आजची तरुणाई ‘कुछ तो हटके ’ या टॅगलाइनच्या जमान्यात जगते आहे. अंगावरच्या कपडय़ांपासून ते पायातील चपलेपर्यंत, हातातील घडय़ाळापासून ते ताटातील पदार्थापर्यंत तरुणाई नेहमीच काही ना काही हटके शोधत असते. त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रेस्टॉरंटच्या मेन्यूनेदेखील कात टाकली आहे. बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये तेच पदार्थ जराशा हटके अंदाजात चाखायला मिळतायेत. कधी बार फूड, हेल्दी फूड अशा वेगवेगळ्या संकल्पनांच्या नावाखाली तेच पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी थोडंसं रूप बदलून येतात. असाच काहीसा प्रकार सध्या स्पा फूड नावाने लोकप्रिय होतो आहे.
स्पा हे नाव घेतल्यावर चटकन आराम, रिलॅक्स, स्टीम, मसाज तत्सम गोष्टी डोळ्यासमोर येतात. तसंच स्पा फूड म्हटल्यावर पदार्थानादेखील वाफ देऊन (उकडवून) ताटात देतात का? अशी शंका लगेच मनात येते; पण असे काहीही नसून स्पा फूड ही निव्वळ एक टॅगलाइन आहे, असं तज्ज्ञ शेफचं म्हणणं आहे. स्पा फूड म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न सेलेब्रिटी शेफ वरुण इनामदारला विचारला असता, स्पा फूड ही निव्वळ टॅगलाइन आहे. आजकाल भारतात रेस्टॉरंटच्या मेनू लिस्टमध्ये स्पा फूड या नावाने खवय्यांची दिशाभूल केली जाते आहे, असं आपलं स्पष्ट मत असल्याचं वरुणने सांगितलं.
आजकालच्या धावपळीच्या जगात चार दिवस निवांत वेळ घालवण्यासाठी, शारीरिक थकवा नाहीसा करण्यासाठी लोक बक्कळ पैसे मोजून रिसॉर्ट, बडय़ा रेस्टॉरंटला भेट देतात. स्विमिंग पूल, जिम, स्पा आणि त्याच्या जोडीने तिथे मिळणाऱ्या स्वादिष्ट परंतु हेल्दी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊन रिफ्रेश होऊन परततात. हा शारीरिक थकवा शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळाल्या तरी नाहीसा होतो. हेच शीण घालवणारे पदार्थ स्पा फूडच्या नावाखाली सव्र्ह केले जातात. स्पा फूड ही संकल्पना अधिक खोलवर समजून घेण्यासाठी आपण ओट्सचं उदाहरण घेऊ . आजकाल सकाळी न्याहारीला ओट्स सगळीकडेच खाल्ले जातात, पण ते ओट्स ताकासोबत खायचे की दुधाबरोबर हे न्यूट्रिशियनने ठरवणं अधिक सोयीस्कर! कारण प्रत्येक मनुष्याच्या शरीरातली उष्णता, कॅलरीचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. आवश्यक पोषक घटक वेगवेगळे असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे घटक योग्य त्या पदार्थामधून मिळाले तर शरीराला फायदाच होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला उष्णता अधिक असेल तर त्याने ओट्स ताकातून खावेत. अशा प्रकारे ग्राहकांच्या प्रकृतीचा विचार करून त्यांना त्या पद्धतीचे खाद्यपदार्थ स्पा, रिसॉर्टमधून दिले जातात. न्यूट्रिशियन, शेफ व डाएटिशिअन हे तीन त्रिकूट एकत्र येऊन व्यक्तीच्या शरीराला आवश्यक गरजांनुसार स्पा फूड डिझाइन करतात. हवामानानुसार, ऋतूनुसार मिळणाऱ्या ताज्या भाज्या, फळं, ताजे मासे यांचे एकत्रित मिश्रण स्पा फूडमध्ये असतो. तुम्ही आम्ही जे रोज खातो ते स्पा फूडच तर आहे. तसं पाहायला गेलं तर थालीपीठ हे स्पा फूड आहे. पाच, सात, नऊच्या पटीत धान्य एकत्र दळून ते दगडावर थापून कुरकुरीत थालीपीठ ताटात आल्यावर जिव्हातृप्ती होतेच. त्यातून शरीराला अनेक फायदेच मिळतात. तसंच हॉटेलमध्ये मिळणाऱ्या स्पा फूडचं आहे. जिव्हातृप्ती व शरीराला फायदे मिळवून देण्याचं काम हे स्पा फूड करतंय, अशी माहिती वरुण इनामदार यांनी दिली.
