दुर्गाबाई म्हणजे व्यासंग! मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ. अनेक देशी-परदेशी भाषा त्यांना अवगत होत्या. संशोधन, अभ्यास करून केलेल्या त्यांच्या या लेखनाला जगन्मान्यता मिळाली. या व्यासंगामुळेच त्यांचं ज्ञान पक्व झालं, विचारांमध्ये ठामपणा आला जो त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला, त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर तीक्ष्ण टीका झाली. बाईंच्या चारित्र्यावर शिंतोडेदेखील उडाले. मात्र बाईंनी आपल्या निषेधाचा सूर कधी मवाळ केला नाही. स्पष्टशा जाहीरपणाने आणीबाणीला सर्वप्रथम विरोध करणाऱ्या दुर्गाबाई एकटय़ाच होत्या. मात्र एखादी गोष्ट पटली, तर विरोधकांचं कौतुक करण्यातही बाई मागे राहिल्या नाहीत, हीच ‘दुर्गाबाई भागवत’ नावाची थोरवी!
दुर्गाबाई म्हटलं की मला आठवण होते ती एका सुंदरशा कॅलिडोस्कोपची. त्याचा कोन किंचितसा बदलला की त्यामध्ये दरवेळी नवेच सुंदर रूप दिसते. बाईंचेही तसेच. मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ. गौतम बुद्धाचे चरित्र, त्याचे तत्त्वज्ञान, त्याचा न्यायविधी या विषयांबरोबरच संस्कृत, पाली, बंगाली, जर्मन, इंग्रजी भाषांत त्यांचे प्रावीण्य होते. त्याचबरोबर गोंड, बैगा, कोरकू अशा आदिवासींशी मनसोक्त गप्पा मारू शकतील अशा त्यांच्या बोलीभाषादेखील बाईंना अवगत होत्या. त्यामुळेच आदिवासींच्या जीवनाबद्दल विस्तृत आणि मूलभूत असे लेखनही त्यांनी केले. त्यांनी संशोधन, अभ्यास केलेल्या विषयांवरचे त्यांचे लेखन म्हणजे त्या त्या विषयांवर स्वत:चा असा विशेष ठसा उमटवणारे ठरले आणि त्याला जगन्मान्यता मिळाली.
त्यांच्या या अशा गंभीर विषयांबरोबरच स्त्रीजीवनाशी निगडित अशा शिवणकाम, विणकाम, रांगोळ्या घालणं, हात-पाय-कपाळावरची गोंदणं, स्त्रीगीतं, उखाणे, व्रतवैकल्ये, उपासतापास याबरोबरच पाकशास्त्रच नव्हे तर पाककला यांसारख्या ‘बायकी’ विषयांबद्दलचे त्यांचे ज्ञान हे वैशिष्टय़पूर्णच होते. त्या त्या कलांमध्ये त्यांनी आनंद तर घेतलाच, पण त्याचबरोबर त्या त्या कलांशी जोडलेल्या धार्मिक, सामाजिक, श्रद्धांचे धागेदोरेदेखील उलगडून दाखवले. दुर्गाबाईंचा दृढ विश्वास होता की कोणतीही कला ही रंग, रूप, सौंदर्य, स्वाद, सुगंधापुरतीच मर्यादित नसते, तर ती माणसाच्या संपूर्ण जगण्याचा एक अविभाज्य भाग असते. हे सगळं काही त्यांनी गंभीर विषयांवरच्या लेखनापेक्षा अगदी वेगळ्याच अशा अत्यंत सहज, सोप्या, ‘बायकी’ समजल्या जाणाऱ्या भाषेत मांडले. ते वाचताना वाचकाला आश्चर्याबरोबरच आनंदही होतोच. त्यांची ही भाषांची विषयानुरूप बदलत जाणारी रूपं म्हणजे त्या त्या विषयांचे अलंकार ठरली.
