माधुरी ताम्हणे
एखाद्या स्वयंसेवी संस्था, लोकोपयोगी कामं करणाऱ्या संस्था, एनजीओज् यांच्या कामाची माहिती लोकांपर्यंत येत असते. ते सुरू करणाऱ्या संस्थापकांची, संस्था चालकांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचत असते. ते त्या संस्थेचा आधारस्तंभ असतातच, पण त्यांच्या बरोबरीने काम करणारी माणसांची दुसरी फळी ही तितकीच महत्त्वाची असते. अशा लोकांच्या मदतीमुळेच ती संस्था आकाराला येत असते, सतत कार्यरत राहत असते. त्यांची ना कुठे नोंद होत, ना त्यांचा सत्कार होत, पण असे असूनही सतत कार्यरत असणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांविषयीचा हा लेख..
समाधानी नावाची विशीतली किरकोळ अंगचणीची तरुण मुलगी! गावाहून मुंबईला कामासाठी आली. ‘जीवनआनंद’ या संस्थेत कामाला लागली. संदीप परब या संस्थाचालकासोबतचा तिचा पहिलाच दिवस! ते तिला घेऊन मुंबईतील वाकोला पुलाकडे गेले. पुलाखाली पडलेल्या एका बेवारस आजारी वृद्धाला तिच्या मदतीने त्यांनी उचललं. कूपर इस्पितळात आणलं. समाधानीला आवश्यक त्या सूचना देऊन संदीप परब आपल्या कामाला निघून गेले. समाधानी तिथंच थांबली. त्या रुग्णाच्या चिघळलेल्या जखमा, त्यावर घोंगावणाऱ्या माश्या, केसांच्या झिंज्या, गलिच्छ कपडे, अंगाची दुर्गंधी.. ते सगळं पाहताना आणि एकटीने करताना समाधानी तिथंच चक्कर येऊन कोसळली. डॉक्टरांनी तिला सलाईन लावलं आणि संदीपसरांना फोन केला. ‘‘तुमचा रुग्ण ठीक आहे, पण स्टाफ कोलॅप्स झालीय.’’ पाच वर्षांनंतर तीच समाधानी लग्नाची बोलणी करायला आलेल्या होणाऱ्या पतीला ठामपणे सांगत होती, ‘‘मी रस्त्यावरच्या वृद्ध, आजारी, निराधारांची, मनोरुग्णांची सेवा करते. या कामाला वेळेचं बंधन नाही. मला वेळोवेळी हॉस्पिटलला, पोलीस स्टेशनला, शवागारात जावं लागतं. लग्नानंतर मला या कामाला अटकाव करायचा नाही. तरच मी लग्नाला संमती देईन.’’ तिच्या उदारमनस्क सासरच्या मंडळींनी केवळ होकारच दिला नाही तर तिला दिलेला शब्दही पाळला. म्हणूनच समाधानी ऊर्फ संपदा सुर्वे आजही हे काम तितक्याच निष्ठेने आणि आनंदाने करते आहे.
संपदासारख्या अनेक जणी अशी लोकोपयोगी कामं.. काम म्हणण्यापेक्षा सेवा करीत असतात. अनेकदा एखाद्या स्वयंसेवी संस्था, लोकोपयोगी कामं करणाऱ्या संस्था, एनजीओज् यांच्या कामाची माहिती लोकांपर्यंत येत असते. ते सुरू करणाऱ्या संस्थापकांची, संस्थाचालकांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचत असते. ते त्या संस्थेचा आधारस्तंभ असतातच, पण त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने काम करणारी दुसरी फळी ही तितकीच महत्त्वाची असते. अशा लोकांच्या मदतीमुळेच ती संस्था आकाराला येत असते, सतत कार्यरत राहत असते. त्यांची ना कुठे नोंद होत, ना त्यांचा सत्कार होत. अशाच काही दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांविषयीचा हा लेख..
संपदा सुर्वे आपल्या कामाचं स्वरूप सांगते. ‘‘आम्ही ‘जीवनआनंद’ संस्थेच्या वतीने रस्त्यावरच्या निराधार लोकांसाठी काम करतो. असे वृद्ध अथवा रुग्ण दिसले की आधी आम्ही त्यांच्याशी जाऊन बोलतो. मनोरुग्ण स्त्रिया तर बोलायला तयारच नसतात. पण गोड बोलत आधी त्यांचे केस कापतो. त्यांच्या केसांच्या जटा झालेल्या असतात. त्यात उवा, कोंडा असतो, ते कापून नीट विंचरले की सार्वजनिक शौचालयांत नेऊन त्यांचं तोंड धुतो. त्यांना अंघोळ घालतो. अक्षरश: एकेका रुग्णासाठी साबणाची अख्खी वडी लागते. इतकी घाण त्यांच्या अंगावर असते. त्यांना गाऊन चढवला की मग त्यांच्या अंगावरील जखमांना औषध लावून ड्रेसिंग करतो. गरज भासल्यास सरकारी रुग्णालयांत नेऊन त्यांच्यावर उपचार करतो किंवा आमच्या संस्थेत त्यांना भरती करतो.’’
