samajक्वालिटी टाइम ही आधुनिक काळाने आपल्याला दिलेली संकल्पना आहे. पालकत्वाच्या संदर्भात ती खूपदा वापरली जाते. मुलांबरोबर जो वेळ आपण घालवणार आहोत, तो पूर्णपणे त्यांच्यासाठी वापरणे (अनडिव्हायडेड अटेन्शन देणं), असा त्याचा रूढ अर्थ. साधारण सत्तरच्या दशकात पाश्चात्त्य जगात ही संकल्पना उदयाला आली. आईबाबा दोघंही नोकरी करताहेत, विभक्त कुटुंब आहे, पाळणाघरं ही काळाची गरज झाली आहेत. अशा वेळी मुलं आणि आईबाबांना परस्परांसोबत खूप कमी वेळ मिळतो. त्यात घर म्हणून काही गोष्टी कराव्याच लागतात, त्यांना पर्याय नसतो. त्यामुळे मुलांना आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही खंत अनेक आईबाबांच्या मनात कायमच असते, अशा परिस्थितीवर हा तोडगा फारच उचलला गेला. गेली तीन-चार दशकं तो जगभर पालकत्वाच्या क्षेत्रात राज्य करतो आहे. 

मुलांबरोबर जेव्हा वेळ काढाल तेव्हा फोन-लॅपटॉप बंद करणं, मुलांशी खेळणं, गप्पा मारणं त्यांना मजा येईल अशा गोष्टी करणं.. असं बरंच काही त्यात अगदी अलगद बसून जातं. ऐकायलाही हे खूप छान वाटतं.
पण कदाचित म्हणूनच याची वॉिशग्टनची कुऱ्हाड झाली आहे. मुलांशी संबंधित काहीही अडचण आली की शिक्षक, समुपदेशक, काही वेळा डॉक्टर्स, अगदी आजी-आजोबांची पिढीही आईबाबांना ऐकवत असते की तुम्ही मुलांना क्वालिटी टाइम द्या- सगळ्या प्रश्नांवरचा हा रामबाण उपाय असल्यासारखा.
मुळात आईबाबांच्या मनात असलेल्या अपराधीपणाच्या भावनेला त्यातून आणखीनच खतपाणी घातलं जातं. मुलांना वेळ द्यायला हवा यात वादच नाही, पण मुलांना क्वालिटी टाइम द्यायचा म्हणजे काय करायचं, हे कोणी फारसं सांगताना दिसत नाहीत. आणि त्याहूनही गंभीर म्हणजे काय टाळायचं यावर तर काहीच बोललं जात नाही. म्हणून मग प्रत्येकजण आपल्याला हवा तो सोयीस्कर अर्थ त्यातून लावतो, आणि अनेकदा गोंधळच जास्त होताना दिसतो.
अनघाकडे पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या बाई आहेत. तिचा अथर्व पहिलीत आहे, आणि त्याला सकाळची शाळा आहे. संध्याकाळी अनघा ऑफिसमधून आली की ते दोघं एकत्र अभ्यास करतात, खेळतात, ती त्याला वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजना घेऊन जाते. ती रात्री ९ पर्यंत फोन कॉल्सही घेत नाही. हे सगळं छान चाललं होतं, पण मध्ये बाई आठवडाभर नव्हत्या, तेव्हा त्याने अनघाला घरातलं काम अजिबात करू दिलं नाही. अनघाने जेवण बाहेरून मागवलं. आणखी एक, मध्ये अनघाची आई हॉस्पिटलमध्ये होती, म्हणून अनघा संध्याकाळी तिथे जायची, तेव्हा अथर्वने बाईंबरोबर राहायला साफ नकार दिला. घरी खूप गोंधळ घातला. त्याला आई संध्याकाळी आपल्याबरोबर नसायची बिलकूल सवयच नाही. आणि मुख्य म्हणजे अथर्वला क्वालिटी टाइम देता यावा, म्हणून ती काय काय करते, हे अनघा वारंवार बोलत असते. यातून अथर्वला काय मेसेज जातो? तर आईचा संध्याकाळचा वेळ हा केवळ त्याचाच हक्काचा वेळ आहे, त्यात आईने दुसरं काहीही करता नये. जेव्हा कधी तिच्यावर काही वेगळं करायची वेळ येते, तेव्हा तिला अथर्वचं अजिबात सहकार्य मिळत नाही.
अमिता आणि अशोक क्वालिटी टाइम म्हणून दर सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन मॉल, सिनेमा, सर्कस, सहल अशा ठिकाणी जातात, पण म्हणून घरातली अनेक कामं तुंबून राहतात. ती काम करण्यासाठी मुलांनी घरी आल्यावर आपला अभ्यास आपणच चूपचाप संपवून टाकावा अशी अमिता-अशोकची अपेक्षा असते. मुलं बहुतेक वेळा दमलेली असतात, त्यांना अभ्यासाचा अजिबात मूड नसतो. मग सुट्टीच्या दिवसाची सांगता चिडचिडीने होते.
सुजाताचं पाहाल तर रोज आठ ते नऊ या वेळात मुलीशी खेळते, गप्पा मारते, पण नऊ वाजल्यानंतर घरातलं, ऑफिसचं काम करायला म्हणून मुलीने तिला अजिबात त्रास देऊ नये अशी तिची अपेक्षा असते. अर्थातच असं होत नाही, मग दोघींचं तुंबळ जुंपतं, आणि एवढा क्वालिटी टाइम देऊनही हा गोंधळ का होतो असा सुजाताला खरोखरच प्रश्न पडत असतो.
मुळात मुलं वाढवणं हे ऑफिससारखं दिवसातून काही तास करायचं काम नाही. त्याला फक्त ठरावीक वेळ देऊन भागत नाही. आणि मुलं म्हणजे ‘अमुक कच्चा माल फीड केला, तर तमुक तयार माल बाहेर पडेल’, असं यंत्रही नाही. मूल वाढत असताना महत्त्वाचं असतं ते त्यांच्या आणि आपल्या क्षमतांचा योग्य वापर करणं आणि मुलांना वेळोवेळी अडचणींची जाणीव करून देणं. आणि यासाठी वेळ द्यायचा तो अर्थात उपलब्ध वेळेतून. अशा वेळी हमखास उपाय देणाऱ्या कुठल्याही एकाच एक मंत्राची कास धरून भागत नाही. क्वालिटी टाइमची संकल्पनाच मुळात मुलांची आणि आपली दिनचर्या वेगवेगळीच करून टाकते. असं खरंच असतं का? नाही. म्हणून रोनाल्ड लेव्हंटसारख्या आघाडीच्या मानसशास्त्रज्ञाने या संकल्पनेबाबत दोन दशकांपूर्वीच शंका उपस्थित केली होती. क्वालिटी टाइमबद्दल आणखी काही पाहूया पुढच्या लेखात.

mithila.dalvi@gmail.com