शालिनी लॅँगर
शबरीमलाला स्त्रियांनी न जाण्याचं अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्यांनी आजचे पौगंडावस्थेतील मुलगे आणि मुली विचारांच्या कोणत्या वळणावर आहेत, ते पाहणे गरजेचे आहे. एका वर्गात शालेय मुलांसमोर मासिक पाळीवर चर्चा घेतली आणि चर्चेचं फलित निघालं, वर्गात ठेवायचा ‘पीरियड बॉक्स’..
बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करणाऱ्या मोच्रेकऱ्यांच्या आणि दंगल आवरण्यासाठी सज्ज पोलिसांना न जुमानता हेल्मेट्स घालून त्यात सामील झालेल्या निश्चयी कार्यकर्त्यांच्या फोटोंकडे तूर्त दुर्लक्ष करा किंवा करूही नका. बाहेर ‘मी टू’ वादळ पूर्ण भरात असताना जे काही बोललं आणि केलं जातंय त्यात हे किती विनोदी आहे बघा. एका देवाला घनदाट जंगलाच्या सात किलोमीटर आतमध्ये असलेल्या डोंगरावर एकांतात राहावं लागतंय. का, तर आपल्या ब्रह्मचर्याचं वैभव जपण्यासाठी. हा देव आणि सामान्य पुरुष किती सारखे करून ठेवले आहेत नाही? स्त्रीच्या उपस्थितीत आपल्याला भानावर राहता येईल अशी खात्री दोघांपैकी कोणीच देऊ शकत नाही. ना देव, ना सामान्य पुरुष. या देवाला कशाची चिंता वाटत असेल? मूठभर स्त्रिया त्याचे नियम मोडून शबरीमलाचे दरवाजे स्वत:साठी उघडतील याची की स्त्रियांनी हे दरवाजे उघडले की त्याच्या पुरुषांचा मनोनिग्रह पत्त्यांच्या डावासारखा कोसळून पडेल याची?
आणि या श्रद्धा विरुद्ध कायद्याच्या घनघोर संघर्षांत दुर्लक्ष झालेल्या एका आणखी महत्त्वाच्या मुद्दय़ाचं हा देव काय करणार आहे? हो, तो कदाचित बदलेलही येत्या १३ नोव्हेंबरला! (शबरीमला मंदिरात स्त्रियांना प्रवेश देण्याच्या आपल्या निर्णयावरील पुनर्विचार याचिकेवर या दिवशी सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे). केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तर अगदी डोळ्यासमोर चित्र उभं करणाऱ्या भाषेत याबद्दल टिप्पणी केलीये. ही देवाच्या दारात ओढलेली रेषा आहे आणि लक्षात ठेवा, ती फक्त शबरीमला मंदिरात नाही, सगळीकडे आहे. ही रेषा मासिक पाळीच्या वेळी स्रवणाऱ्या रक्ताने ओढलेली आहे. ते डोक्याला ताप देणारं मासिकचक्र काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत दडवलेलंच बरं. जर काही फाजील चिकित्सक पुरुष ते बघून हिरवेनिळे झाले तर काय करता. वर्षांनुवर्षांच्या अनुभवाने आम्हाला शिकवलंय हे दडवून ठेवायला. आमच्या हॅण्डबॅग्जमध्ये वेगळा कप्पा असतो ते ठेवायला, त्या दिवसात घालण्यासाठी खिसा असलेले कपडेही असतात वेगळे ठेवलेले, बाथरूमला जाताना सोबत बॅग घेऊन जाण्याच्या सबबी शोधत असतो आम्ही, त्याची गुपचूप विल्हेवाट लावण्यासाठी टॉयलेट्समध्ये कचरापेटी असलीच पाहिजे याची काळजी घेतो, त्याच्याबद्दल बोलताना आवाजही खूप खाली आणतो आम्ही. अवतीभोवती बघा. कामाच्या ठिकाणी जशी आपण बरीच गुपितं राखतो, तसं हेही गुपित ठेवायला आम्हाला शिकवलेलंच असतं पहिल्यापासून.
