samajक्वालिटी टाइम – मुलांबरोबर जो वेळ आपण घालवणार आहोत, तो पूर्णपणे त्यांच्यासाठी वापरणे, त्या वेळात त्यांना ‘अनडिव्हायडेड अटेन्शन’ देणं- असा त्याचा रूढ अर्थ. आपण मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही अशी खंत अनेक आई-बाबांना नेहमीच वाटत असते. त्या खंत वाटण्याला इन्स्टंट सोल्युशन, सर्व दुखण्यांवरचा अक्सीर इलाज, अशा स्वरूपात ‘क्वालिटी टाइम’चा हुकमी एक्का काढला जातो. गेल्या ३०-४० वर्षांमध्ये पाश्चात्त्य जगात आणि साधारण १०-२० वर्षांमध्ये आपल्याकडे हा पत्ता जोरदार राज्य करतो आहे.
प्रत्यक्षात काय चित्र दिसतं, तर हा तथाकथित ‘क्वालिटी टाइम’ देऊनही पालक आणि मुलांचे एकमेकांबरोबरचे ताणाचे, घासघीस होण्याचे क्षण काही कमी होताना दिसत नाहीत. उलट अनेक ठिकाणी शिक्षक, पालक, समुपदेशकांना त्यात वाढच झालेली दिसते आहे. असं का? रोनाल्ड लेव्हंट या प्रख्यात मानसशास्त्रज्ञाने नव्वदच्या दशकातच म्हणून ठेवलं आहे- पालकत्व ही काही वेळापत्रकानुसार करायची गोष्ट नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, आणि या गोष्टीला पर्याय नाही.
मुलाचा स्वत:चा दिनक्रम, एकंदर घराचं रुटीन आणि गरज पडेल तसं एकमेकांसाठी आपण आहोत हा विश्वास- ही घर या संकल्पनेची बठक आहे. ‘क्वालिटी टाइम’ मुलांची आणि आपली दिनचर्या तर वेगळी करतोच, पण कुटुंबाचे घटक म्हणून आपण एकमेकांसोबत असण्याची पण फारकत करतो.
अतिशय धकाधकीच्या जगण्यात काहीही वेगळं समोर ठाकलं की त्याला तोंड कसं द्यायचं याचा ताण अनेक आई-बाबांना असतो. आणि हाताशी उपलब्ध असलेला मोजका वेळ पाहता तो तसा येणं स्वाभाविकही आहे. पण वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मुलाची गरज वेगळी असते, आणि आपल्या क्षमता आणि मर्यादांची सांगड घालत घालत ही गरज पुरी करायची असते- हे भान पालक म्हणून असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी कुटुंबीयांच्या आचार-विचारातली लवचीकता (फ्लेक्झिबिलिटी) आणि तारतम्य या फार आवश्यक गोष्टी आहेत. बऱ्याचदा अनेकांना मुलं वाढताना सतत सामोरी येणारी अनिश्चितताच नको असते. इन्स्टंट यशाची हमखास खात्री देणारे मंत्र यामुळेच तात्काळ लोकप्रिय होतात. आणि कोणत्याही एकाच एका मंत्राची कास धरली की पालकत्वातली लवचीकता आणि परिणामकारकता गेलीच ना!
मुलांच्या अॅक्टिव्हिटिज आणि त्यांना एक्स्पोजर देण्यासाठी केलेल्या अनेक गोष्टींना दुर्दैवाने आज ‘क्वालिटी टाइम’शी जोडलं गेलं आहे. मुलांना एका क्लास अॅक्टिव्हिटीमधून दुसरीकडे नेण्यात आई-बाबांचा खूप वेळ खर्ची पडतो. आणि खास मुलांसाठी म्हणून आई-बाबांनी वेगळा काढलेला वेळ म्हणून तो आपोआपच ‘क्वालिटी टाइम’ या सदराखाली मोडू लागतो. यातून मुलांना मजा येते का, एकंदर पालक आणि मुलांच्या नात्याला काय ‘क्वालिटी’ प्राप्त होते, असे प्रश्नही विचारायचं अनेक जण टाळतात. मुलांना आपण अपुरा वेळ देतो आहोत यामुळे वाटणारं अपराधीपण बरेचदा याच्या
मुळाशी असतं.
‘क्वालिटी टाइम’ची संकल्पना मुळात या अपराधीपणाच्या भावनेतून आली आहे. पालकत्वासाठी बराच वेळा द्यावा लागतो. आणि तो देता येत नसेल, तर तेच परिणाम मी थोडक्या वेळात, पण त्या वेळेच्या ‘क्वालिटी’तून देईन, अशा भ्रमातून अनेकदा आपण स्वत:ला आणि मुलांनाही फसवत राहतो. रोनाल्ड लेव्हंटने हे नेमकं आणि फार खणखणीतपणे मांडलं आहे. मुलांचं सहकार्य मिळत नाही आणि गोष्टी हाताबाहेर जातात, तेव्हा पुन्हा पुन्हा हेच अधोरेखित होत असतं.
पालक म्हणून स्वत:बद्दल आपल्या स्वत:च्याच काय अपेक्षा आहेत, हे इथं फार महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना आदर्श आई-बाबा व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे, ते खूप नसíगकही आहे. पण रोजच्या जगण्याला ते पुरेसं ठरत नाही. आपल्या मर्यादांबाबतचं भान आणि क्षमतांची रास्त जाणीव हे इथे अतिशय महत्त्वाचं. आई आणि बाबा दोघांनीही अर्थार्जनासाठी बाहेर पडणं, हे जर आपल्या कुटुंबाचं चित्र असेल, तर त्यामुळे वेळेच्या मर्यादा येणार. हे मुळात मान्य करणं फार महत्त्वाचं. या मर्यादांमुळे आणि एकंदरच आपल्याला जशा छोटय़ा-मोठय़ा अडचणी येतात, तशा मुलांनाही त्या येत असतात. ही खूणगाठ एकदा मनाशी असली की आपल्या अडचणी आपण मुलांसमोर सहज मांडू शकतो. अपराधी भावना आली, हा मोकळेपणाच गायब होऊन जातो. मग जे काही वेळेचं गणित बसवायचं आहे, ते मुलांना घेऊन, त्यांच्याशी सल्लामसलत करून बसवता येऊ शकतं. त्यातही पुन्हा लवचीकता महत्त्वाची. उदाहरणार्थ, महिनाभर चाललेलं रुटीन घरातल्या सगळ्यांना नाही जमत आहे असं वाटलं, तर बदलाची तयारी हवी.
अनेकदा तथाकथित ‘क्वालिटी टाइम’च्या एका तासापेक्षा, घरात काम करताना मुलांसोबतचा आईचा अर्धा तास जास्त परिणामकारक ठरतो. या अध्र्या तासात मूल अनेक गोष्टी शिकतं- ‘आईलाही कामं असतात, मला माझं काम आईच्या कामासोबत करायचं आहे, आई तिचं काम करता करता मला मदत करणार आहे, किती काम आह, हे पाहून आम्ही एकमेकांना मदत केली, तर त्याने आम्हाला मस्त वाटतं. मग दोघांनाही मजा करायला आणखी थोडा वेळ मिळू शकतो.’
पुढे मोठं झाल्यावर लागणारी जीवनकौशल्यं हीच नव्हेत का? ग्यानबाची मेख इथंच तर आहे!
mithila.dalvi@gmail.com