महिंद्रा थार ही 2020 मधील सर्वाधिक बहुप्रतिक्षित एसयूव्ही 2 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे भारतात लाँच झाली. नवीन थार 9.8 लाख रुपयांत पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. जुन्या थारच्या तुलनेत अधिक शक्तीशाली आणि शानदार लूक असलेल्या या गाडीला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. लाँचिंगनंतर आतापर्यंत या एसयूव्हीसाठी 20 हजारांपेक्षा जास्त जणांनी बूकिंग केली आहे. थारच्या डिलिव्हरीलाही सुरूवात झालीये, पण तरीही अनेक ग्राहक कंपनीवर नाराज आहेत.
या आठवड्याच्या सुरूवातीला कंपनीने 500 नवीन थारची डिलिव्हरी केली. पण अजूनही हजारो ग्राहक एसयूव्हीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची प्रतीक्षा अजून लांबण्याची शक्यता आहे. कारण, महिंद्रा कंपनी ग्राहकांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या प्रतिसादासाठी तयार नव्हती. त्यामुळे थारचा वेटिंग कालावधी सतत वाढत आहे. महिंद्रा थारच्या अनेक ग्राहकांना डिलिव्हरीची तारीख दिली जात आहे, पण ही तारीख बूकिंगच्या वेळेस डीलरने दिलेल्या तारखेपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे ग्राहक नाराज आहेत. अशात ग्राहकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महिंद्रा कंपनीकडून सुरू आहे, त्यासाठी कंपनी थारच्या ग्राहकांना एक चॉकलेटचा बॉक्स गिफ्ट म्हणून पाठवत आहे. पण चॉकलेट बॉक्सनेही ग्राहकांची नाराजी दूर झालेली नाही, सोशल मीडियावर थारचे ग्राहक याबाबत प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, एखाद्या कार कंपनीने डिलिव्हरी लांबल्यानंतर ग्राहकांचे आभार मानण्याचे ही काही पहिलीच वेळ नाहीये. एमजी मोटर इंडियावरही गेल्या वर्षी जून 2019 मध्ये हेक्टर एसयूव्ही लाँच केल्यानंतर अशीच वेळ आली होती. त्यावेळी ग्राहकांची नाराजी दूर कंपनीकडून गाडीच्या डिलिव्हरीला जितका उशीर होईल त्यानुसार दरआठवड्याला 1,000 अंक प्रतीक्षा पॉइंट्स म्हणून दिले जात होते. या पॉइंट्सद्वारे ग्राहकांना कंपनीच्या अॅक्सेसरीज खरेदी करता येत होत्या.