अभ्यासाला सुरुवात करा. योग्य वेळी सुरुवात केल्यास रोज फक्त तीन-चार तास अभ्यासही पुरेसा ठरतो. तणावमुक्त मनाने केलेले वाचन व लेखन अधिक परिणामकारक होते.
लेखनाचा सराव
प्रत्येक विषयाचे मुख्य मुद्दे व्यवस्थित अभ्यासणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच संपूर्ण उत्तरे लिहिण्याचा सरावही आवश्यक आहे. छायाप्रती (झेरॉक्स)च्या स्वस्त व सहज उपलब्ध असलेल्या सोयीमुळे अनेक विद्यार्थ्यांना रोज लिहिण्याची सवय नसते. नोट्स काढणेसुद्धा मोबाइल फोन किंवा इंटरनेट वापरून केल्यामुळे लेखनाचा वेग अतिशय कमी असतो. परीक्षेत मात्र पेन-कागद वापरूनच उत्तरे लिहावी लागतात हे लक्षात घेऊन दररोज न चुकता लेखनाचा सराव करा.
* लेखनाचा सराव करताना प्रत्येक उत्तर परीक्षेत अपेक्षित असलेल्या स्वरूपातच लिहून काढा. काही प्रश्न वस्तुनिष्ठ असतात, काहींसाठी सविस्तर निबंधात्मक उत्तरे लिहावी लागतात तर काहींसाठी आकृती किंवा तक्ते काढणे आवश्यक असते. प्रत्यक्ष परीक्षेत आपण हे उत्तर लिहीत आहोत असे समजूनच लेखनाचा सराव करा.
* उत्तरे लिहून काढताना लागणाऱ्या वेळाकडे काटेकोर लक्ष ठेवा. सुरुवातीला एखादे उत्तर लिहायला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. नियमित सरावानंतरच कमी वेळात जलद लिहिणे जमू शकते. आपल्या लेखनाच्या वेगाप्रमाणे प्रत्येक उत्तर लिहायला प्रत्यक्ष परीक्षेत आपण किती वेळ देऊ शकतो हे पक्के ठरवून घ्या.
* उत्तरे लिहायला जरुरीपेक्षा अधिक वेळ लागत असला तर सर्व मुद्दय़ांची पुन्हा उजळणी करा. काय लिहावे हे आठवण्यात फार वेळ घालवला तर संपूर्ण पेपर सोडवणे कठीण होईल. उत्तराचा आशय चांगला लक्षात असेल तरच वेगाने लिहिणे शक्य होते.
* दर दीड-दोन तासांनी अभ्यासामधून दहा मिनिटांचा लहानसा ब्रेक घ्या. थोडासा आराम करा, कुणाशी गप्पा मारा किंवा बाहेर फेरफटका मारून या.
* सतत एकाच विषयाचा किंवा एकाच प्रकारचा अभ्यास करून कंटाळा येतो. त्यामुळे प्रत्येक ब्रेकनंतर अभ्यासाच्या पद्धतीत बदल करा. उदा. पाठांतराऐवजी लेखन.
परीक्षेच्या कालावधीत..
* परीक्षेच्या काळात अभ्यासापासून मन विचलित करणारे सर्व अडथळे कठोरपणे दूर करा. मोबाइल फोन बंद ठेवा किंवा किमान त्याचा आवाज तरी २्र’ील्ल३ करा. वारंवार येणाऱ्या संदेशांच्या रिंगटोन्समुळे अभ्यासात सतत व्यत्यय येतो व अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. शक्य असल्यास परीक्षेच्या काळात वॉटस्अॅपसदृश अॅप्स चक्क ४ल्ल्रल्ल२३ं’’ करा व फेसबुक खाते २४२स्र्ील्ल िकरा. असे केल्याने अभ्यास तर चांगल्या रीतीने होईलच, पण परीक्षा संपल्यानंतर पुन्हा नव्याने सोशल मीडिया वापरण्याचा आनंद अनुभवता येईल.
* पेपरच्या आधी रात्री किमान सहा-आठ तास शांत झोप अतिशय आवश्यक असते. आपण वाचलेली/लिहिलेली सर्व माहिती नीट आत्मसात करायला मेंदूला झोपेची गरज असते. ‘नाइट मारणे’ किंवा रात्रभर जागून केलेल्या अभ्यासामुळे मेंदूवर ताण तर येतोच, पण डोळे व शरीरालाही थकवा जाणवतो. अशा थकलेल्या अवस्थेत तुम्ही परीक्षेला १०० टक्के न्याय देऊ शकत नाही व त्याचा विपरीत परिणाम मार्कावर दिसतो.
* अधिक काळ जागे राहून अभ्यास पूर्ण करण्याकरता सतत चहा/कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स पिणे अतिशय हानीकारक आहे. यामुळे जागरण जरी शक्य होत असले तरी तब्येतीवर मात्र वाईट परिणाम होतो व या सगळ्याची सवय (addiction)जडण्याचा धोकाही असतो.
