महाराष्ट्राच्या मनामनांत रुजलेले ज्येष्ठ संगीतकार आणि गायक सुधीर फडके तथा बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या २५ जुलैपासून सुरू होत आहे.  त्यानिमित्ताने त्यांचे संगीतकार व गायक सुपुत्र श्रीधर फडके यांनी आपल्या पित्याच्या सांगीतिक, कौटुंबिक तसेच सामाजिक व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना दिलेला उजाळा..

माझे अण्णा.. अर्थात सुधीर फडके. सर्वाचे लाडके बाबूजी. खूप मृदू स्वभावाचे. शिस्तप्रिय, पण तितकेच हळवे आणि प्रेमळ. वागण्या-बोलण्यात कमालीचे सज्जन. सच्चे. साधे. बाबूजींची ही विविध रूपं मी लहानपणापासून पाहिलीत. आजही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा माझ्या मनात खोलवर रुजलाय. मी तर म्हणेन की, कसं बोलावं, कसं वागावं, हे संस्कार मी त्यांच्याकडूनच कळत-नकळत माझ्यात रुजवत गेलो. त्यांच्या त्या साधेपणाचे, सज्जनपणाचे संस्कार माझ्यावर झाले. आज ते हयात नसतानाही या संस्कारांची शिदोरी माझ्यासोबत कायम आहे. वडील म्हणून त्यांनी केलेल्या संस्कारांतलं मोठेपण मुलगा म्हणून मला नेहमीच जाणवत राहतं. संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणून त्यांनी मला जे दिलं ते तर अद्भुत आहेच; परंतु वडील म्हणून त्यांनी जे प्रेम, आपुलकी आणि संस्कार मला दिले, ते खरोखर अनमोल आहेत.

आम्ही घरी सर्वजण त्यांना ‘अण्णा’ म्हणत असलो तरी रसिकांमध्येही ते ‘बाबूजी’ या नावानेच परिचित आहेत. त्यामुळे यापुढे या लेखात त्यांचा उल्लेख मी ‘बाबूजी’ असाच करणार आहे. एक मोठय़ा आवाक्याचा संगीतकार व गायक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवला. पण तो मोठेपणा त्यांनी कधीच मिरवला नाही. अगदी सामान्यातील सामान्य माणसाशीही ते आपुलकीने वागत. समोरच्याला आपल्या मोठेपणाचं दडपण ते येऊ देत नसत, इतका आपलेपणा त्यांच्या वागण्यात असे. माझ्याशीच काय, पण घरातल्या इतर कोणाशीही वागताना त्यांचं संगीत क्षेत्रातील मोठेपण कधीही आड आलं नाही. वडील म्हणून त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं. पण त्या स्वातंत्र्याला शिस्तीची एक चौकटही होती. ते संगीतकार- गायक आहेत म्हणून मीही तेच करावं अशी त्यांची माझ्यावर कसलीही सक्ती नव्हती. अर्थात जे काही करशील त्याला एक शिस्त हवी, असा मात्र त्यांचा आग्रह असे. आणि हो, हवी ती आवडीची गोष्टी कर; पण शिक्षण, विशेषत: उच्च शिक्षण घ्यावं याविषयी ते आग्रही होते. शिक्षण पूर्ण करून मग पुढे आवडीच्या क्षेत्रात जे काही करता येईल ते करावं असं ते सांगत. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. त्यांना इंजिनीअर व्हायचं होतं. परंतु घरची परिस्थिती बेताची होती. अनेकदा चणे-फुटाणे खाऊन दिवस काढावे लागत. खायला मिळण्याचीच मारामार; तिथे शिक्षणाची काय बात? अशा परिस्थितीत प्रचंड कष्ट करणे यापलीकडे वेगळा विचार करणंच दुरापास्त होतं. पण एवढय़ा हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी दिवस काढूनही कोणत्याही प्रकारची कटुता त्यांच्या मनाला कधी शिवली नाही. आमच्या घरी जो कुणी येई तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे. आयुष्यातील संघर्षांचा लवलेशही कधी त्यांच्या वागण्या-बोलण्यात नसे. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव स्मित असे. प्रेमळ भाव असे. आपुलकी असे. लोकांप्रती जिव्हाळा असे. लहानपणापासून बाबूजींना मी असंच पाहिलं आहे.

