जट तयार झाल्याने देवीला वाहण्याचे प्रकार होण्यापासून त्या स्त्रीला मानेचे, मणक्याचे, पाठीचे विकार  होण्यापर्यंत अनेक गोष्टी घडू शकतात. अंधश्रद्धेचं जोखड ठरलेली जट आजही अनेक स्त्रियांचं जगणं असह्य़ करत आहेत. हेच लक्षात घेऊन नंदिनी जाधव जटनिर्मूलनाचं काम करत असून गेल्या पाच वर्षांत त्यांनी सुमारे ७९ स्त्रियांना जटांच्या जोखडातून बाहेर  काढलं आहे.

जट होते म्हणजे काय होतं.. केसांमध्ये गुंता होतो. ते नीट विंचरले गेले नाहीत तर तो गुंता तसाच राहातो. मग त्यात कचरा अडकतो आणि त्यातून जट निर्माण व्हायला सुरुवात होते. हे एवढं साधंसोपं आहे, पण आपल्याकडे ही जट थेट देवी-देवतांशी जोडली गेलीये. इतकंच नाही तर त्याच्या भोवती भयाचं दाट कोंदण आहे त्यामुळे जट झाली आणि ती निघाली नाही की पार्लरमध्ये जाऊन ती कापून घ्यायचा विचार न करता तंत्र-मंत्र करणाऱ्या कुणाकडे तरी जायचं आणि जटेचा गुंता आणखी वाढवायचा हे ठरूनच गेलंय. आणि हे फक्त अशिक्षित वा गावपातळीवर होत आहे असं वाटत असेल तर तेही आपल्या समाजाने खोटं ठरवलंय. अर्थात त्याचं समर्थन करणारे जसे आहेत तसेच या गैरसमजाला बळी पडणाऱ्यांना त्यातून बाहेर काढणारेही आहेतच. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या नंदिनी जाधव जटनिर्मूलनाबाबत त्यांचे अनुभव सांगतात, तेव्हा जट ही किती गंभीर समस्या आहे याचा उलगडा व्हायला सुरुवात होते.

akola Congress MP Imran Pratapgarhi criticized corrupt Mahayuti government
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार, काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांची खरमरीत टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य

नंदिनी जाधव महाराष्ट्र अंधश्रद्धानिर्मूलन समितीच्या सक्रिय कार्यकर्त्यां आहेत, पण सध्या त्यांची ओळख ही त्या पलीकडे गेलीये. त्यांनी हातात घेतलेलं जटनिर्मूलनाचं काम आणि त्या कामासाठी त्यांनी झोकून देणं हे जट या समस्येचं गांभीर्य समजण्यासाठी पुरेसं आहे. आजपर्यंत अठ्ठय़ाहत्तर स्त्रियांच्या केसांतील जटा काढण्यात त्यांना यश आलंय, शिवाय सुमारे पंचवीस स्त्रियांचं जटनिर्मूलनासाठी समुपदेशन ही त्या करत आहेत.

नंदिनी जाधव सांगतात, ‘‘महाराष्ट्र अंधश्रद्धानिर्मूलन समिती आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संपर्कात येईपर्यंत इतर चारचौघींप्रमाणे सधन आणि सुखाचं आयुष्य मी जगत होते. परदेशात जाऊन ब्युटी पार्लरचं शिक्षण घेऊन आले होते, त्यामुळे त्या शिक्षणाच्या बळावर उत्तम पार्लर चालवत होते आणि त्यातून महिन्याला लाख दीड लाख रुपये अगदी सहज मिळवत होते. या सगळ्याच्या जोडीला आवड म्हणून हव्या त्या विषयाचा अभ्यास करण्याची मोकळीक होती. त्यामुळे पुणे विद्यापीठातल्या स्त्री अभ्यास केंद्रातला एसएसडब्ल्यू अभ्यासक्रम मी केला होता. पण माझ्या जगण्याचा सामान्य गरीब स्त्रियांना, व्यक्तींना उपयोग व्हावा असं मनापासून वाटत होतं. ती संधी मला अंनिसशी जोडली गेल्यामुळे मिळाली. स्त्रिया आणि त्यांच्याशी संबंधित अंधश्रद्धांमध्ये सर्वात प्रमुख अंधश्रद्धा ही स्त्रियांच्या केसांमधली जट आहे हे लक्षात आलं तशी मी जटनिर्मूलनाच्या कामाला लागले.’’ पार्लर चालवण्याचा अनुभव त्यांना होताच, त्यामुळे जट कापणं एक वेळ सोपं होतं, पण खरं आव्हान होतं ते जट असलेल्या स्त्रीसह तिच्या कुटुंबाला समजावून त्यासाठी तयार करणं. पण त्याही वेळी एमएसडब्ल्यूच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकलेलं समुपदेशनाचं कौशल्य कामी आल्याचं नंदिनी सांगतात.

