कुठल्याही क्षेत्रात यशाची शिडी चढायची असल्यास तुमच्यात नेतृत्त्वगुण बाणवणे आवश्यक आहे. नेतृत्त्व गुण जोपासणे म्हणजे नेमके काय, ते जाणून घेऊयात.
नेतृत्वगुणांची गरज
कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर कामाच्या ठिकाणी कोणत्याही लहान किंवा मोठय़ा सांघिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी नेतृत्वगुणांची आवश्यकता भासते. मग ती जबाबदारी कोणतीही असो, एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमधील प्रोग्रािमग प्रोजेक्टचे नेतृत्त्व करणे असो, अकाउंटन्टने कंपनीचे ऑडिट वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी असो, किंवा एखाद्या इव्हेन्ट मनेजमेंट कंपनीतील इव्हेंटचे सोपस्कार पूर्ण करणे असो.. आजच्या स्पर्धात्मक कार्यपद्धतीत, कंपनीच्या व्यवस्थापनासमोर किंवा वरिष्ठांसमोर, अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत स्वतचे वेगळे स्थान निर्माण करायचे असेल तर, नेतृत्वगुण बाणवणे अत्यावश्यक आहे. नेतृत्वगुण हा कोणता एक गुण नसून गुणांचा समूह आहे .
सकारात्मक विचारसरणी
सर्व काळजी घेऊनही, अनेकदा कामात त्रुटी राहू शकते. त्यामुळे काही वेळा अचानक तणावाची परिस्थिती कामाच्या ठिकाणी निर्माण होते, अशा काळात गटप्रमुखाने धीर न सोडता, खंबीरपणे परिस्थिती हाताळणे गरजेचे असते. झालेल्या घटनांचे योग्य विश्लेषण करून वेळेचे, श्रमांचे नुकसान कसे भरून काढता येईल आणि ध्येयापर्यंतचा पुढील मार्ग कसा निर्धोक होईल, याबद्दल गटप्रमुखाने सकारात्मक पावले उचलायला हवीत.
स्वयंमूल्यांकन
समूहाचे मार्गदर्शक होण्याआधी, स्वतला ओळखणे, स्वतच्या मर्यादा, क्षमता, माहितीच्या कक्षा, मेहनत घेण्याची तयारी अजमावून पाहायला हवी.
जोखीम स्वीकारण्याची तयारी
लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींना सामोरे जाण्याची तसेच आíथक संकटांची जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि क्षमता नेत्याच्या अंगी असायला हवी.
जलद, प्रभावी निर्णयक्षमता
ईप्सित ध्येय साध्य करण्यासाठी, नेत्याने
आवश्यक ती निर्णयप्रक्रिया जलद आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी नेत्याने स्वीकारायला हवी.
संयत वर्तणूक
समूहातील सहकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन, त्यांच्या कामातील दोष, त्या त्या वेळेस मात्र संयत पद्धतीने दाखवून दिल्यास कामातील अडथळेही दूर होतात आणि सहकाऱ्यांचा गटप्रमुखाबाबतचा आदर दुणावतो.
आरंभशीलता
कोणतीही नवीन जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी लागेल ती मेहनत करण्याची आरंभशील वृत्ती नेत्याच्या अंगी असणे फार महत्त्वाचे आहे.
हस्तांतरणकौशल्य
अपेक्षित काम योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे पूर्ण होण्यासाठी, सर्व समूहसदस्यांचा एकत्रित सहभाग गरजेचा असतो. यासाठी नेत्याने कामाचे योग्य प्रकारे विभाजन करून सदस्यांच्या क्षमता आणि अनुभव लक्षात घेऊन, कामाचे हस्तांतरण करणे आवश्यक असते. यामुळे कामाचा वेग वाढतो, सर्व सदस्यांना कोणती ना कोणती जवाबदारी पेलल्याचे समाधान मिळते. दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिकाराचे स्वातंत्र्यही हस्तांतरित करणेही महत्त्वाचे आहे.
प्रोत्साहन
कामाचा वेग आणि दर्जा उत्तम राखण्याकरता कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीची गटप्रमुखाने वेळोवेळी दखल घेत त्यांची प्रशंसा करणे आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी, मर्यादा लक्षात घेऊन प्रमुखाने केलेली मदत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते. आणि कामाचा उत्साह टिकवून ठेवते.
