मितेश जोशी

अभ्यास, परीक्षा, प्रात्यक्षिक सगळं काही सांभाळून महाविद्यालयीन तरुणाई वेगवेगळ्या नाटय़स्पर्धामध्ये सहभागी होऊन दर्जेदार नाटय़कृती साकारते आहे. महाविद्यालयीन काळ हा व्यक्तिमत्त्व जडणघडणीचा काळ. या काळात आपलं नाटय़वेड जोपासताना जात्याच प्रयोगशील असलेली ही तरुण मंडळी रंगभूमीवर कसा सहभाग घेतायेत, कोणते नाटक त्यांना कलाकार म्हणून जास्त भावते या सगळ्याचा नुकत्याच होऊन गेलेल्या मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने घेतलेला आढावा..

रंगभूमीवर सध्याच्या घडीला विविध विषयांवर भाष्य करणारी नाटकं आहेत. केवळ व्यावसायिक नाटकांनाच नव्हे तर एकांकिकांच्या प्रयोगालादेखील हाऊसफुल्लचे बोर्ड मोठय़ा दिमाखात झळकत आहेत. नाटक जन्माला येण्यामागे अनेक लोकांचे हात असतात. नाटक घडायला अनेक लोकांची मेहनत असते. यात सध्या महाविद्यालयीन तरुणांचादेखील मोठा सहभाग पाहायला मिळतो आहे. कॉलेजचा अभ्यास, परीक्षा हे सगळं नीट सांभाळून तरुण मुलं राज्य नाटय़स्पर्धा, एकांकिका स्पर्धामध्ये मोठय़ा प्रमाणावर सहभागी होत आहेत. एकांकिका हा एक उंबरठा आहे. यातूनच पुढे ग्लॅमरविश्वाचा प्रवास सुरू होतो आणि त्यातूनच आणखी पुढे जाऊ न घडतात काही उत्तम कलाकार. महाविद्यालयीन काळात रंगभूमीवर झोकून देऊन काम करत नाटक-चित्रपट क्षेत्रांतील आपली वाट शोधणारे असे अनेक सर्जनशील तरुण कलाकार आज आजूबाजूला दिसत आहेत.

दहावीतून अकरावीला महाविद्यालयात प्रवेश करताना मुंबईतील तरुणांना जर सांस्कृतिक विभागात अधिक काम करायचं असेल, अधिक अनुभव संपादन करायचा असेल, तर मुलांचे पाय माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयाकडे आपोआप वळतात. या महाविद्यालयातून आजपर्यंत अनेक कलाकार, लेखक, कवी उत्तीर्ण होऊन बाहेर पडले. सध्या या महाविद्यालयाचा नाटय़वलय विभाग त्याच जोमात काम करतोय. व्यावसायिक रंगभूमीवर सुरू असलेलं ‘अनन्या’ हे नाटक याच महाविद्यालयात जन्माला आलं. ‘अनन्या’ या एकांकिकेपासून सुरू झालेली नाटय़वलयची यशस्वी घोडदौड मधल्या काळात थंडावली होती; परंतु पुन्हा एकदा ती घोडदौड जोमात सुरू झाली आहे. यंदाचा मानाचा आय.एन.टी. स्पर्धेचा विजयी मुकुट रुईयाच्या मस्तकी विराजमान झाला आहे. महाविद्यालयातील कलाकार मंडळींना अधिक प्रात्यक्षिक ज्ञान मिळावं या हेतूने वेगवेगळ्या कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं. यातून विद्यार्थ्यांचे रंगभूमीवरील व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. सध्या महाविद्यालयात तालमीचे वारे वाहत आहेत. रंगवैखरी, लोकसत्ता लोकांकिका आदी एकांकिका स्पर्धेत विजयी मोहर उमटवण्यासाठी कंबर कसली जात आहे.