बाबूजींकडून गाण्याचे संस्कार कळत-नकळतपणे माझ्यावर होत गेले. कानावर सतत गाणं पडत होतं. आमच्या घरी साहित्य आणि संगीत क्षेत्रातील बडय़ा लोकांचा सतत राबता असे. त्यामुळे गाणं, संगीत नेहमी ऐकलं जायचं. त्यांचं संगीत दिग्दर्शनाचं काम सुरू असे. ते गाण्याला चाल लावत असत आणि मी कधी कधी पडद्यामागून ती ऐकत असे. मी त्यावेळी दहा-बारा वर्षांचा असेन. एकदा मला त्यांनी पडद्याआडून गाणं ऐकताना पाहिलं. म्हणजे माझे पाय त्यांना दिसले. त्यांनी मला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं, ‘आत बसून गाणं ऐक.’ असं सतत गाणं कानावर पडत असतानाच थोडीशी तबल्याची आवडही माझ्यात निर्माण झाली. मी तबला शिकलो नाही; परंतु ठेका धरायला शिकलो. मी जसजसा मोठा होत गेलो तसतसं बाबूजींचं गाणं मनात अधिक खोलवर रुजत गेलं. अनेकदा चाल बांधताना ते मला जवळ बसवायचे. ताल द्यायला सांगायचे. मी डग्ग्यावर ठेका धरायचो तेव्हा ते मला आवर्जून सांगत : ‘लय जलद होता कामा नये आणि खेचताही कामा नये. गाणं लयीतच गायला हवं.’

आमच्या घरी गदिमा, शांताबाई शेळके, जगदीश खेबुडकर, सुधीर मोघे, कमर जलालाबादी, पंडित नरेंद्र शर्मा, मधुकर राजस्थानी अशी कवी मंडळी यायची. लताबाई यायच्या. आशाबाई यायच्या आणि रफीसाहेब, मुकेशजी, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, जयवंत कुलकर्णी, तसंच सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल हेदेखील गाण्याच्या तालमीसाठी यायचे. म्युझिक अ‍ॅरेंजर्सपकी श्यामराव कांबळे, प्रभाकर जोग, सेबॅस्टिअन आणि तबलजी केशवराव बडगे, चंद्रकांत नाईक, अण्णा जोशी येत. ढोलकीवादक लाला गंगावणे (ज्यांनी ‘आवारा’ चित्रपटात ढोलकी वाजवली आहे.) यायचे. ते पूर्वी आर्यन थिएटरमध्ये तमाशात ढोलकी वाजवायचे. बाबूजींनी त्यांना आग्रह करून मुंबईत आणलं. आधी ते मुंबईत यायला तयारच नव्हते. ‘मुंबईत आल्यावर तुमची प्रगती होईल,’ असा विश्वास बाबूजींनी त्यांना दिला. पुढे ढोलकीवादक म्हणून मुंबईत त्यांनी नाव कमावलं. त्यांच्या कलेचं चीज झालं. बाबूजींच्या कितीतरी गाण्यांकरता त्यांनी ढोलकी वाजवलीय. दुसऱ्याच्या कलेची कदर करणं, त्याला शाबासकी, दाद देणं- हा मनाचा मोठेपणा एक कलाकार म्हणून त्यांच्यात होता.

बाबूजींचे संगीताचे संस्कार माझ्यावर होत असतानाच ते संगीतकार म्हणून वादकांना कशा सूचना देतात, रेकॉर्डिग कसं करायचं, गाणं कसं बसवायचं.. हे मी अनेकवेळा रेकॉर्डिग ऐकायला जायचो ते नकळत माझ्या मनात ठसत गेलं. प्रभाकर जोग, श्यामराव कांबळे या वादकांकडून गाण्यातले मधले पीसेस ते बसवून घेत. बाबूजी तालाच्या व स्वराच्या बाबतीत इतके पक्के होते, की गाणं जराही इकडे तिकडे झालेलं त्यांना चालत नसे. रेकॉर्डिगच्या वेळी ते त्यांना हव्या त्या नेमक्या स्वरात वादकांकडून वाद्यं वाजवून घेत.

