मुलं सायन्सला असतील आणि मेडिकल किंवा इंजिनीअिरगच्या प्रवेश परीक्षा देत असतील, तर अकरावी बारावीच्या वर्षांमध्ये पाहायलाच नको. या प्रकारात बहुतेक वेळा खेळ, छंद, विरंगुळ्याची आहुतीच पडत असते. त्यामुळे मध्येच जरासा वेळ मिळाला की मोबाइल किंवा टीव्हीचे छोटे छोटे ब्रेक्स मुलांना फार हवेहवेसे वाटतात. आणि हे ब्रेक्स लांबले की, त्यातून आई-वडिलांबरोबर घासाघीस सुरू व्हायला लागते. जोडीने क्लासच्या टेस्ट्समधले मार्क्स फारसे समाधानकारक नसतील तर प्रकरण चिघळू शकतं.
गेल्या काही वर्षांमध्ये हे दृश्य फार घरांमध्ये दिसत आहे. तू अभ्यासच करत नाहीस, बाकीच्यांना कसं जमतं, तुलाच का नाही, अशी उलटतपासणी मग सुरू होते. आणि मी करतो तर आहे, पण तरीही मला बोलणी बसताहेत, म्हणजे मला कुणी समजूनच घेत नाही.. असं मुलांना वाटू लागतं.
बऱ्याचदा अशा भरगच्च शेडय़ुलमध्ये आठवडय़ाच्या सराव परीक्षा देताना मुळात मुलांची तयारीच पुरेशी झालेली नसते. त्यात पाठोपाठच्या परीक्षांमधून डोकंच वर निघत नाही, आणि मग प्रत्येक पुढच्या.. पुढच्या परीक्षा आणि त्यातले मार्क्स, यांनी ताण आणखी वाढतो.
प्रत्येकाला एखाद्या विषयाचा अभ्यास करायला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे ज्या गतीने क्लासेस जातात, ती गती जरी काही मुलांना जमली, तरी ती प्रत्येकाला जमेलच असं नाही. अशा वेळी काय जमतं आहे, काय नाही, याचा सतत आढावा घेत राहणं फार गरजेचं असतं. आणि मुलांना त्यांच्या वयाला, तारतम्याने हा आढावा घेत राहणं बऱ्याचदा जमतं. यात किती वेळ हाताशी आहे, त्यात आत्ता लगेच काय करता येईल, नंतरसाठी काय ठेवता येईल .. पासून ते साठत साठत गेलेल्या अभ्यासासाठी नंतर आपण काय करणार आहोत, इथपर्यंत अनेक बाबी असू शकतात. अगदी गरज पडल्यास एखादी सराव परीक्षा न देणं हा पर्यायही अजमावता येतो, आणि नेमकी कोणती टाळायची हेही ठरवता येतं (उदा. एखाद्या भागाची तयारी चांगली झाली असेल त्याच्यावर होणाऱ्या सराव परीक्षेला न बसता तो वेळ फारशी तयारी नसलेल्या भागासाठी वापरणं.) इथे आई-बाबांना परिस्थितीचं किती वास्तव भान आहे, हे फार महत्त्वाचं ठरतं. क्लासेस आपल्यासाठी आहेत का आपण क्लासेससाठी, हे आपण ठरवायचं आहे.
मुळात मुलांच्या काळ-काम-वेगाची गणितं बसवताना आपल्या मुलाचा कल, त्याची क्षमता, आपली आणि त्याची स्वप्नं, यांची विवेकी (रॅशनल) सांगड घालणं हा फार कळीचा मुद्दा आहे. खरं तर मुलं वाढवताना गोष्टी जेव्हा सुरळीत पार पडत नसतात- मग त्या घरातल्या छोटय़ा-छोटय़ा सवयी असोत, अभ्यासेतर अॅक्टिव्हिटीज असोत, अभ्यास असो वा करिअर- तेव्हा सगळीकडेच हे लागू पडतं.
स्वप्नं तर पाहायलाच हवीत, पण प्रयत्न करूनही एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे होत नसते, जमत नसते, तेव्हा त्यात काहीतरी बदल करून पाहावे लागतात. या बदलांची आपल्यालाच भीती असेल, तर ते आपल्याला आणि मुलांनाच नाही, सगळ्यांनाच क्लेशकारक होतं.
पालक म्हणून संधी, सुविधा उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहेच, पण त्यासोबत मुलांच्या प्रवासाकडे सजगपणे पाहता येणं, त्यात तारतम्य, विवेक राखता येणं, हेही तितकंच महत्त्वाचं!
काळ, काम, वेग आणि विवेक
शाळा, क्लासेस आणि अन्य अॅक्टिव्हिटीजनी भरगच्च अशा मुलांच्या दिवसभराच्या शेडय़ुलचा कळसाध्याय गाठला जातो तो दहावी ते बारावीच्या वर्षांमध्ये.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-02-2015 at 07:08 IST
Web Title: How to manage your studies