दुर्गाबाईंनी निसर्गावर जिवापाड प्रेम केले. त्या स्वत:ला निसर्गाच्या उत्पत्ती-स्थिती-लय या वर्तुळातील एक कडी आहे, असेच समजायच्या. त्यातूनच ‘ऋ तुचक्र’सारखे, निसर्गाच्या विविध, दुष्ट-सुष्ट विभ्रमांचे, जिवाला चटका लावणारे अनुभवसुंदर असे दर्शन त्यांनी घडवले. मरणपंथाला लागलेल्या एकामागोमाग दोनशे-तीनशे अंडी घालणाऱ्या पाकोळीच्या जननक्रियेचे वर्णन करताना दुर्गाबाई म्हणतात, ‘‘त्यांच्या (अंडय़ांच्या) मूकतेतही ब्रह्मांडाच्या कानठळ्या बसाव्यात असे आक्रंदन, त्यांच्या त्या चिमुकल्या देहातला तो अमर्याद जीवनोत्साह आणि ती जगण्या-मरण्याची, अटीतटीची ओढ तुमच्या कानात घुमले नाही असे व्हायचेच नाही!’’ निसर्गातील विविध रूपांना बाईंनी म्हटलेय, ‘जीवनाचे अंकुर फुटविणारा’ (वास), फुलांच्या रंगांना ‘तांभुरणे’ ‘निळे फुलोर’, ‘नटवा पर्युत्सुक रंग’ (पिवळा) असे मनमोहक शब्द हे बाईंचे वैशिष्टय़च.
ईश्वराचे अस्तित्व, पूजाअर्चा यावर विश्वास न ठेवणाऱ्या बाई, पण पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती पाहून, विठोबाबद्दलच्या सगळ्या मिथक कथा आठवून, मग म्हणतात, ‘तुकारामाने याला ‘सुंदर ते ध्यान’ का म्हटले ते कळले!’
व्यासपर्व’मध्ये दासी म्हणून दरबारात आणल्यावर आपल्या दासीपणाबद्दलच सभा, तिथे उपस्थित असलेले वृद्ध लोक धर्माने घातलेले नीतिनियम यांच्याबद्दलचे प्रश्न विचारून कौरवांच्या महासभेतील विद्वान ज्येष्ठांना निरुत्तर करणाऱ्या बुद्धिमती द्रौपदीबद्दल बाईंनी म्हटले आहे, ‘‘प्रीती आणि रती, भक्ती आणि मैत्री, संयम आणि आसक्ती या भावनांच्या द्वंद्वातला सूक्ष्म तोल द्रौपदीच्या व्यक्तिमत्त्वात जसा आढळून येतो तसा मला अन्य कोणत्याही पौराणिक स्त्रीमध्ये आढळत नाही. द्रौपदीच्या मनाचे तडफडणे हे भारतातल्या विलक्षण सुंदर अशांततेचा मूलस्रोत आहे.’’ मला तर वाटते की बाईंनी हे वर्णन महाभारतातील द्रौपदीचे केले असले तरी आजही ते निव्वळ भारतातीलच नव्हे तर एकूणच स्त्रीजातीच्या मनातील द्वंद्वाचे प्रातिनिधिक रूप आहे.
