सध्या करोनाने देशात थैमान घातलं आहे. त्यामुळे देशातील जनतेमध्ये आधीच भीती पसरली आहे. त्यातच वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी-खोकला किंवा अन्य लहान-मोठे त्रास जाणवत आहेत. त्यामुळे या काळात प्रत्येकाने आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसंच आपली रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या आहारात आणि जीवशैलीत काही बदल करण्याची आवश्यकता आहे. डॉ. अर्जुन वैद्य यांनी काही सोपे मार्ग सांगितले आहेत.
१. सकस आहार घ्या –
सकस आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या आहारातून शरीराला जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि सकस स्निग्धांश असे सारे पोषक घटक शरीराला मिळत असतात. त्यामुळे घरी तयार केलेले ताजे, सकस आहार शक्यतो घ्या. तसंच बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. चुकीची आहार पद्धती निवडली तर त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरासोबतच रोगप्रतिकारक शक्तीवरही होत असतो. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये साखर, सॅच्युरेटेड फॅट्स या आणि अशा अनेक घटकांचा समावेश असतो.
२. शरीराची आर्द्रता जपा –
रोगप्रतिकार शक्तीचा विचार करताना आपण आर्द्रतेचा विचार क्वचितच करतो. पण असे करणे चुकीचे असल्याचे अनेक आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितले आहे. शरीरातील पेसी आणि जयापचय संस्थेचं काम सुरळीतपणे सुरळीत राहण्यासाठी शरीरात मुबलक पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या क्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. त्यामुळे शरीराची आर्द्रताही समतोल राखली जाते. जेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण खाली जाते तेव्हा त्याचा थेट प्रभाव आपल्या श्वसन आणि पचनमार्गातील श्लेष्मल अंत:त्वचेवर पडतो. आपल्या श्वसनमार्गिकेला असलेल्या या श्लेष्मल वा चिकट पदार्थाच्या अंत:स्तर जंतू चिकटतात व गाळले जातात व ते शरीरात शिरून संसर्गास कारणीभूत ठरण्याआधीच अडवले जातात. चिकट स्त्रावाच्या या स्तराला कोणतीही हानी झाल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
३. पुरेशी झोप घ्या –
झोपेच्या शिस्तबद्ध वेळापत्रकाचे महत्त्व आयुर्वेदात अधोरेखित करण्यात आले आहे. दुर्दैवाने, हा सल्ला आपल्यापैकी बहुतेक जण सोयीस्कररित्या विसरून गेले आहेत. आता मात्र या सल्ल्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरले आहे, विशेषत: करोनाचा धोका समोर दिसत असताना ही गोष्ट अधिकच गरजेची बनली आहे. पुरेशा झोपेचा रोगप्रतिकारक यंत्रणेवर थेट परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासांतून सिद्ध झाले आहे. अपुरी झोप घेणा-या व्यक्तींनी हवेवाटे पसरणा-या आणि श्वसनमार्गाच्या संसर्गांचा धोका अधिक असलेल्या त्यातील काही अभ्यासांतून असेही दिसून आले आहे. जर तुम्हाला नीट झोप लागत नसेल तर तुम्ही ब्राह्मी आणि जटामासी यांसारख्या आयुर्वेदिक उपशामके किंवा तणाव कमी करणारी औषधे वापरू शकता.
४. धूम्रपान आणि अल्कोहोल सेवन थांबवा –
सिगारेट्स तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे आणि त्यांच्यामुळे करोना व्हायरसचा धोका अधिकच वाढू शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, धूम्रपानामुळे करोनाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये न्यूमोनियासारख्या गुंतागुंती उद्भवण्याचा धोका वाढतो. धूम्रपानामुळे (ई-सिगारेट्सही) फुफ्फुसांची हानी होते व शरीरात अँटीबॉडीज अर्थात रोगाशी मुकाबला करणारी द्रव्ये निर्माण होण्याची प्रक्रिया क्षीण होते. असे झाल्याने जंतूसंसर्गाचा, विशेषत: श्वसनमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. अतिरिक्त मद्यसेवनाचाही दाह वाढणे आणि रोगप्रतिकार शक्ती क्षीण होण्याशी संबंध असल्याचे आढळून आला आहे.
५. सक्रिय रहा –
चांगल्या आरोग्यासाठीची पूर्वअट म्हणून शारीरिक व्यायामाची दखल आयुर्वेदाने नेहमीच घेतली आहे. सध्याच्या काळात, जीम, पार्क्स आणि स्वीमिंग पूल्स बंद असले तरीही शरीराच्या हालचालींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. घरच्या घरीच का होईना पण आवर्जून व्यायाम करा. अगदी उठाबशा, दोरीच्या उड्या मारणे किंवा नृत्य यांसारख्या हलकेफुलके प्रकारही फायदेशीर ठरू शकतात. योगासनांचा पर्याय अर्थातच सर्वोत्तम आहे. नियमित शारीरिक हालचालींमुळे शरीरातील अँटीबॉडीजच्या निर्मितीमध्ये सुधारणा होते व रोगप्रतिकार शक्ती अधिक सक्रिय होते हे अनेक अभ्यासांतून सिद्ध झाले आहे.