परीक्षेच्या दिवशी :
* परीक्षेच्या आधी काही तास महत्त्वाच्या मुद्दय़ांची उजळणी करा. व्याख्या, सूत्रे, तारखा नजरेखालून घाला.
* परीक्षा केंद्रावर पोचल्यानंतर मन शांत ठेवा. मित्र-मत्रिणींपकी कुणी किती अभ्यास केला आहे याचे स्वत:शी तुलना करण्याचे टाळा. यामुळे मनावर निष्कारण दडपण येऊ शकते. ‘मी ही परीक्षा लिहायला तयार आहे व सर्व उत्तरे व्यवस्थित लिहू शकेन’ असा सकारत्मक विचार करा.
प्रश्नपत्रिका सोडवताना
* प्रश्नपत्रिका हातात मिळण्यापूर्वी डोळे मिटून मन एकाग्र करा.
* प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर उत्तरे लिहिण्याची घाई करू नका. प्रथम सुरुवातीच्या सूचनांसकट संपूर्ण प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा. दिलेल्या पर्यायांपकी तुम्ही जे प्रश्न सोडवणार आहात ते निवडा. हे करण्यासाठी तुमच्या वेळेच्या नियोजनात तीन-चार मिनिटांचा वेळ राखून ठेवा. सर्वाधिक चांगले येत असलेले उत्तर प्रथम सोडवा.
* शेवटच्या पानावर दिलेल्या रफ वर्कच्या जागेत उत्तराचे संक्षिप्त मुद्दे टिपून घेऊन मगच प्रत्यक्ष उत्तर लिहायला सुरुवात करा. ही खबरदारी घेतल्याने लिहिण्याच्या नादात एखादा महत्त्वाचा मुद्दा विसरला जात नाही.
* प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पूर्वनियोजित वेळेचे काटेकोर पालन करा. उदा. १५ मार्काचे उत्तर लिहायला २५ मिनिटे देता येतात. २५ मिनिटांत तुमचे उत्तर लिहून पूर्ण झाले नसल्यास ते तसेच अपूर्ण सोडून पुढील प्रश्न सोडवायला घ्या. चांगले मार्क मिळवण्यासाठी संपूर्ण पेपर सोडवणे महत्त्वाचे असते.
* संख्यात्मक दृष्टिकोनातून पाहता १५ मार्काचे उत्तर अपूर्ण राहिल्यास तीन-चार मार्काचे नुकसान होते. मात्र सुरुवातीच्या प्रश्नांची उत्तरे पूर्ण करण्याच्या अट्टहासामुळे शेवटचा प्रश्नच अनुत्तरित राहिला तर थेट १५ मार्काचे नुकसान होते. एखाद-दुसरे उत्तर अपूर्ण राहिले तरीही पेपरमधील प्रत्येक प्रश्न अवश्य सोडवा.
* उत्तरे लिहिताना परीक्षेच्या नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. उदा. उत्तरे लिहिण्यासाठी/अधोरेखित करण्यासाठी लाल/हिरव्या शाईचा वापर टाळा. तसेच आकृतींव्यतिरिक्त सर्व उत्तरे पेनानेच लिहा.
* उत्तरे योग्य स्वरूपात सादर करा (मुद्दे, तक्ता इ.) आणि ती योग्य लांबीची असल्याची खात्री करून घ्या. अपेक्षेपेक्षा अधिक लिहिल्याने वेळ तर वाया जातोच, पण त्यासाठी अतिरिक्त मार्कही दिले जात नाहीत.
* वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी तुम्हाला सर्वाधिक योग्य वाटणारे एकच उत्तर लिहा. अशा प्रश्नांना दोन उत्तरे लिहिली किंवा एकच प्रश्न दोन प्रकारे सोडवून ठेवला तर मार्क दिले जात नाहीत.
* शेवटच्या १० मिनिटांत संपूर्ण पेपर पुन्हा नजरेखालून घाला. सर्व उत्तरांना योग्य क्रमांक दिले आहेत का हे तपासून पाहा. उरलेल्या सात-आठ मिनिटांत अपूर्ण राहिलेले एखादे उत्तर पूर्ण करता येईल. हे करताना प्रथम राहिलेले सर्व मुद्दे लिहून काढा व वेळ मिळाल्यास सविस्तर लिहा.
* परीक्षेची तयारी करताना मेहनतीइतकाच महत्त्वाचा असतो विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन. कमी वेळात सर्व अभ्यास करणे अशक्य आहे असे गृहीत धरणारे विद्यार्थी परीक्षा लिहिण्याचे टाळतात. किंवा त्याहून धोकादायक अशा कॉपीसारख्या प्रकारांकडे वळतात. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योजनाबद्ध पद्धतीने नियमित स्मार्ट अभ्यास केल्यास कोणत्याही परीक्षेत यश मिळवणे अवघड नाही.