किशोरीताईंचे व त्यांची पट्टशिष्या असलेल्या माझ्या आईचे ताणलेले संबंध सुरळीत व्हावेत, दोघींचे पुनर्मीलन व्हावे, ही तर किशोरीताईंची इच्छा होतीच; पण  त्यांचा शिष्यवर्ग आणि आईचा शिष्यवर्ग या साऱ्यांचीच होती. त्यानंतरच्या गुरुपौर्णिमेला ताईंनी त्यांच्या विशाल हृदयात पुनश्च एकवार माझ्या आईला मानाची जागा दिली.

माझी आई आणि गुरू माणिक भिडे या स्व. किशोरी आमोणकरताई यांच्या शिष्या. ताईंना मी पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते आईच्याच चष्म्यातून! त्यांच्या गाण्यावर, विचारावर आणि सौंदर्यदृष्टीवर माझा िपड पोसला गेला. ते पोषण मला आईच्याच नळीतून मिळालं. यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही. कबीरानं गुरुमाहात्म्य सांगताना एका दोह्यत म्हटलंय..

‘गुरु गोिवद दोनों खडे, मं काके लागू पाय?

बलिहारी म गुरुनकी, जिन गोिवद दीनो दिखाय’

माझी गुरू- आई. तर ताईंचं गाणं हा माझा देव! मी कोणत्या वयापासून ताईंचं गाणं ऐकायला सुरुवात केली हे मला आठवतही नाही. त्या वयात मला त्यांचं गाणं काहीही कळत नव्हतं. फक्त हे काहीतरी जबरदस्त आहे असं जाणवायचं. माझ्या वयाच्या १५-१६ व्या वर्षी मला आकाशवाणी स्पध्रेचं सुवर्णपदक मिळाल्यानंतर मात्र माझ्या संगीतशिक्षणाची गंभीरपणे दखल घेण्याची गरज निर्माण झाली. त्यावेळेपर्यंत ‘मला ताईंचंच गाणं गायचंय,’ हे म्हणण्याइतपत अक्कल मला फुटली होती. आईनं तोवर ताईंबरोबरच्या १३-१४ वर्षांच्या प्रदीर्घ सहवासांतर्गत संगीतप्रवासातली उत्तुंग शिखरे, चमकती इंद्रधनुष्ये, खळाळणारे झरे, लखलखणाऱ्या विजा अन् काय काय अनुभवलं होतं. ‘हेच मला हवंय..’ असं म्हणणाऱ्या आपल्या मुलीचं तिला कौतुक वाटलं खरं; पण या कठीण प्रवासाची खडतर वाट- जी तिनं इतकी र्वष सोसली होती- ती आपल्या मुलीला झेपेल का, अशी मातृसुलभ काळजीही वाटत होती. तिनं तिची काळजी मोगुबाईंपाशी बोलून दाखवताच त्यांनी तिला पटकन् सोपा सल्ला दिला, ‘अगं माणिक, तूच तुझ्या मुलीला तालीम दे.’ तिथूनच माझा जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीचा प्रवास सुरू झाला.

माझ्या आईचं माहेर कोल्हापूरचं- जी भूमी म. उ. अल्लादिया खाँसाहेबांच्या वास्तव्यानं पुनीत झाली, अन् जिथं त्यांच्यामागेही या घराण्याची गायकी अनुरणन पावत होती, तिथलं! त्यामुळे आईचं संगीतशिक्षण साहजिकच या घराण्यात पं. मधुकरराव (नानासाहेब) सडोलीकर यांच्याकडे झालं होतं. लग्न होऊन ती भिडे या गानलुब्ध घराण्याची सून म्हणून मुंबईला आली. भिडे परिवाराचे स्नेही व हितचिंतक पं. वामनराव देशपांडे मोगुबाईंचे शिष्य होते. भिडय़ांच्या नव्या सुनेला तिच्या घराण्याची तालीम सुरू राहावी म्हणून मोगुबाईंना भेटवायला ते गोवालिया टँकच्या ‘अशर मॅन्शन’मध्ये घेऊन गेले. माई घरी नव्हत्या, पण ताई होत्या. ‘या नव्या मुलीला- माणिकला आपल्या घराण्याची तालीम हवीय,’ असं वामनरावांनी म्हणताच ताईंनी आईला ‘गाऊन दाखव’ म्हणून फर्मावलं. आणि तिचं गाणं संपल्यावर ‘उद्यापासून माझ्याकडे शिकायला ये,’ म्हणून सांगितलं!

