samaj‘मुलांना काय कळतं, अजून ती लहान आहेत’, किंवा ‘त्यांना कळण्यासारखं नाही हे..’ असं अनेक आईबाबांच्या तोंडून ऐकू येतं. बऱ्याचशा कठीण परिस्थितीत एकंदर परिस्थितीचं आकलन मुलांना होणं अवघड असतं – हे अगदी खरंच. पण म्हणून त्याबाबत मुलांना काहीच न सांगणं किंवा काहीतरी गुळमुळीत अवास्तव सांगणं, ‘सगळं काही नेहमीसारखंच आहे’ असं भासवत राहणं, हा काही त्याच्यावरचा उपाय होत नाही. त्यातून बऱ्याचदा वेगळे प्रश्नच उभे राहतात. कठीण परिस्थितीत बऱ्याचदा नेहमी इतकं लक्ष मुलांकडे नाही देता येत, पण त्यांचं सहकार्य मात्र बऱ्याचदा गृहीत धरलं जातं. उदाहरणार्थ घरी कुणी ज्येष्ठ व्यक्ती आजारी असणं – अशा वेळी नेहमीसारखी मुलं, प्रॉजेक्ट, अभ्यास या सगळ्यात आईवडिलांच्या मदतीची अपेक्षा करत असतील तर तसं होणं अवघड असतं. अशा वेळी मुलांनी आपली कामं स्वत: करावी अशी अपेक्षा असते, कधी कधी आईवडिलांच्या रागालाही बळी पडावं लागतं. अशी परिस्थिती मुलांसाठी आणि पालकांसाठी, सगळ्यांसाठीच खूप फ्रस्ट्रेटिंग होते. मुलं तर प्रचंड गोंधळूनही जातात. त्यांचा वेगळाच त्रागा होतो. यातून बऱ्याचदा नंतर आईबाबांनाही फार वाईट वाटत राहतं.
म्हणून अवघड परिस्थितीत आपल्या समोरच्या अडचणी मोजक्या आणि स्पष्ट शब्दात मुलांसमोर मांडणं सर्वात महत्त्वाचं. उदाहरणार्थ घरात एखादी ज्येष्ठ व्यक्ती गंभीर आजारी असेल, तर ‘तिला बरं नाही’, असं गुळमुळीत सांगण्यापेक्षा अगदी तीन चार वर्षांच्या मुलालाही त्याला उमजेल अशी भाषा वापरता येऊ शकते. ‘आजी-आजोबांना खूप त्रास होतो आहे, असा त्रास होतो तेव्हा घरी राहून केलेले उपचार पुरेसे नसतात, म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं आहे. तिथे डॉक्टर्स सारखं येऊन तपासून जाऊ शकतात, वेगवेगळी यंत्रं असतात, त्यांच्या मदतीने चांगले उपचार करता येतात, बरं वाटू शकतं’ अशा प्रकारे सांगता येऊ शकतं.
बऱ्याचदा लहान मुलांना काही सांगितलं की त्यांच्याकडून येणारे पुढचे प्रश्न मोठय़ांना खूप कटकटीचे वाटतात. त्यांना उत्तरं कशी द्यायची, नेमकं किती सांगायचं, काय सांगायचं, कसं सांगायचं, हे बऱ्याचदा कळत नाही, म्हणून गुळमुळीत उत्तरं दिली जातात किंवा ‘तू अजून लहान आहेस’ असं सांगितलं जातं. कुटुंबातल्या एखाद्याचं निधन झालं की ‘देवाघरी गेला’, असं सांगून त्याबद्दल बोलणं टाळलं जातं. अगदी आठ-दहा वर्षांच्या मुलांनाही तो विषय काढू दिला जात नाही. आणि त्याबद्दल आम्ही बोलतच नाही त्यामुळे ते सगळं आता मागे पडलं आहे, अशी सोयीस्कर समजूत करून घेतली जाते. किंवा घराच्या शेजारी एखाद्याचं निधन झालं की मुलांना तातडीने दुसरीकडे हलवलं जातं. त्यातही का जातोय आपण दुसरीकडे, याबद्दल काही सांगितलं जात नाही. यात मेख अशी असते की एखादा विषय निघत नाही तेव्हा मुलासाठी तो मागे पडला आहे, किंवा त्याला तो माहीतच नाही अशी स्वत:ची सोयीस्कर समजूत करून घेतली जाते. असं जरुरी नसतं. किंबहुना बहुतेक वेळा मुलांना या बाबतीत आपले आईबाबा नीट उत्तरं देत नाहीएत किंवा बोलतच नाहीएत, एवढं तर नक्कीच कळलेलं असतं. आणि हा विषय त्यांना अप्रिय आहे म्हणून काढायचा नाही, हे तर पक्कं कळलेलं असतं. मुलांबरोबरच्या संवादात इथे मोठी गॅप पडते. कधी कधी हे विचित्र स्वरूपात बाहेर येतं. अमुक एक गोष्ट बोलायला आईबाबा कम्फर्टेबल नाहीत हे कळलं तर लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून, किंवा त्यांचा राग आला असेल तर त्यावर सूड म्हणून नेमकी तीच गोष्ट मुद्दाम बोलली जाते. याचं खास उदाहरण म्हणजे दोन-तीन वर्षांच्या मुलांनी आपल्या िलगाला स्पर्श करत राहणं. कारण त्याबाबत कुणी काही बोलतच नाही ना, फक्त ओरडाच मिळत राहतो.
अशा सगळ्या वेळी पालक म्हणून जितकं प्रामाणिकपणे आपण मुलांशी बोलू, तितकं ते परिणामकारक ठरतं. म्हणून आपल्याला त्या क्षणी काय वाटतं आहे, आपली भावना काय आहे, हे सांगणं खूप प्रभावी ठरतं. आणि ‘मला नाही सांगता येत आहे आत्ता तुला’, किंवा ‘मला कळत नाहीय तुला कसं सांगायचं ते,’ असं सांगणं तर खरोखरच अनेक वेळा मुलांच्या आणि आपल्या नात्याला एकाच वेळी खूप वेगळे पलू देऊन जातं. आणि खरोखरच विचार करून कुठून तरी शोधून काढून तो ‘न जमणारा विषय’ मुलांशी बोलता आला, तर विश्वासाचं वेगळंच नातं तयार होतं. हेही मुलांना कळतंच .. नुसतंच कळत नाही, वळतंही! पालक म्हणून आपल्याला हेच तर हवं असतं ना!
mithila.dalvi@gmail.com