पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी खुल्या व्हाव्यात, म्हणून उद्योगक्षेत्राच्या मदतीने अनेक दर्जेदार महाविद्यालयांमध्ये ‘कॅम्पस इंटरवूज’ मोहीम राबवली जाते. आजवर केवळ दर्जेदार अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांत कॅम्पस इंटरव्ह्य़ूजचे आयोजन केले जायचे. मात्र, अलीकडे पारंपरिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या (प्रामुख्याने गणित, सांख्यिकी, रसायनशास्त्राच्या पदवीधरांसाठी) निवडक महाविद्यालयांमध्येही ‘कॅम्पस इंटरवू’ होतात. अशा मुलाखतीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कुठली पूर्वतयारी करणे आवश्यक ठरते, याचे कानमंत्र.

पूर्वतयारी
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाच्या प्राध्यापकांकडून तसेच अन्य माजी विद्यार्थ्यांकडून कॅम्पस इंटरव्ह्य़ू संदर्भात असलेल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. याकरता विद्यार्थ्यांना इंटरनेटचीही मदत घेता येईल.
आपल्या महाविद्यालयात कोणकोणत्या खासगी कंपन्या उमेदवार निवडीसाठी येणार आहेत,
याद्वारे दर वर्षी किती विद्यार्थ्यांना नोकरी मिळते, निवड झालेल्या उमेदवारांची वेतनश्रेणी किती असते, अशा गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवावी.
अशा मुलाखतींत पात्र ठरण्यासाठी आवश्यक ठरणारी अर्हताही विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी. या संदर्भातील अनेक अटींच्या पूर्ततेसाठी तसेच आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी आधीपासूनच पावले उचलणे गरजेचे असते.
उदाहरणार्थ – विद्यार्थ्यांची उत्तम शैक्षणिक कारकीर्द हा अर्हतेचा निकष असतो. शिक्षणक्रमाची सर्व वष्रे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणे, प्रकल्प काम उत्तमरीत्या पूर्ण करणे, शिक्षणेतर उपक्रमांमधील यश या बाबी निवडीस पूरक ठरू शकतात. बहुतेक महाविद्यालयांमध्ये अशा मुलाखतींची तयारी करून घेणारे प्रशिक्षणवर्ग आयोजित केले जातात अथवा स्वतंत्र कक्ष स्थापन केले जातात. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी जरूर उपयोग करून घ्यावा.

semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई

प्रशिक्षणासाठी सज्ज व्हा..
प्रशिक्षण काळात आपल्याला नक्की कोणते ज्ञान संपादन करण्यात रुची आहे, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे काम करायला आवडेल, संशोधन करायचे आहे की उच्च शिक्षण घ्यायचे आहे, नोकरी करायची आहे, की स्वयंरोजगाराचा मार्ग शोधायचा आहे हे उमेदवारांनी निश्चित करणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा कॅम्पस मुलाखतीद्वारे उमेदवारांना कोणत्या कामात स्वारस्य आहे हे शोधले जाते आणि त्यानुसार पुढे त्यांच्यावर विशिष्ट कार्यभार सोपवला जातो. उदा. एखाद्या उमेदवाराला मार्केटिंग विषयक कामात रस असेल आणि त्याचे संवाद कौशल्य उत्तम असेल, तर निवड झाल्यानंतर अशा व्यक्तीला कंपनीच्या मार्केटिंग विभागात सामावून घेतले जाते. एखाद्या उमेदवाराला तांत्रिक कामाची आवड आहे, तांत्रिक बाबींची उत्तम जाणही आहे. मात्र, त्याचे संवाद कौशल्य कमकुवत आहे, अशा उमेदवाराला निवडीनंतर कंपनीच्या देखभाल व दुरुस्ती सेवा विभागात सामावून घेतले जाऊ शकते.

कॅम्पस मुलाखतीच्या दोन किंवा अधिक फेऱ्या असू शकतात. प्रथम गटचर्चा फेरीत उपस्थित उमेदवारांमधील पुढाकार घेण्याची वृत्ती, नेतृत्वगुण, सांघिक गुण, संवाद कौशल्य हे गुण हेरले जातात. व्यक्तिगत मुलाखतीच्या फेरीत, विद्यार्थ्यांची वैयक्तिक क्षमता अजमावली जाते. या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांसाठी विद्यार्थ्यांनी तयार असणे महत्त्वाचे! काही वेळा निवडप्रक्रियेत वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरूपाच्या लेखी परीक्षेचाही समावेश केला जातो. या फेरीतील प्रश्न प्रामुख्याने शिक्षणक्रमातील मूलभूत संकल्पना व त्यांचे उपयोजन यांवर आधारित असतात.
* पेहराव, देहबोली- मुलाखतीचे स्वरूप लक्षात घेता व्यावसायिकतेचे भान ठेवून पेहराव करणे अथवा देहबोली असणे आवश्यक आहे.
* अनावश्यक दडपण टाळणे योग्य- कॅम्पस मुलाखतीच्या संधीकडे गांभीर्याने बघणे आवश्यक असले तरी या मुलाखतीचे अनावश्यक दडपण घेऊ नये, अन्यथा प्रत्यक्ष मुलाखतीतील कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. लक्षात घ्यायला हवे, की ही कॅम्पस मुलाखत म्हणजे आपल्या करिअरसाठी एकमेव अथवा अखेरची संधी नाही. त्यामुळे कॅम्पस इंटरव्ह्य़ूचा अवाजवी ताण घेणे टाळावे.
* एकाच दिवशी एकापेक्षा अधिक किंवा सलग मुलाखतींना सामोरे गेल्यास उत्तरांमध्ये एकसुरीपणा येण्याची शक्यता असते. अशाने मुलाखतीच्या पॅनेलसमोर तुमची कामगिरी सुमार, रटाळ होऊ शकते. म्हणून सरसकट सर्वच मुलाखतींना सामोरे जाण्यापेक्षा, विचारपूर्वक निवडक मुलाखतींमध्ये सहभागी होणे हिताचे ठरते.
* मुलाखत संपताना, मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे बिझनेस कार्ड आठवणीने मागून घेणे, भविष्यात लाभदायक ठरू शकते.