लताबाईंनी काही दिवसांपूर्वी एक किस्सा सांगितला.. ‘ज्योती कलश छलके’ या गाण्याचं रेकॉर्डिग मेहबूब स्टुडिओत सुरू होतं. त्यावेळी वादक वाद्यं टय़ुनिंग न करताच वाजवायला लागले. बाबूजींनी एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं. मग लताबाईंना म्हणाले, ‘आपण पाच मिनिटं थांबू. आधी वादकांना वाद्यं टय़ुनिंग करून घेऊ देत. मगच गाणं रेकॉर्ड होईल. अन्यथा गाण्याचं रेकॉर्डिग होणार नाही. रिहर्सलही होणार नाही.’ अतिशय शिस्तबद्ध असं त्यांचं काम असे. त्यांनी संगीतात वैविध्य राखलं. सगळ्या प्रकारची गाणी बांधली. भक्तिगीतं, प्रेमगीतं, लावण्या.. त्यात फडावरची, बैठकीची लावणीही आली. त्यांच्या संगीताचा आवाका मोठा आणि व्यापक होता. त्यांच्या चाली प्रासादिक होत्या. त्यांना चित्रपट संगीत क्षेत्रात भरपूर मान होता तो त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामामुळे आणि त्यांच्या शालीन वागणुकीमुळेच!

१९४६ मध्ये त्यांचा ‘गोकुल’ हा पहिला हिंदी चित्रपट आला. तो प्रभातचा चित्रपट होता. तेव्हापासून ते ८६-८७ सालच्या ‘रेशीमगाठी’, ‘पुढचं पाऊल’पर्यंतच्या त्यांच्या गाण्यांच्या चालींचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की, त्यांनी दिलेल्या चाली या प्रासादिक, लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशाच आहेत. विशेष म्हणजे काळाप्रमाणे त्या चाली बदलतही गेल्या. पण त्यांच्या चालींतलं माधुर्य मात्र कायम राहिलं. गायक म्हणून त्यांचा स्वर अप्रतिम आणि अचूक असे. मुळात आवाज गोड. सुस्पष्ट उच्चार. आणि अचूक भाव ते गाण्यात पकडत. उच्चारांबाबत तर त्यांचं ‘गीत रामायण’ हे आदर्शच आहे. रामायणातील व्यक्तिरेखांप्रमाणे ते गाणं सादर करत. गाणं ऐकून तो- तो प्रसंग, ती- ती व्यक्तिरेखा श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभी राही. ‘माता न तू वैरिणी’च्या वेळी या गाण्यात असलेला क्रोध, संताप त्यांच्या गायनातून उभा राही. याउलट, ‘पराधीन आहे जगती’मध्ये प्रभू रामचंद्रांनी भरताला केलेला उपदेश त्यांनी आपल्या गायनात नेमकेपणानं आणला आहे. यातून त्यांच्या गायनातील भव्यता दिसून येते. अर्थात याचं श्रेय गदिमांच्या शब्दांनाही आहे. बाबूजी आणि गदिमा म्हणजे जणू अद्वैतच!

अनेक दिग्गज हिंदी संगीतकार त्यांच्या गाण्यांचं कौतुक करायचे. ‘ज्योती कलश छलके’ला सवरेत्कृष्ट शास्त्रीय संगीत लाभलेलं गाणं म्हणून ‘स्वामी हरिदास पुरस्कार’ मिळाला.  बिर्ला मातोश्री सभागृहात हा पुरस्कार समारंभ पार पडला होता. तेव्हा मदनमोहनजी त्यांचं कौतुक करायला आले होते. नौशाद, खय्याम यांच्याशी त्यांचा छान स्नेह होता.

एकीकडे संगीतकार म्हणून त्यांचं असलेलं मोठेपण आणि दुसरीकडे माणूस म्हणून असलेलं त्यांचं साधेपण. त्यांच्या या दोन्ही गुणांविषयी मला खूप आदर वाटे. मोठा नावलौकिकमिळवूनही त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता. कधी कधी संध्याकाळी ते फिरायला जात. रस्त्याने चालता चालता ते गुणगुणत जायचे. शिवाजी पार्कला फेरी मारायचे. जवळच संघाची शाखा होती. तिथे प्रणाम करून ते घरी येत. यादरम्यान कोणी अनोळखी माणूस त्यांना भेटला तरी ते आपला मोठेपणा कधीच मिरवत नसत. त्या व्यक्तीशी ते प्रेमाने बोलत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक सहजता असे. मानमरातब मिळवूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले.

अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. ते सिने म्युझिक डायरेक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. ते मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य होतं. नेटकेपणाने काम पुढे कसं न्यायचं याचं कसब त्यांच्यात होतं. त्यांना उत्तम सामाजिक भान असल्याने ते कुठलंही काम त्याच ताकदीने, तळमळीने करीत. ते चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष असताना १९८२ साली त्यांनी अमेरिकेत पहिला मराठी चित्रपट महोत्सव भरवला. त्यांचे स्नेही दिलीप चित्रे, गोपाळ मराठे, डॉ. देव, शशिकांत पानट, विजू भडकमकर यांच्या सहकार्याने सात-आठ मराठी चित्रपट अमेरिकेतील पाच-सहा शहरांमध्ये तेव्हा दाखवले गेले. त्यावेळी मोबाइल, इंटरनेटसारख्या सुविधा नसूनही त्यांनी महोत्सवाची उत्तमरीत्या आखणी करून हा महोत्सव यशस्वीपणे तडीस नेला. आपल्या कामाप्रति त्यांची प्रचंड निष्ठा असे.

संगीत आणि गायनाबरोबरच राष्ट्रीय तसंच सामाजिक विषयांचंही त्यांना सजग भान होतं. संगीत क्षेत्रात बाबूजींचं काम मोठं आहेच; परंतु सामाजिक कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. देशाचे नागरिक म्हणून समाजाचं आपण काही देणं लागतो, ही भावना त्यांच्यात दृढ होती. ते गाण्याविषयी जेवढं जागरूक असायचे, तेवढेच सामाजिक गोष्टींबाबतही सजग असायचे. गोव्याचे स्वातंत्र्यवीर मोहन रानडे यांच्या सुटकेसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यासाठी ते गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर तसंच दिल्लीत इंदिरा गांधींना भेटले. त्यांनी ‘वीर मोहन रानडे विमोचन समिती’चीही स्थापना केली आणि मोहन रानडे आणि तेलो मस्कारनीस यांना पोर्तुगीजांच्या कारागृहातून सोडवण्याचे कार्य यशस्वीपणे पार पाडले.

१९७२ ची गोष्ट. महाराष्ट्रातील एका खेडेगावात दलित भगिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात त्यांनी उपोषण केलं. ही गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. माझ्या समाजातील एका भगिनीवर अत्याचार होतो आणि आम्ही शांत बसून कसं राहायचं? ही भावना त्यावेळी त्यांच्या मनात होती. ते कट्टर देशभक्त होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. सावरकरांचे निस्सीम भक्त होते. १९५४ मध्ये झालेल्या दादरा-नगर हवेलीच्या मुक्तीसंग्रामात आई आणि बाबूजींनी भाग घेतला होता.

१९६७ साली कोयना भूकंपाच्या वेळी विस्थापितांच्या मदतीसाठी चित्रपट कलाकारांनी निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच सुमारास त्यांचा विदर्भात दौरा होता. ते पहाटे प्रवास करून घरी येत असताना गाडीची खिडकी चुकून उघडी राहिली होती. भयानक थंडीमुळे गार वारा सतत त्यांच्या कानाला लागत होता. मुंबईत घरी आल्यानंतर झोपून सकाळी उठल्यावर तोंड धुताना त्यांच्या लक्षात आलं की, आपली चूळ डाव्या बाजूला पडतेय. त्यांच्या कानाच्या शिरांना वारा लागून बेल्स पाल्सी नामक आजार त्यांना झाला होता. काही दिवसांवर त्यांचा कार्यक्रम आला होता. त्यांच्याबरोबर बरेच कलाकार होते. सगळ्यांनी त्यांना सांगितलं की, ‘तुम्ही कार्यक्रमाला नका जाऊ.’ पण ते ऐकले नाहीत. म्हणाले, ‘मला झालेल्या आजारापेक्षा भूकंपपीडितांचं दु:ख मोठं आहे.’ त्याही परिस्थितीत त्यांनी निधी संकलनासाठी कार्यक्रम केला. १९७२ मध्ये नागपुरात संघातर्फेदुष्काळग्रस्तांसाठी कार्यक्रम झाला. तेरा हजार लोक ‘गीत रामायण’ ऐकण्यासाठी आले होते.