आणि अलीकडेच माझ्या मुलीने या गोष्टीवर पडलेला पडदा अगदी सहजच उचलला. ही १३ वर्षांची मुलगी आणि तिची एक घट्ट मत्रीण दोघींनी त्यांच्या शिक्षिकेशी काहीसा अवघडून टाकणारा वाद घातला. या दोघी स्वच्छतागृहात खूप वेळ काहीतरी करत होत्या असं तिथल्या मदतनीसबाईंनी सांगितल्यामुळे शिक्षिकेने त्यांना त्याबद्दल विचारलं होतं. माझी मुलगी तिच्या मत्रिणीला सॅनिटरी पॅड मिळवून देण्याच्या प्रयत्नात होती. तिची पाळी अचानक आली होती. या दोघींकडेही नॅपकिन नव्हते. त्यामुळे त्या नर्सरूममध्ये गेल्या. त्यानंतर या दोघींनी हा मुद्दा लावून धरला. वर्गशिक्षिकेला त्यांनी विचारलं की, ‘एवढे ‘ग्रोइंग अप’ क्लासेस शाळेने घेतले तरीही मासिक पाळी हा न बोलण्याचा विषय का आहे?’
शिक्षिकेने विचार केला आणि यावर वर्गात चर्चा करायचं ठरवलं. वर्गात १५ मुली आणि १६ मुलगे. त्यानंतर चांगलाच वाद झाला. मुलग्यांना मुलींबद्दल बरेच प्रश्न पडलेले आहेत हे यातून लक्षात आलं. मुलींनी त्यांना सॅनिटरी पॅड दाखवलं, ते कसं वापरतात ते सांगितलं. मुलांना वाटलं की हे खूपच अवघड आहे. एक मुलगा गमतीने म्हणालाही की, त्याची मोठी बहीण काही विशिष्ट दिवस चिडक्या मूडमध्ये का असते ते आत्ता त्याला कळलं. काहींनी मनात आलेलं बोलून दाखवलं, पॅड म्हणजे मोठय़ा आकाराचा डायपर आहे असं कोणीतरी म्हटल्यानंतर चांगलीच खसखस पिकली.
या वादाचं फलीत काय असेल, तर एक बॉक्स. मुलींचा आग्रह होता की हा बॉक्स सुंदर असला पाहिजे, वर्गात सर्वाच्या लक्षात येईल अशा ठिकाणी ठेवला पाहिजे. यात सॅनिटरी पॅड्सचा साठा कायम राहिला पाहिजे. शिवाय पॅण्टी लायनर्स, चॉकलेट्स वगैरे गोड पदार्थ, टिश्यू पेपर्स, एक माहितीपत्रक, कचऱ्याच्या छोटय़ा विघटनशील पिशव्या किंवा पाकिटं आणि हॅण्ड सॅनिटायझर हे सगळं यात असेल. माझी मुलगी हसून म्हणाली, ही यादी लांबतच चालली होती. या बॉक्समध्ये वस्तूंचा साठा ठेवण्याची जबाबदारी वर्गातल्या सगळ्यांनी पाळीपाळीने घ्यायची असं वर्गाने ठरवलं.
मुलग्यांचे पालक यावर काय प्रतिक्रिया देतात अशी काळजी शिक्षिकेला वाटत होती. प्रत्यक्षात त्यांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे शिक्षिका भारावून गेल्या. मुलींनी ही चर्चा पुन्हा घडवून आणली. प्रथम मुख्याध्यापकांपुढे आणि नंतर सर्व शिक्षकांपुढे. बाकीच्या वर्गानाही त्यांच्यासारखाच बॉक्स ठेवायचा होता. माझ्या मुलीच्या वर्गशिक्षिका नुकत्याच मला म्हणाल्या की, ‘पीरियड बॉक्स’मध्ये वस्तूंचा साठा करण्यासाठी मुलग्यांकडून काँट्रिब्युशन का घेत नाही, असं काही मुलग्यांच्या पालकांनी त्यांना विचारलं.