मुलाखतीचे गांभीर्य
महाविद्यालयांतील कॅम्पस मुलाखतीद्वारा योग्य क्षमता असलेल्या उमेदवारांना आघाडीच्या कंपनीमध्ये नोकरीची उत्तम संधी मिळू शकते आणि त्यामुळे शिक्षणानंतर नोकरीसाठीचा ‘स्ट्रगल पिरियड’ विद्यार्थ्यांच्या वाटय़ाला येत नाही. कॅम्पस इंटरव्ह्य़ूमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांची खातरजमा महाविद्यालयांनी केलेली असते. त्यामुळे अशा ठिकाणी फसवणुकीची शक्यता नगण्य असते. त्यामुळेच अशा सोनेरी संधींकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहायला हवे.

सहभागी कंपन्यांचा पूर्वअभ्यास
* मुलाखत घेणाऱ्या कंपनीबद्दल शक्य तेवढी माहिती करून घ्यावी. उदाहरणार्थ, त्या कंपनीच्या शाखा, सुरू असलेले प्रकल्प, भविष्यातील प्रकल्प, उत्पादने व उत्पादन प्रक्रिया याविषयी विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक ठरते. अलीकडे इंटरनेटमुळे हे सहजशक्य झाले आहे. ही सर्व माहिती करून घेतल्याने उमेदवाराला आत्मविश्वासाने उत्तरे देता येतात.
* आपण शिकत असलेल्या महाविद्यालयांप्रमाणेच शक्य असल्यास इतर महाविद्यालयांत आयोजित केल्या जाणाऱ्या रोजगार मेळाव्यांना भेट द्यावी. अशा ठिकाणी समवयस्क विद्यार्थी तसेच व्यावसायिकांशी ओळखी होतात. त्यातून कामाच्या नव्या संधी मिळू शकतात.
* संक्षिप्त माहिती- महाविद्यालयीन अभ्यासाव्यतिरिक्त, पूर्ण केलेल्या इन्टर्नशिपबद्दल तसेच प्रकल्प कामांबद्दल छोटेखानी अहवाल सादर करावा. त्यातून उमेदवाराची आकलन क्षमता, विषयांची जाण, कौशल्य दिसून येते. करिअरच्या यशस्वी वाटचालीसाठी सादरीकरण ही कला अवगत असणे मदतीचे ठरते.

मुलाखतीचे स्वरूप
या अंतर्गत निरनिराळ्या खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या महाविद्यालयांत प्रत्यक्ष जाऊन, कंपनीच्या गरजेप्रमाणे सक्षम, गुणवान विद्यार्थ्यांची निवड करतात आणि त्यांना नोकरीची संधी देऊ करतात.

मुलाखतीचा हेतू
* उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणे आणि भविष्यात कंपनीला अशा उमेदवारांची गरज भासल्यास त्यांना नोकरीची संधी देणे.
* निवडक उमेदवारांना गरजेनुसार काही काळ प्रशिक्षण, विद्यावेतन देऊन पुढे नोकरीत सामावून घेणे.
* काही वेळा देशांतर्गत किंवा देशाबाहेरील पदव्युत्तर शिक्षणाच्या व संशोधनाच्या संधीसाठी या मुलाखतींचे आयोजन केले जाते.
* मुलाखतीचा हेतू जाणून घेत, त्यानुसार तयारी करणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लाभदायक ठरते. ही माहिती उमेदवारांना महाविद्यालयातील संबंधित शिक्षक किंवा विभाग अधिकाऱ्याकडूनही मिळू शकते. क्वचितप्रसंगी संबंधित कंपनीच्या कार्यालयातूनही मिळवता येते. प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान, विद्यार्थ्यांना कंपनीच्या हेतूविषयक चाचपणी करता येईल. आपल्या पदरात कुठले लाभ पडणार, कॉन्ट्रॅक्ट अथवा बॉण्डचे स्वरूप आणि त्यातील नियम यांची चर्चा विद्यार्थ्यांना अंतिम फेरीत तज्ज्ञांशी करता येईल.