डॉ. अश्विनी भालेराव-गांधी chaturang@expressindia.com
बाल्यातून पौगंडावस्थेत प्रवेश करताना मुलांसमोर अनेक शारीरिक, भावनिक प्रश्न असतातच, मात्र आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे हे प्रश्न अधिकच व्यापक होत चालले आहेत. मुला-मुलींना योग्य उपचार आणि समुपदेशन मिळाले तर आजच्या पिढीला त्यांच्यासमोरील आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे भिडता येणे शक्य आहे. म्हणूनच या पिढीसाठी गरज आहे ती किशोरी स्नेही आरोग्य सेवेची! बालदिनानिमित्ताने..
फार पूर्वीच्या काळी मुलीला प्रथम पाळी सुरू झाली की शेजारपाजारच्या बायकांना आणि मुलींना बोलावून तिला मखरात बसवत असत. तिची ओटी भरत असत. या विधीमुळे आपल्या आयुष्यात काही तरी शुभ घटना घडली आहे, असे त्या मुलीला वाटत असे. हल्ली असे विधी क्वचितच केले जातात. बऱ्याच वर्षांपूर्वी मुलींना अजिबातच माहिती नसल्यामुळे प्रथम पाळी आल्यावर ‘आपल्याला एखादा रोग तर नाही ना झाला?’ अशी शंका यायची. आई-बहीण किंवा शाळेतील शिक्षिकासुद्धा संकोचामुळे याविषयी फारसे बोलत नसत. मग मैत्रिणी-मैत्रिणींत हलक्या आवाजात चर्चा सुरू व्हायची. चुकीच्या माहितीची देवाण-घेवाण केली जायची. हल्ली मात्र शाळा-कॉलेजांमधून स्लाइड शो, एखादे व्याख्यान, चर्चा आयोजित केली जाते. बऱ्याच मुली इंटरनेटवरून माहिती गोळा करतात. पण त्यातील काय आपल्याला लागू आहे आणि काय नाही याचे तारतम्य फारच कमी आढळून येते. आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.
‘पाळी म्हणजे अमंगल’ ही गैरसमजूत आता खूपच कमी झाली आहे.(निदान शहरात तरी, असे आपण समजून चालू) ‘मासिक पाळी म्हणजे नित्याच्याच आयुष्याचा एक भाग, तेव्हा नित्य नेम / विधी करण्यात पाळीची आडकाठी येता कामा नये’ असा विचार रुजू लागला आहे. सॅनिटरी नॅपकिन्स, टॅम्पून्स, मेन्स्ट्रअल कप यांसारख्या विविध साधनांचा वापर पाळीच्या दिवसांत मुली करू लागल्या आहेत. मात्र योग्य माहिती अभावी वयात आल्यावर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे मुली गोंधळून जातात. त्यांची वागणूक बदलते. त्या अबोल, घुम्या बनतात. लहरी, अस्वस्थ, चिडखोर होऊ शकतात. शरीरात स्रवणाऱ्या अंतस्त्र्रावांमुळे त्यांना मुलांविषयी कुतूहल, आकर्षण वाटायला लागते. मुख्य म्हणजे स्वत:च्या सौंदर्याविषयी त्या विशेष जागरूक होतात. बऱ्याचदा आई-वडिलांचे ऐकेनाशा होतात. दोन पिढय़ांमध्ये अंतर निर्माण व्हायला सुरुवात होते. आई-वडिलांनी निर्बंध घालायचे आणि मुलींनी ते धाब्यावर बसवायचे अशी चढाओढही अनेकदा सुरू होते. कपडय़ांची लांबी-रुंदी, मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या पाटर्य़ा, मित्र-मैत्रिणी, धूम्रपान, नशिल्या पदार्थाचे सेवन, डेटिंग, रिलेशनशिप अशा बऱ्याच बाबतीत वादविवाद, मनभिन्नता दिसून येते. शाळा पूर्ण व्हायच्या आधीच दोन-तीन बॉयफ्रेंड बदलणे, रोझ डे, व्हॅलेंटाइन डे साजरे करणे यावरून आधीची पिढी आणि आजची पिढी यांच्यात खूपच मतभिन्नता आढळून येते. एकीकडे तारुण्याचे ‘सेलिब्रेशन’ करायचे असते तर दुसरीकडे खूप अभ्यास, स्पर्धा परीक्षा, करिअर यांचा पगडा असतो. सगळे आयुष्यच विस्कळीत झाल्यासारखे भासते. बदलांमुळे शारीरिक, भावनिक, सामाजिक, लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो. अनेकदा तर असुरक्षित लैंगिक संबंध येऊन गर्भारपण राहिल्यामुळे ‘अॅबॉर्शन पिल’ घेऊन निस्तरावे लागते. एमर्जन्सी कॉन्ट्रॅसेप्टिव्ह पिल्स तर सर्रास वापरल्या जातात. आयुष्याचा हा वेग, आवेग कधी भोवंडून सोडतो म्हणजेच या मुला-मुलींना Adolescent Friendly Health services (किशोरी स्नेही आरोग्य सेवा) ची गरज असते. ती निर्माण करणे गरजेचे आहे.