दुसरीकडे मध्य प्रदेशातील आदिवासी लोकांशी संवाद साधून, त्यांचं जगणं, त्यांच्या भावना, त्यांचं कल्पनातीत दारिद्रय़ याबद्दल लिहिताना त्यांनी म्हटलंय, ‘फाशी जाणाऱ्या आदिवासीने अखेरची इच्छा म्हणून वरण भात, माशाचं कालवण मागवून घेतले, आणि जेलरने ते आणून दिल्यानंतर स्वत: ते न खाता आपलं प्रेत घ्यायला येणाऱ्या आपल्या मुलालाच ते जेवण देण्यास सांगितले. दारिद्रय़ाचं हे असलं भयंकर रूप पाहिलं आणि मी पुष्कळ काही समजून गेले. मी भारतातला खरा माणूस पाहिला..संस्कृतीचा ‘श्री गणेश’ मी शिकले. भारताचाच नव्हे, तर जगाचा मूळ माणूस मी तिथेच पाहिला. तेव्हापासून निखळ माणूस मी इथेतिथे हुडकू लागले.’ त्यामुळेच मग बाईंनी माणसातील उलटसुलट वृत्तीदेखील बघितल्या. त्यानुसार भूमिका घेतल्या. त्यामुळेच मग जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक धन, त्यांचे कर्तृत्व यांचे मनापासून कौतुक केले. पण त्यांच्या ज्या गोष्टी बाईंना पटल्या नाहीत त्यावर टीकाही केली. मानवशास्त्र, समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून, संशोधकाच्या नजरेला जे दिसले ते बाईंनी मांडले, पण त्याच वेळी राजकारण, समाजकारणाचे पूर्ण भान असल्यामुळेच बाईंना फुले, आंबेडकरांचे महत्त्व पटले, ते त्यांनी उमाळ्याने लिहिले. बाई म्हणतात, ‘१८८० मध्ये फुल्यांनी शेतकऱ्यांच्या अत्यंत खालावलेल्या परिस्थितीवर ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक लिहिले. तसे पुस्तक लिहिणे दुसऱ्या कुणाला सुचलेही नाही, त्यातच फुल्यांचा मोठेपणा आहे. बाई दुसऱ्या एका लेखात म्हणतात, ‘‘फुले यांच्यासारखे लोक म्हणजे समाजातल्या दोषांवर टीका करणारे, धर्माची समीक्षा करणारे म्हणून आवश्यक आहेतच. पण म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानायचा का?’’ फुल्यांनी हिंदू धर्मावर टीका करताना ब्रह्मदेव अणि त्याची मुलगी यांच्यामधील नवराबायकोच्या संबंधाचा दाखला दिला. त्याला बाईंचा आक्षेप होता. बाई म्हणतात, ‘मानवजातीतील प्रथम स्त्री-पुरुष हे बहीण-भाऊच होते. मानवी संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. ज्यू, ख्रिस्ती-धर्मातील अॅडम अािण ईव्ह हे बहीण-भाऊच होते, अॅडमच्या बरगडीपासून ईव्हचा जन्म झाला, याचा अर्थ ती अॅडमची मुलगीच ठरते, हे फुले यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही, मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासांतील तो एक टाळता येणार नाही असा भाग होता.’ मिथकांचा अर्थ लावताना, त्यांचे विश्लेषण करताना किती गोष्टींचे भान ठेवावे लागते याचाच विचार बाईंनी इथे मांडलेला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च कोटीचे विद्वान. ग्रंथांवर अतोनात प्रेम करणारे आणि उत्तम, खंदे वक्ते, खंदे लेखक म्हणून दुर्गाबाईंनी अनेक वेळा त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. ग्रंथांबद्दलचं अपार प्रेम हा त्या दोघांमधला आस्थेचा मुद्दा होता. परंतु ग्रंथांवर एवढं प्रेम करणाऱ्या आंबेडकरांसारख्या माणसाने ‘मनुस्मृती’सारखा प्राचीन महत्त्वाचा, ऐतिहासिक दस्तावेज असलेला ग्रंथ जाळावा, त्या गोष्टीला दुर्गाबाईंनी आक्षेप घेतलाच, पण आंबेडकरांसारख्या व्यक्तीने अशी गोष्ट करावी याचे अतीव दु:ख झाले, रागही आला. त्यांनी म्हटलं, पुस्तक जाळण्यापेक्षा त्या पुस्तकातील न पटणाऱ्या गोष्टी परखडपणाने खोडून काढाव्यात. बाईंसाठी तर ग्रंथ जाळणे हा गुन्हाच असतो, त्यामुळेच आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘रामकृष्णांचे कोडे’ या पुस्तकाला जाळावे असे म्हणणाऱ्यांचाही तीव्र विरोधच केला होता. ‘रामकृष्णांचे कोडे’ या पुस्तकावर बाईंचा आक्षेप होताच. कारण फुल्यांप्रमाणेच आंबेडकरांनादेखील हिंदू धर्मातील मिथकांचा अन्वयार्थ लावता आलेला नाही, असं त्यांचं म्हणणं. मिथकांचा अन्वयार्थ लावताना प्राचीन काळातील समाजस्थिती, प्रथा रीतीरिवाज, श्रद्धा, परंपरा यांच्या संदर्भातच लावायला हवा, नाहीतर
हेतूंवरच शंका येऊ शकते. गौतम बुद्धांच्या आयुष्याच्या संदर्भातील मिथकांची उदाहरणे देऊनच बाईंनी ‘रामकृष्णांचे कोडे’ यावर आक्षेप घेतले. पण ते पुस्तक जाळण्याला त्यांनी परखडपणाने, तीव्र शब्दात विरोध केला होता. फुले-आंबेडकरांवरच्या बाईंच्या विरोध, आक्षेपांमुळे दलित समाजाने दुर्गाबाईंविरोधात गदारोळ उठवला. कडवा विरोध करणारे लेख प्रसिद्ध केले. शिवीगाळ, घाणेरडय़ा शब्दांत पत्रे आली, फोन आले, धमक्यादेखील आल्या. पण जेव्हा दलित लेखकांनी आपल्या जीवनानुभवांवरच्या कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा उच्चवर्गीयांनी त्यांच्या लेखनाला प्रचंड विरोध केला. कारण ते प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात होते. या वेळी दुर्गाबाईंनी दलित लेखकांचीच बाजू घेतली, एवढेच नव्हे तर त्यांच्या साहित्याचे कौतुक केले. त्यांच्या लेखनाला पाठिंबा दिला. कारण बाईंच्या मते दलितांचे साहित्य म्हणजे त्यांचे जगणे होते, उगाच आव आणून कुणाची उसनवारी केलेले नव्हते. त्यांच्या ‘अश्लील भाषे’लाही बाईंनी आक्षेप घेतला नाही, कारण तशी भाषा, तशा तऱ्हेचे जीवन हेच त्यांचे वास्तव आहे आणि तेच त्यांनी प्रामाणिकपणाने मांडले आहे, म्हणून बाईंनी दलित लेखकांचे कौतुकच केले, त्यामुळेच इतर समाजाला दलित समाजाच्या जीवनाची जाणीव झाली. त्यानंतर फुले-आंबेडकरांवर टीका केली म्हणून बाईंवरचा राग निघून गेला, सौहार्दाचे संबंध निर्माण झाले.
