-डॉ. रिंकी कपूर
अनेकांचा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा. पाऊस पडायला सुरुवात झाली की वातावरणात मस्त गारवा जाणवायला लागतो. मात्र बऱ्याच वेळा सुखावणारा हा पावसाळा अनेकांना त्रासदायक ठरतो. काहींना पावसाळ्यात विविध त्वचाविकार होत असल्याचं पाहायला मिळतं. पाऊस पडायला सुरुवात झाली की विविध प्रकारचे त्वचाविकार डोकं वर काढू लागतात. त्यामुळे या त्वचाविकारांना दूर ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचे असते. म्हणूनच या दिवसांमध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात.
१. त्वचा आणि केस कोरडे ठेवा –
पावसाळ्याच्या दिवसात डोक्यावरील केस व त्वचा अत्यंत नाजूक बनते. भिजून आल्यावर आपली त्वचा आणि डोके कोरडे न केल्यास बुरशीच्या वाढीला प्रोत्साहन मिळते. ज्यांना कोंडा होण्याची सवय आहे, अशा व्यक्तींना केसांमध्ये खाज सुटते, बारीक संसर्गजन्य पुरळ येतात. त्यातून रक्त येते. केस प्रचंड प्रमाणात गळू लागतात. याकरिता केस/ डोके सतत कोरडे ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हवेतील आर्द्रतेमुळे आणि त्यामुळे येणाऱ्या सततच्या घामामुळे विषाणूंचा संसर्ग वाढतो. तसंच गुडघ्याच्या मागे, पायाच्या बोटांमध्ये अनेकांना चिखल्या झाल्याचं पाहायला मिळतं. या त्वचाविकारात दोन बोटांमध्ये खाज येते, त्वचा लाल होते, काही वेळा त्वचा फाटल्यासारखीसुद्धा होते.
२. चेह-याची स्वच्छता राखा –
शक्यतो साबणाऐवजी फेसवॉशचा वापर करा. अनेक वेळा साबणामुळे त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे फेशवॉशचा वापर उत्तम. फेशवॉशमुळे त्वचेवरील मळ काढून निघतो आणि चेह-यावरील छिद्रे मोकळी करतात. कोणत्याही साबणाने तुमचा चेहरा धुणे शक्यतो टाळावे. त्याप्रमाणे चेहरा हलक्या हाताने धुवा, जोरजोरात चोळून किंवा रगडून धुवू नका.
३. त्वचेला टोनिंगची गरज-
टोनरमुळे चेहऱ्यावरील घाण आणि मेकअप काढून टाकतो. त्यामुळे चेहऱ्यावरील छिद्र मोकळी आणि स्वच्छ होतात. त्यामुळे त्वचेला श्वास घेता येतो. तसंच सुरकुत्याही लवकर पडत नाहीत. टी ट्री ऑइल, लिंबाचा रस, गुलाबाचे पाणी, काकडीचे पाणी आणि कॅमोमाइल चहा यासारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश असलेल्या टोनरचा वापर करा. जे तुमच्या त्वचेवरील मुरुमांची समस्या कमी करते.
४. रोज मॉईश्चरायझरचा वापर करा-
त्वचेला कोरडेपणापासून दूर ठेवण्यासाठी मॉईश्चरायझरचा वापर करा. आपली त्वचा तेलकट दिसणार नाही अशा मॉइश्चरायझरची निवड करा. काकडी, नारळाचे तेल इत्यादीसारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझरची निवड करा. प्रवासादरम्यानही या मॉईश्चरायझरचा वापर करा.
५. सनस्क्रीनचा वापर करा –
सुर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी त्वचेला सुरकुत्या तसेच टॅन होण्यापासून रोखण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे गरजेचे आहे. पावसाळ्यातही आपण घराबाहेर पडताना प्रत्येक वेळी सनस्क्रीनचा वापर करावा.
६ भरपूर पाणी प्या –
पावसाळ्यात तहान लागत नाही म्हणून पाणी कमी पिऊ नका. शरीराला आणि त्वचेला पाण्याची आवश्यकता असते ती भरून काढा.
७. नो मेकअप लूकची निवड करा-
पावसाळ्यात तुमची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात अती मेकअप करू नये. कमीतकमी मेकअप करा. त्वचेला मोकळा श्वास घेऊ द्या.
८.स्क्रबचा वापर करा-
मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा फेस स्क्रबचा वापर करा. घरच्या घरी बेसन, ओट्स किंवा ब्राउन शुगर, कॉफी, ग्रीन टी, साखर, बेकिंग सोडा, पपई, दूध आणि मध यांच्यासह दही, कडुनिंबाचा वापर करुनही आपण स्क्रब तयार करू शकतो. गुलाब पाणी आणि मुलतानी मातीची पेस्ट बनवा आणि आठवड्यातून दोनदा आपल्या चेह-यावर लावा. हे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. बेसन, दूध, हळद आणि थोडी कडुलिंबाची पेस्ट एकत्र करून ती चेह-याला लावू शकता. मुरुमांपासून दूर होण्यासाठी याची नक्कीच मदत होईल
९.अँटी-फंगल पावडरचा वापर करा –
पावसाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. आपल्या त्वचेवर आणि आपल्या पायाच्या बोटांच्या दरम्यान आणि स्तनाच्या खाली एक चांगली अँटी-फंगल पावडरचा वापर करून तुम्ही बुरशीजन्य वाढ रोखू शकता.
१०. अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर टाळा –
त्वचेला कोरडेपणापासून रोखण्यासाठी अतिशय गरम पाण्याचा वापर न करता कोमट अथवा थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य राहील.
११. रात्रीच्या वेळी चेहरा स्वच्छ करून मगच झोपा –
रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढायला विसरू नका. त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून मगच झोपा. यासाठी क्लिंजर्सचा वापर करा.
१२. आर्टीफिशियल ज्वेलरीचा वापर टाळा –
पावसाळ्यात आर्टीफिशियल ज्वेलरी वापरत असाल तर तसे करू नका. कारण या दिवसांत धातुंवर पाण्याच्या ओलसरपणामुळे परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे त्वेचला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या दिवसात कृत्रिम दागिन्यांचा वापर करताना काळजी घ्या.
(लेखिका डॉ. रिंकी कपूर ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या सल्लागार डरमॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटो सर्जन आहेत.)