महान कार्य करण्याचा एकुलता एक मार्ग म्हणजे जे काम करत आहात, त्यावर प्रेम करा. जर काम करताना तुम्हाला ही भावना येत नसेल तर तिथं स्थिरावू नका, तर कुठलं काम करायला आवडेल त्याचा शोध घ्या,’ या स्टीव्ह जॉब्जच्या म्हणण्याचा प्रत्येकाने जरूर विचार करायला हवा. कामाविषयीच्या आपल्या कल्पना आणि वास्तवातले काम यातील फरक ओळखला तर कामाचे समाधान मिळू शकते. ‘कामाचे समाधान’ हा खरे तर एक प्रवास आहे, ते काही आपले मुक्कामाचे ठिकाण नव्हे. काम केल्याने मिळणारे समाधान कर्मचारी आणि कंपनी या दोघांवरही अवलंबून असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिणामकारक घटक-
* सकारात्मक मानसिकतेने काम केल्यास आपल्यावर सोपवलेल्या कामाला पुरेपूर न्याय देता येतो आणि काम केल्याचे समाधानही आपल्याला मिळते.
* कामाचे समाधान आपले कामातील स्वारस्य, कामातील निपुणता आणि एकाग्रता यांवर अवलंबून असते.
* कामाचा ताण सहन करण्याची क्षमता, कामावर मिळवलेले नियंत्रण आणि घरच्या – कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये साधलेला समतोल यांतून कामाचे समाधान मिळणे सुकर होते.
* आपण ज्या क्षेत्रात करिअर करायचे निश्चित केले आहे ते क्षेत्र आणि निवडलेले काम आपल्याला आवडतेय का, त्या कामात आपल्याला गती प्राप्त होतेय का, हे कामाचे समाधान मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरते.
* कामाचे स्वरूप, संस्था, वैयक्तिक प्रगतीचा उंचावणारा आलेख, बढतीची संधी, व्यवस्थापनाची ध्येयधोरणे, कार्यपद्धती आणि पर्यवेक्षण.
* कामाच्या ठिकाणचे सकारात्मक/ नकारात्मक वातावरण.
* कामाचा मोबदला काय मिळतो, यावरही कामाचे समाधान अवलंबून असते. दर वेळी कामाच्या समाधानाचे एकमेव कारण पसाच असते, असे नाही. कधी मिळणाऱ्या मानसन्मानातून- पुरस्कारातून कामाचे समाधान मिळते. कधी कामाची वरिष्ठांनी घेतलेली दखल, त्यांनी दिलेली शाबासकी तर कधी चक्क कंपनीचे स्थर्य यातूनही कामाचे समाधान मिळते. व्यक्तीच्या मानसिकतेनुसार मोबदल्याची संकल्पना आणि कामाचे समाधान बदलत राहते.

कसे मिळवाल?

