नोकरी मिळविण्याच्या अटीतटीच्या स्पर्धेत न उतरता, स्वत:चा उद्योग सुरू करणाऱ्या युवावर्गाची संख्या वाढत आहे. स्वत:च्या अर्थार्जनासोबत इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योगाची वाट चोखाळणाऱ्या नवउद्योजकांमध्ये काही विशिष्ट क्षमता आणि कौशल्यांची जोपासना होणे आवश्यक ठरते. त्याविषयी..
आवश्यक क्षमता
’कल्पकता- नावीन्यपूर्ण गोष्टी घडविण्याची किंवा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची, शोधण्याची, विचार करण्याची कल्पकता हवी.
’आग्रही वृत्ती- कामाची संधी मिळवण्यासाठी आणि काम पूर्ण करण्यासाठी चिवटपणे प्रयत्न करत राहणे आवश्यक असते. कोणते काम कसे पूर्ण व्हायला हवे याबद्दलही सतत आग्रही असावे लागते.
’अचूक आणि जलद निर्णयक्षमता – उद्योगाचे यशापयश, तत्परतेने घेतलेल्या अचूक निर्णयांवर अवलंबून असते.
’महत्त्वाकांक्षा- स्वत:चा उद्योग उभारण्याची आणि यशस्वीपणे पुढे नेण्याची महत्त्वाकांक्षा, व्यक्तीला उद्योजक बनण्यासाठी प्रेरक ठरते.
’स्वयंप्रेरित आणि सकारात्मक विचारसरणी – स्वबळावर एखादा उद्योग उभा करत असताना, सुरुवातीपासूनच अनेक अडचणी उभ्या राहतात.
अशा वेळी सकारात्मक विचारांच्या आधाराने ध्येयापर्यंत पोहोचणे सोपे होते.
’आंतरिक इच्छा- आíथकदृष्टय़ा स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण होण्याची तीव्र आंतरिक इच्छा आणि निवडलेल्या कार्यक्षेत्राची मनापासून आवड या दोन गोष्टी स्वत:चा उद्योग सुरू करताना अत्यावश्यक ठरतात.
उद्योग उभारणीसाठी पूर्व अभ्यास महत्त्वाचा!
’कार्यक्षेत्राची निवड आणि अभ्यास- ज्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र उद्योग उभारायचा आहे असे क्षेत्र हुडकून, निवडलेल्या कार्यक्षेत्राचा सखोल अभ्यास करावा. क्षेत्रासंबंधित उपलब्ध साहित्यसामग्रीचे वाचन आणि चालू घडामोडींचे मनन केल्याने उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ठरणारा आत्मविश्वास
वाढीस लागतो.
’निरीक्षण- आपल्या उद्योगक्षेत्राशी संबंधित घडामोडींचे, स्पर्धात्मक उत्पादनांचे अथवा उद्योगप्रक्रियांचे निरीक्षण केल्याने आपल्या उद्योगासमोरील संभाव्य आव्हानांची, अडचणींची पूर्वकल्पना येऊ शकते.
’पूर्वानुभव- नियोजित उद्योगाशी संबंधित कार्यक्षेत्रात अथवा उद्योगात काम करण्याचा पूर्वानुभव, स्वत:च्या उद्योगाच्या यशस्वी उभारणीसाठी मोलाचा ठरतो.
’आíथक नियोजन- उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या आíथक भांडवलाचे नियोजन, वित्तसहाय्य करणाऱ्या सरकारी, खासगी संस्थांच्या योजनांचा अभ्यास आíथक भांडवल उभारणीसाठी फायदेशीर ठरतो.
’कायदेशीर ज्ञान- ज्या उत्पादनाचा किंवा ज्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे अशा कार्यक्षेत्राला लागू होणारे सर्व प्रकारचे कायदेशीर ज्ञान, करविषयक तरतुदींचे ज्ञान मिळवणे आवश्यक आहे (प्राप्ती कर, सेवा कर, व्यवसाय कर, महसूल, संपत्ती कर, विक्री कर), व्यवसायाची अधिकृत नोंदणी करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी योग्य कागदपत्रांची जमवाजमव करणे गरजेचे आहे.
’कच्च्या मालाची उपलब्धता- उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती जिथे घाऊक प्रमाणावर होते, अशा ठिकाणांचा शोध घेणे आणि त्यानुसार उत्पादन प्रक्रियेचे नियोजन करणे.
’बाजारपेठेचा आढावा- नियोजित उत्पादने किंवा सेवा यांसाठी कोणत्या प्रकारचा ग्राहकवर्ग उपलब्ध आहे, तसेच अन्य स्पर्धक कंपन्यांच्या उत्पादनांचा सातत्याने आढावा घेणे उद्योगाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे ठरते.