‘‘एका मोठय़ा राष्ट्रीयीकृत बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बायकोच्या डोक्यात जट होती. ती काढायची नाही कारण ती देवीची खूण असते, ती काढली तर घरावर संकट येतंच शिवाय जट कापणारी व्यक्तीही लगेच मरते हा विचार वारंवार जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या मनावर एवढा ठसवला होता की जट काढायचा विचार त्यांनी सोडून दिला होता. मात्र मी समुपदेशनाचे कौशल्य पणाला लावले आणि त्यांना जट काढायला तयार केलं. जट कापल्यावर त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हे पूर्वी पार्लरमधून मिळणाऱ्या लाख दीड लाख रुपयांपेक्षा मोठं वाटलं आणि त्याच भावनेतून डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येच्या दिवशी मी पार्लरला कुलूप लावलं ते आजतागायत.’’

‘‘पुण्याच्या उपनगरामध्ये एका टपरीवजा हॉटेलमध्ये केसात जट असलेली एक स्त्री काम करत होती. मला तिच्याबद्दल माहिती मिळताच मी तिचा माग काढत निघाले. अंनिसचा एक कार्यकर्ता आधीच तिथे पोहोचून माझी वाट पहात होता. पण तिला कुठून कुणकूण लागली कोणास ठाऊक, मी पोहोचायच्या आधीच ती पसार झाली. मी हॉटेल मालकाशी बोलले, तिचा पत्ता घेतला आणि रात्री साडेदहा अकरा वाजता जनता वसाहतीत तिला शोधत शोधत पोहोचले. वाटेत तिला गाठलं आणि चालत गप्पा मारत तिच्या घरी गेले. तिची जट म्हणजे देवीचा अवतार नाही, केस स्वच्छ न ठेवल्यामुळे ती तयार झाली हे त्या स्त्रीला समजावलं. तिला ते पटलंही, कारण माझी भीती वाटून घराकडे जाताना पायापर्यंत आलेल्या त्या जटेत अडकून ती पडली होती, त्यामुळे देवीच्या जटेनं आपल्याला वाचवलं नाही हा अनुभव तिने स्वतच घेतला होता. अर्धा डाव तर मी जिंकले होते, पण खरी परीक्षा पुढे होती. त्या बाईने तिच्या लेकीला फोन केला आणि माझ्याशी बोलायला सांगितलं – त्या लेकीकडून मी जेवढय़ा शिव्या आणि शापवाणी ऐकली त्याची मोजदाद करणं शक्य नाही. पण त्यानंतर तिला काय उपरती झाली कुणास ठाऊक. तिने युटय़ूबवर जाऊन माझी भाषणं, जट काढतानाचे व्हिडीओ पाहिले आणि मी फसवणाऱ्यातली नाही याची जाणीव होऊन तिने मला फोन केला आणि आईच्या डोक्यातली जट काढायची परवानगी दिली. अजिबात वेळ वाया न घालवता दुसऱ्या दिवशी सकाळीच मी तिच्या आईला जटेतून मुक्त केलं तेव्हा खरंच तिची त्या अवघड जगण्यातून मुक्तता झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं.’’

