एखाद्या वस्तुची अंगभूत गुणवत्ता आणि दर्जा महत्वाचा असतो, तितकेच महत्त्वाचे ठरू लागले आहे ते त्या वस्तूचे पॅकेजिंग. वस्तूचा दर्जा टिकण्याकरता आणि बाजारपेठेत ते उत्पादन अधिक आकर्षक स्वरूपात पेश करण्याकरता त्या वस्तूचे पॅकेजिंग उत्तम असावे, याकडे कल वाढत चालला आहे. आणि याअनुषंगाने आज पॅकेजिंग क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. गेल्या काही वर्षांत पॅकेजिंगची डिझाइन्स, रंगसंगती, तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत आहे. अनेक उत्पादन कंपन्या वस्तुंच्या वेष्टणाला विशेष महत्त्व देऊ लागल्या आहेत. पॅकेजिंग हे क्षेत्र ज्या प्रमाणात विस्तारत आहे, त्या तुलनेत या क्षेत्रात तज्ज्ञमनुष्यबळाची कमतरता दिसून येते. म्हणूनच पॅकेजिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना अनेक उत्तम संधी या क्षेत्रात उपलब्ध होऊ शकतात.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेने सुरू केलेले विविध अभ्यासक्रम या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना निश्चितच उपयुक्त ठरतील. यातील काही अभ्यासक्रम दीर्घ कालावधीचे आहेत तर काही अभ्यासक्रम अल्पावधीचे आहेत. या अल्पावधीच्या अभ्यासक्रमांत प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश होतो. प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने असून हा अभ्यासक्रम विशेषत: निर्यातयोग्य मालाच्या सुयोग्य अशा पॅकेजिंगसाठी उपयुक्त ठरणारा आहे.
केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला एशियन पॅकेजिंग फेडरेशनची अधिस्वीकृती प्राप्त आहे. हा अभ्यासक्रम मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई अशा विविध केंद्रांमध्ये करता येतो. एका बॅचमध्ये एकाच वेळी १५ ते २५ उमेदवारांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत करता येईल. कोणत्याही शाखेतील बारावी, आयटीआय, पदवीधर किंवा पदविकाधारकांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमात पॅकेजिंगची मुलभूत तत्त्वे, साधने, प्रक्रिया, कार्यप्रणाली आणि विविध प्रकारांची निर्मिती आणि त्यांचा उपयोग यांचा ढोबळमानाने समावेश करण्यात येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संस्थेमार्फत प्रमाणपत्र दिले जाते. उमेदवारांना पॅकेजिंगच्या अनुषंगाने तांत्रिक, शास्त्रीय आणि कलात्मक माहिती दिली जाते. पॅकेजिंग सहित्याची सुरक्षितता, किमती याविषयीसुद्धा प्रशिक्षण या अभ्यासक्रमादरम्यान उपलब्ध होते.
संस्थेचा पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग. प्लॉट-२, रस्ता क्रमांक ८, एमआयडीसी एरिया, रिलायन्स एनर्जी कार्यालयाजवळ, पोस्ट बॉक्स- ९४३२,
अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३.
वेबसाइट- iip@iip-in.com