Maharashtra Festivals in September 2023 : इंग्रजी कॅलेंडरचा नववा महिना सुरू होणार आहे. यंदा अधिक मासामुळे (दोन महिन्यांच्या श्रावणामुळे), सर्व उपवास आणि सण १५ दिवस उशिराने येणार आहेत. भाद्रपद महिना १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. उपवास आणि सणांच्या दृष्टीने सप्टेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
कृष्ण जन्माष्टमी, हरतालिका, गणेशोत्सव, ऋषी पंचमी यांसारखे मुख्य सण-उपवासही सप्टेंबरमध्ये येणार आहेत. तसेच सप्टेंबरमध्ये पितृपक्षही सुरू होणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये कोणते उपवास आणि कोण सण हे कोणत्या तारखेला येणार आहे हे जाणून घ्या …
सप्टेंबर २०२३ मधील उपवास व सणांची यादी
श्रीकृष्ण जन्माष्टमी
६ सप्टेंबरला बुधवारी जन्माष्टमी उत्सव आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी अनेक भक्त भक्तिभावाने उपवास, पूजा करतात.
गोपाळकाला किंवा दहीहंडी
७ सप्टेंबरला गुरुवारी गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी केली जाणार आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी म्हणजेच गोपाळकाला सण उत्साहात साजरा केला जातो.
हेही वाचा – तुमचे मुलं इंट्रोवर्ट आहे की लाजाळू? त्यांच्यात आत्मविश्वास कमी आहे का? अशी ओळखा लक्षणे
हरतालिका
१८ सप्टेंबरला हरतालिका व्रत असणार आहे. भाद्रपद महिन्यात गणरायाच्या आगमनाच्या एक दिवस आधी शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचे पूजन केले जाते. पतीच्या दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी महिला हे व्रत करतात. हे व्रत शिव-पार्वतीला समर्पित केले जाते.
गणेश चतुर्थी; गणेशोत्सवाची सुरुवात
सर्वांना गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी गणरायाचे आगमन होते. श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते. गणेशोत्सवाला या दिवसापासून सुरुवात होते. ११ दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्दशीला (२८ सप्टेंबर) श्रीच्या मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते.
ऋषी पंचमी
२० सप्टेंबर २०२३ रोजी ऋषी पंचमी आहे; जी हिंदू धर्मातील सात ऋषींना समर्पित आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी हे व्रत केले जाते. या दिवशी सात ऋषींची विशेष पूजा केली जाते.
ज्येष्ठा गौरी आवाहन
२१ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी आवाहन आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी घरोघरी गौरींचे आगमन होते.
ज्येष्ठा गौरी पूजन
२२ सप्टेंबर २०२३ रोजी ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गौरीपूजन पार पडते. घरोघरी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला जातो. सौभाग्यवती महिलांना जेवणासाठी बोलावले जाते. महिला एकमेकांच्या घरी हळदीकुंकू आणि गौरीच्या दर्शनासाठी जातात.
हेही वाचा पालकांनो, तुमच्या ‘या’ चुकांमुळे मुलं होत नाही स्वावलंबी, आजपासूनच स्वतःमध्ये बदल घडवून आणा
ज्येष्ठा गौरी विसर्जन
२३ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरींचे विसर्जन केले जाते. ज्यांच्या घरी गौरी येतात, त्यांच्याकडे गौरीसह गणेशमूर्तीचेही विसर्जन केले जाते.
परिवर्तिनी एकादशी
चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये असतात, असे मानले जाते. हा त्यांच्या विश्रांतीचा काळ आहे, असे मानतात. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला विष्णू शयनावस्थेत असताना कूस बदलतात म्हणून त्याला परिवर्तिनी एकादशी, असे म्हणतात.
२८ सप्टेंबर २०२३ – अनंत चतुर्दशी, गणेश विसर्ज
भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी ही अनंत चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. अनंत चतुर्दशीला गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. या दिवशी गणेशोत्सवाची समाप्ती होते आणि भगवान गणेशाला पूर्ण विधीपूर्वक निरोप दिला जातो.
पितृ पक्ष
२९ सप्टेंबर २०२३ पासून पितृ पक्षाला सुरुवात होईल. पितृ पक्ष भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्याअमावस्येच्या दिवशी समाप्त होतो. या काळात पूर्वजांच्या पुण्यतिथीला त्यांचे श्राद्ध विधी केले जातात. या काळात पूर्वजांविषयी आदर व्यक्त केला जातो.