गेल्या काही वर्षांमध्ये मुलं, त्यांचा अभ्यास आणि त्या अनुषंगाने एकंदरच मुलांच्या भविष्याबद्दल पालकांच्या आशा-अपेक्षांचं विश्व खूप झपाटय़ानं बदलत आहे. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त गोष्टी बसवण्याची कसरत आईबाबांची पिढी तर करतेच आहे, पण मुलांनाही ती करावी लागते आहे.
त्यामुळे मुलांना वेळ पुरत नाही, ही अगदी सार्वत्रिक अडचण बनली आहे. म्हणून कमीतकमी वेळात जास्तीतजास्त अभ्यास कसा करावा, असं अनेक आई-बाबा विचारत असतात. अभ्यासातल्या काही गोष्टी लक्षात ठेवायची सोपी तंत्रं, युक्त्या जरूर आहेत, पण हे शॉर्टकट्स प्रत्येक गोष्टीला नाही ना लावता येत! म्हणून बहुतेक वेळा मुळात हा प्रॉब्लेम का येतो आहे हे पाहायचा प्रयत्न केला, तर काय दिसतं? खास करून प्राथमिक शाळेतल्या मुलांबाबत. बहुतेक वेळा एवढय़ा लहान मुलांना वेळ पुरत नाही, तेव्हा त्याचं कारण त्यांच्या ढीगभर अॅक्टिव्हिटीज आणि क्लासेस असंच निघतं. मुलांच्या अभ्यासेतर अॅक्टिव्हिटीज हे आजकाल एक स्वतंत्र जग आहे. मुलांना वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव मिळावा म्हणून आजच्या पिढीचे आई-बाबा खूप जागरूक आहेत. त्यामुळे मुलांना अनेक अॅक्टिव्हिटीजसाठी त्यांनी दाखल केलेलं असतं. अगदी महाराष्ट्रातल्या लहान शहरांमध्येही हे चित्र दिसतं. (काही वेळा ‘घरी बसून टीव्ही पाहण्यापेक्षा दुसरं काहीतरी’ हेही त्यामागचं कारण असू शकतं.) अगदी शाळा निवडतानाही शाळेत किती अॅक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत- (विशेषकरून खेळाच्या) हा निकष
लावला जातो. या सगळ्या अॅक्टिव्हिटीजचं वेळापत्रक सांभाळताना अख्ख्या घराचीच प्रचंड दमछाक होताना दिसते, पण म्हणून फार थोडी कुटुंबं या सगळ्यावर खर्च होणारा वेळ आणि पदरी पडणारे लाभ, यांचा ताळेबंद मांडताना दिसतात.
आखीव-रेखीव अॅक्टिव्हिटीजमधून मुलांना काय मिळतं? तर त्या त्या कलेतल्या, खेळातल्या तज्ज्ञ मंडळींकडून शिकता येतं, तिथे नवे मित्र-मत्रिणी जोडता येतात. मजा येते- बऱ्याचदा सुरुवातीला खूप मजा येते, पण नंतर त्यात एकसुरीपणा वाटतो. असं अनेकांचं होतं. मात्र ‘आम्हाला आज काय करायचं आहे’ हे ठरवायचं स्वातंत्र्य मुलांना बहुतेक वेळा नाहीच मिळत. मुलांनी आपलं- आपण मिळून काहीतरी ठरवणं, त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची जुळवाजुळव करणं, ते करताना येणाऱ्या छोटय़ा- छोटय़ा अडचणींवर मात करणं आणि ठरवलेल्याप्रमाणे गोष्टी पार पाडणं- यात वेगळी गंमत आहे. त्यातून आपसूकच अनेक गोष्टी जमायला लागतात, वेगळा आत्मविश्वास येतो. आखीव-रेखीव अॅक्टिव्हिटीजमधून हे नाही होत, म्हणून मग खूपदा ते लादलेलं काम होतं.
साधारण पौगंडावस्थेतली मुलं एक खास पॅटर्न दाखवतात- पहिली-दुसरीपासून आवडणारी एखादी कला, खेळ त्यांना अचानक नकोसा होतो. त्यातल्या मुख्यत: सूचनांबरहुकूम गोष्टी करणं हा भाग आवडेनासा होतो. कंटाळा, कुरकुर, असहकार, अशा पायऱ्या चढत या गोष्टी खटके उडण्यापर्यंत जातात. ‘आतापर्यंत तर छान करत होतास, आताच काय हे-’ असा सूर आई-बाबा लावू लागतात.
मुळात पौगंडावस्था म्हणजे ‘स्व’ची जाणीव होण्याचा काळ. या काळात मेंदूत प्रचंड घडामोडी होऊ लागतात. त्यातून नव्या जाणिवा होऊ लागतात. स्वातंत्र्य हवंहवंसं वाटू लागतं. काही आवडीनिवडी बदलतात, आणि मग अनुभव मिळावा म्हणून सुरू झालेल्या या अभ्यासेतर गोष्टींचं जोखड होऊ लागतं.
बऱ्याचदा एका कलेचं किंवा खेळाचं एक्स्पोजर मिळावं, अशी कॅज्युअली सुरुवात होते, पण त्याचा शेवट होताना, त्याला नाइलाजाची, कडवटपणाची झालर लागते. आपण करून पाहिलं, खूप नाही आवडलं, असा साधा-सोपा शेवट फार कमी वेळा होताना दिसतो. त्यात सातत्य राखणं, आणखी आणखी कौशल्य मिळवणं अशा पालकांच्या अपेक्षा बनू लागतात. खेळांच्या बाबतीत तर स्पर्धा स्तरावर मुलं गेली, की प्रॅक्टिस आणि तथाकथित प्रेरणा देणारे उपदेश यांचा माराच सुरू होतो. ‘भाग घेणं महत्त्वाचं, हरणं-जिंकणं नाही’, अशी सुरुवात होऊन ‘बघ, आणखी थोडे प्रयत्न केले असतेस तर तुला नक्की बक्षीस मिळालं असतं..’ असं तिथल्या तिथे खेळाचं डिसेक्शन होऊन जातं. या सगळ्यात ‘मुलांना मजा येते आहे का?’ हा मुद्दाच मागे पडतो. त्यातून अभ्यास वाढत असतो. त्यामुळे आधीच्या भरगच्च वेळापत्रकात आता क्लासेसची भर पडते. त्यामुळे नुसतं मित्रमत्रिणींबरोबर खेळायला किंवा निवांत असा वेळच उरत नाही. याचे अर्थातच परिणाम अभ्यासावर आणि मुलांच्या एकंदर वागण्यातही दिसून येतात. मग सुरू होतात पालक आणि शिक्षकांकडूनचे सल्ले आणि उपदेश, आणि कमीतकमी वेळात मुलांनी जास्तीतजास्त गोष्टी अधिकाधिक परिणामकारकरीत्या करायला हव्यात अशा अपेक्षा!
त्यातून सुरू होतात, ती काळ-काम आणि वेगाची गणितं, आणि ही तारेवरची कसरत सांभाळतानाची आई-बाबांची, मुलांची- सगळ्यांचीच कुतरओढ. रोजच्या जगण्यातली ही गणितं दुर्दैवाने फक्तआकडेमोड करून सुटत नाहीत, त्याला तारतम्याचीही जोड द्यावी लागते, आणि ती पालकांनाच द्यावी लागते. त्याबद्दल बोलूया पुढच्या लेखात..