ताई गोवालिया टँकला राहत असत आणि आई नाना चौकात! रोजच्या रोज तालीम जोरात सुरू झाली. हे वर्ष असावं १९६४. त्यावेळी आईच्या बरोबरीनं ताईंकडे शिकत होते- सुहासिनी मुळगावकर, भारताच्या सरन्यायाधीशांच्या पत्नी प्रभाताई चंद्रचूड, मालती कामत, मीरा पणशीकर, कधीमधी सुलभा पिशवीकर, अरुण द्रविड वगरे.  १९६८ मध्ये माझे वडील वर्षभरासाठी लंडनला गेले. त्यावेळी मी अन् माझा भाऊ प्रायमरी शाळेत होतो. एप्रिलमध्ये शाळेला सुट्टी लागली तेव्हा आईनं महिनाभर लंडनला जाऊन यायचा बेत केला. ताईंचे भाऊ- बाबुमामा- त्यावेळी लंडनलाच होते. ताई म्हणाल्या, ‘मीपण येते. आपण दोघी बरोबरच जाऊ.’ मात्र, आईला वडिलांच्या एका सहकाऱ्याची सोबत मिळाल्यामुळे ‘मी जाते’ असं ताईंना सांगून आई लंडनला पोचली. यावरून ताई खूप चिडल्या. आई सांगते, ‘लंडनमधल्या पहिल्याच वीकेंडला ‘सेलफ्रिजिस’मध्ये ताई समोर! इतक्या रागावल्या, की लहान मुलं रुसतात तशा तोंड फिरवून उभ्या राहिल्या. बोलायलाच तयार होईनात.’ मग आईनं त्यांची समजूत काढली, ‘आई, असं काय करताय? बोला नं, प्लीज..’ वगरे. मग पुढे लंडनच्या वास्तव्यात काही कार्यक्रम झाले तेव्हा ‘माणकी’ला घेऊन येण्याचं फर्मान सुटलं. आणि ‘माणकी’नंही त्यांचा हट्ट पुरवला. ताई अशा मनस्वी आणि आग्रही होत्या. माझी लहानपणची एक आठवण.. गिरगावातल्या ‘ट्रिनिटी क्लब’मधल्या कार्यक्रमात ऐकायला म्हणून गेलेल्या ताई ‘मी गायला बसते’ म्हणाल्या, तेव्हा रात्री एक वाजता गाडी पाठवून आईला झोपेतून उठवून बोलवून नेलं होतं!

आईचीही त्यांच्यावर तशीच भक्ती होती. तीनेक र्वष ताईंचा आवाज बसला होता, त्या काळात तालीम होत नव्हती तरी आई नियमितपणे त्यांच्याकडे ग्रांट रोडहून अंधेरीला जात असे. (त्यावेळी ताई अंधेरीला ‘जयविजय’ सोसायटीत राहायच्या. नंतर आई शिवाजी पार्कला राहायला आली, आणि ताई प्रभादेवीला!) आईची ताईंकडची तालीम इतकी नियमित असे, की रोज शिवाजी पार्क ते प्रभादेवी बसप्रवास करणाऱ्या माझ्या आईला पाहून लोक समजायचे की हिची प्रभादेवीला नोकरी आहे!

१९६४-१९८१. जवळजवळ १६-१७ वर्षांचा कालखंड. ज्या काळात माझ्या आईनं ताईंची सावलीसारखी सोबत केली. आई भाग्यवान. कारण तो काळ ताईंचा सुवर्णकाळ म्हणता येईल. जयपूर अत्रौली घराणेदार गायकीच्या प्रभावापासून अलग अशी ताईंची स्वतची गायकी निर्माण होण्याचा काळ!

‘मला त्यांचं गाणं कळायचंच नाही गं! डोक्यावरून जात असे. आज एक गायच्या, तर उद्या दुसरंच!’ असं माझी आई सुरुवातीच्या तालमीच्या दिवसांचं वर्णन करते. ताई कदाचित त्यावेळी वेगवेगळे प्रयोग करून बघत असाव्यात!

