छोटय़ा मुलांना आजारी असल्यावर औषध घ्यायला लावणं, इंजेक्शन घेण्यासाठी तयार करणं, रोगप्रतिकारक लस देणं – या गोष्टींची वेळ समोर ठाकली की बऱ्याचदा सगळ्या घरासाठीच ते एक दिव्य होऊन बसतं. हे केल्याशिवाय पर्याय नाही, हे तर सगळ्या मोठय़ांना कळत असतंच. पण मुलाला झालेल्या वेदना आणि त्यानंतर त्याने केलेला आक्रोश दोन्ही पाहवत नाही, म्हणून एकंदरच मुलं आणि डॉक्टर हा अध्यायच अनेकांना अगदी नकोसा वाटतो.
काय केलं जातं अशा वेळी? मुलांना बऱ्याचदा फसवून, चकवून डॉक्टरकडे नेलं जातं. तिथे त्याच्याशी फार गोड वागलं जातं. इतकं की अगदी लहान मुलालाही ते काहीतरी वेगळं वाटावं, खटकावं. मुलाला काही ना काही आमिषं दाखवली जातात. खास करून सहजासहजी दिल्या जात नाहीत अशा गोष्टींची खैरात होते. मध्ये एका आईनं सांगितलं होतं, आम्ही मुलीला आठवडय़ाला एक चॉकलेट देतो, पण डॉक्टरकडे जायचं असलं की एका वेळी दोन काय अगदी तीन चॉकलेट्सही देऊ करतो. तरीही डॉक्टरचं नुसतं नाव काढलं की थमान घालतेच ती.
का होतं असं? कितीही लहान मूल असलं तरी आपल्याला फसवलं जात आहे, ही भावना त्याला नकोशीच असते. त्यातून अगदी जवळच्या व्यक्ती (आईवडील, आजी-आजोबा ) फसवताहेत हे तर अगदी लहान मुलालाही क्लेशकारकच असतं. त्याला ते शब्दात नाही मांडता आलं तरी ते आपला आविर्भाव आणि कृतीतून ते दाखवून देतं. यामुळे मग मुलाचं लक्ष दुसरीकडे वळवून पटकन जेव्हा इंजेक्शन दिलं जातं, तेव्हा त्यात शारीरिक वेदना तर असतेच, पण फसवलं गेल्याचाही त्रास होत असतो. त्यामुळे मोठ्ठाली आमिषं जेव्हा दाखवली जातात, तेव्हा हे वेगळंच काहीतरी चाललं आहे, एवढं तर त्यांना कळतंच, पण पूर्वानुभवावरून यात काही काळंबेरं आहे, असा संशयही बळावतो. मूल असहकार पुकारतं ते त्यामुळेच.
काय करता येईल अशा वेळी? मुलाला डॉक्टरकडे जायचं आहे, याची पूर्वकल्पना तर द्यायचीच, पण इंजेक्शन देताना थोडंसं दुखेल, हेही सांगायचं. पण ते दुखणं कमी करायला डॉक्टर स्पिरिट लावतात, त्याने थोडं बरं वाटतं. मग आपली आपण फुंकर मारू शकतो. किंवा दुखतं तिथे बर्फ लावू शकतो, असे वेगवेगळे पर्याय मुलाला सांगता येऊ शकतात. मुळात आपण जितक्या शांतपणे हा प्रसंग हाताळू तितकी आपली देहबोली मुलांसाठी जास्त आश्वासक ठरते. मुलांना कोणत्याही वेदनेला तोंड देताना यातून मोठा धीर येतो. मला आठवतं, आमचा मुलगा एक वर्षांचा होता. आम्ही नुकतेच अमेरिकेत दाखल झालो होतो. भारतातल्या लसीकरण आणि अमेरिकन लसीकरण यातला फरक भरून काढायला त्याला चार वेगवेगळ्या लसी घ्याव्या लागणार होत्या. तिथली नर्स म्हणाली, ‘त्याने घेतल्या तर चारही आज देऊन टाकू.’ माझ्या तर पोटात गोळाच आला होता. ती शांतपणे त्याच्या समोर बसली. तिने आधी त्याला इंजेक्शन दाखवलं, ‘याने मी तुला थोडंसं टोचणार आहे’, असं आधी सांगितलं. मग स्पिरिटचा बोळा लावून दाखवला. त्याचा हात हातात घेऊन बसली. ‘टोचलं की मुंगी चावते तेवढं दुखेल’, असं सांगितलं. म्हणजे केवढं तर आधी सांगून तिने त्याला एक पिटुकला चिमटा काढला. ‘आता दुखलं ना, एवढंच दुखेल इंजेक्शनने’, असंही सांगितलं. मग आइसपॅक लावला. ‘थोडं बरं वाटतं आहे का?’ असं आधी विचारलं. मग ‘तू रेडी आहेस ना?’, असंही विचारलं. हे सगळं चाललं होतं, एक वर्षांच्या मुलाबरोबर! त्याला तिच्या अमेरिकन इंग्लिशमधलं काही कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण ती बोलत होती, आणि तो तिचं शांतपणे ऐकत होता. पहिलं इंजेक्शन झाल्यावर ‘खूप दुखलं का ऱे?’, असं अगदी मायेनं विचारलं तिने. तो जरासा कावराबावरा झाला होता, पण एकंदर शांत होता. पुढची दोन इंजेक्शन तिने याच प्रकारे दिली. दर वेळेला ‘देऊ ना पुढचं इंजेक्शन?’ असं ती त्याला विचारत होती. आता नेमकं कुठे इंजेक्शन देणार आहे, हेही आधी सांगत होती. तो रडला नाही. शेवटचं इंजेक्शन देताना त्याला ‘थोडं जास्त दुखू शकेल हं’, असं सांगून तिने ते दिलं. ते इंजेक्शन घेताना मात्र तो जरासा रडला, तेव्हा ‘हो रे ते थोडं दुखतंच जास्त, सहनही नाही होत नाहीए का रे ?’, असंही विचारलं.
आजही मला हा प्रसंग आठवतो. पुढे अमेरिकेत, भारतात अनेक छान डॉक्टर, नस्रेस भेटल्या. त्यातले अनेकजण मुलांशी छान बोलणारेही होते. पण या नर्सच्या आवाजातली आश्वासकता आजही आठवते. ती आश्वासकता केवळ त्याच्यासाठीच नव्हती, तर आम्हा आईबाबांसाठीही होती. काय केलं तिनं? तिनं मुलाला तुला दुखणार आहे हे तर सांगितलंच, पण तिच्या देहबोलीतून, आवाजातून तुला दुखणार आहे आणि हे मला कळतं आहे, हे मुख्यत: पोहोचवलं. त्यातून हे काही फार मोठं अवघड प्रकरण नाही, सहन होण्यातलं आहे, हेही मुलापर्यंत पोहोचलं. दर वेळी थोडं थांबून मगच ‘देऊ ना पुढचं इंजेक्शन’ असं विचारूनच मग ते दिलं. यातून मी आहे तुझ्याबरोबर हे खूप स्पष्टपणे पोहोचलं असणार त्याच्यापर्यंत, म्हणूनच तर त्याचं इतकं सहकार्य मिळालं ना!
एखाद्याची भावना ओळखणं, आणि ‘तुझी भावना मला कळते आहे’ हे त्याच्यापर्यंत बोलण्यातून, कृतीतून, स्पर्शातून पोहोचवणं, म्हणजे ‘एम्पथी’! सहवेदना, सहभाव, सहअनुभूती, तद्अनुभूती असे अनेक मराठी शब्द त्यासाठी वापरले जातात. केवळ मुलंच नाही तर कोणत्याही व्यक्तीबरोबरच्या सुसंवादाचा हा कणा आहे. त्याबाबत आणखी बोलूया पुढच्या लेखात.
mithila.dalvi@gmail.com
वेदना आणि सहवेदना
छोटय़ा मुलांना आजारी असल्यावर औषध घ्यायला लावणं, इंजेक्शन घेण्यासाठी तयार करणं, रोगप्रतिकारक लस देणं
Written by रोहित धामणस्कर
आणखी वाचा
First published on: 16-09-2015 at 08:10 IST
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to treat children while taking medical treatment