चित्रपटसृष्टीचे ‘जनक’ दादासाहेब फाळके यांच्या पत्नी सरस्वतीबाईं दादासाहेबांच्या पाठीशी कायम दीपस्तंभासारख्या उभ्या राहिल्या. ‘रोपटय़ाची वाढ’ या पहिल्या लघुपटाच्या शूटिंगसाठी मदतीपासून चित्रपटात मनाविरुद्ध छोटी भूमिका करण्यापर्यंत, प्रसंगी सगळे दागिने सुपूर्द करण्यापासून संपूर्ण चित्रपट युनिटच्या जेवणाची काळजी घेण्यापर्यंत त्यांनी सगळं केलं. म्हणूनच दादासाहेबांचं चित्रपटनिर्मितीचं स्वप्न पूर्ण झालं. १ जून रोजी सरस्वती फाळके यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त ..
स्थळ होतं निळकंठेश्वराचे मंदिर, बडोदे. काळ होता सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा. वेळ होती साधारण सकाळी साडेआठची. बडोदे संस्थानचे राजगायक भाऊराव कोल्हटकर यांना एक तरुण मुलगा निळकंठेश्वराच्या मंदिरात रोज येताना दिसू लागला. चांदीचं पळीभांडं घेऊन, रेशमी सोवळं नेसून हा तरुण, त्याच्या त्र्यंबकेश्वरीच्या सवयीप्रमाणे, सकाळीच देवदर्शनाला येई. भरदार देहयष्टी, भव्य कपाळ, धारदार नाक, तपकिरी डोळे त्याच्या बुद्धिमत्तेची साक्ष देत होते. कोण असेल हा? कुठला असेल? विचारावं का त्याला? भाऊरावांनी मुलाशी ओळख करून घेतली, वाढवली अन् त्याच्या बुद्धीची चमक त्यांच्या चांगलीच लक्षात आली. आपली भाची, सरस्वती आता बारा वर्षांची झालीय, लग्नाला थोडा उशीरच झालाय.. पण आहे किती हुशार अन् चुणचुणीत. गाणी किती छान म्हणते, वाडय़ातील मैत्रिणींना गोळा करून गोष्टी तर अशा सांगते की प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. मग त्यांची खात्रीच पटली आपल्या भाचीसाठी हाच मुलगा वर म्हणून योग्य आहे. शंकररावांशी बोललं पाहिजे लवकरच!
अन् लवकरच त्या तरुणाशी म्हणजे धुंडिराज गोविंद तथा दादासाहेब फाळके (चित्रपटसृष्टीचे आद्य जनक) यांच्याशी सरस्वती ऊर्फ गिरिजा शंकर करंदीकर हिचा विवाह झाला. दोघांच्या वयात २० वर्षांचं अंतर होतं. ते वर्ष होतं १९०२. गिरिजा करंदीकरांची झाली सरस्वती धुंडिराज फाळके. दादासाहेब मूळचे त्र्यंबकेश्वरचे. वैदिकी, याज्ञिकी करणारे दाजीशास्त्री व द्वारकाबाई यांचे सुपुत्र. सरस्वती बडोद्याची. शंकर वासुदेव करंदीकर या कीर्तनकारांची मुलगी. महाराणी चिमणाबाई हायस्कूलमध्ये चौथीपर्यंत शिकलेली. लग्न झाल्यावर सरस्वती सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे संसाराला लागली खरी, पण तिच्या लवकरच लक्षात आलं की, हा प्रवास एका झंझावाताबरोबरचा आहे. तेव्हा वादळातील दीपस्तंभाप्रमाणे आपली भूमिका असायला हवी हे तिनं मनोमन ठरवून टाकलं आणि त्याच क्षणी सरस्वतीचं रूपांतर एका समजूतदार, जबाबदार स्त्रीत झालं.