पण त्यापाठोपाठच १९७२ च्या १५ ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या समारंभाला तीव्र विरोध करून राजा ढाले यांनी म्हटले की, आम्हा लोकांना कुठे स्वातंत्र्य मिळालेय? अजूनही आम्ही, आमच्या स्त्रिया गुलामांचेच जीवन जगताहेत. कशाला त्या राष्ट्रध्वजाला सन्मान द्यायचा. असे म्हणताना अत्यंत शिवराळ, घाणेरडी भाषा वापरली. त्या भाषेला मात्र दुर्गाबाईंनी तीव्र शब्दांत विरोध केला. पुन्हा एकदा दलित बाईंवर रागावले. त्यानंतर काही काळानंतर नामदेव ढसाळ या अत्यंत संवेदनशील कवीचे ‘गोलपीठा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात ढसाळांनी वेश्या वस्तीतील वातावरण, तेथील वेश्यांचे जगणे याबद्दलचे लेखन केले होते. पुन्हा एकदा ‘अशा’ विषयावर लिहिले गेले म्हणून टीका होऊ लागली. पण याही वेळी दुर्गाबाईंनी ‘गोलपीठाचे’ कौतुक केले. बाईंनी तमासगीर बायका, तमाशा या विषयावर खूप संशोधन केलेले होते. त्या वेळी तमासगीर बायका, त्यांचे जगणे, त्यांचे वेश्याजीवनाकडे ढकलले जाणे हे सगळे त्यांनी संशोधन करून, त्यांच्याशी संवाद साधून समजून घेतलेले होते. त्यांच्या जीवनातले दाहक सत्य बाईंनी पाहिले होते, तेच सत्य ढसाळांनी ‘गोलपीठा’मध्ये मांडले होते, म्हणूनच दुर्गाबाईंनी ढसाळांचे कौतुकच केले. त्या गोष्टीचा ढसाळांना अतिशय आनंद झाला, त्यांनी बाईंना फोन करून, बाईंचे आभार मानले आणि बाईंना आपल्या घरी जेवायला येण्याचेही आमंत्रण दिले. ढसाळांचा फोन आल्याचा आनंद बाईंना झालाच, परंतु प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्या ढसाळांच्या घरी जेवणाला मात्र जाऊ शकल्या नाहीत.
एशियाटिक लायब्ररीमधील कर्मचाऱ्यांना महिनोन्महिने पगार मिळत नाहीत, पुस्तकांची हेळसांड होत आहे, लायब्ररीतील काही पुस्तके रस्त्यावरच्या फूटपाथवरच विक्रीला ठेवलेली दिसली. अत्यंत नामवंत लोकांनी लायब्ररीतून नेलेली दुर्मीळ अशी मौल्यवान पुस्तके परत करण्यास स्पष्ट नकार देऊनही, लायब्ररी त्यांच्याविरोधात काहीही कारवाया करीत नाही, ग्रंथालयाचा गलथान कारभार, अस्वच्छता याविरोधात दुर्गाबाईंनी इतरांना बरोबर घेऊन जोरदार आवाज उठवला. पाठोपाठच हितसंबंध गुंतलेल्यांनी दुर्गाबाईंच्या विरोधात वेडेवाकडे आरोप करायला कमी केले नाही. परंतु बाईंचा रेटा एवढा होता की सरकारने नेमलेल्या समितीमुळे त्यातून मार्ग काढले गेले. एशियाटिक लायब्ररीप्रमाणेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कारभाराबद्दलच्या किती तरी वर्षांपासूनच्या कित्येक तक्रारींचा तडा लावण्यासाठीदेखील बाईंनी पुढाकार घेतला होता. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, दुर्मीळ ग्रंथ सुरक्षितपणे ठेवले जावेत, ग्रंथांच्या चोऱ्या, भ्रष्टाचाराला आळा बसावा या पोटतिडकीनेच बाईंनी प्रकरणे लावून धरली होती. त्यासाठीदेखील त्यांना विरोध झालाच होता. परंतु बाईंचे अमाप ग्रंथप्रेम हीच त्यांची प्रेरणा होती.
