बहुसंख्य खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा स्वयंमूल्यांकन (सेल्फ अप्रायझल) या प्रक्रियेद्वारे मांडला जातो. कर्मचाऱ्यांच्या बढतीचा तसेच वेतनवाढीचा निर्णय या स्वयंमूल्यांकन प्रक्रियेद्वारे घेण्यात येतो. या वार्षकि प्रक्रियेद्वारा कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष कामातील योगदान ठरते आणि त्यावर करिअरमधील त्याच्या प्रगतीचा आलेख निश्चित होत असतो.
प्रक्रियेचे स्वरूप
* या अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याला साधारणत: आíथक वर्षांच्या शेवटच्या महिन्यात एक प्रश्नावली दिली जाते.
* कर्मचाऱ्याने ही प्रश्नावली विशिष्ट कालावधीत पूर्ण भरून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देणे अनिवार्य असते.
* याबाबत कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित कर्मचारी यांच्यात समक्ष सविस्तर चर्चा होते आणि अधिकारी व्यक्तीच्या अभिप्रायासह ते पत्रक वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवले जाते.
* अधिकाऱ्याने नोंदवलेले शेरे, टीका, टिपा यांच्या आधारे कर्मचाऱ्याच्या बढतीचे तसेच पगारवाढीचे निर्णय कंपनीच्या अधिकारीवर्गाकडून घेतले जातात.
प्रश्नावलीचे स्वरूप
* कर्मचाऱ्याचा सध्याचा हुद्दा आणि वेतन यांची सविस्तर माहिती.
* वर्षभरात कर्मचाऱ्यावर सोपवलेली विभागवार कामे.
* या विहित कामांव्यतिरिक्त वर्षभरात सोपवलेल्या विशेष जबाबदाऱ्या.
* वरील कामे पार पाडताना आलेल्या अडचणी आणि त्या दूर करण्यासाठी कर्मचाऱ्याने केलेले प्रयत्न.
* कार्यालयातील कामकाजाबद्दल काही महत्त्वपूर्ण सूचना.
* वरिष्ठांकडून विशेष दखल घेतली जावी अशी महत्त्वपूर्ण कामे.
* आपली कार्यालयीन कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही शिक्षणक्रम, परीक्षा, अभ्यासवर्ग यात सहभागी होण्याची इच्छा असल्यास, त्याचा उल्लेख.
* नजीकच्या भविष्यात आपल्या कंपनीकडून काय अपेक्षा आहेत आणि त्यासाठी आपण कोणते प्रयत्न करू शकतो, या गोष्टी नमूद करणे.
* आगामी वर्षांत कोणती विशिष्ट जबाबदारी पेलण्याची आपली इच्छा असल्यास तसे लेखी स्वरूपात नमूद करावे.
* आपल्या ठरावीक प्रयत्नांमुळे किंवा निर्णयांमुळे जर कंपनीचा कोणत्याही प्रकारे फायदा झाला असेल, तर अशा गोष्टींचा सविस्तर उल्लेख
अपेक्षित असतो.
पूर्वनियोजन
* वर्षांच्या शेवटी कराव्या लागणाऱ्या स्वयंमूल्यांकन प्रक्रियेचा विचार कर्मचाऱ्याने वर्षभर करत राहणे प्रभावी ठरते.
* कोणत्याही महत्त्वपूर्ण कार्यालयीन प्रकल्पांची पूर्तता, कामकाजातील स्वीकारलेले आणि यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आव्हान, कामकाजातील अडचणी, सुधारणा यांची नोंद वेळोवेळी स्वत:जवळ ठेवणे गरजेचे आहे. यामुळे स्वयंमूल्यांकन करणे सोपे आणि जलद होईल.
प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांनी
स्वत:ला विचारावेत असे प्रश्न
* गतवर्षीपेक्षा, या वर्षी कोणती वेगळी आणि उत्तम कामगिरी माझ्याकडून पार पडली? जर कोणतीच भरीव कामगिरी हातून घडली नसेल तर त्यामागील कारण काय आहे?
* माझी बलस्थाने कोणती आहेत आणि त्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे का?
* माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या दुबळ्या बाजू कोणत्या आहेत आणि त्यात गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे का?
* उत्तम कर्मचारी बनण्यासाठी या वर्षांत मी कोणती नवीन आव्हाने स्वीकारली? स्वत:मध्ये कोणते बदल घडवून आणले?
* पुढील वर्षांत स्वत: पुढाकार घेऊन कोणते आव्हान स्वीकारण्याची आपली तयारी आणि क्षमता आहे का?
* येत्या वर्षांत कार्यालयीन प्रगतीसंदर्भात माझी कोणती निश्चित ध्येये आहेत आणि त्यासाठी कोणती तयारी सुरू आहे?
गुणवत्तापूर्ण लेखन आवश्यक
* स्वयंमूल्यांकन ही वरकरणी साधी प्रक्रिया वाटली तरी प्रत्यक्षात मात्र ही विचारांना चालना देणारी प्रक्रिया आहे. कर्मचारी आणि कंपनी या दोघांच्याही प्रगतीसाठी आवश्यक ठरते.