* कामाचे नेमके स्वरूप जाणून घ्या. अनेकदा काम करताना आपण किती महत्त्वाच्या प्रकल्पासाठी काम करत आहोत हेच आपल्याला ठाऊक नसते. आपण केलेल्या कामाच्या संभाव्य परिणामांबद्दल आपण अनभिज्ञ असतो. कामाचे स्वरूप आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी यांचे महत्त्व लक्षात घेतले की आपला काम करण्याचा हुरूप वाढतो. आपण महत्त्वाची कामगिरी करत आहोत हे जाणले की मग आपण ते काम मनापासून आणि लक्षपूर्वक करतो. म्हणूनच आपल्यावर नवे काम सोपवले की त्याबाबत आपल्या मनात असणाऱ्या शंकांचे समाधान वरिष्ठांशी बोलून करून घ्यावे.
* मार्गदर्शन घ्या- आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करताना वेगवेगळ्या टप्प्यावर वरिष्ठांशी संवाद साधा. पूर्ण झालेले काम, कामाबाबतचा तुमचा दृष्टिकोन, कामात उद्भवणाऱ्या समस्या यांविषयी त्यांच्याशी चर्चा करा.
* त्रुटी दूर करा- आपल्या कामाचा प्रतिसाद अजमावणे महत्त्वाचे ठरते. आपल्या कामाबाबत सहकारी अथवा वरिष्ठांनी केलेल्या सूचना अथवा त्यांचा मिळणारा प्रतिसाद याकडे जरूर लक्ष पुरवा. आपल्या कामातील अथवा काम करण्यातील त्रुटी अथवा चुका कुणी लक्षात आणून दिल्यास त्या मान्य करून लगेच आवश्यक ती दुरुस्ती करा.
* कामाचे प्राधान्यक्रम ठरवा- एकाच वेळी वेगवेगळ्या कामांचा भडिमार झाला की बावचळायला होते. अशा वेळी तुमच्यावर सोपवलेल्या कामांचे महत्त्व, उत्तरदायित्व आणि डेडलाइन यांचा प्राधान्यक्रम लावत काम पूर्ण करा. ढिगभर कामे अर्धवट करण्यापेक्षा हाती घेतलेले एक काम पूर्ण झाल्यानंतरच दुसरे काम हाती घ्यावे.
* कामाचा ताण टाळा- कॉर्पोरेट वर्तुळात आज कामाचा ताण वाढत आहे. सोपवलेल्या भारंभार कामांमुळे कर्मचाऱ्यांवर अवाजवी ताण येतो. अशा वेळेस कामाचा दर्जा खालावण्याची भीती असते आणि अशाने कामाच्या समाधानापासूनही मुकावे लागते. अशा वेळी शांत डोक्याने हातातील काम पूर्ण करणे आपल्या हाती असते.
* एकाग्रता महत्त्वाची- आपल्यावर सोपवलेले काम एकाग्रपणे केले की ते वेळेत पूर्ण होते. कामाचा दर्जा राखला जातो आणि त्यामुळे कामाचे समाधानही मिळते. म्हणूनच कामाच्या ठिकाणी कामात अडथळे आणणाऱ्या बाबींपासून कटाक्षाने दूर राहा.
* अपेक्षांवर नियंत्रण ठेवा- काम करताना मिळणारे वेतन, पदोन्नती यांचा विचार करून हिरमुसले होण्यापेक्षा काम नीट पूर्ण करण्यावर भर दिला तर कामाचे समाधान वाढू शकेल.

मनाशी पक्के ठरवा..
* भावनिकदृष्टय़ा मी कायम खंबीर राहीन.
* घडणारी प्रत्येक गोष्ट मला पटणारी असेलच असे नाही.
* अनेक प्रकारच्या प्रवृत्तींची माणसे भोवताली असली तरी त्याचा माझ्या कामावर परिणाम होऊ देणार नाही.
* कामासंदर्भातील इतरांचे विचार आणि अनुभव आपल्या कल्पनेपेक्षा वेगळे असू शकतात.

अडथळे
* कामाच्या स्वरूपात सतत बदल होत राहिला तर कर्मचारी भांबावतात. त्याचा परिणाम काम वेळेत पूर्ण न होणं, कामाचा दर्जा खालावणं अशा प्रकारे होऊ शकतो.
* काम करताना पुरेसे स्वातंत्र्य मिळालं नाही तरी काम करण्यातील उत्साह थंडावतो.
* व्यक्तिगत पातळीवर भेडसावणारी आर्थिक-भावनिक समस्या, वाढलेली अनुपस्थिती, आजारपण, वेतनवाढीचा प्रश्न याचाही प्रत्यक्ष कामावर अनिष्ट परिणाम होतो आणि त्यातून कामाचे समाधान कमी होऊ शकते.
* आपला मूड आणि भावना कामाच्या समाधानाशी निगडित आहेत. कामाच्या ठिकाणी समस्या भेडसावत असल्या तरी त्यांना प्रतिसाद कसा द्यावा, हे सर्वस्वी आपल्यावर असते. याकरता भावनांचे व्यवस्थापन करता यायला हवे.

राधिका कुंटे

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to gain job satisfaction
Show comments