लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने काही दिवसांपूर्वी विंडोज फोनचा सपोर्ट थांबवला, त्यामुळे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर WhatsApp वापरता येत नाही. विंडोजनंतर आता काही अँड्रॉइड फोन आणि आयफोनचा WhatsApp सपोर्ट थांबवला जाणार आहे. एक फेब्रुवारीपासून काही मोबाइलमधून WhatsApp बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

यापूर्वी कंपनीने काही अँड्रॉइड फोन आणि आयफोनचा सपोर्ट बंद केला होता, त्या यादीमध्ये आता अजून फोनचा समावेश होणार आहे. फेसबुकची मालकी असलेल्या कंपनीने पोस्ट केलेल्या अधिकृत ब्लॉगनुसार iOS 7 आणि जुन्या सॉफ्टवेअरवर कार्यरत असणाऱ्या आयफोनचा व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट थांबवला जाणार आहे. याच ब्लॉगमध्ये कंपनीने काही अँड्रॉइड फोनचाही सपोर्ट थांबवणार असल्याचं स्पष्ट केलंय. एक फेब्रुवारीपासून व्हर्जन 2.3.7 किंवा जुने सॉफ्टवेअर असलेल्या अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही असं कंपनीने म्हटलंय.

त्यामुळे जर तुम्ही iOS 7 असलेला आयफोन किंवा 2.3.7 व्हर्जनचा अँड्रॉइड फोन वापरत असाल तर फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा. जर सॉफ्टवेअर अपडेट करण्याचा पर्याय उपलब्ध नसेल तर फोन बदलण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. कंपनी गेल्या काही काळापासून जुन्या फोनचा सपोर्ट थांबवतेय कारण पुढील काळात जुन्या व्हर्जनसाठी अपडेट दिले जाणार नाहीये.