दादासाहेब त्या काळात बडोदे येथे सरकारी पुरातत्त्व वस्तू संशोधन खात्यात नोकरी करत होते. अंगी असलेल्या विविध कलागुणांमुळे छायाचित्रकार आणि ड्राफ्ट्समन म्हणून काम करत; पण त्यांचं कलासक्त मन या नोकरीत रमलं नाही. स्वातंत्र्याचं वारं वाहात होतं. वंगभंगाच्या चळवळीचा परिणाम मनावर झाला होता. तेव्हा स्वदेशी व्यवसाय करून देशकार्य करायचं, हे त्यांनी मनाशी निश्चित केलं आणि नोकरी सोडली. सरस्वतीला पतीचा अभिमान वाटला.
ते साल होतं १९०६. सरस्वतीच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. नाव ठेवलं भालचंद्र. संसाराची जबाबदारी वाढली होती. त्यामुळे लोणावळा येथे जाऊन त्यांनी चित्रछपाई व्यवसायाला सुरुवात केली. तिरंगी रंगीत छपाईला आवश्यक असणारी यंत्रसामग्री जर्मनीला जाऊन खरेदी केली. ही रंगीत छपाई अत्यंत कलापूर्ण व नयनरम्य असायची; परंतु काही कारणानं दादासाहेबांनी हा व्यवसाय सोडायचा ठरवला तेव्हा सरस्वती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. ‘आपण कसंही भागवू, पण तुम्ही तुमचं ध्येय सोडू नका,’ असा सल्लाही तिनं दिला. खरा कसोटीचा काळ इथूनच पुढे चालू होणार होता. आता भारतीय चित्रपटसृष्टी उदयाला येणार होती!
‘‘ही चित्रे कशी हो हलतात?’’ सरस्वतीनं दादासाहेबांना विचारलं. ‘‘हे सर्व तुला लवकरच माहीत होणार आहे. मीच अशा हलत्या चित्रांचा व्यवसाय करणार आहे.’’ दादासाहेबांनी ठामपणे आपला निश्चय व्यक्त केला. गिरगावात एका तंबूसारख्या थिएटरात लागलेला ‘द लाइफ ऑफ ख्राईस्ट’ बघून ते दोघं परत येत होते. देशप्रेमी दादासाहेबांच्या मनात पुन:पुन्हा विचार येत होते की, आपले भारतीय प्रेक्षक असे पाश्चात्त्यांचे चित्रपट पाहातात, मग भारतीय संस्कृतीचं दर्शन त्यांना कधी होणार? आपल्याकडील रामायण, महाभारतातील कथा घेऊन आपणच स्वदेशी चित्रपट तयार केला तर? हे मला जमेल ना? सगळी रात्र विवंचनेत गेली. सरस्वतीला ती जाणवली..
एक अजब आणि अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा तो काळ होता. त्यानं दादासाहेबांना झपाटून टाकलं होतं. स्वप्न भव्य होतं, पण वाट खडतर!
मग एकच ध्यास- स्वदेशी चित्रपटनिर्मितीचा! त्यासाठी लंडनला पत्रव्यवहार सुरू झाला. लंडनमध्ये जाऊन सिनेमाची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कॅमेरा आणण्यासाठी दादासाहेब निघाले तेव्हा सरस्वतीने त्यांना शब्द दिला, ‘‘आमची काळजी करू नका. जी जी म्हणून संकटे येतील त्यात मी तुमच्याबरोबर असेन.’’ त्या वेळी त्या फक्त २१ वर्षांच्या होत्या अन् तिसऱ्यांदा गर्भवती! पण दोन मुलांना घेऊन त्या ठामपणे मुंबईत राहिल्या.
१ एप्रिल १९१२. लंडनमधून विल्यम्सन कॅमेरा, प्रिंटिंग मशीन व फिल्मला भोके पाडण्याचे मशीन ही यंत्रसामग्री व एक मोठं, विशाल स्वप्न घेऊन दादासाहेब मायदेशी परतले. सरस्वतीचा कामाचा उरक, चटपटीतपणा या गुणांमुळे दादासाहेबांनी त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. यंत्रांची जुळवाजुळव, फिल्मला भोकं पाडणं, फिल्म डेव्हलप करणं, फिल्म कॅमेऱ्यात भरणं हे सरस्वतींनी लीलया शिकून घेतलं. दोनशे फूट फिल्मला भोकं पाडण्यास साडेतीन तास लागत. हात भरून यायचे, पण त्यांच्या सोशीकतेला तोड नव्हती.
