अॅक्सेसरीज हा रोजच्या फॅशनमधला महत्त्वाचा भाग. सध्या तर अॅक्सेसरीजच्या बाबतीतही चोखंदळ असलेल्या तरुणाईचा कल हा युज अॅण्ड थ्रो, स्मार्ट पण जास्त महागडे नसलेले, एकाच गोष्टीचे अनेक पर्याय देणाऱ्या आणि त्यातही नवं काही हटके देणाऱ्या अॅक्सेसरीजकडे आहे. आणि हेच हेरून सध्या बाजारात अनेक नवीन गोष्टी येऊ लागल्या आहेत. अॅक्सेसरीजच्या मार्केटमधील या स्मार्ट, ट्रेंडी पर्यायांची ही झलक..
प्लॅटिनम ज्वेलरी
आताची तरुण पिढी रोजच्या जीवनातही छोटी, ट्रेंडी ज्वेलरीच वापरतात. रोजच्या जीवनात किंवा अगदी मोठय़ा कार्यक्रमालाही तरुण पिढी सोन्याच्या दागिन्यांपेक्षा चांदी किंवा प्लॅटिनमच्या ज्वेलरीला प्राधान्य देते आहे. प्लॅटिनम ज्वेलरीविषयी नुकतंच एक सर्वेक्षण झालं त्यातील निष्कर्षांनुसार तरुणवर्गात आणि अगदी विवाहितांमध्येही प्लॅटिनम ज्वेलरीचं आकर्षण वाढतं आहे. याविषयी ‘सेंको गोल्ड अॅण्ड डायमंड्स’चे डायरेक्टर सुवंकार सेन सांगतात. ‘आजच्या तरुण पिढीच्या मागणीमुळे सध्या सगळ्याच सराफांकडून प्लॅटिनमची विक्री केली जाते आहे. आजच्या पिढीला प्लॅटिनमचे महत्त्व आणि त्यामुळे व्यक्तिमत्त्वाला येणार उठाव या दोन्ही गोष्टींची माहिती असल्याने त्यांच्याकडून प्लॅटिनम ज्वेलरीसाठी मागणी वाढते आहे. आपल्याकडे सध्या जी प्लॅटिनमची धूम आहे ती केवळ या तरुणाईच्या जोरावर आहे आणि ही मागणी अजून वाढणार आहे हे आम्ही खात्रीने सांगू शकतो’. दागिने हा भारतीय विवाह सोहळ्यातील महत्त्वाचा आणि दुर्लक्षित न करता येणारा भाग आहे. तिथे अजूनपर्यंत फक्त सोन्याची अधिसत्ता होती. परंतु, आता ही परंपरा बदली आहे. ग्राहक भेटवस्तू देण्याकरिताही प्लॅटिनमच्या ज्वेलरीची खरेदी करतायेत. प्लॅटिनम ज्वेलरीमध्ये बाजारात प्लॅटिनम लव बॅण्ड्स, अंगठी, ब्रेसलेट, जड नक्षीकाम असलेले आणि नाजूक दोन्ही प्रकारचे नेकपीस, कानातले, छोटे डिझायनर पेंडंट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ही ज्वेलरी कोणत्याही आऊटफिट वरती आणि कोणत्याही कार्यक्रमाला सहज वापरता येण्याजोगी असल्याने त्याकडे कल वाढतो आहे.
स्मार्ट वॉच
खरं तर स्मार्ट वॉच ही काही तशी नवीन संकल्पना नाही. पण बाजारात तुम्हाला जी स्मार्ट वॉच मिळतात ती युनिसेक्स असतात. अर्थात ती मुले आणि मुली अशा दोघांसाठी डिझाइन केलेली असतात. पण ‘वॉचआऊट’ या भारतीय कंपनीने खास मुलींसाठी ‘वॉचआऊट वेअरेबल’ हे घडय़ाळांचं कलेक्शन नुकतंच बाजारात आणलं आहे. या विषयी ‘स्मार्ट वॉच’ या कंपनीचे सहसंस्थापक अभिषेक बाहेती सांगतात, ‘हे कलेक्शन पूर्णपणे मुलींना डोळ्यासमोर ठेवून, त्यांच्या गरजांचा अभ्यास करून डिझाइन केलेलं आहे. बाजारातील घडय़ाळ युनिसेक्स असतात त्यामुळे मुलींना ते प्रत्येक आऊटफिटवरती घालता येतातच असं नाही. स्नो-व्हाईट, रोझ गोल्ड आणि ब्लू सॅफिअर ही घडय़ाळं म्हणजे मुलींच्या हातावरती परफेक्ट बसतील आणि कूल लुक देतील अशी आहेत. याची बॉडी गोल्ड मेटॅलिक आहे तर पट्टा बारीक लेदरचा आहे. यामुळे मुली हे घडय़ाळ कोणत्याही ड्रेसवरती सहज कॅरी करू शकतात’. हे कलेक्शन डिझाइन करताना मार्के टमधील वॉच आणि स्त्रियांच्या अडचणी याचा अभ्यास करताना अनेकदा स्त्रियांच्या ड्रेसला खिसा नसतो त्यामुळे त्या त्यांचा फोन बॅगेत किंवा अन्य ठिकाणी ठेवतात. अनेकदा त्या फोन उचलू शकत नाही. त्यामुळे हातातील घडय़ाळावरच ही सोय उपलब्ध करताना त्यांना कु ठल्याही कपडय़ावर सूट होईल, फिट दिसेल अशा सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मार्केटमध्ये मुलींसाठी म्हणून आलेल्या स्मार्ट वॉचवर आपण कॉल घेऊ किंवा करू शकतो, यावरती मेसेज बघायची आणि पाठवायची सोय आहे. त्यामुळे कधीही वेळप्रसंगी मुली या घडय़ाळाचा योग्य वापर करू शकतात. याखेरीज यामध्ये फिटनेसविषयक कॅ लरी काऊंटर, स्टेप काऊंटर असं सगळंच आहे. या सगळ्या गोष्टीमुळे स्त्रियांना हे घडय़ाळ स्टायलिश लुकही देतं आणि एखाद्या मित्रासारखी अनेक गोष्टींमध्ये उपयोगीही पडतं.
