दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी पुढील वर्षापासून आपली लोकप्रिय प्रीमियम रेंज Galaxy Note सीरिज बंद करण्याची शक्यता आहे. करोना व्हायरसच्या संकटामुळे ‘हाय-एंड स्मार्टफोन्स’च्या (high-end smartphones) मागणीत कमालीची घट झाल्यामुळे कंपनीने नोट सीरिज बंद केल्याचा निर्णय घेतल्याचं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. मात्र, अद्याप कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रिसर्च फर्म काउंटरपॉइंटचे विश्लेषक टॉम काँग यांच्यानुसार, सॅमसंगच्या नोट सीरिजची विक्री यावर्षी 8 दशलक्षांनी कमी होण्याची शक्यता आहे. तर, S-सीरिजची विक्री 5 दशलक्षांनी कमी होण्याचा अंदाज आहे. “यावर्षी प्रीमियम फोनची मागणी बरीच कमी झालीये आणि नवीन प्रोडक्ट्सच्या शोधात असलेल्यांचं प्रमाणही बरंच कमी आहे”, असं काँग यांनी सांगितलं.
सॅमसंगने सर्वप्रथम 2011 मध्ये नोट स्मार्टफोन लाँच केला होता. लाँच होताच हा फोन चांगलाच लोकप्रिय ठरला होता आणि त्याच वर्षी पहिल्यांदा अॅपलवर मात करत सॅमसंग जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी ठरली होती. दरम्यान, Samsung पुढील वर्षी बाजारात आपल्या S सीरिजअंतर्गत एक नवीन स्मार्टफोन Galaxy S21 लाँच करणार असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये युजर्सना S pen चा सपोर्ट मिळू शकतो. आतापर्यंत युजर्सना केवळ Galaxy Note सिरीजसोबतच S pen चा सपोर्ट मिळत आलाय.