२१ वर्षांची जुई एकटीच घाबरून माझ्या क्लिनिकबाहेर उभी होती. तिला आतमध्ये बोलावून बोलते केल्यावर ती रडायलाच लागली. आई-वडिलांपासून दूर मुंबईला ती उच्च शिक्षणासाठी आली होती. गेल्या चार दिवसांपासून ती बाह्य़ांगाला आलेल्या पुळ्या आणि श्वेतप्रदर यामुळे बेजार झाली होती. तिला तपासल्यावर आमच्या लक्षात आले की योनिमार्गाचा संसर्ग झाल्याने तिला वेदना होत आहेत. योग्य ते समुपदेशन केल्यावर, तिला विश्वासात घेतल्यावर तिने खरी माहिती दिली. एका मित्राबरोबर तिचे लैंगिक संबंध सुरू होते आणि त्याद्वारे तिला संसर्ग झाला होता. योग्य त्या औषधोपचारानंतर ती बरी झाली. मित्रालाही आमच्याकडे घेऊन आली. दोघांनीही काय खबरदारी घ्यायला हवी याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या दहा ते चोवीस वर्षांमधील मुलामुलींना युवा (यंग पीपल) म्हटले जाते. या काळात शिक्षणासाठी, नोकरीसाठी मुले-मुली घरापासून दूर हॉस्टेलमध्ये, पेइंग गेस्ट म्हणून राहायला लागतात. मोबाइल, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अॅप इत्यादींमुळे परस्पर संपर्क अतिशय सहज सोपा झाला आहे. कॉलेजमध्ये पार्टी, डिस्को, दांडिया, सोशल-सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे शारीरिक जवळीक निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेली संधी भरपूर प्रमाणात मिळते. एकटेपणावर मात करण्यासाठी, शारीरिक आकर्षणामुळे ग्रुपमधल्या मित्रमैत्रिणींचे अनुकरण म्हणूनही (पीअर प्रेशर) शरीर संबंधांना सुरुवात होते. काही वेळा मुलींवर जोर-जबरदस्ती केली जाते. तिची इच्छा नसतानाही तिचा प्रियकर (?) तिला शरीर संबंध ठेवण्यास उद्युक्त करतो. आपल्यावर खरे प्रेम आहे हे शरीर संबंध ठेवण्यास होकार दिल्यासच सिद्ध होईल असा समज करून दिल्यामुळे कधी कधी मुली राजी होतात. अशा वेळी जोडीदाराने कंडोमसारखे साधन वापरायला हवे हे कळत असूनही वळत नाही. जोडीदार त्या मुलीशी एकनिष्ठ नसल्यास गुप्तरोग, तसेच अवांच्छित गर्भारपणाची भीती असते. प्रत्येक मुलीला लादलेले शरीरसंबंध नाकारण्याचा हक्क आहे. ‘नाही’ म्हणायचा हक्क आहे. तसेच जोडीदाराने एखाद्या गोष्टीला ‘नाही’ म्हटले तर ते उदारपणे स्वीकारणे ही तिची-त्याची जबाबदारी आहे. ‘जबाबदार लैंगिक वर्तन’ ही काळाची गरज आहे. पण त्यासाठी या मुलींनाच नव्हे तर मुलांनाही किशोरी स्नेही आरोग्य सेवेची गरज आहे, आणि ती उपलब्ध करणे ही समाजाची गरज आहे.
संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी एक पंचमांश लोकसंख्या किशोरवयीन आहे. विशेषत: प्रगतीशील देशांमध्ये हे प्रमाण खूपच जास्त आहे. भारतातील ३२ टक्के लोकसंख्या युवा गटात बसणारी आहे. युवकांमध्ये चांगल्या-वाईट गुणावगुणांचे मिश्रण असते. उदाहरणार्थ- कार्यरतता, आततायीपणा, उत्साह, उद्यमशीलता, वैचारिक गोंधळ, प्रयोगशीलता, स्वयंपूर्ण बनण्यासाठी प्रयत्न करणे, लैंगिकतेविषयी कुतूहल, मनात शंका-कुशंका, भविष्यविषयक नियोजन करण्यात मश्गूूल असणे इत्यादी. सध्याच्या तरुण पिढीला अनेक नवीन प्रश्नांना आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते आहे. हल्लीच्या पिढीतील मुले-मुली लवकर वयात येतात; विभक्त कुटुंबपद्धतीमुळे त्यांना पूर्वीच्या पिढीपेक्षा वेगळ्याच समस्यांना तोंड द्यायला लागते. शैक्षणिक स्पर्धा, ताणतणाव, प्रसारमाध्यमांचा बरा-वाईट प्रभाव, शहरीकरण, औद्योगिकीकरण, तसेच जागतिकीकरणाचा परिणाम, नव्या तंत्रज्ञानाचा बरा-वाईट प्रभाव सध्याच्या युवा पिढीवर होत आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर होणे अपरिहार्य आहे. या वयात मुला-मुलींमध्ये ताणतणाव, भावनिक असमतोल संभवतो. याच वयात खाण्याच्या चुकीच्या सवयी, बेशिस्त वर्तन, धाडस अंगाशी येऊन अपघात होणे, मारामाऱ्यांमुळे इजा होणे, अभ्यासात अडचणी येणे, शाळेत मागे पडणे, वर्तन-समस्या, व्यसने आढळून येतात. तीव्र स्पर्धा, परीक्षांमुळे येणारे वैफल्य, परीक्षेतील अपयश, आवडत्या शाखेत प्रवेश न मिळणे, अभ्यासाचा ताण यामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल एखाद्या मुला-मुलीने उचलू नये म्हणून पालक आणि शिक्षक यांनी सजग राहायला हवे.
विवाहपूर्व वैद्यकीय सल्ला, गर्भधारणा प्रतिबंधक साधनांविषयी मार्गदर्शन, लैंगिक समस्यांविषयी मार्गदर्शन इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण आणि नाजूक विषयांवर तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक ठरते. केवळ लग्नाचे वय कमी-जास्त करून कुठल्याच समस्यांचे निराकरण होणार नाही.
आजकालच्या मुलींमध्ये आणखी काही लक्षणं दिसायला लागली आहेत. श्रावणी आणि तिची आई खूपच काळजीत दिसत होत्या. श्रावणी सीए करत होती. गेल्या दोन वर्षांपासून तिचे वजन सारखे वाढत होते. अंगावर लव, चेहऱ्यावर मुरुमे यामुळे ती त्रस्त झाली होती. पाळीही खूपच अनियमित झाली होती. कधी तीन महिन्यांनी तर कधी चार महिन्यांनी यायला लागली होती. रक्तस्रावाचे प्रमाणही कमी झाले होते. गेल्या काही वर्षांत वरीलप्रमाणे समस्या घेऊन येणाऱ्या मुली आणि तरुणींमध्ये खूपच वाढ झाली आहे. जणू अशा समस्यांचे पेवच फुटले आहे. श्रावणीला पॉलिसिस्टिक ओव्हरीजचा त्रास होता. सोनोग्राफीमध्ये स्त्रीबीज कोषांत (ओव्हरीज) विशिष्ट तऱ्हेने माळेसारख्या फॉलिकल्स आढळल्यास त्याला पॉलिसिस्टक ओव्हरीज संबोधले जाते. यासाठी काही निकष ठरवलेले आहेत. खरे पाहता ज्या मुलींमध्ये पाळी उशिराने (दर दीड ते तीन महिन्यांनी) येते त्यांच्यापैकी २८ टक्के मुलींमध्येही असे स्त्रीबीजकोष आढळून येतात. सगळ्याच मुलींना उपचारांची गरज असतेच असे नाही. काही मुलींमध्ये मोठेपणी ही स्थिती नाहीशी होते; पण काहींमध्ये मात्र कमी-अधिक प्रमाणात मोठेपणीही याचे प्राबल्य आढळून येते. हल्ली मुली मासिक, इंटरनेट यांवरून पीसीओएस अर्थात पॉलिसिस्टक ओव्हरीज सिंड्रॉमविषयी योग्य/अयोग्य