* स्वत:च्या वर्षभराच्या कामगिरीचे मूल्यमापन एका बठकीत लिहून काढणे अशक्य आहे. भरपूर वेळ आणि विचार करून त्याची गुणवत्ता वाढवणे योग्य ठरते.
* आपले स्वयंमूल्यांकन जास्तीत जास्त परिपूर्ण असेल, आपली यच्चयावत कामगिरी त्यात समाविष्ट केली आहे, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
* लेखनातील व्याकरण अचूक असणे महत्त्वाचे आहे.
* प्रतिमा निदर्शक- आपल्या स्वयंमूल्यांकनातून आपली प्रतिमा सक्षम, सकारात्मक, प्रामाणिक, परिवर्तनशील, प्रगतिशील होणे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. यासाठी वरिष्ठांकडून मार्गदर्शन, सल्ला आणि वेळ पडल्यास विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची तयारी आपण दर्शवायला हवी.
* सुधारणांसाठी प्रयत्न- आपल्या कामाचा दर्जा उंचावण्यासाठी आपण कोणती पावले उचलणार आहोत, याच्या योजनांची माहिती देणे गरजेचे आहे.
उदाहरणार्थ, येत्या वर्षांत विक्री विभागातील कर्मचाऱ्याने आपले विक्री लक्ष्य गाठण्यासाठी, अकौंटंटने कंपनीची ऑडिटेड बॅलन्सशीट वेळच्यावेळी देण्यासाठी, तर दुरुस्ती अभियंता किंवा तंत्रज्ञाने कमी अवधीत जास्तीतजास्त ग्राहक तक्रारी दूर करण्यासाठी कोणते नियोजन केले आहे याची माहिती अपेक्षित आहे.
स्वयंमूल्यांकनाचे महत्त्व
* वर्षभरातील कामगिरीचे मूल्यांकन, स्वत: कर्मचाऱ्याकडून झाल्याने, त्याला स्वत:च्या क्षमतांचा अंदाज येतो आणि कामाचे नियोजन व व्यवस्थापनातील त्रुटी अजमावून त्यावर उपाय शोधणे सोपे होते.
* जर एकच काम दोन कर्मचाऱ्यांकडून होत असेल (डय़ुप्लिकेशन ऑफ वर्क) किंवा कार्यप्रक्रियेतील एखादा टप्पा वगळला जात असेल (ओमिशन ऑफ वर्क) तर अशा गोष्टी स्वयंमूल्यांकन प्रक्रियेद्वारा व्यवस्थापकीय मंडळासमोर येतात आणि त्यावर योग्य उपाययोजना केली जाते.
* कर्मचाऱ्याला देण्यात येणारा वार्षकि मोबदला (सी.टी.सी.) आणि त्या तुलनेत कर्मचाऱ्याची उपयुक्तता अशी थेट तुलना या प्रक्रियेतून साध्य होते.
* कर्मचाऱ्याला कंपनीच्या निर्णयप्रक्रियेत, ध्येयपूर्तीत सहभागी झाल्याचे समाधान मिळते, सन्मान मिळतो आणि परिणामी, कर्मचाऱ्यांची कामगिरी आणि कंपनी प्रति असलेली निष्ठा वाढीस लागते.
* वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांमधील सुसंवाद वाढण्यास मदत होते. वरिष्ठांबरोबर केलेल्या चच्रेमुळे परस्परांमधील गरसमज दूर होऊन कामकाज सुरळीत होण्यास मदत होते.
प्रभावी स्वयंमूल्यांकनासाठी..
* मुद्देसूद मांडणी- वर्षभरातील कामांची माहिती, प्रगती, प्रयत्न या सर्व गोष्टी मुद्देसूदपणे शब्दबद्ध करणे आवश्यक आहे. कामाच्या प्रक्रियेत आलेल्या अडचणी किंवा त्रुटी यांचे समर्पक स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. जिथे शक्य असेल तेथे यादी आणि रकाने स्वरूपात माहिती देणे प्रभावी ठरते.
* माहितीची सत्यता- मूल्यांकन करताना मांडलेले मुद्दे सत्य आहेत हे स्पष्ट व्हावे, याकरता शक्य झाल्यास लेखी स्वरूपातील यादी किंवा
उदाहरणे जोडावीत.
* सकारात्मक विधाने- मूल्यांकन सादर करताना वरिष्ठ व्यक्तींबद्दल नाराजीचा सूर, सहकाऱ्यांबद्दल तक्रारी, कामाचा होणारा त्रास या गोष्टींचा उल्लेख प्रयत्नपूर्वक टाळावा. याऐवजी आपल्याला भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी नेमके कोणते बदल कार्यालयीन व्यवस्थेत आवश्यक आहेत याबद्दल जरूर सूचना द्याव्यात.
उपयुक्त संकेतस्थळे
स्वयंमूल्यांकन योग्य प्रकारे कसे करता येईल, यासंबंधीचे मार्गदर्शन करणारी संगणकीय संकेतस्थळेही उपलब्ध आहेत. त्यांचीही मदत घेता येईल.
http://www.wikihow.com/Write-a-Self-Evaluation
http://www4.nau.edu/insidenau/bumps/9_21_05/appraisal.htm
http://www4.nau.edu/insidenau/bumps/9_21_05/appraisal.htm