कर्करोगाचे निदान केवळ रक्त तपासणीने होणार असल्याचा दावा दातार कॅन्सर जेनेटिक्सने केला आहे . नव्या संशोधनात रक्तप्रवाहात फिरणाऱ्या ट्यूमर पेशींचे समूह शोधून काढणारी नवी क्रांतिकारी पद्धत वापरली असून यामुळे कर्करोगाचे लवकर निदान होण्यास मदत होत असल्याचा दावा यातून करण्यात आला आहे. या संशोधनात १६,१३४ जण सहभागी झाले. त्यापैकी ५,५०९ व्यक्ती कर्करुग्ण होत्या (ट्रुब्लड स्टडी), तर १०,६२५ जणांमध्ये कर्करोगाची कुठलीही लक्षणे नव्हती (रेझोल्यूट स्टडी). ही तपासणी ९४ टक्क्यांपेक्षाही अधिक अचूक असल्याचे स्पष्ट झाले.
भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांनी आपल्या नव्या संशोधनाद्वारे आजाराची कुठलीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या रक्तामधीलही कॅन्सरपेशींचे समूह हुडकून काढणाऱ्या नॉन-इन्व्हेजिव स्क्रीनिंग आणि डायग्नोस्टिक पद्धतीच्या अभिनव तपासणीचे पुरावे मांडले आहेत. या तपासणीमुळे कर्करोगाची चाचणी सोपी, परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होणार असून कर्करोग निदानासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. लवकरच व्यावसायिक पातळीवर ही तपासणी पद्धत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या संशोधनाचे मुख्य लेखक आणि दातार कॅन्सर जेनेटिक्सचे संशोधक संचालक डॉ. दादासाहेब अकोलकर यांनी सांगितले कि , “कर्करोगाच्या नव्या प्रणालीचे मापदंड निश्चित करण्यासाठी १६ हजारांहून अधिक जणांच्या बाबतीत संशोधन करून रक्तात फिरणाऱ्या ट्यूमरचे अस्तित्व शोधून काढणारे हे अशा प्रकारचे पहिलेच संशोधन आहे. आम्ही जी पद्धत वापरली आहे ती, नव्या वाटा खुली करणारी आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील ट्यूमरपासून ज्यावेळी पेशींचा समूह अलग होतो आणि रक्तप्रवाहात शिरतो, त्यावेळी अवघ्या १० मिली रक्तनमुन्याचा वापर करून आपण १० कोटी पेशींपासून काहीशे घातक पेशी अचूकपणे आणि प्रभावीपणे वेगळ्या करू शकतो. कर्करोगाच्या सर्वच नमुन्यंमध्ये हे पेशीसमूह अस्तित्वात होते, परंतु कर्करोग नसलेल्या काही नमुन्यांमध्येही ते आढळून आले.
कर्करोगाचे लवकर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु प्रभावी व विश्वासार्ह तपासणी पद्धतीच्या अभावामुळे हे काम तितकेच आव्हानात्मक देखील आहे. सध्या व्यावसायिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या बहुसंख्य चाचण्या या इन्व्हेजिव आणि महागड्या आहेत. त्याचप्रमाणे, मॅमोग्रॅम्स आणि लो-डोस सीटी स्कॅन्स (एलडीसीटी) यांसारखे सध्या वापरल्या जाणाऱ्या कर्करोग तपासणी पद्धतीत रेडिएशनचा धोका असतो, कोलोनोस्कोपी इन्व्हेजिव पद्धत आहे, रक्ताधारित मार्कर्स हे संदिग्ध आहेत, तर सर्वसाधारण शस्त्रक्रिया प्रक्रियेत जे धोके असतात, ते टिश्यू बायोप्सीमध्येही असतात. असे दातार कॅन्सर जेनेटिक्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन दातार म्हणाले