‘आज एक, तर उद्या दुसरंच..’ हे त्यांचं तत्त्व तर शेवटपर्यंत कायम होतं. स्वत:चं वळण त्यांनी कधीच गिरवलं नाही. भूपाची ‘सहेला रे!’, बागेश्रीची ‘बिरहा ना जला’, अहिर भरवाची ‘सावन बीतो जाय’ या नितांतसुंदर बंदिशी असोत, की ‘म्हारो प्रणाम’, ‘बोलावा विठ्ठल’, ‘घट घट में पंछी बोलता’, ‘अवघा रंग एक जाला’ अशा एकापेक्षा एक सरस संतरचना! स्वतच्या मफलीत त्यांनी त्या स्वत: नाहीच मांडल्या! मुखडा किंवा पहिली ओळदेखील त्या सातत्यानं बदलत. इतकी, की पेटीवादक हैराण होऊन विचारी, ‘याची ‘ओरिजिनल’ काय? मी काय रिपीट करू?’ त्यांच्या प्रतिभेचे आविष्कारच तेवढे नवनवोन्मेषशाली असायचे! अशा वेळी तंबोऱ्याच्या साथीला मागे बसलेली माझी आई त्यांच्या गाण्याला त्यांच्या बरोबरीनं साथ तर देत असेच; पण कल्पनेच्या अवकाशात उत्तुंग भराऱ्या घेणाऱ्या त्यांच्या प्रतिभाविलासाच्या पतंगाच्या दोरीचं काम जमिनीवर पाय घट्ट रोवून करीत असे. घरी तालमीच्या वेळी तर ताईंच्या कल्पनाविलासाला मर्यादाच नसत. कारण वेळेचं किंवा श्रोत्यांचं- कुठलंच बंधन नसे! अशा वेळी त्यांचे सांडलेले तेजोकण वेचण्याचा शिष्यांचा तोकडा प्रयत्न अन् धडपड चाले. तेही ताईंना नकोसं असे. कारण त्यामुळे त्यांच्या अर्निबध कल्पनाविलासाला अडथळा होई! मग त्या म्हणायच्या, ‘माझ्या मागून लगेच माणकी रिपीट करेल. नंतर बाकीचे!’

ताईंकडे शिकणंच काय, पण त्यांच्या सहवासात राहणं हीदेखील मोठी तपश्चर्याच होती! त्यांचं प्रेम आणि त्यांचा राग- दोन्ही पराकोटीचे! त्यांच्या प्रखर तेजाची दाहकता त्यांच्या जवळच्यांना सहन करावी लागे. माझी आई इतकी सतत त्यांच्याबरोबर असे, की हे प्रखरतेचे चटके कधी कधी तिच्या सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे जात. एका बाजूला ‘माणके, तू माझी मुलगीच आहेस गं!’ असं म्हणून आईच्या मायेनं माणिकला वागवणाऱ्या ताई दुसरीकडे न झालेल्या चुकांबद्दल ‘माणकी’ला जबाबदार धरून तिला प्रचंड शाब्दिक झोडपतही असत. अशाच एका पराकोटीच्या ताणाच्या क्षणी आईच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. वर्ष होतं १९८१. वर्षांनुवर्षांची रोजची तालीम बंद पडली. आईच्या दिनचय्रेत एकदम भलीमोठी पोकळी निर्माण झाली. पण एव्हाना आईने मला शिकवायला लागून चार-पाच र्वष झाली होती. या क्षेत्राची नवी साद आता आईला ऐकू आली. माझ्याबरोबरीनं वंदना, गीतिका, अन्वया, सारंगी वगरे अन्य मुलींना आई शिकवू लागली. इतकी र्वष इमानेइतबारे ताईंचं शिष्यत्व निभावलेल्या माझ्या आईनं आता गुरूच्या नव्या भूमिकेत प्रवेश केला.

आईनं ताईंना जी अनेक र्वष अविरत साथ केली, त्यातून तिनं काय वेचलं? सावलीसारखं सतत बरोबर राहून, गाऊनही आईचं गाणं तंतोतंत ताईंच्या गाण्यासारखं वाटलं नाही, याचं कारण तिनं गुरूंच्या गाण्याची ‘कॉपी’ केली नाही, तर त्यांची शाश्वत सौंदर्यतत्त्वं उचलली. त्यांच्या गाण्याची, शैलीची बा वेष्टनं नव्हेत, तर सुराला/ रागाला भिडण्याची, त्यात चिंब भिजून क्रीडा करण्याची वृत्ती आईनं आत्मसात केली. ताईंचं गाणं तिनं स्वत:चं केलं आणि मग ते आमच्यात पेरून दिलं. आम्हाला तिनं कधीही तिचं किंवा ताईंचं अंधानुकरण करू दिलं नाही, तर त्यांच्या सौंदर्यमूल्यांची दृष्टी दिली. ताईंकडून बाहेर पडल्यानंतरही तिनं सदैव ताईंचीच पूजा केली. दुसऱ्या कोणत्याही संगीताची आस वा कास बाळगली नाही.