नाटकात नेपथ्य जितकं महत्त्वाचं असतं अगदीच तितकंच महत्त्व नाटकाच्या विषयाला, नाटकातील संवादाला दिलं जातं. नाटय़लेखन हा नाटय़उभारणीचा पाया आहे, असं आपण म्हणू शकतो. बालनाटय़ातून पुढे येऊन आता चंदेरी विश्वात स्वत:चं लेखनविश्व उभं करू पाहणारा विनायक पुरुषोत्तम हा रुपारेल महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. विनायक दहावीत असताना एका बालनाटय़ स्पर्धेत सहभागी झाला ज्यात त्याला बक्षीस मिळालं. याच बक्षिसाच्या बळावर सांस्कृतिक कोटय़ातून त्याला रुपारेल महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातूनदेखील अनेक कलाकार घडले आहेत. केवळ रंगभूमीवर काम करण्याच्या हेतूने विनायकने या महाविद्यालयात प्रवेश घेतला. विनायकला बालनाटय़ातून मिळालेल्या अनुभवाच्या गाठोडय़ात इथे अधिकच भर पडू लागली. वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धामध्ये त्याच्या चमूने सहभाग घेतला. विनायक तेरावीत असताना काही कारणास्तव रुपारेल महाविद्यालयातील नाटय़वर्तुळाचे काम रखडले. केवळ  नाटकासाठी या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता व आता नाटय़वर्तुळातच राजकारण सुरू झाल्यावर विनायकने रुपारेलला रामराम ठोकला. त्या वेळात त्याने पुस्तक वाचून आपला कल एकांकिका लेखनाकडे वळवला. एकांकिका दिग्दर्शनाची धुरादेखील विनायक उत्तमरीत्या पेलतोय. विनायकने दरम्यानच्या काळात ‘ऑल द बेस्ट २’ या व्यावसायिक नाटकात काम केलं. व्यावसायिक रंगभूमीची तोंडओळख त्याला होऊ  लागली. सध्या त्याने रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘आमच्या हिचं प्रकरण’ या नाटकाचं साहाय्यक दिग्दर्शन केलं आहे. या नाटकातूनच पुढे त्याला ‘सोनी मराठी’वरच्या ‘हास्यजत्रा’ या कथाबाह्य़ कार्यक्रमात साहाय्यक दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. याच कार्यक्रमात विनोदी लेखक सचिन मोटे व इतर लेखकांसोबत स्क्रिप्ट लेखनाची संधीदेखील विनायकला मिळाली आहे. एकंदरीतच कॉलेजविश्वातील तरुण लेखकांची सद्य:स्थिती सांगताना विनायक म्हणाला, ‘‘मला आतापर्यंत माझ्या आधीच्या कामावरूनच पुढचं काम मिळत गेलं. सध्या कॉलेजमध्ये तरुण लेखकांची संख्या उत्तम आहे; परंतु चांगलं लिहिणाऱ्या लेखकांची संख्या कमी आहे. तरुण लेखकांच्या डोक्यात भन्नाट संकल्पना आहेत; परंतु त्यांना अचूक शब्दांत व्यक्त होता येत नाही. त्यासाठी पुस्तकवाचन हा एकमेव पर्याय आहे. वाचनाची गोडी वाढवून अचूक शब्दांत व्यक्त होता आलं तर इंडस्ट्रीची दारं सताड उघडी आहेत,’’ असं तो म्हणतो. विनायकला नवनवीन विषयांवर लेखन करून रंगभूमीवर प्रयोग घडवायचे आहेत..

मराठी रंगभूमीप्रमाणेच संस्कृत रंगभूमीवरदेखील आपलं योगदान महाविद्यालयीन तरुणाई देताना दिसत आहे. विद्याविहारच्या क.जे. सोमैया महाविद्यालयातील नाटय़दर्पण विभागाचे इथे आपण उदाहरण घेऊ. ‘देवशुनी’ या नाटकाच्या चमूने महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाटय़ स्पर्धा (संस्कृत विभाग) यंदाच्या वर्षी यशाची मोहोर उमटवली. त्याचबरोबर पुण्यातील स.प. महाविद्यालयात झालेल्या संस्कृत एकांकिका स्पर्धेवरदेखील मोहोर उमटवली. महाविद्यालयाचा नाटय़दर्पण विभाग केवळ संस्कृत रंगभूमीवरच थांबलेला नाही. येत्या काळात ते विविध मराठी एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत.

मुंबईतील रुईया महाविद्यालयाकडे ज्याप्रमाणे सांस्कृतिक चळवळींसाठी विद्यार्थ्यांचे पाय वळतात अगदी त्याप्रमाणे पुण्यातील स.प. महाविद्यालयातही याच नाटय़वेडापायी विद्यार्थ्यांचे मन धाव घेत असते. गेली ६८ वर्षे या महाविद्यालयात नाटय़मंडळ विभाग सुरू आहे. या विभागाने गेली अनेक वर्षे सलग पुण्यातील मानाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत विविध विभागांत बक्षिसं मिळवली. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे याच विभागातून पुढे आली. मुंबईतील मानाची सवाई एकांकिका स्पर्धा कित्येक वर्षांनी मृण्मयीच्या मेहनतीने जिंकली. सध्या या महाविद्यालयातदेखील तालमीचे वारे वाहत आहेत. मुंबईत होणाऱ्या विविध एकांकिका स्पर्धेत आपलं कसब अजमावण्यासाठी हे कलाकार कसून तालमी करत आहेत.

एकंदरीतच अभ्यास, परीक्षा, प्रात्यक्षिक, लेक्चर्स यांच्यातून वेळ काढून महाविद्यालयीन तरुणाई आपलं नाटय़वेड जपण्यासाठीही तितकीच धडपडताना दिसते आहे. रंगभूमीवर केवळ नाटय़ाविष्कार साकारण्यासाठी ही तरुणाई आसुसलेली नाही तर नाटय़गृहात जाऊन विविध नाटय़कृती पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठीही हीच तरुण मंडळी गर्दी करताना दिसतात. आजच्या तरुणाईला समाजात घडलेल्या घटनांवर भाष्य करणाऱ्या कलाकृती, नात्यांवर भाष्य करणाऱ्या कलाकृती पाहायला आणि मांडायलाही तितक्याच आवडतात. त्यामुळे नवनवीन प्रयोग करत रंगभूमीवर या तरुण रंगकर्मीचं नाटय़होत्र अविरत सुरू आहे.