स्वत:ची लहान मुलं, घरकाम, पाहुण्यांची ऊठबैस या सर्व गोष्टी पूर्ण करून, छोटय़ा मंदाकिनीला (पहिली बालकलाकार- चित्रपट ‘कालियामर्दन’) झोपवून रात्री उशिरा त्या डार्करूममध्ये पोहोचत आणि कामं उरकीत. प्रचंड कामामुळे आणि रात्रभर अंधारात रासायनिक प्रक्रिया करावी लागल्याने दादासाहेबांची दृष्टी गेली. तेव्हा औषधोपचार आणि पथ्यातील सातत्य सरस्वतीबाईंनी सांभाळलं आणि म्हणूनच त्यांची दृष्टी परत आली.
आता चिंता होती ती भांडवलनिर्मितीची. सरस्वतीने मंगळसूत्र तेवढं गळ्यात ठेवून बाकी सर्व दागिने पतीच्या स्वाधीन केले. नातेवाईकांच्या टीकेला तोंड दिलं. प्रापंचिक अडचणींची तिने उजळणी केली नाही. लंडनहून यंत्रसामग्री आल्यानंतर ‘राजा हरिश्चंद्र’ हे कथानक घेऊन चित्रनिर्मिती करायची हे त्यांनी ठरवलं होतं, पण भांडवलदारांचा विश्वास संपादन करायचा म्हणून एक लघुपट त्यांनी तयार केला. त्याचं नाव ‘रोपटय़ाची वाढ’. यात त्यांनी घरीच एका कुंडीत वाटाण्याचं बी पेरलं. त्याच्या समोर सव्वा महिना कॅमेरा फिक्स करून ‘वन टर्न वन..’ या पद्धतीने शूटिंग केलं. जास्तीत जास्त शूटिंग हे सरस्वतीबाईंनीच केलं. दादासाहेबांना सुरुवातीच्या चित्रपटापासून लाखो रुपये मिळाले, पण ते पुन्हा चित्रनिर्मितीसाठीच खर्च होत. कुठलंच व्यसन त्यांना नव्हतं.
पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’चं शूटिंग सुरू होतं. त्यात छोटा भालचंद्र रोहिदासाची भूमिका करी. एकदा ऋ षी कुमारांबरोबर खेळताना भालचंद्राच्या डोक्याला खोक पडली, पण या उभयतांनी मन घट्ट करून ‘सरणावरती मृत रोहिदासाला नेऊन ठेवतात’ या दृश्याचं चित्रीकरण केलं. शूटिंग संपल्यावर मात्र भालचंद्राला जवळ घेऊन त्या खूप रडल्या. धन्य त्या माऊलीची! म्हणजे प्रसंगी तारामतीपेक्षाही धीरोदात्तपणे सरस्वतीबाई वागल्या असंच म्हणावं लागेल. एका मासिकाला मुलाखत देताना एकदा त्या म्हणाल्या, ‘‘चित्रपट व्यवसाय स्वदेशी व्हावा याकरिता सारा संसार, कुटुंब त्यांनी पणाला लावलं होतं.’’ ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट बघायला प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली तेव्हा केलेल्या अपार कष्टाचं, सोसलेल्या हालांचं चीज झालं. दोघांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.
फाळके फिल्म कंपनी आता मोठी होऊ लागली. ४०-५० कलावंतांचा काकुबाई व देवीशंकर यांच्या मदतीने स्वयंपाक तर रोजचाच. कधी आळस, कुरकुर सरस्वतीबाईंना माहीत नव्हती. त्या कलावंतांचे उपास, व्रते, आवडीनिवडी, डोहाळजेवणं, बाळंतपणं, आजारपणं या सगळ्याकडे त्या आपुलकीनं लक्ष देत. हसतमुखानं सर्व करीत. काहींचे तर संसारही त्यांनी थाटून दिले. दादासाहेब सतत व्यवसायाची बाजू सांभाळण्यात व्यस्त असत. पटकथा लिहिणं, संवाद लिहिणं यातही सरस्वतीबाई मदत करत, काही तरी नवीन सुचवत.