या स्पा फूडचं नात बॉडी स्पाशी आहे का, हे स्पष्ट करताना, स्पा फूड कुझिन खूप मोठं कुझिन आहे. बॉडी स्पा करत असताना तुमच्या शरीरातली एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे पदार्थ तुम्हाला खिलवले जातात. त्याला ‘स्पा फूड’ असं संबोधलं जातं, अशी माहिती शेफ सचिन जोशी यांनी दिली. हे पदार्थ सर्वच स्पा पार्लरमध्ये खिलवले जातात असं नाही. परदेशात ते हमखास खायला दिले जातात. केवळ एकच एक पदार्थ आपल्याला स्पा फूडच्या नावाखाली खायला मिळतो असंही नाही. त्या त्या ऋतूनुसार, समोरच्या व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार हे फूड तयार केलं जातं, असंदेखील ते सांगतात.
थालीपीठ ज्याप्रमाणे मल्टिग्रेन हेल्दी स्पा फूड आहे तसंच थंडीत बनवला जाणारा उंधियू हादेखील स्पा फूडचाच प्रकार आहे. पातीचा हिरवा लसूण, हुरडा, गाजर म्हणजेच थंडीतल्या फ्रेश भाज्या एकत्रित करून चमचमीत उंधियू जेव्हा ताटात येतो तेव्हा तो जिव्हातृप्तीबरोबर थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीराला मदत करतो. शरीराला असंख्य फायदे देतो. अशाच थंडीसाठी स्पेशल स्पा फूडच्या रेसिपी शेफ सचिन जोशी यांनी सांगितल्या आहेत.
पालक टोफू मुटके
साहित्य : बारीक चिरलेला पालक, १५० ग्रॅम टोफू, कॉर्नस्टार्च दोन चमचे, मेक्सिकन मिरचीच्या बिया, तीळ तेल, मीठ, सोया सॉस, वॉनटॉन रॅपर्सच्या पट्टय़ा, टोमॅटो केचप, व्हिनेगर, १ चमचा मध.
कृती : उकळत्या पाण्यात चिरलेला पालक २० मिनिटे उकळून घ्या व लगेच चाळणीत घालून गार करा. उकळण्यासाठी वापरलेले गरम पाणी बाजूला ठेवा. पालक गार झाल्यावर एका बाऊलमध्ये जाडसर चिरून ठेवलेला टोफू, तीळ तेल, कॉर्नस्टार्च आणि सोया सॉस एकजीव करा. एका वेळी ४ वॉनटॉन पेपर्स मांडून त्याच्या मध्यभागी एक एक चमचा तयार पालकाचं मिश्रण घाला आणि काठ बंद करून त्रिकोणी पुडी बांधा. अशाच सर्व वॉनटन्स्च्या पुडय़ा बांधून उकळत्या पाण्यात ३ मिनिटे उकडून घ्या. नंतर गाळून प्लेटमध्ये द्या. एका वाडग्यात सोया सॉस, व्हिनेगर आणि मध एकत्र करून हे मिश्रण सॉस म्हणून बरोबर द्या.
तजेलदार रिफ्रेशर
साहित्य : ३ पुदिन्यांची पाने, बर्फाचे तुकडे, १ कप अननसाचा रस, १ चमचा साखर, २ मोठे चमचे डाळिंबाचा रस.
कृती : पुदिन्याची पाने ठेचून घ्या. एका मोठय़ा काचेच्या ग्लासमध्ये १ कप अननसाचा रस १ चमचा साखर, २ मोठे चमचे डाळिंबाचा रस एकत्र करा. बर्फाचे तुकडे घालून सव्र्ह करा तजेलदार रिफ्रेशर.
