जमाना वेगाचा- इन्स्टण्ट गोष्टींचा आहे. इन्स्टण्ट फूड, वेगवान वाहने, हाय स्पीड इंटरनेट, आपल्याला सगळ्याच गोष्टी झटपट व्हायला हव्या आहेत. कोणत्याही गोष्टीचे लगेचच रिझल्टस हवे असणे, या सगळ्याची लाट खरे तर गेली साठेक वर्षे- दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापासून सुरू झाली आहेच आणि तिचा वेग झपाटय़ाने वाढतोच आहे. बदलते तंत्रज्ञान, त्यातून जन्माला आलेले माहितीयुग (इन्फम्रेशन एरा) आणि त्या अनुषंगाने बदललेली जीवनशैली, या सगळ्याचे पडसाद अर्थातच आपल्या रोजच्या जगण्यावर झाले आहेत. आपल्या आयुष्यात येणारे ताणतणाव, आपण ते कसे हाताळतो, आपली सुख-दु:खाची व्याख्या.. सगळीकडे हे जाणवते आहे, दिसते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या पिढीने आपल्या आईवडीलांकडून, आजी-आजोबांकडून ‘धीर’ नसण्यावर किती बोलणी खाल्ली असतील? त्या काळी धीर धरता येणे हा सद्गुण मानला जायचा आणि धीर धरण्यासाठी आपल्याला वेगळे असे काही करावे नाही लागायचे. अगदी दुकानात गेले की, पुढचा माणूस हटल्याशिवाय दुकानदाराचे तोंडही दिसत नसे. तेव्हा मॉल्स नव्हते ना! सायकल भाडय़ाने आणायची तर कुणी तरी ती नेलेली परत देईपर्यंत थांबा. खेळणे पाहिजे असल्यास वाढदिवसापर्यंत थांबा. बससाठी थांबा (रिक्षांचा पर्याय नव्हता), एसटीसाठी थांबा, मग बसायला मिळायला थांबा आणि त्यापुढे खिडकी मिळायला थांबा.. काय झाले यामुळे? या सगळ्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर काही परिणाम झाला का? असेल तर काय झाला?
१९६० आणि १९७०च्या दशकात झटपट इन्स्टण्ट समाधान हवे असण्याच्या आणि त्याच्या नेमके उलटे म्हणजे काही तरी मिळवण्यासाठी थांबता येणे, या प्रवृत्तीवर मोठय़ा प्रमाणावर मानसशास्त्रीय दृष्टीतून अभ्यास झाले. स्टॅनफर्ड युनिव्हर्सटिीच्या प्रोफेसर वॉल्टर मिशेल आणि त्यांच्या टीमने या संदर्भात साडेतीन ते साडेपाच-सहा वयोगटातील (प्री स्कूल वयोगट) मुलांबरोबर केलेले प्रयोग ‘मार्शमेलोज एक्सपिरिमेन्ट्स’ म्हणून प्रसिद्ध आहेत. या प्रयोगात मुलांना एका रिकाम्या खोलीत सोडले जायचे. खोलीत एक टेबल-खुर्ची असायची. टेबलावर कोणता तरी खाऊ ठेवलेला असायचा. प्रयोगात अनेकदा हा खाऊ म्हणून मार्शमेलोज वापरले गेले. म्हणून या प्रयोगाला ‘मार्शमेलोज एक्सपिरिमेन्ट्स’ असे नाव मिळाले. लगेच खाल्ले तर एक मार्शमेलो मिळेल आणि साधारण पंधराएक मिनिटे थांबायची तयारी असेल, तर दोन मार्शमेलोज मिळतील, असे मुलांना सांगितले जायचे आणि मग सांगणारा तिथून निघून जायचा.
या प्रयोगातल्या मुलांनी त्या १५ मिनिटांत काय काय केले याचे चित्रीकरण झाले. ते फारच गमतीशीर होते. काहींनी सूचना देणाऱ्याची पाठ वळताच खाऊ तोंडात टाकला. काहींना हसू आले. काही टक लावून खाऊकडे पाहत राहिले, तर काहींनी त्याचा वास घेणे, त्याला हाताळत वेळ काढण्याचा प्रयत्न केला. काहींनी मोह होऊ नये, म्हणून डोळेच बंद करून घेतले. ज्यांना पूर्ण १५ मिनिटे धीर धरवला नाही, त्यांनी मध्येच खाऊ मटकावून टाकला. काही मात्र पूर्ण वेळ थांबू शकले. अर्थातच त्यांना आणखी एक खाऊ मिळाला.
वरकरणी १५ मिनिटांचा वाटणारा हा प्रयोग प्रत्यक्षात पुढची अनेक वर्षे सुरू राहिला. या प्रयोगात भाग घेतलेली सगळी मुले आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या आघाडय़ांवर काय करतात, याचा मागोवा घेण्यात आला. अभ्यास, ताणतणाव हाताळता येणे, खाण्यापिण्याच्या सवयी, मोहाला बळी पडणे, व्यसनाधीन होणे, नातेसंबंध – या सगळ्याला ही मुले कशी सामोरी जातात, याचा अभ्यास थोडीथोडकी नाही तर सुमारे ४० वर्षे करण्यात आला. वेगवेगळ्या टप्प्यांवर या अभ्यासाचे जे निष्कर्ष बाहेर आले, ते मानसशास्त्रीय अभ्यासाचे मोठे मानदंड ठरले आहेत. काय होते हे निष्कर्ष.. जी मुलं थांबू शकली, ती मुलं टीनएजमध्ये जास्त स्थिर होती, त्यांचे अभ्यासातले मार्क्स चांगले होते. ताणतणाव हाताळायची, मोहाच्या क्षणांना सामोरे जाण्याची त्यांची क्षमता थांबू न शकणाऱ्या मुलांपेक्षा अनेकपटींनी जास्त होती. स्वाभाविकच या मुलांमधले व्यसनाधीनतेचे प्रमाणही खूपच कमी होते. अगदी अलीकडे म्हणजे २०११ मध्ये या मुलांचे ‘ब्रेन इमेजिंग’ही झाले, एव्हाना ही मुले चाळिशीपारची प्रौढ झाली होती. त्याचे निष्कर्षही आधीच्यांशी सुसंगतच आले.
खरे तर ही प्रयोगांची मालिका आहे. दर वेळी छोटे छोटे बदल करून हे प्रयोग केले जात आहेत. डिलेड ग्रॅटिफिकेशन- काही दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी लगेचचे छोटे मोह टाळता येणे, त्यासाठी थांबता येणे- ही संकल्पना या प्रयोगांनी दिली. एकंदरच स्वयंनियंत्रण आणि यशापयशाचा संबंध या प्रयोगांनी अधोरेखित केला आहे.
मुलांच्या यशस्वी, सुखी आयुष्यासाठी सर्वतोपरी कष्ट घेताना, पालक म्हणून हे भान सतत राखणे म्हणूनच महत्त्वाचे आहे. मुलांनी मागितलेल्या सगळ्या गोष्टी तात्काळ हजर करणे, त्यांना कशाचीच तोशीस पडू न देणे, कायम त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी करत राहणे यातून थांबण्याचे मोल कळतच नाही. ‘मूल ते सक्षम व्यक्ती’ या प्रवासात या थांबण्यातून खूप काही हासील होते. त्याबद्दल पाहू या पुढच्या लेखात..

mithila.dalvi@gmail.com

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fascination problem in childrens
Show comments