यानंतरच्या वर्षांत जसा माझा संगीतप्रवास आईच्या दक्ष मार्गदर्शनाखाली सुरळीत चालला होता, तसाच ताईंकडेही रघुनंदन, नंदिनी आणि अन्य शिष्य आकाराला येत होते.

ताई आणि आई व मी.. आमच्यात मात्र फार संपर्क नव्हता. ताईंना मिळालेल्या पद्मभूषण, पद्मविभूषण, इ. गौरवप्रसंगी किंवा रविकाका आमोणकर वा माईंचा दु:खद मृत्यू असे मोजके प्रसंग सोडले तर मी व आई ताईंकडे क्वचितच गेलो असू. ताईंच्या जाहीर कार्यक्रमात हजेरी लावायलाही मला धास्तीच वाटत असे. जवळजवळ पंचवीस वर्षांनंतर – २००४ साली – ‘निरगुडकर फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित केलेल्या कलापिनी आणि माझ्या कार्यक्रमाला ताई फाऊंडेशनच्या ‘ट्रस्टी’ या नात्यानं हजर राहिल्या होत्या. मी स्टेजवर बसलेली असताना ‘चार शब्द बोलायला’ म्हणून ताई मंचावर आल्या. त्यांच्या ‘स्वरार्थरमणी’च्या निर्मितीचा तो काळ होता. ताई जुन्या ग्रंथांबद्दल, त्यांतल्या संगीतविचारांबद्दल आणि त्यांचं परिशीलन आणि संशोधनकार्य कसं गरजेचं आहे, याबद्दल उमाळ्यानं बोलल्या. भाषण संपवून मंचावरून त्या उतरत असताना मी उठून त्यांच्या पाया पडले, त्यावेळी भरल्या सभागृहात त्यांनी मला उठवून कवेत घेतलं. मी अंतर्बा मोहरून गेले. त्यांची अनपेक्षित कृती आणि माझ्या डोक्यावरून फिरलेला त्यांचा हात मला त्या क्षणी फार आश्वासक वाटला. मी त्या सुमारास माझ्या बंदिशींच्या संकलनाचं काम (रागरचनांजली) करीत होते. ताईंना मी कायम देवस्थानी मानीत आले. या देवाच्या चरणी आपलं काम ठेवायची मनीषा या प्रसंगानंतर माझ्या मनी उफाळून आली. आणि भीती व भीड बाजूला सारून मी त्यांना फोन करून भेटीसाठी वेळ मागितली. ‘तुला फक्त तुझं हस्तलिखित मला दाखवायचं आहे नं? मग पाच मिनिटांचंच काम आहे. मी संध्याकाळी सात वाजता रियाजाला बसते. त्याच्या आधी पाच मिनिटं ये. आजच ये..’ असं ताई म्हणाल्या.

माझं बाड त्यांनी केराच्या टोपलीत टाकलं आणि मला ‘चालती हो’ म्हणाल्या तरी चालेल, पण आपण आपल्या देवाच्या पायावर हे घालायचंच, या निर्धारानिशी मी सातला पाच मिनिटं असताना त्यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर ताई दोन तास माझ्याशी बोलत बसल्या.

‘हे बंदिशी वगरे सगळं ठीक आहे, पण तू तंबोरा घेऊन रागाचा/ सुराचा रियाज कर,’ असं त्या म्हणाल्या. ‘ ‘सा’ म्हणजे काय, ते तुला कळलं आहे का? ‘सा’ काय सांगतो? ‘रे’ काय सांगतो? स्वरभाषा म्हणजे काय? ती कशासाठी’ हे आणि इतरही बरंच काही मला सांगण्यामागची त्यांची तळमळ, कळकळ, सुरांवरचं त्यांचं प्रेम लपत नव्हतं. गंमत म्हणजे आईनंही मला हेच सांगितलेलं! ‘अगं, ते बंदिशी वगरे करणं सोडून जरा नेहमीसारखा रियाज कर की!’ असं आई मला म्हणत असे.