सरस्वतीबाईंच्या स्वयंपाकाला चव असे. सहज मिळणाऱ्या भाज्या त्या करत; चवदार, चटकदार. लोणची- भोकराची, लिंबाची, अगदी कोरफडीचंसुद्धा! अंबाडीच्या फळांचा मुरांबा! मंडळी अगदी खूश होऊन जेवीत. त्या काळात जेवायच्या मोठय़ा पंक्ती बसत आणि जेवायचा आग्रह असे. या सर्व कुटुंब कबिल्यात स्वत:च्या मुलांसाठी वेगळं असं काहीच नसे. सरस्वतीबाईंना एकूण सात मुलगे व दोन मुली झाल्या. सरस्वतीबाईंना सर्व जण प्रेमाने ‘काकी’ म्हणत. स्वच्छ नऊवारी सुती पातळ अन् पांढरं शुभ्र कॉटनचे ब्लाऊज, पायात चढाव घातले की झाल्या शूटिंगसाठी कारखान्यात जायला तयार! त्या काळातही नऊवारी लुगडय़ावर बूट घातलेल्या सरस्वतीबाई जेव्हा दादासाहेबांबरोबर काम करीत तेव्हा बघणाऱ्याला अप्रूप वाटे आणि काहीसा दराराही.
दुपारच्या वेळात स्त्री पार्ट करणाऱ्या मुलांचे लांब वाढवलेले केस धुणं, त्यांना लुगडं नेसायला शिकवणं. हावभाव करून दाखवणं, मुलांना मुलींसारखं लाजणं- मुरडणं शिकवणं, त्यांच्या वेशभूषा, ढाली, तलवारी, किरीट, टोप आदी साहित्य तयार ठेवणं, पन्नास ते पाचशे कप चहा करणं, ही तर रोजचीच कामं. त्या काळी रिफ्लेक्टर्स नव्हते. मग कित्येक वेळा शूटिंगच्या वेळी सरस्वतीबाई उजेडात पांढरी चादर ताठ धरून उभ्या राहात. ‘‘मी बाहेरून तुम्हाला कोणतीही मदत करीन, पण पडद्यावर येणं मला आवडणार नाही,’’ असं एकदा सरस्वतीबाईंनी निक्षून सांगितलं होतं. पण.. पण याच स्त्रीने आयुष्याशी जुळवून तरी किती घ्यावं? ‘राजा श्रीयाळ’च्या वेळेस भांडवल कमी पडत होतं म्हणून दादासाहेबांनी स्वत: राजा श्रीयाळची अन् भालचंद्राने चिल्याची भूमिका करायचं असं ठरलं, पण चांगुणेचं काम करणारी स्त्री पार्टी काही लवकर मिळेना. तेव्हा ‘माझं नाव कुठे द्यायचं नाही हं!’ या अटीवर सरस्वतीबाई चांगुणेची भूमिका करायला आपणहून तयार झाल्या.
व्यवसायाच्या निमित्तानं दादासाहेब बाहेरच जास्त वेळ असत. घरातही त्यांचं सतत वाचन, लेखन, पेंटिंग्ज वगैरे कामं चालू असत. कित्येक वेळेला व्यवसायानिमित्त दादासाहेबांना सगळा कुटुंब कबिला वेगवेगळ्या गावी न्यावा लागे. त्र्यंबकेश्वर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, मुंबई व अन्य अनेक ठिकाणी. दर वेळेस, दर काही महिन्यांनी नव्या गावाला. सरस्वतीबाईंना मग सामानसुमानासकट पुन्हा एकदा नवा जम बसवावा लागे, की परत मुक्काम हलवण्याची वेळ यायची. या सगळ्यात आपल्या मुलांचं कसं होणार, मुलींची लग्ने कशी होणार याची त्यांना काळजी लागलेली असे, पण त्या बोलत नसत. चार पैसे हाती आले की दागिने करायचे अन् गरज लागली की तेच दागिने सावकाराकडे! हे तर नेहमीचंच झालं होतं. ‘लंकादहनाच्या’ चित्रीकरणाच्या वेळी आठ बैलगाडय़ा भरून तंत्रज्ञ, कलावंत, कर्मचारी एवढय़ा मोठय़ा ताफ्याचे जेवण त्या पाठवत असत. अनेक कंगोरे असलेलं ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होतं.