माहिती मिळवतात आणि मग खूप काळजीत पडतात. त्यांच्या आईच्या मनातही पुष्कळ प्रश्न उभे राहतात. आपल्या मुलीला लग्नानंतर मुले होणार की नाहीत? नंतर कर्करोग वगैरे तर होणार नाही ना इत्यादी. हे सर्व नेमके कशामुळे होते याविषयी अनेक मतांतरे आहेत. उदा – अंत:स्रावांमध्ये असंतुलन, शरीरातील पेशींमध्ये इन्सुलिन प्रती असहकार/प्रतिकार असणे (इन्सुलिन रेजिस्टन्स); पुरुषी अंत:स्राव जास्त प्रमाणात स्रवणे (एन्ड्रोजेन एक्सेस), आनुवंशिकता, कुटुंबामध्ये मधुमेह असणे इत्यादी. यापैकी नेमक्या कोणत्या कारणांमुळे पीसीओएसची समस्या निर्माण होते हे निश्चित सांगता येत नाही. एकंदरीतच शरीरातील चयापचयाच्या क्रियांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, उदाहरणार्थ- रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढणे, अति रक्तदाब, स्थूलता, रक्तातील कोलेस्टेरॉल/ट्रायग्लिस राइड्सचे प्रमाण वाढणे वगैरे. म्हणजेच पॉलिसिस्टक ओव्हरी ही अनेक बदलांच्या समुच्चयापैकी (मोटाबॉलिक सिंट्रोम) केवळ एक समस्या झाली. यात स्त्रीबीज कोषांमध्ये अनेक फॉलिकल्स वाढायला लागतात; पण स्त्री बीज विमोचन (ओव्ह्य़ुलेशन) मात्र नियमित आणि सुनियंत्रितपणे होत नाही. म्हणजेच इस्ट्रोजीन अंत:स्रावाचे प्रमाण जास्त असते, प्रोजेस्ट्रोजीनची कमतरता असते तर अॅन्ड्रोजेन अतिरिक्त प्रमाणात असते.
या सर्व समस्यांच्या मुळाशी नेमके काय आहे? आनुवंशिकता, गुणसूत्रांमधील फेरफार, बाह्य़ वातावरणाचा परिणाम, चिंता-तणाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, स्पर्धात्मक जगातील दबाव, प्रदूषण अशा अनेक बाबींचा विचार करता येईल. योग्य उपाययोजना न केल्यास प्रौढ वयात मधुमेह, अति रक्तदाब आणि तसेच क्वचित प्रसंगी गर्भाशयाच्या अस्तराचा कर्करोग व्हायची शक्यता असते. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असलेल्या मुली आणि तरुणी यांच्यासाठी विविध उपाययोजना उपलब्ध आहेत. पाळी नियमित करण्यासाठी विशिष्ट औषधे दिली जातात. विशेषत: प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्यांचा विशिष्ट कोर्स दिला जातो. कधी कधी गर्भ निरोधक गोळ्यांचाही वापर केला जातो. या गोळ्यांमुळे एफएसएच, एसएच हे अंत:स्राव दबले जातात. त्यामुळे स्त्रीबीज कोषांचे कार्य स्थगित होऊन त्यांना विश्रांती मिळते. काही विशिष्ट गर्भनिरोधक गोळ्यांमुळे मुरुमे, लव यांचे प्रमाण खूपच कमी होते. विवाहानंतर लवकर गर्भधारणा व्हायला हवी असल्यास स्त्रीबीजविमोचनकारक औषधे दिली जातात. वजन जास्त असल्यास तसेच इन्सुलिन रेजिस्टन्स आढळल्यास मधुमेह निवारक गोळ्याही सुरू केल्या जातात. केवळ गोळ्या देऊन भागत नाही. तर वजन कमी करणे, नियमित व्यायाम करणे, समग्र जीवनशैलीत बदल करणे, ताणतणाव कमी करण्यासाठी योगासनांचा वापर करणे, समुपदेशनाचा लाभ घेणे, मुरुमे-लव यांच्यावर उपचार करणे इत्यादी अनेक बाबींचा विचार केला जातो.
पुरुषी वर्चस्व असलेल्या स्पर्धात्मक जगात स्थिरावताना आजच्या मुली आणि तरुणींना स्वत:च्या शरीरात होणाऱ्या अंत:स्राव असंतुलनालाही तोंड द्यावे लागते. याचे अत्यंत समर्पक उदाहरण म्हणजे पॉलिस्टिक ओव्ॉरियन सिंड्रोम होय! आजच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या या आजारपणाविरुद्ध आपणच समर्थपणे लढायला हवं. योग्य मदतीसह!
(लेखिका हिंदुजा हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)