२००४ साली ‘रागरचनांजली’च्या प्रकाशन समारंभात ताई इतकं सुंदर बोलल्या, की त्यांनी लिहून आणलेल्या त्यांच्या भाषणाचा कागद एका वार्ताहरानं त्यांच्या हातातून तिथेच काढून घेतला आणि जसाच्या तसा छापला. मात्र, या सर्व समारंभात मी माझ्या आईला मंचावर बसवू शकले नाही. कारण ग्रीनरूममध्ये आई ताईंच्या पाया पडली तेव्हा ‘गॉड ब्लेस यू’व्यतिरिक्त ताई तिच्याशी काहीही बोलल्या नाहीत!

पुढली दहा र्वष आधीची भीती आणि ताण मागे सरून ताईंचे प्रेम आणि ऊब मला जाणवत राहिली खरी; पण आमच्या संभाषणात आईला स्थान नसे. २०१४ मध्ये ‘गानसरस्वती महोत्सवा’त ताईंच्या हस्ते मला पहिला ‘मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ दिला गेला, तेव्हा मी आईचा उल्लेख करू शकले नव्हते, या वास्तवाने मला अनेक दिवस कुरतडून खाल्ले होते. पण त्याच वर्षअखेरीस हीही परिस्थिती बदलली. ढाक्याच्या ‘बंगाल फाऊंडेशन’ या जगप्रसिद्ध कॉन्फरन्ससाठी मी व ताई आम्ही दोघींनी मुंबई-ढाका प्रवास एकत्र केला. त्यावेळी इतक्या वर्षांत प्रथमच ताईंनी माझ्याकडे आईच्या तब्येतीची चौकशी केली. या अनपेक्षित घटनेने मी इतकी गलबलून गेले, की माझ्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. ताईंनी त्यांच्या पर्समधून एक चांदीची डबी काढून मला दाखवली. कधीच्या काळी माझ्या आईनं त्यांना भेट दिलेली ती डबी त्या रोज बरोबर बाळगून होत्या. त्यांचे व त्यांची पट्टशिष्या असलेल्या माझ्या आईचे ताणलेले संबंध सुरळीत व्हावेत, दोघींचे पुनर्मीलन व्हावे, ही इच्छा त्यांची तर होतीच; पण त्यांच्या मुलीसारखी असणारी त्यांची केअरटेकर मीना, त्यांचा शिष्यवर्ग आणि आईचा शिष्यवर्ग या साऱ्यांचीच होती. त्यानंतरच्या गुरुपौर्णिमेला ताईंनी त्यांच्या विशाल हृदयात पुनश्च एकवार माझ्या आईला मानाची जागा दिली. त्या दिवशी त्यांच्या घरी आई जेवली तेव्हा त्यांनी जातीनं शेजारी बसून आईला प्रेमानं वाढलं. ‘माणिकने जशी माझी साथ केली, तशी तुम्ही कुणीच करू शकणार नाही,’ असं त्या दिवशी ताई सर्व शिष्यवर्गासमोर उद्गारल्या.

त्यानंतर गेली दीड-दोन वष्रे या गुरू-शिष्येचे संबंध पूर्वीसारखे प्रेमाचे राहिले. नुकत्याच पार पडलेल्या तेजश्रीच्या लग्नात तर ताईंनी किती वेळ आईला शेजारीच बसवून घेतलं. सोडलंच नाही. एक्याऐंशीव्या वर्षी माझी आई आता तब्येतीनं काहीशी हटली आहे. पण तरी तिला ‘तू माझ्याकडे येऊन माझ्याबरोबर गायला बस, म्हणजे तुला लौकर बरं वाटेल,’ असं तिच्यापेक्षा वयानं मोठय़ा असूनही तब्येतीनं खणखणीत असणाऱ्या ताई सांगायच्या. हे सांगण्यामागे माणिकची तब्येत सुधारावी ही सदिच्छा तर होतीच, पण ती गाण्यानंच सुधारणार आहे, हा अढळ विश्वासही होता. मला खात्री आहे, की ताईंनी यमराजालाही जसे हुकमतीने जवळ केले, तशीच ही जादूदेखील नक्की केली असती.

ashwinibdesh@gmail.com