६. योग्य सप्लिमेंट्स घ्या –
सर्वच सप्लिमेंट्स रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करत नाहीत. पण काही पदार्थ हे नक्कीच फायदेशीर ठरतात. इथे आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे सर्वच जीवनसत्वे किंवा खनिजांची सप्लिमेंट्स नैसर्गिक नसतात, त्यात काही कृत्रिम घटक असतात. रोगप्रतिकार शक्तीला बळ देणारे आयुर्वेदिक पदार्थ मात्र अत्यंत परिणामकारक मानले जातात, कारण ते संपूर्णपणे वनौषधींपासून बनलेले असतात. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तुम्ही आले, लसूण, तुळस, आवळा आणि पुदिना यांच्यासारखे नेहमीच्या वापरातले पदार्थ वापरू शकता. याखेरीज ज्येष्ठीमध, गुडुटी आणि अश्वगंधा यांच्यासारख्या वनौषधींची रोगप्रतिकार शक्तीवरील परिणामकारकता सिद्ध झालेली आहे. अर्थात यातील काही वनौषधी नैसर्गिक रूपात सहज उपलब्ध नसतात. पण या वनौषधींचा अर्क असलेल्या सप्लिमेंट्समधूनही तुम्हाला त्यांचे फायदे मिळू शकतात.
७. ताणतणावांची पातळी कमी करा –
ताणतणावांचा आपल्या आरोग्यावर अतिशय मोठा परिणाम होत असतो. ताणामुळे दुर्धर स्वरूपाचा दाह निर्माण होण्याची व जीवनशैलीशी निगडित आजार जडण्याची शक्यता वाढते. तसेच, त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीही क्षीण होते. ताणतणावांची पातळी कमी करण्यासाठी ध्यानधारणा हा सर्वात परिणामकारक उपाय आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही वेळी मनावरील ताण हलका करण्यासाठी या मार्गाचा वापर करता येतो. आपल्याला आनंद देणा-या, मन शांत करणा-या एखाद्या गोष्टीसाठी दिवसातला थोडा वेळ बाजूला काढायला हवा. टोकाचा ताण किंवा चिंता कमी करण्यासाठी गरज भासल्यास अश्वगंधा आणि ब्राह्मी यांसारख्या आयुर्वैदिक मन:शांतीकारक वनौषधींचा वापर करता येईल.
८. जल नेती करून पहा –
जल नेतीमुळे रोगप्रतिकार शक्तीला थेट बळ मिळत नसले तरीही ती अधिक सक्षम बनण्यास अप्रत्यक्षरित्या मदत होते. नासिका सिंचनाची ही पुरातन आयुर्वैदिक पद्धत श्वसनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. या पद्धतीमुळे श्वसनमार्गातील जंतूसंसर्गाचा धोका कमी होतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये ही गोष्ट खूपच फायद्याची ठरू शकते. जल नेती केल्यानंतर नस्य करण्याचेही फायदे आहेत. मात्र हे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करा.
९. श्वसनाचे व्यायाम –
आपल्या योग व ध्यानधारणेच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये प्राणायामाचा समावेश असायलाच हवा. श्वसनमार्गाशी संबंधित व हवेतून पसरणा-या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी या श्वासोच्छवासाशी संबंधित या योगिक व्यायामाचे होणारे फायदे सिद्ध झाले आहेत. कपालभाती आणि भ्रमरी यांसारख्या प्राणायाम पद्धती फुफ्फुसांना बळकटी देणारे, संसर्गांना आणि आजारांना रोखणारे व्यायाम म्हणून ओळखल्या जातात. याव्यतिरिक्त या श्वसनाच्या व्यायामांमुळे ताणतणावांची पातळीही खाली येते.
१०. सकारात्मक विचार करा –
आपल्या तारुण्यात आशावादी असलेल्या व्यक्तींचे आयुर्मान निराशावादी व्यक्तींच्या तुलनेत अधिक असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. नकारात्मकतेचा संबंध चिंता, ताणतणावांची पातळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होण्याशी असल्याचे दिसून आले आहे. दुस-या बाजूला, खळखळून हसण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती खरोखरंच वाढते असेही संशोधनांतून दिसून आले आहे. ‘laughter is the best medicine’ – हास्य हेच सर्वोत्तम औषध आहे. या जुन्या उक्तीला या निष्कर्षांनी पुष्टीच दिली आहे.