मानसिक ताण हा मनाला आलेला थकवा असतो असे आपण म्हणत असलो तरीही हा ताण येताना त्याची काही लक्षणे दिसतात. आता मानसिक समस्येची लक्षणे ही मानसिकच असली पाहिजेत, असा आपला सामान्य समज असतो. मात्र, मन आणि शरीर हे एकमेकांशी जोडलेले असल्याने मानसिक ताणाचा शरीरावर परिणाम होतो आणि काही लक्षणे दिसतात. ही लक्षणे आपल्याला सहज लक्षात येण्यासारखी असतात. मानसिक ताण आल्यास त्याचा मनाबरोबरच भावना, शरीर या सगळ्यांवरच परिणाम होतो. त्यामुळे व्यक्तीला नैराश्य आलेले असेल तर त्याचा शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो हे निश्चित. आता मानसिक नैराश्याची ही शारीरिक लक्षणे नेमकी कोणती ते जाणून घेऊया.

१. शारीरिक दुखणे – जे लोक दीर्घकाळ नैराश्यामध्ये असतात त्यांच्या शरीराचे विविध अवयव सारखे दुखत असतात. अंग जास्त काळ दुखत असेल तर डॉक्टरांना दाखवून योग्य ते उपचार घेणे केव्हाही चांगले. मात्र यासाठी डॉक्टरांना आवश्यक त्या मानसिक स्थितीची माहिती देणेही गरजेचे आहे.

२. जठर व आतड्यांविषयीच्या अडचणी – शरीरात विविध कारणांनी तयार होणारे एक प्रकारचे आम्ल आतड्यामध्ये तयार होते. जर एखादा व्यक्ती नैराश्यामध्ये असेल तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या पोटावर होतो. या व्यक्तींना नैराश्यामुळे अतिसार आणि बद्धकोष्ठता या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मानसिक अवस्था चांगली नसेल तर पोटाच्या आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात.

३. थकवा – तुम्हाला दीर्घकाळ थकल्यासारखे वाटत असेल तर नैराश्य हे त्यामागील एक प्रमुख कारण असू शकते. यामध्ये पुरेसा आराम आणि झोप झालेली असेल तरीही तुम्हाला थकवा आल्यासारखे वाटते. सकाळी झोपेतून उठताना फ्रेश वाटायला हवे. मात्र नैराश्य असणाऱ्या व्यक्तींना झोप पूर्ण झाली तरीही फ्रेश वाटत नाही. यामध्ये व्यायाम करणे, ऑफिसला जाणे किंवा इतर दैनंदिन कामे करण्याचा कंटाळा येतो.

४. अस्वस्थता – दीर्घकाळ नैराश्य असेल तरीही आळशीपणा आणि जडपणा येतो. यामुळे कोणतेही काम कऱण्याची इच्छा राहत नाही.

५. झोपेच्या अडचणी – नैराश्य आणि झोप यांचे अतिशय जवळचे नाते आहे. व्यक्ती नैराश्यात असल्यास त्याचा व्यक्तीच्या झोपेवर अतिशय वाईट परिणाम होतो. निराशेत असणाऱ्या व्यक्तींना अनेकदा निद्रानाशाचा त्रास होतो. याचे मुख्य कारण म्हणजे या व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या विचारात असतात. तर काही बाबतीत लोक इतके झोपतात की ते याआधी कधी झोपलेच नव्हते.

यातून बाहेर कसे पडायचे?

नैराश्याशी सामना करायचा असल्यास चांगल्या डॉक्टरांना दाखविणे गरजेचे असते. यामध्ये फॅमिली डॉक्टरशिवाय मनोविकारतज्ज्ञांचा सल्लाही महत्त्वाचा ठरतो. अशा घटनांमध्ये शरीरात होणारे बदल लक्षात घेऊन त्यामागील नेमके कारण शोधणे हे डॉक्टरांसाठी आव्हानच असते. मात्र वरील लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर योग्य ते उपाय करणे गरजेचे आहे. याशिवाय नैराश्याशी सामना करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती उपलब्ध आहेत याची माहिती करुन घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मानसी जैन

Story img Loader