नोकरीची ऑफर मिळते, तेव्हा ती स्वीकारावी की नाही आणि हे काम तुमच्यासाठी सुयोग्य आहे की नाही, हे ठरवण्याचा अंतिम अधिकार तुमचा असतो. अशा वेळेस निर्णय घेताना तुमच्याकरता महत्त्वाचे ठरणारे मुद्दे तुम्ही प्राधान्यक्रमाने लक्षात घ्यायला हवेत. ही नोकरी तुमच्याकरता योग्य आहे का हे तुम्हाला पुढील मुद्दय़ांच्या आधारे निश्चित करता येईल. यातील केवळ एखाद्या बाबीवर नोकरी स्वीकारण्याबाबत अथवा नाकारण्याबाबतचा तुमचा निर्णय अवलंबून राहू शकत नाही तर साऱ्या गोष्टी एकत्रितरीत्या ध्यानात घेऊन त्यानुसार नोकरी स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा निर्णय घेणे शक्य होते.

संस्थेची पाश्र्वभूमी
संस्थेची पाश्र्वभूमी लक्षात घेतल्यास ही संस्था काम करण्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवणे सोपे जाते. त्याकरता काही प्रश्न मनाशी विचारा..
’या संस्थेचा व्यापार, उपक्रम हे तुमच्या आवडीशी, विश्वासाशी आणि मूल्यांशी जुळतात का?
’संस्था ज्या उत्पादनांची निर्मिती करते किंवा ज्या सेवा पुरवते, त्यांच्याशी तुमचा संबंध जोडला जाणे तुम्हाला मान्य आहे का?
’संस्था किती मोठी अथवा लहान आहे, हा आकार तुमच्या निर्णयावर परिणाम करतो का? तुम्हाला लहानशा संस्थेत काम करायला आवडेल की मोठय़ा?
’संस्था तुलनात्मकरीत्या नवी आहे की नामांकित- उत्तमरीत्या बस्तान बसवलेली आहे का?

वेतन आणि इतर लाभ
तुमचे दरमहा वेतन आणि त्यासोबत मिळणारे इतर लाभ यांवर तुमचा निर्णय बऱ्याच अंशी अवलंबून असतो. त्याकरता खालील प्रश्नांची उत्तरे मिळवा.
’तुमच्या वेतनातून तुमचा महिन्याचा खर्च सहज भागला जाईल का? या वेतनातून तुमच्या किमान आर्थिक अपेक्षा पूर्ण होतात का?
’कोणकोणते लाभ तुमच्या पदरात पडतात? आरोग्य विमा, शिकवणी खर्च, व्यावसायिक विकासासाठीचे अभ्यासक्रम, रजेचा कालावधी, व्यक्तिगत अथवा आजारपणाच्या रजा, कामगिरीचे मूल्यांकन आणि वेतनवाढ, बोनस योजना, शेअर्स विषयीचे पर्याय इत्यादी.
’या पद्धतीच्या कामासाठी इतर संस्थांत किती वेतन दिले जाते? तुम्हाला जे देऊ केले आहे, ते तेवढे अथवा त्याहून अधिक आहे का?

संधींची उपलब्धता
कामाची उत्तम संधी तुम्हाला नवी कौशल्ये शिकण्याचीही संधी देते. तुमची मिळकत वाढवते आणि पदोन्नती, वाढीव जबाबदारी आणि मान मिळवून देते. त्यासंबंधित खालील मुद्दय़ांचा जरूर
विचार करा.
’तुम्हाला कुठली नवी कौशल्ये शिकवण्याची कंपनीची
योजना आहे?
’तुमच्या करिअरच्या शिडीची पुढची पायरी कोणती? एखादी जागा रिकामी झाल्यानंतर तुम्हाला काम मिळणार असेल तर त्यासाठी किती अवधी लागणार आहे?
’ जेव्हा वरिष्ठ पदांच्या संधी निर्माण होतील, तेव्हा त्या कंपनीतील काम करणाऱ्यांकरवी भरल्या
जातील की त्याकरता कंपनीबाहेरील अर्जदारांचा विचार केला जाईल?
’तुमच्या अर्हतेनुसार कंपनीतील इतर कुठल्या विभागात काम करण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता का, की तुम्हाला असे करण्यास मनाई आहे?