दुर्गाबाईंच्या आयुष्यातील अत्यंत कसोटीची, बाईंच्या तत्त्वनिष्ठेची परीक्षा घेणारा, बाईंचे व्यक्तित्व उजळून टाकणारा काळ होता तो आणीबाणीचा. लेखनस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य यांचा पुरस्कार आयुष्यभर करणाऱ्या बाईंना १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही विश्वासात न घेता देशात आणीबाणी जाहीर करणे म्हणजे बाईंच्या समोर एक आव्हानच होते. इंदिरा गांधींच्या सरकारने रातोरात, त्यांच्याविरोधी असणाऱ्या बहुतेक नेत्यांना तुरुंगात टाकले, कित्येक जण भूमिगत झाले. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लागू केली. सरकारची परवानगी मिळवल्याशिवाय लेखन प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली. सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांच्या कचेऱ्यांना कुलपे घातली गेली. त्या वृत्तपत्रांच्या संपादकांनादेखील बंदी बनवले. लाखो लोक तुरुंगात गेले. कुटुंबनियोजनासाठी सक्तीने शस्त्रक्रिया होऊ लागल्या. सगळे वातावरण भयग्रस्त झाले. परंतु आणीबाणीला जाहीरपणे विरोध करण्याचे धारिष्टय़ नव्हतेच. आणीबाणीचे परिणाम अनिष्ट होत आहेत म्हणून आणीबाणी उठवावी असा ठराव पुण्याच्या साहित्य महामंडळाने मांडला. सरकारतर्फे मिळालेला ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार मान्यवर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी परत केला. पण मान्यवर लेखक वि. स. खांडेकर,
पु. ल. देशपांडे यांनी मात्र त्यांना मिळालेले पुरस्कार परत करण्यास नकार दिला. पु. ल. देशपांडे एवढे मात्र म्हणाले होते की, जोपर्यंत जयप्रकाश नारायण तुरुंगात आहेत तोपर्यंत मी मद्य घेणार नाही!
सर्वप्रथम स्पष्टशा जाहीरपणाने आणीबाणीला विरोध करणाऱ्या दुर्गाबाई एकटय़ाच निघाल्या. कराड इथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्याचसाठी त्यांची निवड झाली होती. बाई साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आणीबाणीविरोधात बोलतील, ठराव मांडतील याची धास्तीच नव्हे तर खात्रीच सरकारधार्जिण्या लोकांना वाटत होती. ‘आणीबाणीचे कार्य आता सफल झाले आहे तेव्हा आता आणीबाणी काढून घ्यावी’ असे विनंतीपत्र तयार करून त्यावर लक्ष्मणशास्त्री जोशींपासून कित्येक मान्यवर विचारवंत साहित्यिकांनी सह्य़ा केल्या व बाईंनी हे पत्र संमेलनाचे सन्मानीय पाहुणे, तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना द्यावे, अशी विनंती केली. त्याला बाईंनी नकार देऊन म्हटले, हे पत्र तुम्हीच संमेलनाद्वारे द्यावे. आपल्या भाषणात बाईंनी आणीबाणीला विरोध करू नये अशी एक चिठ्ठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले साहित्यिक वि. स. खांडेकरांनी बाईंना दिली. बाईंवर त्यासाठी कित्येक मान्यवरांनी दडपणे आणली होती. बाईंना आणीबाणीला विरोध तर करायचा होता, पण तो कोणत्या स्वरूपात करावा? शिवाय बाईंवर किती तरी विचारवंत, मान्यवरांची दडपणेही होतीच. साहित्य संमेलन सुरू झाले. यशवंतराव चव्हाण बोलायला उठताच, प्रेक्षकांत बसलेल्या समाजवादी पक्षाच्या आघाडीच्या कार्यकर्त्यां इंदूताई केळकर एकदम उठून उभ्याच राहिल्या. हातातून लपवून आणलेला काळा झेंडा फडकावून इंदिरा गांधींच्या विरोधात जोरजोरात घोषणा देऊ लागल्या. एकदम खळबळ माजली. पाठोपाठच महिला, पुरुष पोलीस आले, इंदूताईंना पकडून घेऊन गेले. साहित्य संमेलन पुढे चालू झाले. मग पु. ल. देशपांडे यांच्या खुसखुशीत विनोदी भाषणाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत असतानाच दुर्गाबाई एकदम पुढे झाल्या. त्यांनी पु. ल. देशपांडे यांना विनंती करून त्यांच्या हातून ध्वनिक्षेपक घेतला आणि त्या म्हणाल्या, ‘जयप्रकाश नारायण हे यशवंतराव चव्हाणांना गुरुस्थानी आहेत. लक्ष्मणशास्त्र्यांचे ते स्नेही, सहकारीदेखील आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून या क्षणी सगळा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. आपणदेखील त्यांच्यासाठी दोन मिनिटे शांतता पाळून प्रार्थना करू या. बाईंच्या या वक्तव्यानंतर समोर बसलेले सगळे प्रेक्षक उठून उभे राहिले, सगळ्या साहित्यिकांनाही उठावे लागले. खुद्द यशवंतराव चव्हाणदेखील उठून उभे राहिले. बाईंची इच्छा पुर्ण झाली. व्यासपीठाची परंपरा न मोडता, इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकलेल्या जयप्रकाशांसारख्या नेत्याच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी सर्वाकडून प्रार्थना करवून बाईंनी आपला आणीबाणीचा विरोध सौम्यप्रकारे जाहीर केला.