उद्योगासाठी अनुकूल गोष्टी..
’कौटुंबिक पािठबा- स्वयंउद्योग सुरू करण्यासाठी कुटुंबीयांचा भावनिक पाठिंबा उद्योजकाला मानसिक बळ देतो. काही वेळा पिढीजात सुरू असलेला व्यवसाय-उद्योगच पुढे चालवणे जास्त सोपे आणि हितावह ठरते.
’आíथक भांडवल- उद्योगासाठी आवश्यक असलेले अर्थसहाय्य कुठून आणि कसे मिळवता येईल याचा प्राधान्यक्रमाने विचार करावा.
’यंत्रणेचे नियोजन- निवडलेल्या उद्योगासाठी आवश्यक जागा, साधनसामग्री किंवा यंत्रणा उभी करण्याच्या व्यवस्थेचे नियोजन आधीच होणे गरजेचे आहे.
’मनुष्यबळ- निवडलेल्या उद्योगासाठी सक्षम आणि रास्त दरातील कर्मचारीवर्ग उपलब्ध होणे फायदेशीर ठरते.
कौशल्यांची जोड हवी!
’स्वयंशिस्त- व्यापारसंबंधित कामे वेळच्यावेळी होण्याकरता सुरुवातीपासूनच कामात स्वयंशिस्त बाणवणे महत्त्वाचे आहे. कामात चालढकल केल्यास किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यास त्याची जबर किंमत मोजावी लागू शकते.
’प्रभावी जनसंपर्क- यशस्वी उद्योजकतेसाठी जनसंपर्क महत्त्वाचा ठरतो. म्हणून विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी ओळख आणि परिचय असणे तुमच्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरू शकते.
’संवादकौशल्य हवे- स्वत:च्या उद्योग-व्यवसायाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवणे, आपल्या अपेक्षेनुसार हाताखालील व्यक्तींकडून काम करून घेणे, तयार उत्पादनाच्या अथवा सेवासंबंधित बाजारपेठेत ग्राहकांचा विश्वास संपादन करणे याकरता संवादकौशल्य आवश्यक असते.
’नेतृत्त्व गुण- कर्मचारी, भागीदार, कनिष्ठ सहकारी यांच्याकडून अपेक्षित गुणवत्ता साध्य करण्यासाठी आणि सर्वाची मोट बांधून स्वत:चा उद्योग यशस्वी करण्यासाठी उद्योजकाच्या अंगी नेतृत्त्वगुण असावे लागतात.
’जोखीम स्वीकारण्याची वृत्ती- नुकसान, अपयश यांमुळे डगमगून न जाता उद्योगातील प्रत्येक आव्हान आत्मविश्वासाने स्वीकारले तरच यशाच्या शक्यता दुणावतात.
’वेळेचे नियोजन- उत्पादन निर्मितीसाठी कच्च्या मालाची खरेदी, उत्पादनाची विक्री, माल वेळेवर पोहोचता करणे आणि ग्राहकांद्वारे पशाची वेळेवर वसुली करणे या परस्परावलंबी गोष्टी सुरळीत पार पडण्यासाठी वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरते.
स्वयंरोजगारातील संधी
स्वयंरोजगार संधींचा आवाका खूप मोठा आहे. फ्री-लािन्सग, फ्रँचायझी, एजन्सी, सेवा उद्योग, स्वतंत्र उत्पादक, उद्योजक याप्रमाणेच खाद्यपदार्थाशी निगडित गृहउद्योग, शिकवणीवर्ग, सौंदर्य आणि वस्त्रप्रावरणविषयक सेवा उद्योग.. ही यादी बरीच वाढू शकते.
वेळेची कमतरता आणि दूरवर पसरलेली लोकवस्ती ही कारणे लक्षात घेत अशा कुटुंबांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ‘घरपोच सेवा’ हाही एक स्वतंत्र जोडधंदा ठरताना दिसतो.
फायदे-तोटे
आवडीच्या क्षेत्रात काम केल्याचे समाधान, निर्णयस्वातंत्र्य या स्वतंत्र उद्योग उभारणीतील जमेच्या
बाजू आहेत.
मात्र, स्वत:चा उद्योग उभारताना अनेक तणाव आणणाऱ्या गोष्टींचा सामना करण्याची तयारीही ठेवावी लागते. यांत नुकसान, अपयशाची भीती, व्यावसायिक असुरक्षितता, कामाच्या तासांची अनियमितता, आíथक भांडवलाची उभारणीसाठीचे कष्ट यांचा समावेश होतो.