विलक्षण प्रतिमासृष्टीने साठोत्तरी प्रयोगवादी हिंदी काव्यप्रवाहात महत्त्वाचे ठरलेले ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी केदारनाथ सिंह यांचे नुकतेच निधन झाले. केदारनाथ यांचे सुह्रद आणि ज्येष्ठ अनुवादक-समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी..

हिंदी कविता समृद्ध करणारे तीन मोठे कवी अवघ्या आठ महिन्यांत मृत्यूच्या साम्राज्यात विलीन झाले. आधी चंद्रकांत देवताले गेले. मग कुंवर नारायण आणि आता केदारनाथ सिंह. तिघेही स्वातंत्र्यानंतरचे महत्त्वाचे कवी होते. तिघांनीही आपल्या दीर्घ कवितांनी हिंदी कवितेला वेगळे वळण दिले होते. कुंवर नारायण यांची ‘आत्मजयी’, केदारनाथजींची ‘बाघ’ आणि चंद्रकांत यांची ‘भूखंड तप रहा है’ या कवितांची विशेष चर्चा झाली होती. ‘आत्मजयी’ची प्रेरणा नचिकेताच्या मिथकात होती, तर ‘बाघ’ची प्रेरणा पंचतंत्रात होती. या तीनही कवींचे आपल्यात नसणे तसे वेदनादायकच आहे. कुठल्याही अस्सल कवीचे आपल्यातून कायमचे निघून जाणे मनातल्या कोपऱ्यात कुठे तरी पोकळीची जाणीव करून देत असतेच; जेव्हा अशा कवींशी आपले व्यक्तिगत संबंध असतात तेव्हा तर कमालीची विषण्णता येते. आणि याच विषण्णतेने मला आता घेरून टाकलेले आहे.

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल

केदारनाथजींच्या जीवनचरित्राबद्दल काही सांगणे म्हणजे थंड अनास्था दाखवल्यासारखे होईल. ते कुठे जन्मले, कुठे वाढले, त्यांच्यावर कुणाकुणाचे संस्कार झाले, त्यांनी काय काय लिहिले, कोणती नोकरी केली इत्यादीची इत्थंभूत माहिती एका क्षणात इंटरनेटवर सहज मिळू शकते. त्यांना साहित्य अकादमीचे आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर खूप लिहिले गेले आहे. ते पुन्हा सांगणे इथे अनाठायी होईल. या निमित्ताने त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देणे आणि त्यातून होणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणे अधिक उचित होईल असे मला वाटते.

केदारजींची माझी पहिली भेट ऐंशीच्या पूर्वार्धात भोपाळच्या भारत भवनमध्ये झाली. दिवसभराच्या चर्चासत्रानंतर सगळ्यात रंजक भाग रात्रीच्या अनौपचारिक गप्पांचा असे. अशा एका कार्यक्रमातच मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. त्या वेळी त्या मैफिलीत नामवर सिंह, अशोक वाजपेयी, चंद्रकांत देवताले, प्रभात त्रिपाठी, भगवत रावत, सुदीप बॅनर्जी, चित्रकार स्वामिनाथन, कृष्ण बलदेव वैद आणि अजून काही लोक होते. गप्पांचा केंद्रबिंदू अर्थात नामवरजीच होते. मात्र केदारजींचा सौम्य, मृदू, मितभाषी स्वभाव, सुसभ्य मंद हसणे, इतरांच्या बोलण्यात उत्सुकता दाखवणे, चेहऱ्यावर आपोआप उमटणारे कुतूहल, नजाकत, खूप जुना सहवास असल्यासारखे आत्मीय वागणे याने मी भारावून गेलो होतो. ते मला चांगलेच ओळखत होते, भेट मात्र पहिलीच होती. त्यांच्या कवितांचा अनुवाद पहिल्यांदा मी ‘प्रतिष्ठान’च्या अंकात १९७३ साली प्रसिद्ध केला होता. नंतर त्यांच्या निवडक दहा कवितांचा बंध कोल्हापूरहून प्रकाशित होणाऱ्या एका दिवाळी अंकात केला. त्यांच्या गाजलेल्या आणि मला विलक्षण भावणाऱ्या ‘भाकरी’, ‘उन्हात घोडय़ावर चर्चा’ अशा कविता मी संपादित-अनुवादित केलेल्या ‘समकालीन हिंदी कविता’ या संकलनात होत्या. तात्पर्य, केदारजी मला चांगलेच ओळखत होते. पहिल्याच भेटीत मला त्यांच्यातील आस्था आणि आत्मीयतेचा सुखद अनुभव आला. नंतर ही आस्था आयुष्यभर अधिकाधिक वाढत गेली. पुढे कितीदा तरी भोपाळ, दिल्ली, गोवा, केरळ, भुवनेश्वर, वाराणसी, अलाहाबाद, मुंबई अशा अनेक ठिकाणी भेटत गेलो. त्यांच्यातील चिरतारुण्य, निरागसता, ताजेपणा, जगण्यावरची अपार श्रद्धा, आशावाद कधी कमी झाल्याचे जाणवले नाही. अगदी अलीकडे त्यांची सविस्तर भेट झाली ती दिल्लीत साहित्य अकादमीने आयोजित केलेल्या ‘विश्व कविता समारोहा’त. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वार्धक्याची चाहूलही नव्हती. त्या रात्री झालेल्या हिरवळीवरील भोजनाच्या वेळी केदारजी, मी आणि चंद्रकांत देवताले खूप वेळ बोलत बसलो होतो. चंद्रकांत मात्र त्या वेळी आजाराच्या उंबरठय़ावरच होता.

असेच एकदा एम. टी. वासुदेवन नायर यांनी मला तिरूर (केरळ) इथे ‘विज्ञान आणि साहित्याचा परस्पर संबंध’ या विषयावरील एका चर्चासत्राच्या उद्घाटनासाठी बोलावले होते. तिरूरला माझ्या ओळखीचे कुणीच नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो तर अगदी अनपेक्षितपणे समोर एमटींसोबत केदारजी उभे होते! त्यांनी मला पाहिले आणि आनंदाने मिठी मारली. ही त्यांची भेटायची खास पद्धत होती! तिथे आदल्या दिवशी केदारजींना सन्मानित करण्यात आले होते. या सुखद धक्क्याने ते सुखावले होते. मात्र लगेचच मला उद्घाटन झाल्यावर दिल्लीला जायचे होते. त्यामुळे त्यांनाही माझ्यासोबत परतावे वाटले होते. पण ते शक्य झाले नाही. ते थोडेसे नाराज झाले असावेत. ही आठवण त्यांनी माझ्यासमोर अनेकांना फार आत्मीयतेने सांगितली होती.

अशा असंख्य भेटीगाठींच्या आठवणी आता गर्दी करत आहेत. पण एका भेटीचा मुद्दाम  उल्लेख केला पाहिजेच. मुंबईला एक साहित्यिक संस्था दरवर्षी एका हिंदी कवीला लाखाचा पुरस्कार देते. पूर्वी हा पुरस्कार लोकप्रिय गीतकाराला दिला जायचा. गेल्या काही वर्षांपासून सुंदरचंद ठाकूर आणि विष्णू खरे यांच्या सहभागामुळे हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर आणि गंभीर काव्यलेखन करणाऱ्यांना दिला जातोय. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी हा पुरस्कार दोन लाखांचा करून तो केदारजींना देण्यात आला होता. पुरस्कार मराठी-हिंदीचे प्रख्यात समीक्षक आणि दुतर्फा अनुवादक निशिकांत ठकार यांच्या हस्ते दिला गेला. या वेळी केदारजींनी फार सुंदर भाषण केले होतेच, शिवाय ठकारांच्या अध्यक्षीय भाषणाचीही नंतर त्यांनी खूप स्तुती केली होती. ते भाषण त्यांनी मुद्दाम मागवून घेऊन त्यांच्यावर प्रकाशित होणाऱ्या एका नियतकालिकात छापायला दिले होते. बहुधा त्यांनीच सुरू केलेल्या आणि नंतर नव्या लोकांना हस्तांतरित केलेल्या त्यांच्या ‘साखी’ या लघु नियतकालिकाच्या त्यांच्यावरील विशेष अंकात ते आले असावे.

केदारजींच्या कवितेवर आणि समीक्षालेखनावर आतापर्यंत बरेच लिहून आलेले आहे आणि आताही येईल. त्यांचे पुनर्मूल्यांकनही होईल. (कदाचित त्यांच्या निष्कपट, सरळ, सहज, अजातशत्रू, लोभस व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या साहित्यावर सडेतोड लिहिले जाण्याची शक्यताही नाही!) त्यांच्या कवितेचा प्रवास सुरू झाला तो अज्ञेय यांनी संपादित केलेल्या ‘तिसरा सप्तक’मधून. विजयदेव नारायण साही, कुंवर नारायण, रघुवीर सहाय, श्रीकांत वर्मा या महत्त्वाच्या समकालीन कवींमध्ये ते वयाने सगळ्यात लहान कवी असावेत. त्यांच्या जाण्याने गजानन माधव मुक्तिबोधांनंतरची ती पिढीही काळाच्या पडद्याआड गेली आहे. परवर्ती पिढीवर यांच्यापैकी सगळ्यात जास्त प्रभाव पडला तो रघुवीर सहाय आणि केदारजींचाच. त्यांच्या पहिल्याच ‘अभी, बिल्कुल अभी’ या पहिल्याच संग्रहाने वाचकांचे लक्ष वेधून घेतले आणि नंतर आलेल्या ‘जमीन पक रही है’, ‘यहाँ से देखो’, ‘अकाल में सारस’ या संग्रहांनी त्यांचे हिंदी कवितेच्या मध्यवर्ती प्रवाहातले स्थान अधिकच पक्के केले. एका बाजूला निसर्गाचे, निसर्गातल्या झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी, कीटक, नदी, नाले, पूल, डोंगर, आभाळ, मेघ, वीज अशा जैव-अजैव घटकांबद्दलचे कमालीचे कुतूहल, प्रेम, आस्था आणि दुसऱ्या बाजूने मानवी करुणा, मानवाचे प्रेम, स्वत:ला उपेक्षित, शोषित आणि निम्न मध्यम- वर्गाच्याही खाली असलेल्या सामान्य लोकांशी जोडून घेण्याची आंतरिक प्रेरणा अशा दुहेरी विणीतून त्यांची कविता सतत अभिव्यक्त होत गेली.

संयत आणि सौम्य वृत्तीच्या आंतरिक सक्तीमुळे ते वर्गीय अभिनिवेशापासून आणि त्याच्या राजकारणापासून कोसो दूर होते. राजकारणाचे उग्र रूप आणि प्रखर विद्रोहापासून त्यांची कविताही दूर होती. जीवनाच्या एकूण अर्थाच्या शोधात त्यांची कविता नव्या वाटा शोधत होती. आणि नव्या भाषेची निर्मिती करण्यात गुंतली होती. त्यांना प्रतिमासृष्टीची विलक्षण ओढ होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या प्रबंधाचा विषयही ‘आधुनिक हिंदी कविता में बिम्बविधान’ असाच निवडला होता. नेमक्या आणि ताज्या टवटवीत प्रतिमांचा वापर, मितव्ययी भाषा, रचनेचे आणि रूपाचे सौष्ठव, अद्भुत शिल्परचना ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने होती. त्यांच्या कवितेचे शिल्प तर अद्भुत असेच होते. त्याबाबत शमशेर बहाद्दूर सिंह यांचा अपवाद वगळता एकही कवी एवढा जागरूक वाटत नाही. बऱ्याचदा तर त्यांनी शिल्पाची जाणूनबुजून बांधणी केल्याचे वाटत असे. अशा बांधणीमुळे जगण्यातल्या अंत:स्फूर्त बोधाला बाधा येत असते. त्यांच्या भाषेबद्दल तर स्वतंत्रपणेच लिहावे लागेल. सरळ, सोपे आणि गुंतागुतीचे अनुभव सहजपणे व्यक्त करणारी त्यांची भाषा लोकमानसात रुजलेल्या कथनशैलीतून आणि मिथकांतून ऊर्जा घेताना दिसते. त्या भाषेला खेडय़ातल्या मातीचा गंध असला तरी ती वाटते तितकी सोपी नव्हती. तिच्यात एक प्रकारचा फसवा सोपेपणा होता. ‘माझ्या भाषेतले लोक हे माझ्या रस्त्यावरील लोक आहेत,’ असे ते म्हणत. शिवाय ‘माझी मुळे हीच माझी शक्ती आहे!’ असेही त्यांचे म्हणणे होते.

एकूण भारतीय कवितेबद्दल ते फार सजग होते. बा. सी. मर्ढेकरांनी एकही मुक्तछंदातील कविता लिहिली नाही आणि तरीही ते आधुनिक मराठी कवितेचे अध्वर्यू आहेत याचे त्यांना विलक्षण कौतुक वाटे. अरुण कोलटकरच्या ‘द्रोण’ या कवितेचे निशिकांत ठकार यांनी केलेले हिंदी भाषांतर त्यांना विलक्षण आवडत असे. त्या कवितेवर ते खूप वेळ बोलू शकत असत. मिथकाचा एवढा जबरदस्त वापर करून, मिथकाची नव्याने निर्मिती करून सद्य:कालीन जगावर भाष्य करणारी इतकी प्रभावी कविता अरुणशिवाय एकाही भारतीय वा अभारतीय कवीने लिहिली नव्हती, असे ते म्हणत.

केदारजींची कविता बौद्धिक ध्रुवापासून दूर होती, असे काही समीक्षकांचे मत आहे. असे असूनही त्यांना विष्णू खरेची नितांत बौद्धिक अंगाने जाणारी कविता विलक्षण आवडत असे. हिंदीच्या मध्यवर्ती प्रवाहापासून पहिल्यांदाच विष्णूच्या कवितेने वेगळे, नवे वळण घेतले असून त्याने कवितेची वेगळीच शैली निर्माण केलेली आहे, असे केदारजींचे मत होते. म्हणूनच त्यांना जेव्हा विष्णूच्या प्रातिनिधिक कवितेचे संपादन करण्याविषयी राजकमलच्या माहेश्वरींनी विचारले तेव्हा त्यांनी तात्काळ  ‘हा माझा सन्मानच आहे!’ अशी प्रतिक्रिया दिली आणि त्याचे आनंदाने संपादन केले. तेच त्यांचे अखेरचे पुस्तक ठरले आहे. विशेष म्हणजे कवितेवर आणि एकूणच गांभीर्याने लेखन करणाऱ्या कुंवर नारायण यांनाही विष्णू खरे हिंदी कवितेच्या परंपरेतला महत्त्वाचा कवी वाटत होता. केदारजींनी नव्या पिढीच्या कवितेवर आणि कवींवरही खूप प्रेम केले आणि त्या कवींना मानवी आस्था आणि ऊब दिली.

सगळ्या महान कवींची आकांक्षा काय असते? काळावर मात करणे आणि काळाला बाजूला सारणे. समकालीन स्पंदने टिपूनही केदारजींच्या कवितेने काळाला नाकारण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच ते आपल्यात नसले तरी त्यांची कविता आपल्यासोबत राहील आणि नंतरच्या पिढय़ांनाही समकालीन वाटेल. त्यांच्याच कवितेतल्या ओळी आहेत :

‘.. कि अन्त महज एक मुहावरा है

जिसे शब्द हमेशा

अपने विस्फोट में उडा देते है।’

patilcn43@gmail.com