संवादकौशल्य
कामाच्या ठिकाणचे वातावरण निकोप राहावे, याकरता समूहातील सदस्यांचा आपापसांत आणि नेत्याचा समूहसदस्यांशी सुसंवाद राहणे गरजेचे आहे. यामुळे समूह आणि नेता यांचे परस्परांशी सहकार्याचे आणि सामंजस्याचे संबंध राहून, लक्ष्य गाठणे सोपे होते. यासाठी आधी नेत्याने समूहातील सर्वाशी नेमाने संवाद साधायला हवा; काही वेळा कार्यालयातील औपचारिक संकेत बाजूला सारून नेत्याने समूहसदस्यांशी जाणीवपूर्वक अनौपचारिक संवादही साधायला हवा. यामुळे नेता आणि समूहसदस्यांमध्ये आपुलकी
निर्माण होण्यास मदत होते
आणि अर्थातच याचा सकारात्मक परिणाम समूहाच्या कामगिरीवरही दिसून येतो.
उत्तम श्रोता
समूहातील प्रत्येकाशी स्वतंत्र किंवा एकत्रित संवाद साधताना शांतता आणि संयम राखून सदस्यांचे बोलणे गटप्रमुखाने ऐकून घ्यायला हवे. यामुळे समूहात सुसंवाद साधणे शक्य होते. त्याचप्रमाणे नवीन संकल्पनांची माहिती नेत्याला मिळू शकते. आपले म्हणणेही ऐकून घेतले जाते, असा विश्वास कर्मचाऱ्यांना वाटून त्यांचा काम करण्याचा उत्साह दुणावतो.
समूहाचे मूल्यांकन
गटप्रमुखाला ज्या समूहाबरोबर काम करायचे आहे त्या समूहातील सदस्यांबाबत काही मूलभूत गोष्टी माहिती असणे आवश्यक ठरते. समूहसदस्यांच्या क्षमता, मर्यादा, अडचणी, कोणता सदस्य कोणती गोष्ट चांगली पार पाडू शकेल, त्यांपकी कितीजणांनी, याआधी कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत, प्रत्येकाची शैक्षणिक क्षमता, अनुभव, कार्यपद्धती, शारीरिक आणि मानसिक क्षमता चाचपून पाहणे, प्रत्येक सदस्याशी मित्रत्वाचे आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे. या गोष्टी नेतृत्त्वाची परिणामकारकता वाढवतात.
प्रामाणिकपणा
नेत्याच्या वर्तणुकीतील आणि विचारांतील प्रामाणिकपणा समूहसदस्यांना जाणवल्याने संघनेतृत्व अधिक परिणामकारक बनते. स्वत:चे अज्ञान, चुका जिथल्या तिथे दिलदारपणे मान्य करण्याने, तसेच समूहसदस्यांनी दिलेल्या विशेष सहकार्याला सर्वासमक्ष उत्स्फूर्त दाद दिल्याने, समूहसदस्यांच्या मनात नेत्याची प्रतिमा उंचावते.
उत्तम वक्तृत्व
आपल्या मनातील भावना, इच्छा, विचार कर्मचाऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी, नेत्याच्या अंगी उत्तम वक्तृत्वगुण असायला हवेत. बोलणे सुसूत्र, मुद्देसूद, मनातली इच्छा व्यक्त करणारे असायला हवे. भाषा सर्वाना समजेल, रुचेल अशी हवी. मुख्य म्हणजे प्रभावी आणि स्पष्ट वक्तव्यातून, इच्छित ध्येय गाठण्याची आवश्यकता नेत्याने समूहाच्या मनावर ठसवणे गरजेचे असते. यामुळे नेत्याच्या मनातील ध्येय फक्त नेत्याचे न राहता, ते पूर्ण समूहाचे ध्येय बनते, आणि सांघिकशक्ती बळकट होते.
विनोदबुद्धी
तणावाच्या, अडचणीच्या क्षणी निराश न होता कामाच्या ठिकाणचे वातावरण हलकेफुलके ठेवले तर समूहातील सदस्यांच्या मनावरील ताण हलका होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. कोणाचेही मन न दुखावता, उद्भवलेल्या कठीण समस्येला सामंजस्याने सामोरं जाण्याची सवय नेत्याने जोपासायला हवी.
विश्वासार्हता
समूहातील सदस्यांचा, नेत्यावर विश्वास असणे गरजेचे असते. हा विश्वास संपादन करण्यासाठी नेत्याने स्वतच्या वागण्या-बोलण्यातून, समूहाने केलेल्या कामाची जवाबदारी पेलण्यास तो पूर्णपणे समर्थ आहे असा विश्वास सतत देत राहायला हवा. नेत्याने स्वत कामातील अचूकता, वक्तशीरपणा, आणि उत्तम वर्तनकौशल्य या गोष्टींतून समूहापुढे आदर्श घालून देणे गरजेचे ठरते.