समज-उमज
सध्याच्या वेगवान जीवनशैलीत आपल्याला सगळंच कसं हायस्पीड हवं असतं- खाणंपिणं, खेळ, प्रवास, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून सगळंच. अगदी व्यक्तिगत सुखसमाधानही आपल्याला लवकरात लवकर मिळावं असं वाटत असतं. झटपट इन्स्टण्ट समाधान हवं असण्याच्या आणि त्याच्या नेमकं उलटं म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी थांबता येणं, या प्रवृत्तीवर मोठय़ा प्रमाणावर मानसशास्त्रीय दृष्टीतून अभ्यास झाले आहेत. अशा अभ्यासामागची मूळ संकल्पना म्हणजे ‘डिलेड ग्रॅटिफिकेशन’.
काही दीर्घकालीन मोठा फायदा मिळवण्यासाठी लगेचचे छोटे मोह टाळता येणं, त्यासाठी थांबता येणं, म्हणजे डिलेड ग्रॅटिफिकेशन. उदाहरणार्थ आज ‘आयपीएल’ची एक खूप इंटरेिस्टग मॅच आहे, पण उद्या परीक्षा आहे, आणि अभ्यास पूर्ण झालेला नाही. अशा वेळी मॅच पाहायचा मोह टाळता येणं किंवा अधूनमधून स्कोअर चेक केला तरी पुन्हा अभ्यासाकडे वळता येणं, हे म्हणजे डिलेड ग्रॅटिफिकेशन.
असं थांबता येणं- स्वयंनियंत्रण- हा यशस्वी होण्यामागचा मोठा घटक आहे, हे दीर्घकाळ चाललेल्या मानसशास्त्रीय प्रयोगांनी आता फार ठळकपणे अधोरेखित केलं आहे.
खरं तर जगण्याच्या अनेक पलूंना हे लागू पडतं. पण पालकत्वाच्या बाबतीत डिलेड ग्रॅटिफिकेशन ही दुहेरी जबाबदारी होते. आपल्या मुलांमध्ये ते असावं म्हणून प्रयत्न करणं, हा त्याचा एक भाग. आणि मुलांच्या वाढीत, जडणघडणीत आपली कुठे घाई तर होत नाही ना, याचं स्वत:ला भान असणं- हा त्याचा दुसरा आणि जास्त कसोटी पाहणारा भाग.
मुलांनी एखादी गोष्ट करावी, म्हणून त्यांना त्यासाठी आमिषं दाखवली जातात तेव्हा काय होत असतं? मुलांना प्रेरणा देणं (मोटिव्हेशन) हे किचकट, अगदी प्रेरणा देणाऱ्याची परीक्षा पाहणारं असू शकतं. त्याऐवजी त्यांना काहीतरी देऊ केलं की झालं ना झटपट काम! गंमत म्हणजे परीक्षेत अमुक मार्क्स मिळाले की देतो तुला नवीन खेळणं (आजकालच्या काळात बऱ्याचदा हे खेळणं म्हणजे स्मार्ट फोन). पण तितके मार्क्स नाही मिळाले तर काय? तरीही जर मुलांच्या भुणभुणीला कंटाळून जर आपण तो देणारच असू तर काय? किंवा इमर्जन्सी म्हणून मुलाकडे तो असायला हवा असेल तर काय? मग तर तो आपण देणारच असतो. अशा वेळी आपलं मोटिव्हेशनचं काम झटपट व्हायला तर नाही ना वापरत आहोत हे आमिष? अशा वेळी आपलं धीर धरणं कमी पडतं का, हे तपासून पाहणं
फार गरजेचं.
स्पध्रेत, परीक्षेत अपेक्षित यश न मिळवू शकलेल्या एखाद्या मुलाशी बोलताना पालक, शिक्षक, प्रशिक्षक या सगळ्यांचा एक खास लाडका डायलॉग असतो- ‘पुढच्या वेळेस आणखी प्रयत्न केलेस तर नक्की यश मिळवशील तू.’ ऐकणारा खरंच हा सल्ला ऐकण्याच्या मन:स्थितीत असतो का? नाही. बहुतेक वेळा तो त्याच्या उदास, खंतावलेल्या मन:स्थितीत असतो. त्यामुळे याचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी बहुतेक वेळा उलटा नकारात्मकच परिणाम होत असतो. असं का होतं? या सांगण्यात चुकीचं असं काहीच नाही. चुकीचं आहे ते टायिमग. सांगणाऱ्याला आपलं काम करायची घाई
झालेली असते!
मुलांना त्यांना अवघड जाणारे विषय शिकवणं, त्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक जडणघडण होणं, या सगळ्याच गोष्टींसाठी आज क्लासेस, कॅम्प्स, शिबिरं, सराव वर्ग सगळंच उपलब्ध आहे. व्यवसायाचा भाग म्हणून यातले अनेक जण यशाची हमखास खात्री देत असतात. प्रत्येक मूल वेगळं, त्यामुळे या गोष्टींचा फायदा प्रत्येक मुलाला वेगळ्या प्रकारे कमी-जास्त प्रमाणात होत असतो याचं भान असणं पालक म्हणून खूप महत्त्वाचं. मुलांमध्ये कमी असणाऱ्या गोष्टी झटपट फिक्स करून देणारी सोय म्हणून या सगळ्याकडे पाहण्याचा कल आता वाढीला लागला आहे. एकंदरच वेळेच्या अभावामुळे या अनेक गोष्टी आऊटसोर्स कराव्याशा वाटणं स्वाभाविकही आहे. पण पालकत्व नाही आऊटसोर्स करता येत. आपल्या बऱ्या-वाईट सगळ्या गुणअवगुणांना पाहात आपलं मूल घडत असतं. बऱ्याचदा हाताशी वेळ कमी आहे, आपल्या व्यवसायाचा अविरत ताण आहे आणि मुलांच्या बाबतीत नेमकं काय करायचं हे कळत नाही. या सगळ्यातून अशा झटपट उपाययोजना हव्या असं वाटूही शकतं. पण काही बाबतीत योग्य तो वेळ द्यावाच लागतो. तिथे अनेक टप्प्यांतून जात जातच अपेक्षित परिणाम गाठला जात असतो. मधली सगळी प्रक्रिया हा मुलांच्या आणि आपल्याही जडणघडणीचा एक भागच असतो.
या जडणघडणीसाठी पालक म्हणून आपल्याला कळ सोसता येते आहे ना, आपली थांबायची तयारी आहे ना- याचं सारखं भान ठेवावं लागतं. आणि त्यासाठी आपलं तारतम्य सतत जागं असणं फार महत्त्वाचं. ‘थांबा आणि पुढे जा’ हे दाखवणाऱ्या पिवळ्या सिग्नलसारखं. मुलांमध्ये थांबता येण्याची क्षमता जोपासायची असेल, तर मुळात आपली ‘सबुरी’ मुलांना दिसणं म्हणूनच महत्त्वाचं!
..आणि सबुरी
सध्याच्या वेगवान जीवनशैलीत आपल्याला सगळंच कसं हायस्पीड हवं असतं- खाणंपिणं, खेळ, प्रवास, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून सगळंच. अगदी व्यक्तिगत सुखसमाधानही आपल्याला लवकरात लवकर मिळावं असं वाटत असतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-05-2015 at 09:51 IST
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patience