Food To Increase Height: विचारांची उंची कितीही महत्त्वाची असली तरी रांगेत उभं राहताना, गर्दीत हरवायला नको म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनमध्ये पकडायचे हॅण्डल झाले की जरा उंची जास्त हवी होती असं आपल्यालाही वाटून जातं. उंची वाढवण्यासाठी अनेकजण अनेक सल्ले देतात. झाडाला लटक, उड्या मार, ताडासन आणि एक ना अनेक प्रकारचे उपाय तुम्हीही आजवर ऐकले असतील. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तुमचा आहार. आज आपण उंची वाढवण्यासाठी मदत करू शकतील अशा १० पदार्थांची यादी पाहणार आहोत. चला तर मग…
१) बदाम: बदामामधील व्हिटॅमिन्स व मिनरल्सच्या मुबलकतेमुळे उंची वाढण्यास मदत होऊ शकते. शिवाय बदामात असणाऱ्या उत्तम फॅट्स, फायबर्स, मँगनीज, मॅग्नेशियम यांच्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पोषक सत्व मिळू शकतात.
२) रताळे: रताळ्यांमध्ये असणारे जीवनसत्व ‘अ’ (व्हिटॅमिन A) हाडांना मजबुती देण्याचे काम करते. तसेच उंची वाढवण्यासाठी सुद्धा कामी येते.
३) अंडी: एका अभ्यासात असे आढळून आले की, लहान मुलांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अंडी खाण्यासाठी दिल्यास त्यांच्या उंचीत वाढ झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे शरीराला आवश्यक व्हिटॅमिन डी सुद्धा मिळू शकते.
४) बीन्स: बीन्समध्ये भरपूर प्रोटिन्स असल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढू शकते. हेच इन्सुलिन उंची वाढवण्यात सुद्धा मदत करू शकते.
५) दही: दह्यामध्ये विटामिन डी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. जे मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि त्यांची उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. दह्यातील प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य नीट ठेवण्यास मदत करते.
६) दूध: प्रत्येक लहान मुलासाठी दिवसभरात किमान एक ग्लास दुध पिणे अत्यंत आवश्यक आहे. दुधात भरपुर प्रमाणात कॅल्शियम, विटामिन डी आणि प्रोटीन आढळते. यामुळे मुलांच्या शारीरिक विकासासाठी मदत मिळते.
७) पालेभाज्या: साहजिकच अनेक लहान मुलांना पालेभाज्या खाऊ घालणे हा मोठा टास्क असतो पण याच पालेभाज्यांमधील व्हिटॅमिन के सारखे सत्व शरीराच्या वाढीस व हाडांच्या मजबुतीस वरदान सिद्ध होऊ शकतात.
८) सोयाबीन: प्रथिने, फोलेट, कार्ब्स, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असणारे सोयाबीन हे बर्याचदा उंची वाढवण्यास मदत करतात. सोया उत्पादनांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
९) केळी: केळी हे फळ असणारे पोटॅशियम, मॅंगनीज, कॅल्शियम, विघटनशील फायबर, व्हिटॅमिन बी 6, सी, ए आणि निरोगी प्रोबायोटिक्स सारख्या अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामुळे उंची वाढण्यास मोठी मदत होऊ शकते.
१०) क्विनोआ: क्विनोआमध्ये मुबलक प्रथिने शिवाय शरीराला आवश्यक नऊ अमीनो ऍसिड असतात. हाडांच्या ऊतींचा एक महत्त्वाचा भाग असलेला मॅग्नेशियम, मॅंगनीज, फोलेट, फॉस्फरस क्विनोआमध्ये असतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)