कोळंबी काकडी सूप
हे हलके आणि ताजेतवाने सूप आहे. शाकाहारी सूप हवे असल्यास कोळंबी वगळावी. कच्चे पदार्थ वापरून स्वयंपाक केल्यास पोषक तत्त्वे टिकून राहतात आणि शरीराला फायदा होतो. काकडी सुमारे ९६ टक्के पाण्याने, कमी कॅलरीजनी बनलेली असते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होतेच, शिवाय फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासाठी मदत करते. म्हणूनच स्पामध्ये मसाज थेरपीनंतर हे सूप प्यायला देतात.
साहित्य सूपसाठी : ८ काकडय़ा बिया काढून चेचलेल्या, १ चमचा शेरी व्हिनेगर, ऑलिव्ह तेल, २ चमचे मध, पुदिना, सैंधव मीठ.
भाज्यांच्या मिश्रणासाठी : मिरपूड, १ कप लाल सिमला मिरची बारीक चिरलेली, १ कप काकडी बिया काढून बारीक चिरलेली, १ कप चिरून बडीशेपच्या रोपाचा कांदा, इटालियन पार्सेली, ऑलिव्ह तेल, सैंधव मीठ.
कोळंबीसाठी : १२ कोळंबी, १ लिटर पाणी, व्हाइट वाइन व्हिनेगर, २ चमचे सैंधव मीठ.
कृती : सूपसाठी लागणारे सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये बारीक करा. भाज्यांसाठी सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये बारीक करा. पाणी, व्हिनेगर आणि मीठ उकळून कोळंबीवर ओता. २ मिनिटांनी कोळंबी पाण्यातून गाळून ५ ते ६ कोळंबी रेफ्रिजरेटरमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. सूपची तयार पेस्ट व कोळंबी ५ मिनिटं एकत्र शिजवा. सवर्हिंग बाऊलमध्ये भाज्यांची तयार पेस्ट घ्या. त्यात हळूहळू सूप ओता. दोन-तीन थंड कोळंबी वर ठेवून सव्र्ह करा.
चिकन विथ शतावरी
शतावरी कमी कॅलरीज आणि आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटने भरलेले आहे. पोषक द्रव्यांचा मोठा स्रोत असलेल्या शतावरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ज्यात वजन कमी होणे, पचनशक्ती सुधारणे, निरोगी गर्भधारणा आणि रक्तदाब कमी करणे यांचा समावेश होतो. पेशंटचा रक्तदाब व पोटाचे विकार कमी करण्यासाठी स्पा रिसॉर्टमध्ये या पाककृतीचा स्पा फूडमध्ये समावेश केलेला दिसतो.
साहित्य : ७०० ग्रॅम ताजे शतावरीचे कोंब कापलेले, ऑलिव्ह तेल, मीठ, ताजे मिरपूड, उकडलेल्या चिकनचे ४ पातळ काप, १ कप चिरलेला कांदा, ३ कप चिकन किंवा भाजीपाला स्टॉक, ३ चमचे आर्बेरियो तांदूळ, किसलेले जायफळ, लिंबाचा रस.
कृती : ४०० डिग्रीला ओव्हन तापवून घ्या. मोठय़ा वाडग्यात ऑलिव्ह तेल, मीठ आणि मिरपूडसह शतावरी टॉस करा. ओव्हनमध्ये बेकिंग शीटवर एकाच थरामध्ये शतावरी व्यवस्थित पसरवा. तपकिरी रंगाची होईपर्यंत २० मिनिटे भाजा. २० मिनिटांनी ओव्हनचं तापमान ३५० डिग्रीवर सेट करून बेकिंग शीटवर चिकनचे स्लाइस १० मिनिटं बेक करा.
एका लोखंडी कढईमध्ये उर्वरित ऑलिव्ह ऑइल आणि कांदा साधारण ९ ते १० मिनिटे मंद आचेवर शिजवा. त्यात भाजलेली शतावरी, चिकन स्टॉक, आर्बेरियो तांदूळ, जायफळ घाला आणि उकळवा. झाकण ठेवा आणि तांदूळ अतिशय मऊ होईपर्यंत म्हणजेच सुमारे २० मिनिटे शिजवा.
शब्दांकन – मितेश जोशी
viva@expressindia.com