‘‘एका सोळा वर्षे वयाच्या मुलीच्या केसात जट होती. मला समजलं आणि नेहमीप्रमाणे मी वेळ वाया न घालवता त्या मुलीच्या घरी पोहोचले. तिचे सुशिक्षित आई वडील तिला सौंदत्तीला देवीकडे पाठवून द्यायला निघाले होते, वेळेत पोहोचून समुपदेशन केल्यामुळे तिला वाचवणं शक्य झालं. गैरसमज किती टोकाचे आहेत आणि एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे आहेत याची ना तिच्या पालकांना जाणीव ना इतरांना.

केवळ जट झाली म्हणून तिला देवदासी ठरवणे किंवा सौंदत्तीला पाठवणे, हे जर आपल्या समाजात आजही होत असेल तर खरोखरच हा विषय़ खूप गंभीर आहे पण म्हणूनच सातत्याने समुपदेशन करत रहाणे गरजेचे आहे. गेली पाच वर्षे सातत्याने यावर काम करणाऱ्या नंदिनी यांच्या नुसार  हे समुपदेशन उपयोगी पडतंय असं वाटत असलं तरी त्या सगळ्याच्या बदल्यात त्यांना आत्तापर्यंत फक्त शिव्या आणि त्या लोकांचा रोषच मिळाला. पण त्यांनी पाठ सोडली नाही. काही लोक जे थोडे सुधारलेले असतात त्यांची समजूत घालायला फार वेळ लागत नाही त्यांना फक्त एक दोन दिवस लागतात मात्र काहींची समजूत घालेपर्यंत एक दोन वर्षही निघून जातात. पण त्या सगळ्या काळात त्या बाईला शारीरिक वेदना सहन करावी लागते.

पण अशा नकारात्मक अनुभवानंतर एखादा खूप चांगला सकारात्मक अनुभवही येऊन जातो. एका सामान्य रिक्षावाल्याच्या बायकोच्या केसातली जट कापल्यानंतर त्या रिक्षावाल्याचे जटनिर्मूलन अभियान सुरू ठेवण्यात फारच मदत केली. अनेक जट असलेल्या स्त्रियांना नंदिनी जाधव यांच्यापर्यंत आणण्याचे काम ते करत आहेत. अर्थात त्यांच्या बायकोची जट काढण्यासाठी चक्क डॉक्टरांची मध्यस्थी मागावी लागली. तेव्हा कुठे त्यांच्या आईने या जट काढण्याला परवानगी दिली.

तर या घटनेच्या उलट मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या एका वकिलांच्या कुटुंबातही जट असलेली एक स्त्री आहे. मात्र अंधश्रद्धेच्या दबावामुळे ती काढण्यासाठी कुटुंब तयार नाही. पण नंदिनी स्वस्थ बसणाऱ्यातल्या नाहीत. त्यांनी या कुटुंबाची पाठ सोडलेली नाही. त्यांचं समुपदेशन सुरू आहेच. त्यात यश नक्की येईलच. नंदिनी सांगतात, ‘‘सर्व शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्तरांतील कुटुंबामध्ये जट या प्रकाराबद्दल गैरसमज आहेत. त्यामुळे विशिष्ट जातीत किंवा आर्थिक, सामाजिक गटात ही समस्या आहे हे चुकीचे आहे. जट असलेल्या स्त्रियांना नीट झोपता येत नाही. त्यातून मानेचे, पाठीचे,कमरेचे मणक्याचे आजार होतात. दुर्दैव म्हणजे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरदखील हे दुखणे जटेमुळे आल्याचे सांगत नाहीत.’’

नंदिनी जाधव म्हणतात, ‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची समाजाप्रती असलेली समर्पणाची भावना आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी वेचलेलं आयुष्य हे काही वेळासाठी का होईना, पण जवळून पहाता आलं. त्यांचं काम जटनिर्मूलन आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून सुरू ठेवून त्यांना आदरांजली वाहणं हेच माझं ध्येय आहे.’’

नंदिनी जाधव संपर्क- ९४२२३०५९२९

bhaktibisure@expressindia.com

chaturang@expressindia.com