महिलांमध्ये उपजतच उद्योगप्रियता असते. त्या एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतात. आज महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कार्यालयीन कामकाज यशस्वीरीत्या सांभाळते. महिलांची उद्योगप्रियता त्यांना सतत क्रियाशील ठेवत असते. चिकाटी आणि सातत्य हे दोन गुण महिलांमध्ये दिसून येतात. वेळेच्या व्यवस्थापनातलं त्यांचं कौशल्य वाखाणण्यासारखं असतं. या सर्व बाबी त्या योग्य नियोजनानं करत असतात. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळालेले नसले तरीही बहुसंख्य महिला काळ-काम-वेगाचं गणित अचूक पद्धतीने सांभाळत असतात.
या सर्व बाबी एखादा स्वयंरोजगार, व्यवसाय किंवा उद्योगाच्या यशस्वितेसाठी उपयुक्त ठरू शकतात. स्वत:मधील हा गुण लक्षात घेऊन महिलांनी स्वंयरोजगार उभारण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. कोणत्याही स्वयंरोजगारासाठी अथवा व्यवसायासाठी काही मूलभूत ज्ञान अत्यावश्यक असतं. अशा प्रकारचं प्रशिक्षण देणारा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम ‘दुर्गादेवी सराफ इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ने सुरू केला आहे.
हा अभ्यासक्रम ‘डिप्लोमा इन आंत्रप्रिन्युरशिप अॅण्ड बिझनेस प्लॅिनग’ या नावानं ओळखला जातो. कालावधी-चार महिने. अर्हता- व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा असणारी व उत्तम संवादकौशल्य असणारी कोणतीही महिला या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवू शकते.
या अभ्यासक्रमात एखाद्या व्यवसायाची सुरुवात कशी करायची, तो पुढे कसा सुरू ठेवायचा, त्याला गती कशी द्यायची याचं मूलभूत प्रशिक्षण दिलं जातं. व्यवसायाच्या आराखडय़ाची निर्मिती, व्यवसाय सुरू करण्याआधीचं संशोधन, वस्तू अथवा सेवा, विपणन, विक्री, वित्तीय नियोजन, संवाद साधताना येणारे अडथळे, सादरीकरणाचं कौशल्य, वाटाघाटी कौशल्य, वेळेचं प्रभावी व्यवस्थापन, कर्जपुरवठा, बँकेशी संपर्क, वित्तीय बाबींच्या नोंदी, सोशलमीडिया आणि ऑनलाइन सुविधेचा व्यवसायवृद्धीसाठी वापर, पुढील पाच वर्षांचं नियोजन, मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशिक्षण, व्यवसायाशी संबंधित विविध कायदे, नियम, तरतुदी, तणाव व्यवस्थापन, वस्तूंच्या जाहिराती, प्रदर्शने, प्रत्येक घडामोडीवरील संनियंत्रण आदी विविध बाबींचे प्राथमिक ज्ञान उपलब्ध करून दिलं जातं.
पत्ता- दुर्गादेवी सराफ इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,
आर. एस. कॅम्पस, एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई- ६४. वेबसाइट- http://www.dsims.org.in
ईमेल- dmission@dsims.org.in