‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हणत विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करुन शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. एकमेकांना ही आपट्याची पाने देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.

साडेतीन मुहुर्तातील एक मुहुर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा असे या दिवसाचे महत्त्व सांगितले जाते. या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. याशिवाय कुटुंबातील मंडळी एकत्रितपणे देवीला जाण्याचाही प्रघात आहे. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. मात्र या दंतकथा असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आजच्या काळात आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा द्या असे म्हटले जाते. मोठ्या शहरांमध्ये विविध संस्था संघटनांकडून रावणाच्या प्रतिकृतीच्या दहनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात.

या दिवशाला सीमोल्लंघन म्हणूनही ओळखले जाते. याचे कारण शिवकालीन आणि पेशवेकालीन परंपरेत आहे. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत नक्की करत असत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. म्हणून हा दिवस सीमोल्लंघन म्हणून ओळखला जातो. आपल्या गावाची वेस ओलांडून जाणे याचा अर्थ सीमेचे उल्लंघन करणे.