आत्मविश्वास आणि नवी आव्हानं पेलण्याची जिद्द यांच्या जोरावर तुम्ही करिअरमध्ये बदल करू शकता. नवीन क्षेत्रात प्रवेश करताना नव्या संधींना खुलेपणाने सामोरे जाण्याची तयारी हवी. त्याविषयी..
‘‘पंधरा र्वष नोकरी करतोय. तेच काम, तेच कागद, तशीच माणसं.. बदल्या झाल्या तरी तशीच ऑफिसं.. आयुष्य फार एकसुरी होतंय. स्वेच्छानिवृत्ती घ्यावीशी वाटते..’’ काही र्वष नोकरी झाल्यानंतर अनेकांना असं वाटतं. पण ऑफिसच्या वेळा आणि कामांचा एक कम्फर्ट झोन तयार झालेला असतो. गृहिणींनाही घर एके घरचा कंटाळा येतो, ‘उंबरठय़ापलीकडचं जग पाहिलंच नाही’ची खंत असते. तरीही घराचा कम्फर्ट झोन सोडवत नाही. त्यामुळे ‘बदल हवा’ अशी इच्छा जेवढी तीव्र असते, तेवढीच ‘आता बदल झेपेल का?’ची तीव्र भीतीदेखील सर्वाना असते. व्यावसायिकांना कंटाळा नसतो, पण कालानुरूप बदल करण्याची गरज जाणवते. ज्या व्यक्तींना आत्तापर्यंत शांतपणे चाललेल्या रुटीनबद्दल कुरकुर किंवा नाराजी जाणवते, त्यांनी या टप्प्यावर थांबून एकदा शांतपणे आढावा घ्यायला हवा. आपल्याला आयुष्याकडून आता नक्की काय हवंय? हा प्रश्न स्वत:ला प्रामाणिकपणे विचारायला हवा.
मनानं बदलाची मागणी केली तर ती स्वीकारण्याची तयारी करायलाही स्वत:ला काही काळ द्यावा लागतो. तीव्र इच्छा असेल तर ‘आपण करिअरमध्ये बदल करू शकू’ हे स्वीकारणं महत्त्वाचं. थोडय़ाफार अडचणी तर येणारच, नवी दिशा लगेच सापडणारही नाही, ‘पुढे काय?’ हा प्रश्न काही काळ झोप उडवेल. काहींनी मनाचा कौल घेऊन बदलाचा निर्णय घेतला असेल, पण ‘निर्णय चुकला की काय?’ असंही कधी वाटेल. त्या वेळी एक लक्षात घ्यायचं, की पूर्वीच्या कामात कौशल्याची, जबाबदारी घेण्याची एक वरची पातळी आपण गाठलेली असल्यामुळे स्वत:च्या क्षमतेबद्दल आपले काही ठोकताळे झालेले असतात. आपल्या स्व-प्रतिमेला धक्का लावणारी ही मधली अवस्था झेपत नाही. जुन्या-नव्याची सतत तुलना होत राहते. अशा वेळी स्वत:वरचा विश्वास पक्का हवा. हा एक छोटा टप्पा आहे, नव्याचा अंदाज येईपर्यंत, कौशल्य आत्मसात होईपर्यंत धीर धरायचाय हे स्वत:ला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं.
जुना अनुभव किंवा कौशल्य हे ड्रायिव्हगसारखं असतं. एकदा ते येत असेल की वाहन बदललं तरी सेट होण्याचा थोडा वेळ सोडल्यास कुठलंही वाहन चालवता येतं तसं. त्यामुळे पूर्वी मिळवलेली पदवी, शिक्षण आता कालबाह्य वाटलं तरी त्याला नव्याची जोड देणं अवघड नसतं. आता शिक्षण खेडय़ापाडय़ापर्यंत पोहोचलंय, इंटरनेटमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं कुठल्याही विषयाचं शिक्षण घरबसल्या घेता येऊ शकतं. आवडीच्या विषयातलं कौशल्य वाढवता येऊ शकतं. कौशल्यामुळे आनंद मिळतोच, त्याहीपेक्षा आत्मविश्वास मिळतो.
