आपले बिझनेस कार्ड हे नुसतं आपलं व्यावसायिक ओळखपत्र नसून आपल्या व्यावसायिक प्रतिमेचा अंश असते. आपण हे कार्ड समोरच्या व्यक्तीला कसे पेश करतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
* प्रत्येक व्यावसायिकाने तसेच कॉर्पोरेट वर्तुळात वावरणाऱ्या प्रत्येकाने नेहमी पुरेशी कार्ड्स जवळ बाळगावीत.
* कोपऱ्यात चुरगळलेली, मळलेली, डाग पडलेली कार्ड्स कोणालाही देऊ नये. कार्डाची दुरवस्था होऊ नये यासाठी ‘कार्ड वॉलट’ चा वापर करावा.
* कंपनी लोगो अथवा आपले नाव झाकले जाणार नाही अशा रीतीने कार्ड हातात धरावे.
* समोरच्या व्यक्तीला वाचता येईल अशा तऱ्हेने आपले बिझनेस कार्ड पेश करावे.
कार्ड स्वीकारायचीही विशिष्ट पद्धत असते. समोरची व्यक्ती ज्या पद्धतीने तुम्हाला कार्ड देऊ करेल, तशा रीतीने तुम्ही ते स्वीकारायला हवे. उदाहरणार्थ..
*  पूर्वेकडच्या देशांमध्ये बिझनेस कार्ड दोन्ही हातात धरून अगदी मौल्यवान वस्तू अर्पण केल्यासारखी दिली जातात. घेणाऱ्यानेही तशाच भावनेने ही बिझनेस कार्ड्स स्वीकारायला हवीत.
* एखाद्या परिषदेत, मोठय़ाला मीटिंगमध्ये खूप सारी बिझनेस कार्ड्स दिली-घेतली जातात. अशा वेळी आपल्या समोरच्या व्यक्ती ज्या क्रमाने बसल्या असतील त्याच क्रमाने त्यांची कार्ड्स आपल्या समोर मांडावीत. असे केल्याने चेहऱ्यांची आणि नावांची जुळवाजुळव करणे सोपे होते.
* आपल्याला समोरच्या व्यक्तीने कार्ड दिल्यानंतर ते वाचूनच आत ठेवावे. न वाचता बॅगेत कोंबण्याची अथवा टेबलावर ठेवण्याची घाई करू नये अथवा त्या कार्डावर देणाऱ्या व्यक्तीसमोर तरी काहीबाही लिहू नये.