अनेकांची समजूत असते की केवळ संबंधित क्षेत्रातील पदवी अथवा व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण गाठीशी असले तर करिअरमध्ये हमखास यश मिळते. हे खरं आहे की, करिअरची सुरुवात करताना अशा पदव्यांची आवश्यकता भासते. मात्र, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी यासोबत आणखीही काही गोष्टी अत्यावश्यक असतात.. त्यातील एक घटक म्हणजे तुमची प्रतिमा. सॉफ्ट स्किल्सच्या अर्थात वर्तणूक कौशल्यांच्या आधारे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात प्रगती साधता येते. याच कौशल्यांच्या आधारे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि इतरांच्या मनातील तुमच्या प्रतिमेचाही विकास होत असतो. तुमची प्रतिभा आणि प्रतिमा उंचावण्यासाठी काय करता येईल, ते पाहूयात-
प्रतिमेच्या संवर्धनासाठी योग्य दृष्टिकोन जोपासा
* तुम्ही उच्चारलेले प्रत्येक सकारात्मक वाक्य हे तुमच्या प्रतिमेच्या संवर्धनासाठी उपयोगी पडते.
* स्वत:बद्दल कधीही नकारात्मक वाक्य तोंडी येणार नाही, याची दक्षता घ्या.
* इतरांच्या गुणकौशल्यांतून तुम्ही बरंच शिकू शकता, मात्र त्यांनी केलेल्या साऱ्या गोष्टी आपणही केल्याच पाहिजेत, हा अट्टहास बाळगू नका.
* ‘आपण असं असावं’ याबद्दल तुमची स्वत:बाबत जी कल्पना, अपेक्षा असेल त्याच दृष्टिकोनातून स्वत:कडे पाहा. पूर्वायुष्यात घडलेल्या चुका अथवा मर्यादांचे ओझे मनाशी बाळगू नका.
* स्वत:ला प्रोत्साहित करण्यासाठी सतत स्वत:शी संवाद साधत राहा.
* हे लक्षात ठेवा, की जर एखादा सहकारी तुमच्या कामाविषयी नेहमीच नकारात्मक प्रतिक्रिया देत असेल तर त्याने तुमच्या कामावर विपरित परिणाम होऊ शकतो. मात्र, जर ती नकारात्मक प्रतिक्रिया जर तुमच्या मनात फार काळ रेंगाळत राहिली आणि तुम्हीही स्वत:च्या कामाविषयी तोच दृष्टिकोन बाळगलात तर ते तुमच्यासाठी अधिक वाईट असते.
स्वत:ची वागणूक अभ्यासा
* तुमच्या वागणुकीवर सगळ्यांचे लक्ष असते, हे लक्षात असू द्या. तुमचा पेहराव, इतरांशी तुमचं बोलणं नेटकं असू द्या.
’अधिकाधिक शिकण्यासाठी उत्सुक राहा. तुमच्या कंपनीने आयोजित केलेल्या कार्यशाळा, परिसंवाद यांना आवर्जून उपस्थित राहा.
* इतरांविषयी नकारात्मक बोलणं, एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल गॉसिप करणं टाळा.
* स्वत:च्या खासगी आयुष्यातील अडचणींची चर्चा कार्यालयामध्ये करू नका.
* कार्यालयातील मोकळ्या वेळेत तुम्ही कुणासोबत असता, यावरही इतरांचे लक्ष असते.
* शांत व प्रसन्न राहा.
वर्तणूक कौशल्ये आत्मसात करा
* वर्तणूक कौशल्ये ही तुमची प्रतिमा ठसवण्यासाठी आवश्यक असतात.
* तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक यांच्याशी बोलून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील कुठल्या गोष्टी त्यांना आवडतात, कुठल्या पटत नाहीत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला तुमच्या मर्यादांचे भान येते आणि त्रुटींवर मात करता येते.
* एखादी व्यक्ती ‘रोल मॉडेल म्हणून निवडा. त्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक बाबी आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा.
* समूहातील वक्तव्य- मग ते एखाद्या मीटिंगमधील असो वा एखाद्या परिसंवादातील.. काही वेळानंतर आपल्या कामगिरीची समीक्षा करण्याची सवय लावून घ्या.
* गुणात्मक आणि व्यवस्थापकीय कौशल्यांची दखल कार्यालयीन पातळीवर उच्चपदस्थांकडून घेतली जात असते, हे ध्यानात घ्या.
प्रतिमेच्या व्यवस्थापनासाठी सोशल मीडियाचा उपयोग
तुमचा ऑनलाइन वावर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या वर्तुळाच्या पलीकडे पोहोचवत असतो. त्यातून इतरांच्या मनात तुमची प्रतिमा आकार घेत असते. अनेक कंपन्यांमध्ये नोकरी देताना त्या व्यक्तीच्या सोशल मीडियातील प्रोफाइलचीही पडताळणी होत असते.
ट्विटर – तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्या क्षेत्रातील संस्थांशी आणि व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी ट्विटर हे चांगले माध्यम आहे. ट्विटरच्या माध्यमातून तुम्हाला विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांशी चांगले संबंध ठेवता येतील. ट्विटरद्वारे जनसंपर्क वाढवून इतरांना तुमच्या कौशल्यांची, यशाची जाणीव करून द्या. ट्विट केल्यानंतर ते सर्वांपर्यंत पोहोचते. म्हणूनच तुम्ही जे ट्विट कराल, ते
काळजीपूर्वक करा.
फेसबुक – वरिष्ठ, सहकारी अथवा तुमच्या क्षेत्राशी संबंधित असलेले अनेकजण तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फेसबुकचा उपयोग करतात. फेसबुकमध्ये तुमच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्यातील सीमारेषा धूसर होते. म्हणूनच फेसबुकवर संपर्क करताना तसेच फोटो टाकताना काळजी घ्या.
लिंकडिन – व्यावसायिकदृष्टय़ा संपर्कात राहण्यासाठी लिंकडिनचा उपयोग केला जातो. संपर्कात राहण्यासाठी तुमची विश्वासार्हता ध्यानात घेतली जाते. लिंकडिनवर तुमची अचूक माहिती द्या.
ब्लॉग – ब्लॉगवर प्रतिक्रिया दिल्यास तुम्हाला योग्य प्रतिक्रिया कशी द्यावी, याचा सराव होऊ शकेल. लिहिलेले आवडल्यास लेखकाचे जरूर कौतुक करा. लेखनासंबंधी तुम्हाला सांगावेसे वाटणारे अधिकचे मुद्दे जोडा. विषयाशी संबंधित लिंक असेल तर ती द्या. जर तुमच्या क्षेत्राशी संबंधित अथवा विषयाशी संबंधित ब्लॉग असेल तर सविस्तर प्रतिक्रिया लिहिण्यास संकोच करू नका. यू टय़ूबवर अपलोड केलेला तुमचा व्हिडीओ अथवा महत्त्वाच्या विषयावर लिहिलेला स्वत:चा ब्लॉग याद्वारे तुम्हाला तुमची प्रतिभा व्यक्त करता येईल. तुमची प्रतिमा उजळण्यास या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात.