प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराची एक अमीट छाप असते. गाण्याची सुरावट, गाण्याच्या मुखडय़ाच्या आणि कडव्याच्या आधी वाजणारे म्युझिक, दोन ओळींमधले छोटे छोटे म्युझिकचे पीसेस आणि एकूण वाद्यमेळ हे सर्व ऐकताच त्या गाण्याचं संगीत कुणाचं असेल, हे जाणकार रसिक क्षणात ओळखतात. संगीतकार खय्याम यांच्या बाबतीत तर हे विशेषत्वाने म्हणता येईल.

१९५१ ते ७५ ही पंचवीस वर्षे हिंदी सिनेसंगीताचे सुवर्णयुग मानले जाते. आपण आज जी जुनी गाणी ऐकतो, त्यातली बहुतेक गाणी ही याच काळातील आहेत. या युगाचे बहुतेक मानकरी आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे जे ‘लिजंडस्’ आज हयात आहेत, त्यातले एक म्हणजे खय्याम. विशेष म्हणजे खय्यामसाहेबांनी सुवर्णयुगानंतरही आपल्या संगीतातून त्याची झलक दाखवून दिली होती.

१८ फेब्रुवारी १९२७ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचं पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी. लहानपणापासून त्यांना शिक्षणाऐवजी संगीतात अधिक रस होता. मोहम्मद चिश्ती, पं. हुस्नलाल भगतराम आणि त्यांचे बंधू पं. अमरनाथ यांच्याकडे त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला तो गायक म्हणून. पं. हुस्नलाल भगतराम यांनी त्यांच्या ‘रोमिओ ज्युलिएट’मध्ये त्यांना गाण्याची संधी दिली. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडेच साहाय्यक म्हणून काम केलं. १९४७-४८ चा तो काळ. देशाची फाळणी झालेली. सर्वत्र असुरक्षितता, अविश्वासाचं वातावरण. अशा वेळी त्यांच्या गुरुजींनी त्यांना बजावलं, ‘मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी को कुछ दिन भूल जाओ.. आज से आप शर्माजी!’ आणि मग ‘शर्माजी वर्माजी’ या टोपणनावाने खय्याम यांनी त्यांच्या गुरुजींच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिलं. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकीर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले. ‘फूटपाथ’मधील सुंदर गाण्यांनी खय्याम यांनी चित्रपटसृष्टीला आपली दखल घ्यायला लावली. या चित्रपटातील दिलीपकुमारवर चित्रित झालेलं ‘शाम ए गम की कसम..’ हे तलत महमूद यांनी गायलेलं गाणं कमालीचं हिट् झालं. अली सरदार जाफरी आणि मजरूह यांच्या शब्दांतील व्यथा, उदासी, प्रतीक्षा आणि विरहवेदना खय्याम यांनी चालीत आणि तलत यांनी स्वरांतून तितक्याच तरलपणे उतरविली. या गाण्यात कुठल्याही तालवाद्याचा वापर केला नसून स्पॅनिश गिटार, व्हायोलिन्स, क्लॅव्हिअर, डबल बास आणि सोलोवॉक्स या वाद्यांचा वापर त्यात केला आहे. सोलोवॉक्स आणि क्लॅव्हिअर या वाद्यांचा वापर प्रथमच खय्याम यांनी या गाण्यात केला. (क्लॅव्हिअर म्हणजेच पुढे अनेक वाद्यांची छुट्टी करून त्यांची जागा बळकावलेल्या इलेक्ट्रॉनिक कीबोर्डची आधीची पिढी!) ‘जाने क्या ढूंढती रहती है ये आंखें..’ या १९६१ च्या ‘शोला और शबनम’मधल्या गाण्यातही हाच वाद्यमेळ ऐकू येतो. विशेष म्हणजे ‘फूटपाथ’मधील सगळी गाणी अली सरदार जाफरी आणि मजरूह या दोन प्रतिभावंत शायरांनी एकत्रितपणे लिहिली आहेत. ‘फूटपाथ’नंतर खय्याम यांना अनेक चित्रपटांचे प्रस्ताव आले, पण रणजीत मूव्हिटोनशी करारबद्ध असल्यामुळे खय्याम ते स्वीकारू शकले नाहीत.

टॉलस्टॉयच्या ‘क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’वर आधारित ‘फिर सुबह होगी’ या राज कपूर- माला सिन्हा अशी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटासाठी गीतकार साहिर लुधियानवी यांनी निर्माता रमेश सैगल यांना खय्याम यांचं नाव सुचवलं. सैगलना खात्री होती की, चित्रपटाचा नायक आणि संगीताचा उत्तम जाणकार असणाऱ्या राज कपूरला खय्याम यांची गाणी आवडणार नाहीत आणि तो शंकर-जयकिशन यांचाच आग्रह धरील. तरीही साहिरच्या आग्रहाखातर तो राज कपूर-खय्याम यांच्या सीटिंगला तयार झाला. सीटिंगच्या आधी सैगल त्यांना म्हणाला, ‘खय्यामसाब, अब इम्तिहान के लिए तय्यार हो जाओ!’ खय्यामनी केलेली पाचही गाणी सैगल आणि राजला ऐकवली. पण राज कपूरच्या चेहऱ्यावर ती आवडल्याचं वा न आवडल्याचं काहीच चिन्ह दिसेना. सैगलना घेऊन राज दुसऱ्या खोलीत गेला. इकडे खय्याम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जिवाची नुसती घालमेल! थोडय़ा वेळाने दोघेही बाहेर आले आणि खय्यामना मिठी मारून सैगल म्हणाला, ‘खय्यामसाब, यू डिड इट!’ राज कपूरने पुन्हा एकदा ती पाचही गाणी ऐकवण्याची खय्यामना विनंती केली. त्याला ती गाणी अतिशय आवडली. यातलं ‘वो सुबह कभी तो आएगी..’ ही खरं तर एक नज्म आहे. कधीतरी सकाळ होईल असा आशावाद असलेलं, राज कपूरवर चित्रित करण्यात आलेलं हे गीत (अर्थातच) मुकेशच्या आवाजात ऐकू येतं. मग हलकेच आशाजीही मुकेशसोबत गुणगुणू लागतात. हे गुणगुणणं अगदी नैसर्गिक, स्वाभाविक वाटतं.

‘फिर सुबह होगी’ची गाणी ऐकून आशाजी खय्यामना म्हणाल्या, ‘खय्यामसाब, आप की सुबह हो गयी समझो!’ आणि तसंच झालं. ‘फिर सुबह होगी’ बॉक्स ऑफिसवर हिट् ठरला नाही; पण त्यातली गाणी हिट् झाली. त्यातलं साहिरने लिहिलेलं ‘चीनो अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, रहने को जगह नहीं, हैं सारा जहाँ हमारा..’ हे गाणं त्यातील आशयामुळे वादग्रस्त ठरलं; पण लोकप्रिय झालं.

खय्याम यांचं संगीत असलेला डाकूंच्या जीवनावर आधारित ‘चंबल की कसम’ हा चित्रपट डब्यात गेला, पण त्यातलं रफीसाहेबांनी गायलेलं ‘सिमटी हुई ये घडियाँ.. फिर से न बिखर जाये..’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं.

‘‘मोहोब्बत इस को कहते है’ या चित्रपटातलं ‘ठहरिये होश में आ लूं तो चले जाइयेगा..’ हे तुमचं गोड गाणं तुमच्या अन्य गाण्यांपेक्षा जरा वेगळं वाटतं, ते कशामुळे?,’ असं विचारल्यावर त्यांची कळी खुलते. ते सांगू लागतात : ‘खरं तर ती मजरूहसाहेबांची गजल आहे. पण त्याचं आम्ही युगुलगीत केलं. या गीताचा दुसरा अंतरा ‘मुझ को इकरारे मुहब्बत पे हया आती है..’ सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेतलाय. गाण्यातल्या स्त्रीसुलभ लाज, संकोच, इ. भावनांचा आविष्कार सुमनताईंपेक्षा अधिक चांगला कोण करणार?’

खय्याम यांची गाणी चटकन् ओळखू येतात. ‘बहारों मेरा जीवन भी संवारो..’ (‘आखरी खत’), ‘कभी कभी मेरे दिल में..’ (‘कभी कभी’), ‘‘ऐ दिलें नादाँ..’ (‘रझिया सुलतान’), ‘हजार राहें मूड के देखी..’ (‘थोडीसी बेवफाई’), ‘ये मुलाकात इक बहाना है..’ (‘खानदान’), ‘फिर छिडी बात बात फूलों की..’ (‘बाज़ार’) ही गाणी ऐकलीत तर लक्षात येईल, की त्यांचं गाणं एकदम सुरू होत नाही. गाण्याआधी संतूर, सतार, बासरीवर अलवारपणे वाजणाऱ्या विशिष्ट ढंगाच्या ‘इंट्रो’ म्युझिकने उत्तम वातावरणनिर्मिती केलेली असते. ज्या स्वरांवर पहिली ओळ संपते त्याच स्वरांवर पुढची ओळ सुरू होते. हे त्यांच्या अनेक गाण्यांचं आणखी एक वैशिष्टय़. (गुणगुणून बघा- ‘शाम ए गम की कसम..’ किंवा ‘ये मुलाकात इक बहाना है..’) ‘पहाडी’ हा त्यांचा अतिशय आवडता राग. त्यामुळे अनेक गाण्यांसाठी त्यांनी ‘पहाडी’चा वापर केला आहे.

‘शगून’ चित्रपटात खय्याम यांनी एक छान गाणं दिलंय- ‘तुम अपना रंजोगम, अपनी परेशानी मुझे दे दो..’. साहिरचे शब्द, जगजीत कौर यांचा आगळा, ममत्वपूर्ण, आश्वासक स्वर आणि पियानोच्या सुरांची जादू यामुळे ते अतिशय श्रवणीय झालं आहे. हे गाणं गाणाऱ्या गायिका जगजीत कौर पुढे ‘तुम अपना रंजोगम..’ म्हणत खय्याम यांच्या जीवनसाथी झाल्या. खय्याम यांची ही संगीतरचना जगजीतजींनी केवळ गायली नाही, तर त्यातील आशय त्या प्रत्यक्षात जगल्याही. श्रीमंत, खानदानी पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या जगजीतजी खय्याम यांच्या अनेक संगीतरचनांमागील प्रेरणास्थान आहेत. खय्याम यांच्या यशस्वी संगीत कारकीर्दीच्या एक मोलाच्या सहकारी आणि कसोटीच्या क्षणी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहणाऱ्या त्या आदर्श जीवनसाथी आहेत.

यश चोप्रांचे ‘कभी कभी’ (१९७६), ‘त्रिशूल’(१९७८) आणि ‘नूरी’ (१९७९) असे तीन चित्रपट लागोपाठ हिट् झाल्यावर एका मुलाखतीत चोप्रा बोलून गेले की, ‘माझ्या चित्रपटांमुळे खय्याम यांची यशस्वी सेकंड इनिंग सुरू झाली.’ हे बोलणं खय्याम यांच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं होतं. वास्तविक या तिन्ही चित्रपटांतलं खय्याम यांचं संगीतही त्या चित्रपटांइतकंच गाजलं. त्यामुळे अमिताभ बच्चन, रेखा, संजीवकुमार आणि जया बच्चन अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘सिलसिला’चा प्रस्ताव घेऊन यश चोप्रा जेव्हा खय्याम यांच्याकडे गेले तेव्हा हा चित्रपट खय्याम यांनी नम्रपणे नाकारला.

त्याआधी ‘बरसात की रात’ हा चित्रपटही त्यांनी सोडला होता. ‘बरसात की रात’चा निर्माता आणि त्या चित्रपटाचा नायक भारत भूषण याचा भाऊ  आर. चंद्रा एक दिवस उस्ताद फतेह अली खान (नुसरत अली फतेह खान यांचे वडील) यांची कॅसेट घेऊन खय्याम यांच्याकडे आला आणि त्या कॅसेटमधील कव्वालीच्या चालीवर खय्याम यांनी कव्वाली बनवावी असं त्याने सांगितलं. तत्त्वनिष्ठ खय्याम म्हणाले, ‘कुणाच्या तरी चालीवरून मी माझी गाणी बनवीत नाही. आपलं जमणार नाही!’ आणि त्यांनी हे ब्रीद त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत पाळलं. ते म्हणतात : ‘वेगवेगळ्या भाषांतली गाणी, लोकगीते गोळा करून, त्यात थोडेफार फेरफार करून, त्यावर वेगळा साज चढवून काही संगीतकार ती गाणी स्वत:ची म्हणून खपवत आणि भरपूर पैसे कमवीत. मला अशा पैशांची गरज नव्हती आणि नाही!’

‘रझिया सुलतान’मधील जान निसार अख्तर यांनी लिहिलेलं ‘ऐ दिलें नादाँ..’ हे गाणं ध्वनिमुद्रित झाल्यावर त्या गाण्याची, त्यातल्या वेगळेपणाची सिनेसृष्टीत बरीच चर्चा झाली. या गाण्यात पहिल्या ओळीनंतर दुसरी ओळ येत नाही. आधी त्या ओळीची सुरावट संतूरवर वाजते आणि मग पुढची ओळ ऐकू येते. व्हायोलिन्सच्या ताफ्याबरोबर वाजणारे सारंगीचे सूर, वाळवंटात मार्गक्रमण करीत असलेला उंटांचा काफिला, संधिप्रकाश कापत जाणारा लतादीदींचा तलवारीसारखा धारदार आवाज आणि खय्यामसाहेबांची आगळीवेगळी, एखाद्या ‘हाँटिंग साँग’सारखी मनात दीर्घकाळ रेंगाळणारी चाल ‘मास्टरपीस’ ठरली. अमिताभ बच्चन यांनी या गाण्याबद्दल ऐकलं तेव्हा त्यांना हे गाणं ऐकायची एवढी तीव्र इच्छा झाली की मध्यरात्री दोन वाजता त्यांनी जयाजींना ते गाणं (तेव्हा त्यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या) खय्याम यांच्याकडून टेप करून आणायला पाठवलं.

‘हजार राहें मूड के देखी..’ (‘थोडीसी बेवफाई’) या गाण्याच्या मुखडय़ात प्रत्येक ओळीपाठोपाठ ३०-४० व्हायोलिन्स वाजतात. दुसरी ओळ, पुन्हा व्हायोलिन्स. तिसरी ओळ, पुन्हा व्हायोलिन्स.. असं करत मग गाणं पुढे सरकतं. ‘असं का?’ असा प्रश्न खय्यामसाहेबांना विचारताच ते आनंदून म्हणाले, ‘‘बेटा, यही सवाल इस गाने के रिकॉर्डिग के समय किशोरदाने भी मुझसे पूछा था. मी लगेच माझा म्युझिक अ‍ॅरेंजर अनिल मोहिलेला बोलावून म्हटलं, ‘अनिल, किशोरदांना ही अ‍ॅरेंजमेंट बहुधा पसंत नसावी. आपण असं करू या, ती व्हायोलिन्स काढून गाणं रेकॉर्ड करून पाहू.’ तसं झालं. किशोरने गाणं ऐकताच म्हणाला, ‘नहीं खय्यामसाब, जैसा पहले था वैसेही रखियेगा!’’ मग या वाद्यमेळाचं प्रयोजन खय्यामसाहेबांकडून ऐकायला मिळालं.

आपण गाणी ऐकतो, त्यांना दाद देतो. पण एकेका गाण्यामध्ये एकेका जागेसाठी संगीतकार किती अंगांनी विचार करतो हे नव्याने उमगलं. खय्याम यांचा आणखी एक गुण मला विशेष भावला. तो म्हणजे ते स्वत:कडे लहानपण घेत त्यांच्याहून ज्येष्ठच नव्हे, तर सर्व समकालीन संगीतकारांचा उल्लेख ‘बडे संगीतकार’ असा करतात. कल्याणजी यांनी त्यांच्या अनेक गीतांमध्ये त्यांचे ते सुप्रसिद्ध वाद्य ‘तार शहनाई’ वाजवलं आहे. ‘क्या जादू है कल्याणजी के हाथों में!’ अशी उत्स्फूर्त दाद खय्याम देतात. नम्रतेने विचारतात, ‘‘बेटा, मेरी किसी संगीतरचना पर किसी दूसरे गाने की छाया तो नजर नहीं आयी?’’ मी त्यांना गमतीने म्हटलं, ‘‘दूसरों के गाने की नहीं, पर आप के अपने गाने की जरूर नजर आयी!’’

‘उमराव जान’ हे त्यांच्या आयुष्यातलं सोनेरी पान आहे. यातील ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए..’, ‘ये क्या जगह है दोस्तो..’ आणि ‘इन आंखों की मस्ती के परवाने हजारो है..’ या शहरयार यांच्या लेखणीतून उतरलेल्या सर्व गाण्यांमध्ये खय्याम यांनी आशाताईंच्या आवाजाला एक आगळी झळाळी दिली आहे. त्यामुळे ओपींकडची आशा, पंचमकडची आशा आणि ‘उमराव जान’मधली आशा पूर्णपणे भिन्न जाणवते. ‘उमराव जान’ने खय्याम यांना दुसरे ‘फिल्मफेअर’ तर मिळवून दिलंच; शिवाय त्यावर्षीचा उत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. आशाताईंनाही यातल्या गाण्यांसाठी उत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

खय्याम यांनी त्यांच्या साठ वर्षांच्या कारकीर्दीत ७१ चित्रपट आणि नऊ दूरदर्शन मालिकांना संगीत दिलं. त्यांच्या एकूण गाण्यांची संख्या ६४२ इतकी भरते. यात सुमारे २२० गैरफिल्मी गीतांचा समावेश आहे- जी त्यांनी बेगम अख्तर, रफी, मुकेश, तलत, आशा, महेन्द्र कपूर, सुधा मल्होत्रा, सुलक्षणा पंडित, भूपिंदर सिंग आणि हेमलता यांच्याकडून गाऊन घेतली आहेत. त्यांनी मोहम्मद रफी यांच्याकडून काही भजनंही गाऊन घेतली. ५० वर्षांपूर्वीची ती भजने त्यांना अजूनही स्मरतात. खय्याम यांना १९७७ मध्ये ‘कभी कभी’ आणि १९८२ मध्ये ‘उमराव जान’मधील संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्काराने, २००७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने आणि २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. २०१० मध्ये फिल्मफेअरने जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. आज वयाच्या ९१ व्या वर्षीही ते तंदुरुस्त असून मोकळेपणाने गप्पा मारतात.. जुन्या आठवणींत रमतात.

– जयंत टिळक

jayant.tilak@gmail.com