चंकी आणि सिल्वर ज्वेलरी
रोजच्या जीवनात आपण बेसिक ज्वेलरी वापरतोच, पण हीच ज्वेलरी वापरून रोजच्या जीवनातही आपल्याला फॅशनेबल आणि हटके लुक हवा असतो. आणि म्हणूनच अनेक ब्रॅण्ड्सनी चंकी ज्वेलरी आणि सिल्वर ज्वेलरी बाजारात आणली आहे. अशाच ब्रॅण्डपैकी सध्या सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेला ब्रॅण्ड म्हणजे ‘आद्या’. या ब्रॅण्डअंतर्गत तुम्हाला नोज रिंग, कुडी, नेकपीस, कानातले, अंगठी, कंबरपट्टा असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. या कलेक्शनमध्ये तुम्हाला जुने ट्रेडिशनल मोटिफ, डिझाइन नवीन लुकमध्ये मिळतात. यामुळे इंडोवेस्टर्न असा या ज्वेलरीचा लुक तुम्ही ट्रेडिशनल, वेस्टर्न अगदी जीन्स, वनपीस अशा सगळ्याच आऊटफिटवरती कॅरी करू शकता. याखेरीज लोकल ते ग्लोबल अशा मार्केटमध्ये चंकी ज्वेलरीचा ट्रेंड काही महिन्यांपासून खूप आहे. ही चंकी ज्वेलरी लवकर खराब होत नाही आणि ती सगळ्या प्रकारातही उपलब्ध आहे. आणि याच्या किमतीही तरुणांच्या पॉकेटला परवडणाऱ्या असल्याने तरुणाई रोजच्या वापरात या ज्वेलरीला प्राधान्य देताना दिसते आहे.
कापडी ज्वेलरी
कापडापासून बनवलेली ज्वेलरी तशी नवीन नाही, पण आत्तापर्यंत ती फारशी ट्रेंडमध्येही येत नव्हती. मात्र हाच ट्रेंड बदलण्यासाठी आणि इकोफ्रेंडली ज्वेलरीचा पर्याय म्हणून अनेक ब्रॅण्ड्स सध्या बाजारात कापडी ज्वेलरी घेऊन उतरले आहेत. मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित या दोघींनी त्यांच्या ‘तेजाज्ञा’ या ब्रॅण्डअंतर्गत खण ज्वेलरी नुकतीच बाजरात आणली आहे. या कलेक्शनमध्ये खास खणापासून बनवलेले नेकपीस, चोकर तर कापडाचे आणि त्यावर हाताने रंगवलेले कानातले ज्यावर नथ, काही हटके शब्द प्रिंट करण्यात आले आहेत. ही ज्वेलरी तुम्ही ट्रेडिशनल आणि इंडो वेस्टर्न आऊटफिट दोन्हीवरती कॅ री करू शकता. याखेरीज अनेक ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरती तुम्हाला सिल्क दोऱ्याची आणि कापडाची, वेगवेगळ्या फुलांची डिझाइन असलेले नेकपीस, बांगडय़ा, कानातले यांचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.
एकूणच त्याच पारंपरिक वस्तू त्याच पद्धतीने वापरण्याचे नाकारणारी ही पिढी अॅक्सेसरीजच्या बाबतीतही आपला स्मार्ट दृष्टिकोन आजमावते आहे. त्यामुळे त्यांच्या गरजांनुसार आणि मागणीनुसार घडय़ाळापासून दागिन्यांपर्यंत सगळ्याच अॅक्सेसरीजचा स्मार्ट अवतार बाजारात पाहायला मिळतो आहे.