दुर्गाबाईंनी मात्र आणीबाणीविरोधात भाषणे देण्याचा सपाटाच लावला. पुण्या-मुंबईसारख्या शहरांतूनच नव्हे तर इतर गावांतून जिथून बोलावणी आली तिथे जाऊन त्यांनी आणीबाणीला कठोर शब्दांत विरोध केला. विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. बाई एशियाटिक लायब्ररीत बसलेल्या असताना पोलीस आले आणि बाईंना पकडवॉरंट दाखवले. बाईंना तुरुंगात टाकले गेले. पण बाई तिथेही स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हत्याच. मृणाल गोरे, प्रमिला दंडवतेंसारख्या राजकीय नेत्या, कार्यकर्त्यांप्रमाणेच चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, खुनी गुन्हेगार बायका, वेश्या गुन्हेगार यांच्यामध्येदेखील बाई रमल्या. प्रत्येकीचे स्वभावविशेष त्यांनी नेमकेपणाने टिपले. पाली भाषेतील सिद्धार्थ जातकाचे भाषांतर पूर्ण केले आणि गुन्हेगार बायकांकडून त्यांच्या गोधडय़ांवर घालायचे विशेष असे टाकेदेखील त्या शिकल्या.
आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता सरकारने बाईंना महाराष्ट्रातील मंत्रिपद देऊ केले होते, पण ते माझे काम नाही म्हणून बाईंनी नकार दिला. शिवाय त्यानंतर सरकारकडून मिळणारे सगळे पुरस्कार नाकारले, सरकारी संस्थांशी कसलाही संबंध ठेवायलाही नकार दिला. आणीबाणी लादली म्हणून इंदिरा गांधींचा विरोध करणाऱ्या दुर्गाबाईंनी इंदिरा गांधींना थोरोबद्दल प्रेम वाटते, त्याच्यावर कविता केली म्हणून दुर्गाबाईंनी इंदिरा गांधींचे कौतुकही केले.
असे कधी तरी खाष्टपणा करणारे, पण बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या, सगळ्या कला, ज्ञान, शास्त्रांना आपल्या कवेत घेणाऱ्या बाईंना जीवनाचे अंतिम सत्य सापडले होते का? या माझ्या प्रश्नावर बाई म्हणाल्या होत्या, ‘अमुक एकच सत्य असे काही नसतेच. पण या सृष्टिचक्रातील मीदेखील एक कडी आहे. मी विश्वचैतन्याशी जोडली गेले आहे. याचे पूर्ण भान मला आहे. बाईंच्या या म्हणण्यातच बाईंच्या असण्याचे सार आले आहे, त्यांनी स्वत:च्याच मृत्यूबद्दल कविता केली होती. कवितेच्या अखेरीस बाईंनी म्हटले आहे.
मरणा तुझ्या स्वागतास। आत्मा माझा आहे सज्ज।
पायघडी देहाची ती। घालूनी मी वाट पाही।
सुखवेडी मी जाहले। देहोपनिषद सिद्ध झाले।
प्रतिभा रानडे ranadepratibha@gmail.com