मुलं वाढत असताना त्यांना एखादी गोष्ट जमते आहे हे पाहिलं, की मुलांबरोबर घरातल्या सगळ्यांना छान वाटू लागतं. मुलं थोडं थोडं बोलू लागली की त्यांनी रोजचे नवे शिकलेले शब्द, वाक्य आणि त्यांची विशिष्ट वाक्यरचना.. हे सगळं पाहणं हा घरातल्या सगळ्यांसाठीच फार सुखद अनुभव असतो. प्रत्येक पिढी आपापल्या परीनं हे अनुभव, हे क्षण जपून ठेवते. अगदी कोणे एके काळी स्टुडिओतल्या गोल खुर्चीत बसून षठीषणमासी काढलेले मुलांचे फोटो- ते आज प्रत्येक क्षणाक्षणाचे मुलांचे टिपलेले व्हिडीओज्- असा तो प्रवास आहे. स्मार्ट फोन्समुळे सगळ्या सुविधा उठता बसता प्रत्येक क्षणी अक्षरश: आपल्या हाताशी आहेत.. डिजिटली सगळं स्टोअर करायला लागणारी प्रचंड मेमरी तर बोटावर मावण्याइतकी छोटीशी आहे.
यात भर पडली आहे ती सोशल मीडियामुळे विस्तारलेल्या प्रचंड क्षितिजांची. यामुळे मुलांचे काहीही छान फोटोज/ व्हिडीओज घेतले की ते तात्काळ अपलोड होतात आणि छान वाटतं म्हणून व्हॉट्सअपच्या ग्रुप्समधून ते फिरत राहतात. कोणे एके काळी पाहुणे घरी आले की त्यांना घरातली मुलं श्लोक, प्रार्थना, कविता, नर्सरी ऱ्हाइम्स म्हणून दाखवायची. त्याचं सध्याचं स्वरूप म्हणजे मुलांना येणाऱ्या गोष्टी, गाणी रेकॉर्ड करून ती अपलोड करणं.
मग मुलांनी म्हटलेली गाणी, वाजवलेली वाद्यं, केलेले छोटे-मोठे नाच यापासून ते मुलांना असणारं जनरल नॉलेज- या सगळ्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर पाहायला मिळताहेत. या जनरल नॉलेजचा आवाकाही थक्क करणारा.. म्हणजे तीन-चार वर्षांच्या मुलांनी सांगितलेल्या पन्नास एक देशांच्या राजधान्या, करन्सी (चलन), देशाच्या राष्ट्रपतींपासून अनेक पदाधिकाऱ्यांची नावं.. यादी न संपणारी..
यातल्या अनेक गोष्टींचे संदर्भ मुलांना माहीत नसतात, ते केवळ पाठांतर असतं. मुलं अनेक श्लोक, प्रार्थना, गाणी म्हणतात, तसं हे. सगळं फक्त गद्यातलं. सहसा बोलकी, भाषा सहज येणारी मुलं या गोष्टी सहजी आत्मसात करतात. गोष्टी सहजपणे होतात तिथपर्यंत त्यात गंमत, रमणं आहे. पण एकदा का या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर गेल्या आणि त्यांना मिळणारे लाइक्स मोजले जायला लागले, की या सगळ्याचं स्वरूपच बदलतं. त्याला सादरीकरणाचं (प्रेझेण्टेशन) रूप मिळतं. त्यात अमुकला किती देशाच्या राजधान्या सांगता येतात, तमुकला किती राज्यांचे मुख्यमंत्री सांगता येतात आणि त्या तुलनेत माझ्या मुलाला काय काय येतं, असे नवे नवे अनेक पलू त्याला चिकटत जातात. आणि या सगळ्याचा प्रभाव म्हणजे अगदी चार-पाच वर्षांच्या मुलांबरोबर जनरल नॉलेजची पुस्तकं घेऊन बसणाऱ्या आई-बाबांची नवीन पिढी उदयाला येते आहे आणि या काही गोष्टी जमल्या म्हणजे मूल ‘हुशार’ असा समजही फार झपाटय़ाने पसरतो आहे.
मुळात बुद्धिमत्तेचे अनेक पलू आहेत. पाठांतर आणि भाषाविषयक गोष्टी जमणे हा बुद्धिमत्तेचा केवळ एक भाग आहे, हे भान मुलांच्या जवळच्यांना असणं फार गरजेचं आहे. जितक्या जास्त लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचतात, तितक्या जास्त प्रमाणात मूल कौतुकाचं धनी होतं. आणि कौतुक होताना ते मुलाच्या या एका पलूचं कौतुक असं त्याला स्वरूप नाही राहात, एकूणातच ‘मूल हुशार’ असा शिक्का त्याच्यावर आपोआप बसतो आणि हा शिक्का गृहीत धरून मूल पुढे जात राहतं.
अशा काही मुलांची पुढची वाट फार खडतर होऊ शकते. पाठांतर करून खालच्या वर्गामधून परीक्षेत भरपूर मार्क्स मिळवता येतातही. त्यामुळे अनेकदा विषय समजून घ्यायची फारशी गरज वाटत नाही. एका विशिष्ट वयापर्यंत पाठांतराच्या बळावर हुशारीचा शिरपेच डोक्यावर खोवून वावरायची या मुलांना सवय लागते. मात्र पुढे पुढे शाळेत भूमिती, गणित, भौतिकशास्त्र, भूगोल हे विषय केवळ पाठांतराच्या जोरावर धकवता नाही येत. समजून घेण्याची सवयही लागलेली नाही, संकल्पना समजत नाहीत, तेव्हा मग अभ्यासच नकोसा वाटायला लागतो, परिणाम- अर्थातच मार्क्स घटायला लागतात, आई-वडील, शिक्षक सगळ्यांची बोलणी ऐकावी लागतात. इतक्या दिवसांचा हुशारीचा शिरपेच अचानक बोझ बनून जातो आणि त्या मुलांना कळतच नाही की, आताआतापर्यंत तर सगळेच माझं कौतुक करत आलेत, मग आताच का हे फटके पडायला लागलेत!
यात गोम अशी असते की, मुलांना नाही कळत म्हणावं, तर आई-बाबांनाही नाही कळत काय गोंधळ होतो आहे ते. मग मुलाला आणखी आणखी बोलणी बसत जातात आणि मूल एकटं पडत जातं.
अगदी लहान वयात अति कौतुकाचे धनी होणाऱ्या अनेक मुलांच्या वाटय़ाला हा खडतर प्रवास येतो. अशा वेळी नेहमी एक प्रश्न आई-बाबा, आजी-आजोबा मंडळी विचारतात, म्हणजे काय एखादी गोष्ट चांगली केली तर कौतुकच नाही करायचं मुलांचं? करायचं ना, पण कसं करायचं ते पाहू या पुढच्या लेखात.
मिथिला दळवी -mithila.dalvi@gmail.com
समज-उमज : कौतुकाचा शिरपेच
मुलं वाढत असताना त्यांना एखादी गोष्ट जमते आहे हे पाहिलं, की मुलांबरोबर घरातल्या सगळ्यांना छान वाटू लागतं
आणखी वाचा
First published on: 05-08-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raising kids in a digital world