तुमची देहबोली तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जाते. जन्मानंतर किमान एक भाषा तरी प्रत्येक जण शिकत असतो. पण आणखी एक भाषा आपल्यापकी प्रत्येकालाच माहीत सुरुवातीपासून ठाऊक असते- ती म्हणजे देहबोली. देहबोलीबद्दल आणखी माहिती करून घेणं म्हणूनच आवश्यक ठरतं. देहबोली ही शास्त्रीय, प्राथमिक भाषा आहे. तिचा उगम हा अश्मयुगातल्या मानवापासून सुरू होतो. भीतीमुळे आपल्या शरीराची जी प्रतिक्रिया होते, तीच प्रतिक्रिया त्या काळच्या मानवाची भुकेला सिंह समोर ठाकल्यावर होत असावी. अर्थात ही देहबोली वाचणं आणि तिचा वापर करणं ही खरंच एक कला आहे. म्हणूनच आवड, आदर आणि आराधना यांच्या सहाय्याने ही कला आत्मसात करणं आवश्यक असतं.
देहबोली म्हणजे काय?
विचारांमधला बदल भावनांमधल्या बदलांमध्ये परावíतत होतो. त्याचा परिणाम विशिष्ट प्रकारच्या शारीरिक बदलांमध्ये होतो. त्यालाच देहबोली म्हणतात. आपण आनंदी असतो तेव्हा आपले डोळे लकाकतात, चेहरा उजळतो, चेहऱ्यावर हास्य येते, खांदे ताठ होतात आणि देह किंचित पुढे झुकतो, मनातले विचार बदलले की शरीराची स्थिती बदलते आणि चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात.
देहबोलीचं महत्त्व
देहबोली म्हणजे आपल्या मनात सुरू असलेल्या विचारांचा जणू आरसाच असतो! म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर त्याची देहबोली वाचायला शिकायला हवं.
एखादी व्यक्ती अप्रामाणिकपणे एखादी कृती करत असते तेव्हा ती शब्द अगदी जपून, काळजीपूर्वक वापरत असते. अर्थात त्यांची देहबोली वाचायला शिकलं तर त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा थांग
लागू शकतो.
देहबोली खोटं बोलू शकते?
एकाच वेळी डोके, हात-पाय, बोटं, ओठ, डोळे अशा सर्व अवयवांची स्थिती जाणीवपूर्वक आपल्या नियंत्रणात ठेवणं ही अशक्य बाब आहे. त्यासाठी अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं आणि अशा प्रकारचं वागणं कृत्रिमपणाचं होऊ शकतं. म्हणूनच आपल्याला आपली प्रतिमा जशी हवी आहे, तसं वागणं हेच यशाचं गमक आहे. आपण आत्मविश्वासाने वावरत आहोत, असं दिसावं असं वाटत असेल तर त्यासाठी स्वत:त आत्मविश्वास येणं आवश्यक आहे. ही आत्मविश्वासाची भूमिका मनाने एकदा स्वीकारली की शरीराला ती पाळावीच लागेल.
एकूण काय, देहबोलीविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या शरीराची स्थिती आणि हालचाल कशी असते याकडे बारकाईने लक्ष द्या. इतर व्यक्तींची त्या त्या प्रसंगी प्रतिक्रिया काय असेल हे ध्यानात असू द्या. देहबोलीचा सराव करणं महत्त्वाचं आहे. देहबोली या गोष्टीवरून जाणता येते
* संयम आणि शरीरस्थिती- आपण ज्या प्रकारे उभे राहतो, चालतो, बसतो.
* पाय-शरीराच्या वजनाचं संतुलन साधणं किंवा पुढे-मागे झुकणं.
* हालचाली- हातांची वा बोटांची हालचाल.
* चेहऱ्यावरचे हावभाव- कपाळ, डोळे, भुवया, ओठ, जबडा यांची स्थिती व हालचाल.
* अंतर- एखाद्या व्यक्तीशी बोलताना किती अंतर राखलंय यावरून नात्याची जवळीक कळते.