हे सगळं काम फार सहजगत्या होतं असं मुळीच नाही. ‘जीवनआनंद’चे संस्थापक संदीप परब सांगतात, ‘‘या साफसफाईला मुळात या रस्त्यावरच्या रुग्णांचाच विरोध असतो. संस्थेत आणल्यावर सर्वप्रथम त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. ती होईपर्यंत अनेकदा त्या आमच्या मुलींना शिवीगाळ करतात. आरडाओरडा करतात. मारतात, चावतात. तरीही या मुली अत्यंत संयमाने, गोड बोलत त्यांना चहा-बिस्किटं भरवतात. त्यांची शुश्रूषा करतात. त्यांना मायेने जवळ घेऊन वेळेला जेवणसुद्धा भरवतात. त्यानंतर हे रुग्ण हळूहळू शांत होत जातात. शेवटी असं आहे ना, रस्त्यावर राहणाऱ्या माणसांनी त्यांचं हे आयुष्य विनातक्रार स्वीकारलेलं आहे. स्वच्छ राहणी, पोटभर अन्न, वस्त्र, निवारा हे त्यांच्या विस्मृतीत गेलेलं असतं. पण समाजातला आपला बांधव चांगला राहवा ही आमची गरज आहे. आमची आंच आहे. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही काम करतो!’’
संदीप परब स्वत:च्या खिशाला खार लावून निरलसपणे वर्षांनुवर्ष हे काम करतात, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तरुणींनी सुखासीन आयुष्य नाकारून खडतर सेवेचा वसा घेतला आहे. समाज अशाच सेवाव्रतींवर तर चालत असतो.
प्रीती दिवटे सांगते, ‘‘मला माझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा अजूनही आठवते. त्या दिवशी सकाळी अकरा वाजता एक फोन कॉल आला. अंधेरीला एका कचराकुंडीत एक बाई पडली आहे. आम्ही लगेच तिथं पोहोचलो. तिला कचराकुंडीतून बाहेर काढलं. तिचं अंग सडलेलं होतं. मी आणि माझ्या सहकाऱ्याने तिला कपडय़ांत लपेटली. सायन इस्पितळात आणलं. तिची अवस्था बघून कोणीही तिला प्रवेश देईना. शेवटी मी स्वत: तिला तिथल्या बाथरूममध्ये नेलं. पायापासून डोक्यापर्यंत साबणाच्या वडीने चोळून अंघोळ घातली. तिच्या जखमांमधून रक्त वाहत होतं. तिच्या जखमा धुऊन ड्रेसिंग केलं. इस्पितळातला एकही माणूस माझ्या मदतीला आला नाही. उलट ‘ती महारोगी आहे. तेव्हा तुम्ही तिला वसरेव्याच्या संस्थेत घेऊन जा’ म्हणून सांगितलं. मी तिला घेऊन दिवसभर वसरेवा, चेंबूर, तिथून वडाळा अशी मुंबईभर फिरत राहिले. कोणीच तिला घेईना. शेवटी ती जिथं सापडली तिथंच मी तिला नेऊन ठेवलं. सकाळी आठ ते रात्री आठ त्या वटपौर्णिमेला वडाच्या झाडाऐवजी मी चक्क मुंबईलाच प्रदक्षिणा घातल्या. पण शेवटी जेव्हा मला कळलं, की ती एचआयव्ही पॉझिटिव्हचीही लास्ट स्टेजची रुग्ण आहे तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिची रक्ततपासणी न करता मी तिच्या जखमा धुतल्या होत्या. त्यावर औषधोपचार केले होते. पण एक सांगते, अशा कोणत्याही संसर्गजन्य रुग्णाला हाताळलं तरी आम्हाला कोणालाही आजवर कोणत्याही आजाराची लागण झाली नाही. अर्थात संस्था आमची दर सहा महिन्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी करते. टॉनिक्स पुरवते. पण मला वाटतं, हे ईश्वरी कार्य असल्याने तो ईश्वरच आम्हाला सांभाळतो.