नव्या करिअरचा विचार करताना आता बदललेल्या परिस्थितीकडे संधी म्हणून पाहायला हवं. ‘वाढत्या स्पध्रेबद्दल’ खूप नकारात्मक चर्चा करून आपण धास्तीत जगतो. त्याऐवजी ‘संधी वाढल्यात’ याबद्दल चर्चा केली तर ती दिशा देईल. एखादाच स्किलसेट घेऊन आयुष्यभर फक्त पोटासाठी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी राब राब राबायचं हे मागच्या पिढीनं खूप केलं. आता त्या प्रकारच्या जबाबदाऱ्या फारशा नसतात. काही काळ भरपूर कष्ट करून योग्य आíथक नियोजन करून स्थर्यापर्यंत पोहोचायचं आणि त्यानंतर दुसऱ्या करिअरचा विचार करायचा हे आता शक्य आहे. शिवाय कामात समाधान मिळत नसेल तर नवा रस्ता शोधायलाच हवा हेदेखील स्पष्ट आहे. मग अडचण कसली?
‘इट द फ्रॉग फर्स्ट’ असं मार्क ट्वेन म्हणतो. म्हणजे, सगळ्यात अवघड वाटणारी गोष्ट सर्वात आधी संपवा. नंतर त्यापेक्षा अवघड काही उरत नाही. आपल्याला बदलासाठी सुरुवात करणंच खूप कठीण जातं, कारण ‘जमेल ना?’ची मनातली भीती आणि ‘आता पुन्हा कुठे नव्यानं सुरुवात करायची?’चा इनíशया. हे फ्रॉग संपवण्याची मानसिकता आणण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारावे लागतील.
‘‘आत्ता चाललंय तसंच आयुष्य मला येणारी २०-३० वर्षे चालेल का?’’
‘‘पुढच्या रस्त्यावरचा प्रत्येक दगड, प्रत्येक खड्डा मला आधी माहीत असेल तरच मी चालणार का?’’
‘‘स्वत:च्या आवडीचं जगणं / करणं राहूनच गेलं अशी खंत सांभाळत, चिडचिड करत राहिल्यावर आणखी १५-२० वर्षांनी माझं काय झालेलं असेल?’’
या प्रश्नांचं उत्तर ‘नाही’ असं असेल तर बदलासाठी आणखी दोनच गोष्टी लागतात- आत्मविश्वास आणि खुलं मन. मग कुठलीही वाट पुढेच नेते.

नीलिमा किराणे
neelima.kirane1@gmail.com
करिअर बदलांची चाहूल
* तुमचे तुमच्या कामातील स्वारस्य कमी होत. खरे तर तुम्हाला आणखी काही तरी करायला आवडू लागते.
* करिअर बदलण्याचा निर्णय तुम्ही हळूहळू घ्या.
* त्याआधी तुम्हाला करिअरमध्ये बदल करायचा आहे याची पुरती खात्री करून घ्या.
* एक मात्र नक्की लक्षात ठेवा- करिअरमध्ये बदल करणे यात चुकीचे काही नाही उलटपक्षी, जीवनात प्रगती होत असल्याचे ते लक्षण आहे.

करिअर बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर..
* तुम्हाला काय करायला आवडेल ते ध्यानात घ्या. तुम्ही पूर्वी काय करायचं ठरवलं होतं, तुम्हाला काय करायला आवडतं, या प्रश्नांची जी उत्तरे तुमच्या मनात डोकावतात, ती कितीही चुकीची वाटली तरी त्याची नोंद करा.
* आता या उत्तराच्या अनुषंगाने काही धागा सापडतो का ते शोधा. असे कुठले प्रकल्प अथवा विषय आहेत त्यातून तुमच्या कल्पनांना वाव मिळू शकेल ते शोधा. काय केल्याने तुम्हाला आनंद मिळेल ते शोधा. कुठले काम करताना तुम्ही खूश असता, त्याकडे लक्ष द्या.
* धीर धरा. हा शोध घ्यायला तुम्हाला काही वेळ लागेल तसेच योग्य करिअरचा मार्ग सापडेपर्यंत तुम्हाला कदाचित आणखीही काही मार्गावरून वाटचाल करावी लागेल.
* वेळ आणि आत्मनिरीक्षणातूनच तुम्हाला कशात आनंद मिळतो आणि कुठल्या कामातून तुम्हाला खरे समाधान मिळते ते शोधता येईल.

कुठल्या गोष्टी लक्षात घ्याल?