स्त्रिया लढत असलेल्या दैनंदिन लढायांना प्रसिद्धी मिळत असतानाच हाही एक छोटासा विजय आहे. या वर्गातली १३ वर्षांची मुलं कोणता डोंगर चढली नाहीत की त्यांनी हक्क मिळवला नाही, ना त्यांना देवाचा शोध घ्यायचा होता. इथे फक्त त्यांना एक चर्चा करायची होती आणि शिक्षिकेने ती करू दिली. पण हे सगळं सांगत असताना माझ्या मुलीच्या डोळ्यात दिसणारी चमक, शाळेच्या ऑडिटोरिअममध्ये हे सांगतानाचा तिचा खणखणीत आवाज हे सगळं मला मी ज्यांचा ‘अपमान’ करू शकत होते त्या गोष्टींची (लोणची, तुळस, प्रसाद, स्वयंपाकघर, भांडी, घे तुझं तू) आठवण करून देत होतं. आता या कोणत्याही गोष्टी नव्हत्या पण त्या नसण्यामागे काहीच दृष्टी नव्हती असं कोण म्हणेल?
माझ्या मुलीला बातम्यांमध्ये फारसा रस नाही पण ती म्हणते, तिला शबरीमला वादाबद्दल सगळं माहीत आहे. कसं ते मी विचारलं नाही. ती १३ वर्षांची आहे, तर मी ४४. ती पहिला पिंपल आलाय म्हणून दु:खात आहे, तर मी ‘आता जरा प्रौढच दिसलं पाहिजे’ असं म्हणत उपरोधाने बघणाऱ्या आरशाची समजूत काढतेय. ती हिरिरीने लढण्यासाठी तयार आहे, तर मी रात्री शांत झोप लागावी म्हणून बहुतेक लढय़ांवर पाणी सोडते. पुरुषाची निर्मिती असलेल्या या विश्वात देवाला आम्हा दोघींपासून सारखीच ‘भीती’ आहे.
मासिक पाळी येणाऱ्या मुली-बायांना बाहेर ठेवण्याचा मार्ग श्रद्धेने पत्करावा की नाही हे लेकीने अजून मला विचारलेलं नाही किंवा ज्या सरकारला ‘माँ’, ‘बहन’, ‘बेटी’ अशा ठरावीक साच्यात न बसणारी स्त्री कधी कळलीच नाही (हो, या सरकारच्या योजनाही तशाच आहेत) अशा सरकारमधल्या एक स्त्री मंत्री याची पाठराखण कशी करू शकतात, हेही तिने विचारलेलं नाही. शबरीमला प्रकरणातील सगळ्या वजनदार मुद्दय़ांचं परीक्षण करून मी बुद्धीला पटणारं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेनही. पण ते इतकं कठीण असायला हवं का, हा मूळ प्रश्न आहे. तिचा ३१ मुला-मुलींचा वर्ग यावर काय उत्तर देईल, असं तुम्हाला वाटतं?
आणि आणखी अनेक वर्षांनी हे मुलगे जेव्हा काम करू लागतील, पत्रकार होतील, चित्रपट काढतील, न्यायाधीश होतील, धर्मगुरू होतील किंवा अगदी मंत्री होतील, तेव्हाची गोष्ट आतापेक्षा थोडी वेगळी असेल अशी आशा करू शकतोय का आज आपण?
टीप : ‘धोक्या’च्या पौगंडावस्थेत पाऊल टाकण्यापूर्वीचा प्रवास करणारा हा आठवीचा वर्ग मी बघितलेला मुला-मुलींची सर्वात घट्ट मत्री असलेला ग्रुप आहे. श्रीमती स्मृती इराणी, मित्र असेच असतात.
(‘इंडियन एक्स्प्रेस’च्या सौजन्याने)
भाषांतर – सायली परांजपे