माइंडफुलनेस अ‍ॅप्स हे काही आपल्यासाठी नवीन नाहीत परंतु कोविड-१९ मुळे हे अ‍ॅप्स बरेच प्रसिद्ध झाले आहेत. रोजच्या ताणतणावाच्या पारस्थितीमधून बाहेर येण्यासाठी अनेकजण या अ‍ॅप्सचा वापर करत आहेत. रोजच्या कामातून काही मिनिटे जरी या अ‍ॅप्सवरत घालवले तरी अनेकांना शांत वाटतं. पण यातच विरोधाभास आहे. आपले मन शांत करण्यासाठी आणि माइंडफुलनेससाठी आपण एखाद्या डिव्हाइसवरील किंवा आपल्या स्मार्टफोनमधील अ‍ॅपचा वापर करतो. हे डिव्हाइस, स्मार्ट फोन स्वतःच एक स्ट्रेस देणारे म्हणून मानले जातात. या समस्येवर संशोधकांना चिंता आहे. यावर काही रिसर्च करून रिसर्च पेपरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

काय सांगतात रिसर्च पेपर्स?

२०१९ मध्ये जेएमआयआरएम हेल्थ आणि यूहेल्थने Calm नावाच्या अॅपचा स्ट्रेसमध्ये असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामाबद्दल अभ्यास केला. त्यात या अॅपचा सकारात्मक परिणाम दिसून आला. माइंडफुलनेसचे प्रत्यक्ष प्रोग्राम अटेंड करण्यासारखेच काम हे स्मार्टफोनमध्ये असलेले अ‍ॅप्स करू शकतात हे दिसून आले. Calm प्रमाणेच आणखी एक लोकप्रिय अॅप ज्याचा अभ्यास केला गेला. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या त्या अभ्यासाच्या मते, ‘अॅपचा १० दिवस वापर केल्यावर स्ट्रेस कमी होऊन सकारात्मक भावना जास्त वाढल्या आहेत’ हे दिसून आलं.

माइंडफुलनेस अॅप्स वापरणे चांगले आहे का?

हेडस्पेसने केलेल्या संशोधनानुसार, आरोग्य सेवा देणाऱ्यांमध्ये ४ सेशन नंतर १४% स्ट्रेस कमी झाला तर १२% स्ट्रेस वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ३० दिवसांनंतर कमी झालेला दिसून आला. इंटरनॅशनल मार्केटींगचे व्ही. पी. लुईस ट्रोन यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की “आम्ही सायंटिफिक संशोधनही केले आहे. ज्यात लक्षात आलं की, या अॅप्समुळे नकारात्मक भावना 28% कमी होते. जे सातत्याने १० दिवस मेडिटेट करत आहेत असे १६% लोक शेवटी आनंदी आहेत. दररोज कमीतकमी कोणत्याही पद्धतीने १ मिनिटासाठी मेडिटेट केल्यास फ्रेश वाटते.”

परंतु, असे अॅप्स वापरणे म्हणजे स्क्रीन टाइम वाढल्यासारखं होणार नाही का? या प्रश्नावर ट्रोन म्हणतात, “इफेक्टिव्ह आणि माइंडफुल स्क्रीन टाइम आपण नक्कीच करायला हवा. याचा अर्थ असा की हे अॅप्स वापरताना संपूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेणेकरून वाईट विचार मनात येणारच नाहीत. यामुळे आपल्याला शांत होण्यासाठी मदत होते. एकदा तुम्ही इमोशनली मेडिटेटरशी कनेक्ट झालात की फोन खाली ठेवून डोळे बंद करावेत आणि शांतपणे मेडिटेटर सांगत आहेत ते ऐकावं. यामुळे तुम्हाला फोनमधील बाकीच्या अॅप्सकडे दुर्लक्ष करण्यासाठी उपयोग होतो.