नातेसंबंध
कामाच्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणाचा प्रशासन, सहकारी आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या ुपरस्परसंबंधांवर मोठा परिणाम घडून येत असतो. हे लक्षात घेत पुढील प्रश्नांची उत्तरे मिळवा.
’ तुम्ही कोणासोबत काम करणार आहात? तुमच्या विभागातील अथवा कंपनीतील व्यक्तींचा परस्परसंवाद कसा आहे? तुमच्या मुलाखतीदरम्यान कर्मचाऱ्यांसोबत तुमचा झालेला संवाद कसा होता?
’निर्णय कशा प्रकारे घेतले जातात आणि बुद्धिमत्ता अथवा उत्तम कामगिरीचे मूल्यांकन कसे केले जाते, हे प्रश्न मुलाखतीच्या प्रक्रियेदरम्यान तुमच्या संभाव्य व्यवस्थापकाला अथवा पर्यवेक्षकाला जरूर विचारा.
’ तुम्हाला कामाचे स्वातंत्र्य उपलब्ध आहे का?
’तुमच्या टीममधील कनिष्ठ कर्मचारी जे तुमच्याकरिता काम करणार आहेत, त्यांची बलस्थाने अथवा कमकुवत बाजू कोणत्या आहेत? त्यांचे परिणामकारकरीत्या व्यवस्थापन करण्याची कौशल्ये तुमच्यापाशी आहेत का?

’ ज्यांच्याबद्दल तुम्हाला अथवा इतरांना आदर वाटतो, कौतुक वाटते आणि त्यांच्याकरता तुम्हाला काम करावेसे वाटते असे उच्चपदस्थ तुमच्या संस्थेत अथवा कंपनीत आहेत का?

कामाचे स्वरूप
काम आवडीचे असेल, मात्र नोकरीसंबंधातील बाकीच्या बाबी जर तुमच्यासाठी अनुकूल नसतील, तर तुम्ही तुमचे दैनंदिन काम आनंदाने करू शकणार नाही. म्हणूनच पुढील मुद्दे लक्षात घ्या..
’कामाची जागा कुठे आहे? तुम्हाला किती वेळ प्रवास करावा लागेल?
’कामाचे तास किती आहेत? कामांच्या तासांहून अधिक वेळ काम करणे अपेक्षित आहे का?
’तुम्ही जे काम करणार आहात, त्यात तुमच्या कौशल्यांचा उपयोग होईल का?
’ तुम्ही करत असलेले काम
त्या संस्थेकरता किती
महत्त्वाचे आहे?
’संस्थेत काम करत असलेल्या सर्वाधिक व्यक्ती किती वर्षांपासून त्या कंपनीत
कार्यरत आहेत?
’तुम्ही या कामासाठी किती पॅशनेट आहात? हे काम व्यक्तिश: तुमच्यासाठी ‘खूप काही’ आहे का?

कार्यसंस्कृती
एखाद्या संस्थेत अथवा कंपनीत काम करावे की नाही या निर्णयावर कंपनीत जोपासले जाणारे दृष्टिकोन, मूल्ये, उद्दिष्टे
आणि पद्धती निश्चितच
परिणामकारक ठरतात.. म्हणूनच पुढील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या..
’प्रशासनाचे मूल्य किती आहे? ग्राहकांना अथवा कर्मचाऱ्यांना कंपनी कशा प्रकारे वागणूक देते, याचे मूल्यांकन करणारा पुरावा तुम्ही शोधू शकता का?
’माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत कशी पोहोचवली जाते आणि निर्णय कशा प्रकारे घेतले जातात?
’कामाचा आणि व्यक्तिगत जीवनाचा समतोल साधणे हे तुमच्याकरता किती महत्त्वाचे आहे आणि या संबंधात कंपनीची अपेक्षा काय आहे?
’तुमच्या पर्यवेक्षकाची अथवा व्यवस्थापकाची प्रतिष्ठा काय आहे? तो /ती मूल्यांना किती महत्त्व देतात? मुलाखती- दरम्यान त्याच्या अथवा तिच्या व्यवस्थापनाच्या शैलीची कल्पना तुम्हाला आली का?
’संस्थेचे तत्त्वज्ञान कोणते? तुमच्या तत्त्वज्ञानाशी ते जुळते की अजिबात जुळत नाही?

व्यक्तिगत मुद्दे
प्रत्येकाची विचारपद्धती, समाधान शोधण्याच्या बाबी वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात. एखादी नोकरी काहींना अगदी उत्तम वाटते तीच एखाद्या इतर व्यक्तीकरिता असमाधानकारक ठरते.
’नोकरी उत्तम आहे की नाही, हे स्पष्ट करणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींची यादी बनवा. त्यात कुठल्या गोष्टी अधिक आहेत, ते लक्षात घ्या.
’नोकरीला होकार अथवा नकार देण्याबाबत तुमची अंत:प्रेरणा तुम्हाला काय सांगते?
’तुमच्या मनात नोकरीसंदर्भात कुठल्या शंका असतील तर त्या नक्की विचारा.

 

Story img Loader