विजेवर चालणारी यंत्रसामग्री आणायला दादासाहेब पुन्हा लंडनला गेले. इकडे भांडवलदाराने पैशाचा ओघ कमी केला, कामगारांचे पगार थकले, स्टुडिओला टाळा ठोकण्याची भाषा सावकार करू लागले. या निकराच्या प्रसंगीही सरस्वतीबाई डगमगल्या नाहीत. सावकाराला थोपवलं आणि होणारं नुकसान टाळलं.
तिकडे ‘राजा हरिश्चंद्र’, ‘मोहिनी भस्मासुर’, ‘सत्यवान सावित्री’ हे चित्रपट बघून लंडनवासीय व्यावसायिक खूश झाले होते. दादासाहेबांची तांत्रिक कसब पाहून हे ‘दी बायग्राफने’ म्हटलं, फ्रॉम द टेक्निकल पॉइट ऑफ व्हय़ू दिस पिक्चर्स आर सप्रायजिंगली एक्स्लंट’, तर ‘कायनोटोग्राफ’ या सिने नियतकालिकाने ‘हे फाळके इंग्लंडमध्ये जन्माला का नाही आले?’ असं लिहिलं.
हेपवर्थसारख्या मान्यवर निर्मात्याने पूर्ण फाळके फिल्म कंपनी इंग्लंडला आणण्याचा खर्च, कलावंतांचे पगार, फाळके यांचा स्वतंत्र पगार व नफ्यात २० टक्के वाटा द्यायची योजना मांडली, परंतु दादासाहेबांनी ती नम्रपणे नाकारली आणि सांगितले, ‘‘हा व्यवसाय स्वदेशी व्हावा म्हणून मी झटलो, कुटुंबीयांचे हाल केले, संकटे- अडचणींना सामोरा गेलो. या माध्यमाद्वारे लोकरंजनाबरोबर लोकशिक्षण व्हावे, भारतीय संस्कृतीची जगाला ओळख पटावी यासाठी धडपडलो. ही योजना मी स्वीकारली तर माझ्या ध्येयापासून, तत्त्वनिष्ठेपासून मी ढळेन म्हणून मला ही स्वीकारता येणार नाही. तेव्हा मला क्षमा करावी.’’
सरस्वतीबाईंना हे कळलं तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. एका जाज्वल्य देशभक्ताचे हे विचार होते. अनंत आर्थिक अडचणी सोसूनही त्यांनी आपली तत्त्वं विकली नाहीत. याचा रास्त अभिमान सरस्वतीबाईंना होता. आपल्या पतीच्या स्वप्नउभारणीत पतीपाठोपाठ त्या चालल्या. कधी हसतमुखाने, तर कधी कणखरपणे. ही वाट कधी खडतर, कधी काटेरी, तर कधी सुकुमार फुलांनी सजलेली! हिमालयाची सावलीच जणू त्या होत्या. पतीच्या ध्येयपूर्तीसाठी झिजत, ही त्यागमय मूर्ती वितळत पण झळकत राहिली.
शेवटच्या काळात त्यांनी दादासाहेबांविषयीचे लेखन पूर्ण केले. आपली सर्व मुले चांगली नोकरी-उद्योग करत आहेत, मुली सुस्थळी आहेत हे पाहून
१ जून १९५३ रोजी एका अपूर्व समाधानाने त्या अनंतात विलीन झाल्या. ते समाधान होतं त्यागाचं, कर्तव्यपूर्तीचं!
vasanti.phalke@gmail.com