’आवडनिवड लक्षात घ्या. बहुतेकजण करिअर बदलतात, कारण त्यांना नोकरी, बॉस अथवा कंपनी बदलायची असते. त्यामुळे नक्की कुठल्या कारणापायी तुम्ही करिअर बदलू इच्छिता हे आधी लक्षात घ्या. मात्र, तुमची आवड लक्षात घेतल्याखेरीज करिअरबदल कुठल्या दिशेने करावा हे तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला कुठलं काम करायला आवडतं ते ध्यानात घ्या. कुठलं काम करताना तुमच्यात चैतन्य संचारतं, तुमची पॅशन काय आहे, या सगळ्याबाबत तुम्हाला अद्यापही खात्री नसेल तर आणखी थोडा वेळ घ्या.
नव्या करिअरच्या वाटांबाबत संशोधन करा.
तुमची आवड अथवा पॅशनला केंद्रस्थानी ठेवून त्या भोवतालच्या नव्या वाटांचा शोध- पुनशरेध घ्या. काहीसं असुरक्षित वाटलं तरी त्याची काळजी करू नका. करिअर बदलाच्या प्रक्रियेत असं वाटणं स्वाभाविक आहे.

हस्तांतरणीय कौशल्ये
तुमची सद्य कौशल्ये आणि अनुभव नव्या करिअरमध्ये किती उपयोगी पडतील त्याचा अंदाज घ्या. संवादकौशल्ये, नेतृत्त्वगुण, नियोजन इत्यादी कौशल्ये हस्तांतरणीय असतात. आणि तुम्ही ज्या नव्या करिअरमध्ये प्रवेश कराल, तिथे तुम्हाला ती उपयोगी ठरतील. यामुळे नव्या करिअरमध्येही तुम्हाला तुमचा आतापर्यंतचा कामाचा अनुभव कामी येईल.
प्रशिक्षण आणि शिक्षण
करिअरमध्ये बदल करत असल्याने कदाचित तुम्हाला तुमची कौशल्ये अद्ययावत करण्याची आणि तुमचे ज्ञान विस्तारण्याची गरज वाटू शकेल. प्रवेश करत असलेल्या क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्हाला नव्याने काही शिकणे आवश्यक वाटत असेल तर तुमची नवी कंपनी अशा प्रकारचं प्रशिक्षण तुम्हाला देऊ शकते का, याची चाचपणी करा. जर तुम्हाला नव्याने कुठली पदवी मिळवायची असेल तर त्या अभ्यासक्रमाची मान्यता लक्षात घ्या
आणि प्लेसमेन्टचीही माहिती घ्या.
नेटवर्किंग
आपण उपलब्ध आहोत आणि अमुक प्रकारचं काम शोधतोय हे संपर्कातल्या जास्तीतजास्त लोकांना कळवायला हवं. त्याबाबत ‘असं कसं मी कुणाला सांगणार?’ असा ईगो प्रॉब्लेम किंवा भिडस्तपणा न करता खूप मोकळेपणानं सर्वाशी संवाद ठेवायला हवा.
अनुभव मिळवा.
लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या करिअरला पुन्हा सुरुवातीपासून सुरू करत आहात. एखादे अर्धवेळ काम पत्करा किंवा विनामूल्य काम करा. त्यातून तुम्हाला नव्या क्षेत्राचा परिचय होईल. कामाच्या स्वरूपाची कल्पना येईल.
मार्गदर्शक शोधा.
करिअर बदलाच्या खडतर मार्गावरून वाटचाल करताना तुम्हाला मदत करेल, मार्गदर्शन करेल असा गुरू शोधा. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला नव्या क्षेत्रात नेटवर्किंग करण्यास मदत होईल.
जॉब हंटिंग
जॉब हंटिंग करण्याचे कौशल्य, साधनांचा योग्य वापर करा. उदा. रिसर्चिग कंपन्या.
लवचीक राहा
प्रत्येक बाबतीत लवचीक राहा. तुमच्या कामाच्या पदापासून वेतनापर्यंत सर्वच बाबतीत लवचीकता ठेवा. यामुळे तुम्ही एक पायरी खाली उतरत आहात, अशी भावना मनात बाळगू नका.. नवी सुरुवात करताना या गोष्टी क्रमप्राप्त आहे, हे लक्षात ठेवा.
अपर्णा राणे