‘जीवनआनंद’ संस्थेच्या कुडाळ येथील आश्रमात काम करणाऱ्या लीना पालकर, ज्योती आंगणे, विजया कांबळी यांना तर रुग्णांचे सर्व शरीरधर्म पार पाडणं, त्यांचे कपडे बदलणं, त्यांना काळजीपूर्वक इस्पितळात नेणं, सर्व काही खेडेगावातील त्रुटींशी सामना करत करावं लागतं. दर्शना सावंत ही समाजसेविका मनोरुग्ण स्त्रियांना जीवापाड सांभाळत होती. शिवाय त्यांच्या नवजात अर्भकांना दूध पाजणं, त्यांची शी-शू काढणं, सर्व काही तीच करायची. एकदा निरुशा शाहू या ओरिसाच्या स्त्रीने मूल रडतं म्हणून चक्क पलंगावरून फेकून दिलं. दर्शना जणू त्या पोरक्या बालकाची आईच होऊन गेली. संस्थेचे चालक आणि समाजसेवक कितीही प्रामाणिकपणे काम करत असले, तरी अनेकदा विघ्नसंतोषी लोक या कामात अडथळे निर्माण करतात. अशा वेळी नीता गावडे, विजया कांबळींसारख्या समाजसेविका भक्कमपणे संस्थेच्या पाठीशी उभ्या रहातात. त्यामुळे ही जगावेगळी मानवसेवा अव्याहत सुरू राहते.
हरवलेल्या माणसांचा शोध घेणं आणि त्यांना त्यांच्या मुला-माणसांमध्ये सोडून येणं हे कामही या मुली खूप तळमळीने करतात.
प्रीती दिवटे सांगते, ‘‘मानसी कसबे ही बाई नवऱ्यासह जळगावहून आलेली. नवरा अर्धवट डोक्याचा. एकदा भीक मागत असताना ट्रकचा धक्का लागून ती कोसळली. नवऱ्याला वाटलं, ती मेली. तिला तसंच टाकून तो गावी पळाला. गावाला त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा होता. त्यांना सांगितलं, आई अपघातात मेली. ही बाई अहिराणी भाषा बोलायची. सायन इस्पितळात तिच्यावर उपचार झाले. ती बरी झाली. ही केस आमच्याकडे आली. दीड महिन्यानंतर तिच्या गावचा पत्ता मिळाला. मी तिथल्या सरपंचांशी संपर्क साधला आणि तिला घेऊन तिच्या गावाला पोहोचले. दोन हातांत कुबडय़ा घेऊन लंगडत चालत येणाऱ्या आपल्या आईला तिच्या मुलांनी पाहिलं मात्र, ती मुलं ‘‘मायऽऽऽ’’ असा हंबरडा फोडत तीरासारखी धावली आणि त्यांनी तिला घट्ट कवटाळलं. हे दृश्य पाहून मला अश्रू आवरेनात. अशा एखाद्या हरवलेल्या व्यक्तीचं घर शोधून तिला तिच्या मुला-माणसांत सोडलं की माझा तो दिवस खूप आनंदात जातो. त्या दिवशी सुखाची झोप लागते!’’ प्रीती आजही हा प्रसंग सांगताना गहिवरते. पण या मानवसेवेच्या कार्यात असेही अनुभव येतात की, अनेकदा या मुलीच गोत्यात येतात. असाच एक अनुभव संपदा सांगते. ‘‘एकदा आग्रीपाडय़ाला लताबाई देसाई नावाची एक बाई मनोरुग्ण मुलीसोबत एका घुशीने पूर्णत: पोखरलेल्या झोपडीत पडलेली आहे, असं कळलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी केस आमच्याकडे पाठवली. आम्ही तिला आश्रमात आणलं. तिचा मुलगा वारला होता. पण सून आणि नातू होता. आम्ही त्यांना शोधून काढलं. पण मध्येच कसा कोण जाणे तिचा भाचा उपटला. त्याला ती झोपडी लाटायची होती. त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली की या मुली शांताबाईचं घर लाटत आहेत. या संस्थेचं काम जवळून अनुभवणाऱ्या पोलिसांनी मात्र ही केस रद्द केली.’’
‘पण अशा अवघड प्रसंगांमध्ये संदीप सरांची पत्नी भक्ती परब आणि त्यांची आई लावण्यवती परब आमच्याप्रमाणेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहातात,’ असं कुंदाताई चौधरी आवर्जून सांगतात. तसेच असे कडवट अनुभव या मुलींना कधीही नाऊमेद करत नाहीत हे तितकंच खरं! रुदालीची केस के.ई.एम. इस्पितळातून आली. तिच्या डोक्याला मार लागल्याने तिला काहीही आठवत नव्हतं. तिला जेवण-खाणं भरवणं, औषध देणं, अंघोळ घालणं, तिचे डायपर बदलणं हे सर्व काही चंदा छत्रे इतकं प्रेमाने करते की जणू काही ती आता तिची लेकच बनून गेली आहे.
