सोशल मीडिया हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले आहे. कोणत्याही गोष्टीचे अपडेटस घ्यायचे असोत किंवा आपल्या एखाद्या जुन्या मित्र किंवा मैत्रीणीला शोधायचे असो. आपण या माध्यमाचा सर्रास वापर करतो. फेसबुक हे यापैकी एक आघाडीचे माध्यम आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. फेसबुकच्या माध्यमातून तर अनेकदा दुरावलेल्या नात्यांमध्ये पुन्हा ओलावा निर्माण झाल्याच्या आणि आयुष्यभरासाठीचे ऋणानुबंध जुळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. फेसबुक पुरेसे सुरक्षित नसल्याच्या काही घटना नुकत्याच समोर आल्या होत्या. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीने आपल्या सुरक्षेमध्ये वाढही केली होती. त्याचाच एक भाग म्हणून आणखी एक बदल करण्यात आला आहे. पूर्वी तुम्ही आपल्या मित्रमंडळींना त्यांचे मोबाइल क्रमांक टाकूनही शोधू शकत होतात. मात्र आता हे फिचर बंद करण्यात आले आहे.

एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असल्याने फेसबुकने मोबाइल क्रमांकावरुन व्यक्ती शोधण्याचे एक सोपे फिचर तयार केले होते. मात्र हे फिचर चुकीच्या पद्धतीने वापरले जात असल्याने फेसबुकने ते अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच फेसबुकने थर्ड पार्टी अॅपसाठीचे नियमही कडक केले आहेत. कोणतेही थर्ड पार्टी अॅप्लिकेशन आता फेसबुक युजर्सची वैवाहिक, धार्मिक आणि प्रोफेशनल माहिती जमा करु शकणार नाहीत. फेसबुकने एका ब्लॉगद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. याबरोबरच फेसबुकवर येणाऱ्या कोणत्या जाहिराती पहायच्या किंवा नाही हे आता युजर ठरवू शकणार आहेत. या जाहिरातदारांसोबत युजर्सची माहिती शेअर केली जाणार नाही असेही फेसबुकने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत फेसबुक स्वत:मध्ये अनेक चांगले बदल करत असल्याचे समोर आले आहे.