ग्राहक पंचायतीचे ते पहिले अध्यक्ष होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भव्य चित्रपट काढण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ या न्यासातून त्यांनी तो निर्माण केला. या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला. ते इच्छामरणी होते. ‘हा चित्रपट पूर्ण होऊन मगच मी जाईन,’ असं ते म्हणाले होते. आणि तसंच झालं. देश प्रथम आणि मग सर्व काही- हा विचार त्यांच्या मनात सतत असे.

बाबूजींना गाणं सांगताना मला खूप टेन्शन यायचं. ‘लक्ष्मीची पाऊले’ हा पहिला चित्रपट मला त्यांच्यामुळेच मिळाला. कोल्हापूरचे जी. जी. भोसले हे चित्रपट दिग्दर्शक आमच्याकडे आले होते. अरुण चिपडेंची निर्मिती होती. १९८० सालची ही गोष्ट. बाबूजींशी चित्रपटाच्या संगीताविषयी बोलणी सुरू असताना मी तिथेच सुधीर मोघेंच्या ‘फिटे अंधाराचे जाळे..’ या कवितेला चाल लावत बसलो होतो. त्यांनी बाबूजींना विचारलं, ‘‘हे गाणं मला चित्रपटात घेता येईल का?’’ ते म्हणाले, ‘‘हे कसं शक्य आहे? ही चाल श्रीधरची आहे. तुम्ही असं करा- तुम्ही त्यालाच सांगा. मी त्याच्यासोबत आहे.’’

मला आठवतंय, १९९१ ला शिवाजी महाराजांवर एक मराठी मालिका आली होती. मी त्यात रामदासस्वामींचे श्लोक स्वरबद्ध केले होते. ‘आला राजा मनीचा दिनकर कुळीचा’ असं समर्थानी शिवाजी महाराजांविषयी लिहिलंय. आणि त्याला जोडून ‘निश्चयाचा महामेरू’ या श्लोकाचं रेकॉर्डिग झालं. तेव्हा बाबूजी ७२ वर्षांचे होते. त्यात त्यांचा काय विलक्षण आवाज लागलाय! त्या गाण्यातून अगदी ठाम निर्धार व्यक्त होतोय. ते गाणं ऐकलं की अंगावर रोमांच  उभे राहतात. समर्थानी शिवाजी महाराजांचं केलेलं वर्णन त्यांनी हुबेहूब गायनातून उभं केलंय.

बाबूजींच्या गाण्यातलं माधुर्य मला नेहमीच भावत आलंय. त्यांच्या संगीताचा, गायनाचा प्रभाव माझ्यावर निश्चितच आहे. त्याचबरोबर माझ्या चाली या वेगळ्या आणि कठीण आहेत, असं रसिक आणि खुद्द बाबूजीदेखील म्हणत. समर्थ रामदासांच्या हिंदी रचनेला मी चाल लावली होती. अंतरा थोडा मुखडय़ापासून वेगळ्या स्वरात जाऊन बांधला होता. आणि परत मुखडय़ापर्यंत आलो होतो. जेव्हा मी त्यांना ही चाल थोडंसं दबकत दबकत ऐकवली तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे तुला कसं सुचलं?’’ माझ्या वडिलांनी आणि एका प्रतिभावान संगीतकाराने व गायकाने दिलेली ही कौतुकाची सर्वात मोठी पावती होती. माझ्यासाठी ते सर्वात मोठे पारितोषिक होते.

बाबूजी जितके शिस्तीचे पक्के होते, तितकेच हळवेही. त्यांनी नाती कायम जपली. माणसं जपली. मी जेव्हा पाल्र्यात राहायला आलो तेव्हा आपल्या नाती आपल्यापासून दूर जाणार, या विचाराने त्यांना अतिशय दु:ख झालं होतं.

आज ते हयात नसतानाही त्यांचं मोठेपण सतत जाणवत राहतं. वडील तसेच संगीतकार व गायक म्हणून ते अतिशय मोठे असल्याची भावना अधिक तीव्र होत जाते. त्यांच्यातल्या माणूसपणाची व त्यांच्या प्रतिभावान कार्याची जाणीव आणखीन गहिरी होत जाते, ती त्यांच्यानंतरही कायम असलेल्या त्यांच्या लोकप्रियतेतून..!

शब्दांकन : लता दाभोळकर