या मुलींनी आपल्या कामाचा परीघ स्वत:हून विस्तारित केला आहे. या बेवारस रुग्णांना अनेकदा सरकारी इस्पितळात व्हरांडय़ात टाकलेलं असतं. जर्जर अवस्थेतील वा हातपाय मोडलेल्या स्थितीतील हे रुग्ण व्हरांडय़ाच्या कोपऱ्यात अत्यंत घाण करून ठेवतात. अशा वेळी संदीप परब यांच्यासह या सेविका स्वेच्छेने पुढे येतात. गलिच्छ, किडे पडलेला व्हरांडा स्वत:हून स्वच्छ करतात. रुग्णांनाही स्वच्छ करून या व्हरांडय़ात झोपवतात. तेव्हा रुग्णांमधील माणूस या देवदूतांना साक्षात प्रमाण करतो.
बेवारस, निराधार जगण्याचं प्राक्तन भोगणारी ही माणसं कधी कधी स्वेच्छेने अस्वच्छतेचा, गलिच्छ जगण्याचा अंगीकार करतात तेव्हा त्यामागची त्यांची भूमिका या मुली खूप आपलेपणाने समजून घेतात. एकदा रेशमीला वडाळ्याला एक बाई रेल्वे पुलाखाली सापडली. तीन दिवस रोज रेशमी तिला अंघोळ घालत होती. तिची वेणीफिणी करत होती. आता ती भिकारीण आकर्षक दिसू लागली. चौथ्या दिवशी तिने रेशमीला हाकलून लावलं. म्हणाली, ‘‘काल रात्रभर गर्दुल्यांनी मला झोपू दिलं नाही. नशा करून ते एकेक जण माझ्यावर अत्याचार करत होते. मी घाणेरडी होते तेच बरं होतं. माझ्याजवळ कोणी फिरकत तरी नव्हतं.’’ तिच्या त्राग्यावर रेशमी अवाक होऊन गेली आणि पोलिसांच्या मदतीने तिला संस्थेत दाखल केलं.
पहिल्या बेवारस रुग्णाला पाहून चक्कर आलेली संपदा, प्रीती या आता सर्रास निराधार रुग्णांवर अंत्यसंस्कारसुद्धा करतात. त्या म्हणतात, ‘‘आम्हाला मृतदेह मिळाल्यावर सर्वप्रथम डॉक्टरांचं प्रमाणपत्र मिळवावं लागतं. त्यानंतर मोफत लाकूड, टायर, रॉकेल यांची सोय करावी लागते. एकदा तर एका आजीला सरणावर ठेवून मीच मडकं घेऊन तिच्या प्रेताभोवती फिरले. काय करणार? या जगात माझ्याशिवाय तिचं कोणीच नव्हतं. अशा वेळी वाटतं, या निराधार, बेवारस अभागी जीवांवर अंत्यसंस्कार करून आम्ही जणू त्यांच्या आत्म्याला मुक्ती देत आहोत. अशा किती तरी बेवारस माणसांनी आमच्या हातांत प्राण सोडलाय. अनेक वेळा दिवाळी-दसऱ्यासारख्या सणासुदीला आम्ही प्रेतागारात जाऊन मृतदेह शोधलेत आणि शवविच्छेदनासाठी दिले आहेत. आम्ही या बेवारस अभागी जीवांना आपलं मानलं आहे. पण समाज मात्र त्यांना आपल्यात सामावून घेत नाही, ही आमची खंत आहे. समाजातले दानशूर यांना आर्थिक मदत करतात, पण त्यापलीकडे जाऊन माणूस म्हणून त्यांचा स्वीकार करत नाहीत. ती माणसं रोगग्रस्त असल्याने खासगी वाहनं, अॅम्ब्युलन्स त्यांना घेत नाहीत. अनेकदा सरकारी इस्पितळं अथवा संस्था त्यांना प्रवेश नाकारतात. घरकामाला स्त्रिया पाठवल्या तर त्यांच्यावर अतिप्रसंग ओढवतो. पण त्यांनी समाजावर ओझं बनून जगू नये यासाठी आम्ही त्यांना रस्ते, प्लॅटफॉर्म झाडणं, झाडं लावणं अशी कामं करायला लावतो. समाजाने ठोकरलेल्या जीवांसाठी काम करताना आम्ही खूप धीट, हिंमतवान झालो आहोत. त्यांच्या सेवेतून आम्हाला प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळते. समाधान मिळतं. हेच आमच्या कार्याचं संचित आहे.’’
madhuri.m.tamhane@gmail.com
chaturang@expressindia.com