तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला असा संदेश घेऊन मकरसंक्रांत हा सण येतो. यावर्षी मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी आहे. संक्रांतीचा शुभ मुहूर्त हा १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे. या काळात दानधर्म केल्यास पुण्य लागते असे म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयावेळी केलेले गंगा स्नान शुभ मानले जाते.

कित्येक वर्षानंतर मकरसंक्रांत ही शनिवारी आली आहे. त्यामुळे हा दुर्लभ योग आहे. शनी हा मकर राशीचा स्वामी आहे. त्यामुळेच शनिवारी येणारी मकरसंक्रांत ही पुण्यदायी ठरणार आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये हा सण साजरा केला जातो. सूर्याचे दक्षिणायानातून उत्तरायणात ज्या तिथीला मार्गक्रमण होते त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करून उत्तरायण सुरू होते. या सणाच्या दिवशी दानधर्म केल्यास पुण्य लागते.

पूजेचा विधी

मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांमध्ये धन-धान्य टाकले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते यानंतर गृहिणी एकमेकांनी वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात. पुजेसाठी छोटे मडके किंवा सुगडे आणला जातात. या सुगड्यांना दोऱ्याने बांधतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते.

मकरसक्रांतीचे पौराणिक महत्त्व

मकरसंक्रांतीच्याच दिवशी गंगा नदीचे आगमन झाले पृथ्वीवर झाले होते अशी आख्यायिका आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहाचा स्वेच्छाने त्याग केला होता. दक्षिणायनमध्ये जर आपल्या देहाचा आपण त्याग केला तर आपल्याला गती मिळणार नाही अशी भीष्मांची आस्था होती. त्यामुळेच त्यांनी उत्तरायण हा काळ निवडला होता. उत्तरायणाचे सहा महिने हे शुभ असतात असे भगवद्-गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटले आहे.

Story img Loader